November 21, 2024
Dr V N Shinde article on Thorn
Home » काट्याबद्दल बोलू काही…
मुक्त संवाद

काट्याबद्दल बोलू काही…

काटा.. शब्द ऐकला तरी टोचण्याचा भास होतो. काटा.. डोळ्यात पाणी आणि आतून हुंदका आणणारा. कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला. मूळ वेगळे असेल, कूळ वेगळे असेल, पण टोचण्याचा गुण तोच. गरीब – श्रीमंत, लहान – मोठा, स्त्री – पुरूष, कसलाही भेदभाव न करणारा. वनस्पतीचे काटे टोचत असले तरी ते आपणास सांगतात… जपून, नाही तर टोचेन. पण माणसातील काटे ?तर आज काट्याबद्दल बोलू काही…

डॉ. व्ही. एन. शिंदे

कुलसचिव,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी

मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे!

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची?

चिरदाह वेदनेचा, मज शाप हाच आहे!

काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे

माझे अबोलणेही, विपरीत होत आहे!

हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना

आयुष्य ओघळोनी, मी रिक्तहस्त आहे!

आकाशवाणीवर गाणे लागले होते. सकाळचा चहा घेताना नकळत मीही गुणगुणू लागलो. ‘हे बंध रेशमाचे’ या रणजीत देसाई यांच्या नाटकातील थोर कवयित्री शांता शेळके यांचे गीत. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजाने सजलेले. ‘भीमपलास’ रागातील हे गीत कितीही वेळा ऐकले, तरी पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे. ‘काटा’ या शब्दाने सुरू होणारे. काटा आणि फुलाची सांगड या गीतात घातली आहे. काटा तर रूततोच. मात्र कवयित्रीला फुल रूतते. हे फुलाचे रूतणे तिला आपल्या नशिबाचा भाग वाटतो. सहज शब्दात आलेले हे गीत मनात रूतणारे आहे. अंतर्मन दुखावल्याची भावना या काव्यात व्यक्त होते. अस्वस्थ मनातील भावना व्यक्त करणारे गीत. ऐकत राहावेसे वाटते. मनातील वेदना कोणाला सांगणेही अशक्य आहे. काही कोणाला सांगावे, तर त्यातून वेगळाच अर्थ काढण्याची जगाची रीत आहे. भवताली असणाऱ्या लोकांचे वागणे पाहून मनोमन एकाकी पडलेल्या व्यक्तीचे मनोदर्शन सुंदर पद्धतीने या गीतात ऐकावयास मिळते. नाटकामध्ये हे गीत ज्या प्रसंगानंतर येते, तो लक्षात घेतला तर ते मन:पटलावर आणखी खोल रूतते.

स्वातंत्र्यपूर्व फाळणीचा काळ. आजच्या पाकिस्तानातील लाहोर येथे श्रीकांत आणि अमिर हे दोन गुणी गायक मित्र शेजारी-शेजारी राहात असतात. दंगली उसळल्या आणि श्रीकांतने भारतात यायचा निर्णय घेतला. त्यासाठी तो तिकीट आणण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जातो. तेवढ्यात दंगल उसळते. दंगलखोर श्रीकांतच्या घरी जातात. श्रीकांतच्या पत्नीवर अत्याचार करण्यासाठी पुढे सरकतात. आपले शील जपण्यासाठी ती स्वत:ला पेटवून घेते. श्रीकांत आला की नाही, हे पहायला अमिर श्रीकांतच्या घरी येतो. श्रीकांतच्या घराची दुर्दशा पहात असताना, श्रीकांतची मुलगी शामला, अमिरला बिलगते आणि ‘अब्बूजान हमें बचाओ’ म्हणते. अमिर तिला येऊन घरी येतो. पत्नीची अशी अवस्था आणि मुलीचे गायब होणे पाहून हताश श्रीकांत कसाबसा भारतात येतो. तिकडे अमिर शामलाला संगीत शिकवतो. तिला उत्कृष्ट गायिका बनवतो. अनेक वर्षांनंतर एका संगीत संमेलनात हे दोन मित्र भेटतात. त्या ठिकाणी आपल्या पत्नी आणि मुलीला मारण्यामध्ये अमिरची भूमिका आहे, या ग्रहातून श्रीकांत त्याची निर्भर्त्सना करतो. त्यावेळी अमिरच्या तोंडी रणजीत देसाई यांनी खूप सुंदर वाक्य दिले आहे, ‘लोग काँटों की बात करते है, हमने तो फुलों से जख्म खाये।’ आणि त्यानंतर हे गाणे सुरू होते. या एकूण पार्श्वभूमीवर या गीतातील प्रत्येक शब्द मनाला नकळत अंतर्मुख करत नेतो. हे गीत अनेकदा ऐकले, पण, या गीतातील काटा हा शब्द आज मनातून जात नव्हता. पुनःपुन्हा तो आठवत होता. खरं तर, काटा मनात रूतला होता.

