November 22, 2024
book-review-of-pay-aani-vata-by-arun-deshpande
Home » हरवलेल्या गावाकडे घेऊन जाणारे : पाय आणि वाटा
मुक्त संवाद

हरवलेल्या गावाकडे घेऊन जाणारे : पाय आणि वाटा

मुख्य म्हणजे “पाय आणि वाटा” हे वास्तव ललित लेखन आहे, यातील लेखन परिसर हा “गाव” आहे. गावाकडील भाव-विश्व, व्यवहार-विश्व, व्यक्ती-प्रवृत्ती आणि वृत्ती यांवर सचिन पाटील यानी फार भावनिक-आपलेपणातून लेखन केले आहे. हृद्यस्पर्शी, मनस्पर्शी, भावनाप्रधान लेखन हे “पाय आणि वाटा” मधील लेखनाचे प्रमुख आणि महत्वाचे वैशिष्ट्य आहे, असे मी म्हणेन.

अरुण वि. देशपांडे, पुणे

सध्याच्या मोबाईल, टी.व्ही.च्या जमान्यात वाचनसंस्कृती कमी झालीये असे वाटत असताना लेखक सचिन वसंत पाटील, यांच्या पुस्तकांना मराठी साहित्यक्षेत्रात फार मोठा वाचक वर्ग मिळाला आहे. विविध वर्तमानपत्रांतून, अंकातून, बातम्यातून सचिन पाटील यांच्या पुस्तकांबद्दल लिहिलेले लेख, मिळालेल्या साहित्य पुरस्कारांविषयी नित्यनेमाने गौरवपूर्ण अशी दखल, समीक्षालेख वाचण्यास, पहाण्यास मिळत असतात.

सचिन पाटील, यांच्या ‘सांगावा’ या २००९ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या कथासंग्रहाच्या चार आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. २०१६ साली प्रकाशित झालेल्या ‘अवकाळी विळखा’, ‘येरे येरे पैसा’ या पुस्तकांच्या तिसर्‍या आवृत्त्या आल्या आहेत. तर ‘गावठी गिच्चा’, या कथासंग्रहाचीही रसिक वाचकांनी चांगली दखल घेतली आहे, हे वरील आवृत्यांची आकडेवारी पाहून लक्षात येते. त्यांच्या साहित्याचा आढावा घेणारे आणि परिचय करून देणारे मान्यवर लेखकांचे चार समीक्षाग्रंथही प्रकाशित आहेत, हे विशेष आहे.

साहजिकच का वाचली जात असावीत त्यांची पुस्तके? असा विचार मनात येतो. माझे असे मत आहे, की या लेखकाच्या लेखनात असलेले वेगळेपण, त्याची चित्रमय लैखनशैली, विषय आणि आशय यांची वेधक मांडणी, शिवाय या सगळ्या लेखनात असलेली प्रचंड वाचनियता, हे गुण सचिन पाटील यांना अधिक उत्तम क्षमतेचा लेखक म्हणून सिद्ध करतात. यापुढे जाऊन त्यांची क्षमता वाचकांना पटवून देणारे या लेखकाचे २०२२ ला हर्मिस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले वास्तवदर्शी ललितलेखांचे पुस्तक “पाय आणि वाटा” हे आपण नक्की वाचायला हवे, असे मला वाटते.

या वर्षीचे मान्यवर संस्थाचे अनेक साहित्य पुरस्कार “पाय आणि वाटा” या लेखसंग्रहास जाहीर झाले आहेत, यात उत्तमोत्तम पुरस्कारांची भर पडत जाणार आहे. त्यांच्या याही पुस्तकाला आधीच्या पुस्तकांप्रमाणे यश प्राप्त होईल, आवृत्ती निघतील, याची खात्री वाटते. साहजिकच मग “पाय आणि वाटा” या पुस्तकातील ललित लेखनात असे काय जगावेगळे लिहिलंय? असे काय सांगितले आहे या लेखकाने ? असा प्रश्न जो मला पडला, हाच प्रश्न “पाया आणि वाटा” हे पुस्तक अजून न वाचलेल्या वाचकांना नक्कीच पडेल, म्हणून हा लेखन प्रपंच.