काटा एक साधा शब्द. ऐकला तरी टोचण्याचा आभास होतो. काटा, डोळ्यात पाणी आणि आतून हुंदका आणणारा. काटा, कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला. खेड्यात बालपण गेलेल्या प्रत्येकाला तर तो हमखास टोचतोच, पण, शहरातील मंडळींनाही कोठे तरी तो भेटतोच. फार तर त्याचे झाड वेगळे असेल. मूळ वेगळे असेल, कूळ वेगळे असेल, पण टोचण्याचा गुण तोच. कधी तरी, कोठे तरी पायात घुसतोच. गरीबाला पाय अनवाणी असल्याने बाभळीचा, हिवराचा काटा टोचेल. तर कोणा गर्भश्रीमंताला, स्वयंपाकगृहातही पाय अनवाणी ठेवायची सवय नसलेल्यास, गुलाबाची फुले घेताना हाताला बोचतो. गरीब असो किंवा श्रीमंत, लहान असो किंवा मोठा, स्त्री असो वा पुरूष, काटा कोणताही भेदभाव न करता, थोडे दुर्लक्ष झाले की टोचतो. काटा टोचला की ‘आई गं…’ हे शब्द तोंडातून बाहेर येतात.

निसर्गात झाडाला काटे आले, ते त्यांच्या संरक्षणासाठी निसर्गाने केलेली सोय म्हणून, असे संशोधकांचे मत. कमी पावसाच्या भागात वाढणाऱ्या झाडांना हमखास काटे असतात. झाडाचे संरक्षण हा त्यामागचा उद्देश असतो, असे म्हणतात. मला मात्र हे पटत नाही. हां, हे खरे आहे की, करवंदीसारख्या मधूर फळांच्या जंगलात आढळणाऱ्या झाडाला काटे असतात. मोसंबी, लिंबोणी अशा बागेतील सुमधूर फळांच्या झाडानांही काटे असतात. ते सुरूवातीला हिरवे असतात. नंतर त्यांचा रंग पांढरा होतो. हे काटे फळांचे रक्षण करण्यासाठी निश्चितच नसावेत. कारण बाभळीच्या शेंगा आपण कोठे खातो, हिवराच्या शेंगा कसल्या आहेत, हे कोठे पहायला जातो. त्यांनाही असतातच ना काटे. मग तेथे का असतात काटे? काटे असूनही या झाडांची पाने शेळ्या अन् मेंढ्यांचे आवडते खाद्य. काटे चुकवून पाने खाण्याचे कसब या प्राण्यांना कोण शिकवते, माहीत नाही. तर दुसरीकडे आंबा, पेरू, चिंच या मधूर आणि सर्वप्रिय फळांच्या झाडाना कुठे असतात काटे? याचीही पाने शेळ्या आणि मेंढ्या तितक्याच आवडीने खातात. निवडूंगाच्या झाडाला त्याच्या पानातून बाष्पीभवन कमी व्हावे, म्हणून काटे असतात, म्हणे. कारण काहीही असो, काही वनस्पतींना काटे असतात, तर काहींना नसतात, हेच खरे. काटे असोत वा नसोत सर्वच वनस्पती त्यांचे कार्य करत, काही उद्देशाने जगत असतात. स्वत:ला बुद्धीमान समजणाऱ्या मनुष्यप्राण्यास का जगायचे कळो वा ना कळो, वनस्पतींना मात्र जीवनाचे उद्दिष्ट ठाउक असते.

गुलाबाचे फुल आकर्षक. सर्वांचे आवडते. फुलांचा राजाच. मात्र त्याला बेसावधपणे तोडायला जाल, तर काटे टोचणारच. बरे गुलाबाचे काटे जसे टोकदार, तसेच अणकुचीदार. थोडासा बेसावधपणाही रक्त काढतो. तसे हे फुल इतरांपेक्षा कमी नाजूक, मात्र त्याला काटे आहेत. गुलाबापेक्षा जाई, जुई, चमेली, प्राजक्त, बकुळ, रातराणी, कामिनी अशा अनेक वेलींची आणि झुडुपांची फुले ही कितीतरी नाजूक. मात्र या वेलींना आणि वनस्पतींना काटे नसतात. तर दुसरीकडे बोगनवेलीला पावसाळा संपला की फुले यायला सुरुवात होते. नेत्रसुखापलिकडे काहीही उपयोग नसणारी. पण बोगनवेलीचे काटे वर्षभर सर्वांच्या डोळ्यांत खुपतात. बोगनवेलीचे काटे सरळ, पण वाळल्यावर लोखंडी खिळ्यासारखे पायात घुसणारे. अगदी ‘चप्पल फाड के’. कामिनी, रातराणीची फुले तर सुगंधी दरवळ पसरवणारी. तोडली तर रात्रीत सुकून जाणारी. मानव प्राण्यास धुंद करणारी. मात्र या वनस्पती काट्याविना असतात. निसर्गाने वनस्पतींना काटे वाटताना काय नियम लावला, काही लक्षात येत नाही.   

बरे, या काट्यांचे प्रकारही अनेक. प्रत्येक झाडाचा काटा वेगळा. रंग वेगळा, गुणधर्मही वेगळे. बाभळीचा काटा मोठा, लांब असतो. फांदीच्या अगदी टोकाला असणारे काटे पोपटी असतात. ते जरा जून झाले की पांढरे होतात. हळूहळू त्यांचे टोक काळे होते आणि अगदी जुना काटा झाला की तो पूर्ण काळा होतो. हा काटा पायात खोलवर घुसतो. कोवळा काटा पायात घुसला की काढताना तो टोक आत ठेवूनच येतो. मग पायातील काट्याचा तो भाग काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. या बाभळीच्या काट्याचा वापर एका धार्मिक उत्सवातही केला जातो. पुणे जिल्ह्यातील पुरंधर तालुक्यातील गुळुंचे गावी जोतिर्लिंग मंदिर आहे. इथे गुढीपाडव्यानंतर लगेच बाभळीच्या झाडांच्या शेंड्यांच्या फांद्या तोडून फास घातले जातात. दिपावली पाडव्याला ग्रामदेवतेची यात्रा सुरू होते. कार्तिक बारसच्या दिवशी हे बाभळीचे घातलेले सर्व काटेरी फास एकत्र आणून रचले जातात. या दिवशी देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर अनेक भाविक मंदिराला प्रदक्षिणा घालून येतात. काट्याच्या फासावर उड्या मारतात. हे चित्र तसे नवख्या माणसाच्या अंगावर शहारे आणणारे. मात्र उड्या मारणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नसते. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या या जत्रेला ‘काटेबारस’ म्हणून ओळखले जाते.