तर मित्रांनो, हे पुस्तक खूप वेगळं आहे कारण ऐन उमेदीच्या, आयुष्य बहरीच्या दिवसांत असताना एका अपघाताने सचिन वसंत पाटील, या युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. शरीराचा अर्धांग असणारे दोन्ही पाय कायमचे निकामी झाले. पण या जीवघेण्या आपत्तीवर स्व-मदतीने, आत्मबल आणि मुख्य म्हणजे कमालीच्या संयमाने, संयतपणे सचिन यांनी स्वतःला लेखनात गुंतवून घेतले. वीस वर्षे अंथरुणाशी खिळूनही त्यांच्या मनात असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्ती, पुस्तकांच्या सानिध्यात हे सगळे शक्य होऊ शकले. दुर्दम्य आशावाद, चिकाटी, सकरात्मक दृष्टिकोणाने हा माणूस आज निराशा कशी घालवावी… हे स्वानुभवाने आपल्या शब्दांतून सांगतो. या सगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे सचिन वसंत पाटील, यांना एक सकारात्मक जीवनाचे उदाहरण म्हणून “पाय आणि वाटा” मधील लेखनातून आपण पाहू शकतो.

जग काय म्हणते ? एक अपंग म्हणून लोक आपल्याकडे कशा नजरेने बघतात ? याकडे दुर्लक्ष करून स्वतःसाठी काय भले आहे, हे या सचिन पाटील यांनी नेमकेपणाने ओळखून अंगावर कोसळलेल्या आपत्तीने खचून न जाता, मानसिक क्षमतेच्या आधाराने जगणे सोडलेले नाही, हे फार महत्त्वाचे आहे. क्षुल्लक आणि किरकोळ गोष्टींनी हातपाय गाळून, हतबल, हताश, निराश झालेल्यांनी तर सचिन वसंत पाटील यांचे “पाय आणि वाटा” पुस्तकातील लेखन जरूर वाचावे. यातून खूप काही घेण्यासारखे आहे, हे प्रत्येक वाचकाला जाणवल्याशिवाय राहाणार नाही.

मुख्य म्हणजे “पाय आणि वाटा” हे वास्तव ललित लेखन आहे, यातील लेखन परिसर हा “गाव” आहे. गावाकडील भाव-विश्व, व्यवहार-विश्व, व्यक्ती-प्रवृत्ती आणि वृत्ती यांवर सचिन पाटील यानी फार भावनिक-आपलेपणातून लेखन केले आहे. ह्रदयस्पर्शी, मनस्पर्शी, भावनाप्रधान लेखन हे “पाय आणि वाटा” मधील लेखनाचे प्रमुख आणि महत्वाचे वैशिष्ट्य आहे, असे मी म्हणेन. मग तुम्हाला वाटेल, अपघाताने जायबंदी झालेल्या माणसाने आपले रडगाणे लिहिले असेल! पण तसेही नाही. या लेखनामधील वाटा पायांसोबत जसजशा चालत जावू तसतसे या लेखनातील दु:खाचे मर्म आपल्याला कळू लागते. आठवणींच्या पाऊलखुणा नकळत मनःपटलावर उमटू लागतात.

शहरीकरण हे फक्त मोठ्या गावांचे झालेले नाही तर ते अगदी लहान लहान, छोट्याश्या खेड्यांचे एक आधुनिक गाव, शहर झालेले पाहणे किती दु:खदायी आहे, कसे वेदनादायक आहे, हे भेदक वास्तव मांडतांना लेखक प्रत्येकाच्या मनातल्या, अंधुक झालेल्या, विसरून गेलेल्या, गावाच्या वाटा दाखवतो. आधुनिकीकरणामुळे वाळूच्या कणा प्रमाणे हातातून निसटून विस्मृतीत गेलेल्या अनेक शब्दरुपी गोष्टी आपल्याला इथे भेटतात.

मित्र हो, आज मी अशा एका पिढीचा प्रतिनिधी आहे की ज्याचे लहानपण, बालपण, कुमारवयीन दिवस, आणि नोकरीतले चाकरमानी दिवस, हा मोठ्ठा काळ अशाच पंचक्रोशीतील छोट्या, दूरदूरच्या खेड्यात गेलेला आहे. त्यामुळे “पाय आणि वाटा” वाचतांना लेखक सचिन यांनी माझ्या हाताला धरून मला जणू पुन्हा गावाकडच्या वाटा चालायला लावल्या, असे मी म्हणेन.

वाचक भाव-व्याकुळ होईल, असे हे लेखन आहे. आठवणींच्या संवेदनशील अनुभवासाठी तरी “पाय आणि वाटा” वाचायलाच हवे. १०१ पानांच्या या संग्रहात एकूण पंधरा ललितलेख आहेत. या सगळ्या लेखनातून लेखक स्वतःबद्दल व्यक्त होतांना, आपला गाव, परिसर, निसर्ग ताकदीने उभा करतो. त्यातील भावना त्याच्या वैयक्तिक नाहीत, तर त्या पिढी दर पिढी बदलत जाणारे गाव, माणसाची मनोवृत्ती याबद्दलची असणारी आंतरिक जिव्हाळ्याची, काळजीची भावना सतत शब्दांमधून जाणवत राहाते.