हिवराचे काटेही तसेच. मात्र फांदी तुटून पडली की ते लवकर कुजतात. असा कुजलेला काटा पायात घुसला तर जास्तच त्रासदायक. पायात राहिला तर कुरूप तयार करतो. त्याला मुळापासून काढावे लागते. विलायती बाभूळ नावाची विदेशी वाणाच्या बाभळीचा काटा सर्वात खतरनाक. चुकून गाडीच्या चाकाखाली हा काटा आला, तर टायर पंक्चर झालेच म्हणून समजा. बोरीचे काटे दोन प्रकारचे असतात. सरळ काटा दर्शनी असतो, तर वाकडा काटा पानाआड दडलेला. सरळ काट्यापासून जपताना खालचा काटा कधी ओरखडा उठवतो, कळतही नाही. झाडाची ताजी बोरे तोडून खाण्याची मजा घेताना लपलेल्या काट्यापासून नेहमी सावध रहावे लागते. सरळ काटे सरळ नजरेला दिसतात. मात्र वाकडे काटे आकाराने लहान, पोपटाच्या चोचीसारखा बाक असलेले. त्यांच्या सानिध्यात कोणतीही गोष्ट गेली की फाटलीच पाहिजे. अनेकांचे कपडे आणि कातडी या बोरीच्या काट्यांनी फाडलेली असते. सुरुवातीला पांढरट हिरवे असणारे काटे, पुढे फांदीबरोबर तांबडा रंग धारण करतात आणि काटकही बनतात. घातक, काटेरी झाडाची फळे मात्र मधुर असतात. त्यांची आंबटगोड चव अवर्णनीय. खैर, सागरगोटे किंवा गजगा, चिलारी या झाडांचे काटेही बोरीसारखेच. 

सौंदड किंवा दसऱ्याला ज्याची पाने आपट्याबरोबर वाटण्याची प्रथा मराठवाड्यात आहे, त्या चांदीच्या झाडाचे काटेही अणकुचीदार, वाकडे असतात. सागरगोट्याच्या तर बियांच्या पेटीवरही काटे असतात. मात्र खोडावरचे काटे वाकडे आणि फळांच्या पेटीवरचे काटे सरळ असतात. पेटीतून सागरगोटे फोडून बाहेर काढताना काळजीपूर्वक काढावे लागतात. नाही तर फिकट सोनेरी रंगाचे काटे कधी हातात घुसतात, कळतही नाही. बरे हातात घुसल्यानंतर काटा तर सलतो, पण तो कोठे आहे, ते नेमके दिसत नाही. हेकळीच्या झाडाचे काटे तसेच. मात्र झुडुपाच्या लाल रंगांच्या काट्यावर पाने असतात. पुढे या काट्याचे फांदीत रूपांतर होते. आपटा, पांढरफळी, हुंबाटीचे काटे असेच असतात. मात्र त्यांचे टोक धारदार नसते. गवती बांबूच्या लहान पेरावर ते लहान असल्यापासून काटे असतात. तर इतर जातीच्या बांबूचे बेट पक्व झाले की, त्याला फुले येतात आणि नंतर त्या बांबूला काटे येतात. हे काटे फारच भयंकर असतात. त्यामुळे आदिवासी मंडळी बांबूच्या बेटाला फुले दिसली की कटाई करतात आणि काट्याचा त्रास टाळतात. त्याउलट बाभळीचे वय जसे वाढत जाते, तसे काटे लहान होतात. झाड म्हातारे झाले की त्याला काटे यायचे बंद होतात. बिनकाट्याच्या बाभळीला ‘गोडी बाभळ’ म्हटले जाई. आज क्वचितच गोडी झालेली (पूर्ण आयुष्य जगलेली) बाभूळ पहायला मिळते. फणसाच्या फळावर काटेरी आवरण असल्यासारखे भासते. दिसतेही तसेच. त्यामुळे फळाला हात लावायची भीती वाटते. मात्र या काट्यांच्या आत पौष्टिक गर असतात. धोत्र्याच्या फळाला विषारी म्हणून कोणी हात लावायचे धाडस करत नाही. तरीही या झाडाच्या फळावर काटे असतात. विशेष म्हणजे फणस असो वा धोत्रा त्यांच्या खोडावर काटे नसतात.

काटेसावरची तर गोष्टच वेगळी. अंगभर जाडजूड काटे घेऊन ही बया मिरवत असते. फुललेली काटेसावर पाहिली की मनाने चांगली पण बोलण्याला काट्याची धार असणाऱ्या इरसाल म्हातारीची आठवण येते. काटेसावर फुलली की कावळ्यांपासून पोपटांपर्यंत सर्व पक्षी आणि कीटक मधूभक्षणासाठी या झाडावर गर्दी करतात. आणि हे झाड सर्वांना तितक्याच प्रेमाने आपला मध वाटत राहते. या कार्यक्रमात काटे कोठेच येत नाहीत. याखेरीज विदेशातून भारतात पोहोचलेली आणि सर्वत्र आपले साम्राज्य उभारत चाललेल्या घाणेरीवरील काटे बारीक पण चांगलेच बोचणारे असतात. खरे तर घाणेरीला आता हद्दपार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्टुली आणि वागाटे या रानातल्या फळभाज्या. वागाटे आषाढ महिन्यापर्यंत मिळतात. आषाढी एकादशीचा उपवास सोडताना त्यांचा मान मोठा. मात्र ही रान-फळभाजी बाजारात सहज मिळत नाही. क्वचित दिसतात, पण भरपूर महाग. त्यामुळे नव्या पिढीला ही फळे अपवादानेच माहित आहेत. तर कर्टुली किंवा रानकारली पावसाळयात येतात. रानकार्ल्याच्या वेल नाजूक. कमी उंचीच्या झुडुपावर वाढणारा. तर वागाट्यांचा वेल कडुनिंब, आंबा, शेलवट अशा उंच वाढणाऱ्या झाडावर दिमाखात चढणारा. मात्र रानकार्ल्याच्या वेलाला काटे नाहीत. वागाट्याच्या वेलीचे काटे मात्र भरपूर टोकदार आणि टणक. ही फळे काढणे महाकष्टाचे काम. मुळात वेली कमी. त्यात फळे काढणारे आणखी कमी. रानकार्ल्यावरही काटेरी आवरण आहे, असे दिसते. मात्र हे काटे खूप मऊ असतात.

वांग्याचे भरीत खायला अनेकांना आवडते. मात्र ही फळे काढतानाही भरपूर काळजी घ्यावी लागते. वांग्याच्या खोडावर आणि पानावरही भरपूर काटे असतात. त्याच्या फळाच्या देठावरही काटे असतात. वांग्याला अनेकजण मजेने ‘वन लेग चिकन’ म्हणतात. वांगे तोडताना किंवा स्वयंपाकघरात वांग्यावरील काटे काढताना ते हातात घुसले तर सलतात. काट्यांचा रंगही फिकट पिवळा. त्यामुळे नजरेला लगेच काटा कोठे घुसला, हे दिसत नाही. अंबाडी आणि करडी या दोन तेलबियासुद्धा काटेरी वनस्पतीपासून मिळतात. अंबाडीचे काटे बरे, पण वाळलेल्या करडीचे काटे भरपूर त्रास देणारे. भुईरिंगणीचे काटे अगदी वांग्यासारखेच असतात. याखेरीज अनेक झुडुपवर्गीय, वेलीवर्गीय, जमिनीवर पसरणाऱ्या आणि गवतवर्गीय वनस्पतींना काटे असतात. सरळ, वाकडे आणि कुसीच्या रूपात हे लहान-मोठे काटे आपल्याला भेटतात.   

लहानपणी असा पायात काटा घुसला की बाभळीचा चांगला (न कुजलेला) काटा शोधला जाई, काट्याने काटा काढायला. त्या काट्याने पायात जेथे काटा घुसला आहे, त्याच्या आजूबाजूची कातडी काढली जाई. घुसलेल्या काट्याचे टोक प्रथम शोधले जाई. हा काटा दिसू लागला की ज्याच्या पायात काटा मोडला आहे, त्याला हुश्श वाटे. मग तो काटा आणखी जरा मोकळा करून अलगद काढायचा प्रयत्न केला जात असे. काढणाऱ्याने कितीही काळजी घेतली, तरी ज्याच्या पायात काटा मोडला आहे, तो ‘जरा हळू की. किती जोरात काढताय’, असे ओरडत असे. मोठ्या माणसांना काटा काढू द्यायला लहान मुले तयार नसत. लहानपणी असा पायात मोडलेला काटा बाहेर काढल्यावर तो ‘चोर’ की ‘पोलीस’ हे ठरवण्याचा खेळ चाले. डोळ्यावरील पापणीतील एक केस काढून तो पायातून काढलेल्या काट्याला लावून तो काटा केसाला चिकटतो की नाही, हे तपासले जाई. जर काटा उचलला गेला, तर तो प्रामाणिक आणि पोलीस ठरवला जाई. मात्र जर तो नाही चिकटला, तर तो चोर असे. मग पायात घुसलेल्या काट्याला फेकून दिले जाई. या खेळाला तसा काही अर्थ नसायचा. पण या खेळात काटा घुसून झालेल्या वेदना कुठच्या कुठे पळून जात असत, हे मात्र नक्की.

पायात मोडलेला काटा बाभळीचा असेल तर फारसा त्रास देत नाही. मात्र तो हिवर, पांढरा खैर या झाडांचा असेल तर खूप दुखतो. लगेच काढावा लागतो. त्याच्या वेदना जास्त होतात. लहानपणी असे अनेक काटे पायात मोडले. काटा मोडला की आम्ही वडिलधाऱ्यांना पायाला हात लावू देत नसायचो. मग वडिलधारी मंडळी सांगायची, ‘असा काटा पायात ठेवणे बरे नाही. तो काढावाच लागतो. नाही काढला तर पायात बाभळीचे (किंवा हिवराचे) झाड उगवते. मग त्याची मुळे शरीरात शिरतात आणि झाड मोठे होते. मग तू चालणार कसा?’ असे म्हटले की डोळ्यासमोर आपल्या पायात झाड उगवल्याचे चित्र यायचे. लगेचच ते झाड मोठे व्हायचे. पायातील झाड घेऊन आपल्याला चालता येणार नाही, असे वाटायचे आणि आम्ही गपगुमान काटा काढायला पाय पुढे करायचो.

काट्याच्या बालपणी अनेक गंमतीही घडत असत. आघाड्याच्या रोपाच्या शेंड्याला आलेले काटेरी फळांचे घोस नकळत एखाद्या मुलाच्या पाठीवरून फिरवले जाई आणि त्यांची छान नक्षी पाठीमागे शर्टवर उठायची. मुलगा कोठे तरी टेकून बसेपर्यंत आपण पाठीवर काटे घेऊन फिरतो आहोत, हे त्याच्या गावीही नसायचे. आघाड्याच्या काटेरी बिया नकळत कापडाला चिकटतात. गवतातून जाताना त्या आपल्या कपड्यावर कधी येऊन बसतात, ते कळतही नाही. एका गवताला काळ्या रंगाची कोयरीच्या आकाराची फळे येतात. त्याला खालच्या बाजूला दोन वाकडे काटे असतात आणि देठाच्या बाजूला दोन छिद्रे असत. ते दोन काटे छिद्रात अडकवून त्याची लांब माळ करायचो. ती माळ नंतर सर्वत्र विसकटली जात असत. कोणी याला कोयरीचे तर काही भागात कुत्रीचे झाड म्हणतात. काही ठिकाणी नकटीचे झाडही म्हणतात.  यावरूनच वेल्क्रोचे तंत्रज्ञान तयार झाले. सराटा हा एक भयानक प्रकार खेड्यात आढळतो. हरभऱ्यासारखी पाने असलेली ही वनस्पती. जमिनीवर मस्त पसरते. सराट्याच्या पानांची भाजीही करून खाल्ली जात असे. मात्र त्याच्या फळाचे काटे पायात घुसले की वेदना असह्य होत. जनावरे शेतात चरताना अनेक प्रकारचे काटे शरीरावर घेऊन येत असत. आणखी बरीच झाडे आणि वनस्पती, गवतांना काटे असतात. गवताला भाले फुटतात की नाही, माहीत नाही. मात्र बाजरी, ज्वारी, करडी, अंबाडीला असणारी कुस एक प्रकारचे सूक्ष्म काटेच. ते अंगाला चिकटले तर आंघोळ केल्याशिवाय जात नाही. शक्यतो, काळ्या मातीचा अंगाला लेप लावून आंघोळ केली तरच कुस लवकर जाते.

      या भागातील कवचकुल्या आणि उर्वरित महाराष्ट्रातील खाजखुजली ही एकाच गुणाची. लहानपणी मारकुट्या मास्तरच्या खुर्चीला ती आणून लावायचा प्रकार एक दोन वर्षात एकदा तरी घडायचा. खोडकर मुले अतिशय सांभाळून ती आणायचे. या उनाड मुलांचे नाव सांगणे म्हणजे शाळा सुटल्यावर त्यांचा मार खाणे. त्यामुळे हा पराक्रम करणारा कोण हे बहुतांश वेळा गुप्त राहायचे. त्यामुळे छडीचा प्रसाद अख्ख्या वर्गाला मिळायचा.

असे हे वनस्पतीचे काटे आपल्याला अनेकदा, अनेक ठिकाणी भेटतात आणि छळतातही. मात्र त्यांचा त्रास आपण त्यांना निष्काळजीपणे सामोरे गेलो किंवा आडवे गेलो तरच होतो. ते स्वत:हून तुमच्याकडे येत नाहीत. काट्याचा धर्म आहे टोचणे. जवळ गेलो तर टोचणारच. एकाच झाडाला येणारी फुले, फळे आणि काटे. काट्यांचे मोल नाही. शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी कुंपण करण्यापूरता याला महत्त्व. एरवी रस्त्यात कोठे काटा दिसला तर त्याला उचलून बाजूला फेकले जाते. त्यावरून वाक्प्रचारही आला, काट्यासारखे दूर करणे. फुल किंवा फळ मोलाचे असते. फुलांना भाव मिळतो, मात्र त्या शेजारील काटे खरवडून काढले जातात. फळ आणि फुलाला मिळणारा भाव पाहून असूयेपोटी तर काटे टोचत नसावेत?

मात्र काटे असणारी बाभूळ, हिवर, बोर, कार ही झाडे पक्ष्यांची आवडती झाडे. हिवराच्या झाडावर पन्नासपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी घर बनवतात. बाभळीच्या झाडालाही सुगरणीपासून अनेक पक्ष्यांची पसंती असते. सुगरणीची घरटी कडुलिंबापेक्षा बाभळीवर जास्त दिसतात. या झाडाच्या काट्यामुळे शत्रूचा धोका कमी असतो. कित्येक पक्षांची बाळंतपणे या काटेरी झाडावर सुखेनैव झालेली असतात. बाभळीच्या काट्यांचे सुंदर घर बॅगवर्म मॉथ बनवतो. त्या काटेरी कोशातून तो केवळ पानांचे भोजन घ्यायला बाहेर येतो.

मानवी जीवनाचा काटा हा अविभाज्य भाग आहे. जेवताना चमच्याप्रमाणे आता काटा हाही आवश्यक झाला आहे. त्यातून काटे-चमचे असा जोडशब्दच तयार झाला. वजन-काटा बरोबर असेल तरच माप व्यवस्थित होते. तेथेही काटा हाच महत्त्वाचा. न्यायदेवतेच्या हातातही हा वजन-काटा दिलेला आहे. वस्तुस्थिती काही असो, पुराव्याचे वजन पारड्यात पडले तरच काटा न्यायाच्या बाजून झुकतो. इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आले तरी आपण त्याला काटाच म्हणतो. माशांच्या हाडे काटे म्हणूनच ओळखली जातात. मासे खाताना काटे अलगद बाजूला काढून टाकावे लागतात. चूकून घशात अडकला तर जेवणाची पूर्ण मजाच निघून जाते. मधमाशी, गांधीलमाशी यांनाही काटे असतात. हे किटक माणसाला किंवा इतर प्राण्यांना चावा घेताना तो काटा शरीरात सोडतात. काटा काढला नाही, तर त्या भागाला मोठी सूज येते. कधी कधी त्यामुळे जखम होण्याचा धोका असतो. त्यामुळे तो काटाही शोधून तत्काळ दूर करावा लागतो. निवडणूक दोन तुल्यबळ उमेदवारांत असेल, तर त्या मतदारसंघातील निवडणूक म्हणजे ‘काट्याची टक्कर’ आहे, असे म्हणतात.

काटा हा एकच शब्द आपण मराठीत वापरत असलो तरी इंग्रजीत त्याला अनेक नावे आहेत. वांगी आणि गुलाबावरील काट्यांना ते प्रिकल म्हणतात. कॅक्टसवरील काटे स्पाईन होतात. स्वयंपाकगृहामधील काटे फोर्क असतात. बियांवरील कूस स्पीकलेट असते. वनस्पतींवरील सर्वच काट्यांना थॉर्न म्हणतात. हिंदीत त्याला काँटा म्हणतात. या शब्दाला घेऊन अनेक चित्रपट निघाले. गाणी बनवण्यात आली. तुळजापूरचे कवी नारायण पुरी यांनी नवविवहितेच्या पायात मोडलेला काटा काढणाऱ्या नवऱ्याच्या मनातील भावनांचे छान वर्णन केले आहे. बायकोच्या पायात मोडलेल्या बोरीच्या अणकुचीदार काट्याने ज्या वेदना सुरू होतात, त्यात आपला निम्मा वाटा आहे, असे त्याला वाटते. तिचे पाय किती नाजूक हे सांगताना कवीला कापूस आठवतो.

‘पायामध्ये सलतो गं, सखे बोराटीचा काटा

तुह्या पायातील सल, त्यात माहा निम्मा वाटा

पाय नाजूक साजूक, राणी कापसाच्यावाणी

तुह्या पायाला बग फुलली, बघ काट्याची ग अणी

काटा काढण्याची पद्धत आणि पतीपत्नीतील प्रेमाचे सुंदर वर्णन कवितेत आहे. पायात काटा मोडण्यापासून, काटा काढणे, त्याला चोर-पोलिस ठरविणे आणि त्यानंतर बिब्याचा चटका देईपर्यंत सर्व काही या कवितेत आहे. काटा जर पूर्ण निघाला याची खात्री नसेल, तर बिब्याचा चटका दिला जातो. तसेच ‘वाटेवाटेवर काटे आहेत जरा जपून चाल’, असा पोक्त सल्लाही तिला देतो. तिचा पाय असा मांडीवर घेता येणार असेल, तर तिला काटा पुन्हा मोडावा, असा स्वार्थी विचारही त्याच्या मनात येतो. ग्रामीण भागात काट्यामुळे ओढवणारा प्रसंग ग्रामीण शैलीत अतिशय सुंदर पद्धतीने चित्रीत केले आहे.