माझा गाव, माझ्या भोवतालीचा निसर्ग, शेत शिवार, आणि परिसरातील वातावरणात होत जाणाऱ्या बदलांचे, न टाळता येणारे भले आणि बुरे असे दोन्ही परिणाम याबद्दल लेखक व्यक्त होतांना तो तुमच्या, माझ्या आणि सर्वांच्याबद्दल विचार करताना दिसतो. माणसांची सुख-दुःख मांडतांना, माणुसकी, माणूस-धर्म जपणे महत्वाचे आहे, ही त्याची तळमळ एकूणच लेखनात जाणवत राहाते.

सर्वच लेख छान आहेत परंतु मला खूप आवडलेल्या काही लेखांचा उल्लेख जरूर करीन… लेख – ती बैलगाडी (पृ.२५), लेख- स्पर्श एक संवेदना… (पृ-३७), लेख- पोस्टाच पत्र हरवलं (पृ.५२), लेख- कोरडे डोळे (पृ.६१), माझं बदललेलं गाव (पृ.७९) इत्यादी… हरवलेलं गाव, रानातील पायवाटा, हरवलेलं बालपण, हरवलेल्या आठवणी, या सगळ्यांतून लेखक एकच सांगतो आहे की माणसाने आपल्याला बालपणी घडवणाऱ्या, जगवणाऱ्या, आपल्याच माणसांना आणि गावांना कधीच विसरू नये. उदाहरणार्थ…

१. बालपणीच्या आठवणींचे ठसे माणसाच्या मनावर कायमचे उमटलेले असतात. तहहयात ते जिवंत ताजे टवटवीत राहतात… (हरवलेल्या पायांचे ठसे.. पृ.८)

२. निदान या पुढच्या पिढीनं तरी दिवसभर नोकरी- कामधंदा करून घरी आल्यावर टी.व्ही. मालिकांमधून वेळ काढून मोबाईल, इंटरनेटच्या जंजाळात अडकलेल्या आपल्या मुलां-मुलींना संस्करांच्या चार गोष्टी शिकवाव्यात. त्यांच्यात आपल्या घराविषयी, घरपणाविषयी, गावपणाविषयी जागरूकता निर्माण करावी आणि “गाव “ही संस्कृती जपावी… (माझं बदलेल गाव..पृ. ७९)

३. आज माळाची ती ओबडधोबड वाट चकचकीत डांबराची झाली आहे. आता वळणावर ते आंब्याचं झाड दिसत नाही. तो म्हातारा, त्याची खोपही नाही. सगळंच हरवलंय, बदललंय, माणसं आणि माणसांची मनंही… (झाड आणि वाट..पृ..६४ )

खरेतर लेखक सचिन वसंत पाटील यांचे मला आभार मानायचे आहेत ते एका गोष्टीसाठी त्यांनी एके ठिकाणी सुचवले आहे की- तुमचे चालू शकणारे पाय आहेत ना, मग गावाकडची वाट चालायचे विसरू नका.. मनातल्या-मनात असलेल्या गावाला समक्ष डोळे भरून पाहून या! गावाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा.. पायवाटा पहात असताना येणाऱ्या आपल्या कुणाची तरी गाठ-भेट घ्या !

वडीलकीच्या नात्याने मी त्यांना भरभरून आशीर्वाद व लेखन शुभेच्छा देतो! या संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय आशयसंपन्न करणारे चित्रकार मित्र- अन्वर हुसेन यांनी गावाकडच्या वाटेचे हिरवेगार-सुंदर चित्र रेखाटले आहे. त्यातून धावणारे कथानायकाचे पाय हिरवळीत हरवले आहेत. खूप समर्पक आणि सुंदर वाटले हे चित्र. प्रकाशिका सुश्री-प्रिया सुशील धसकटे- हर्मिस प्रकाशन, पुणे यांनी हा वाचनीय, आशयगर्भ लेखसंग्रह सुंदर स्वरूपात प्रकाशित केला आहे. या सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

पुस्तकाचे नाव – पाय आणि वाटा (ललितलेख संग्रह)
लेखक – सचिन वसंत पाटील
पृष्ठे १०१, मूल्य- १५०/-
प्रकाशक – हर्मिस प्रकाशन, नांदेड सिटी- पुणे संपर्क – 9822266939


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading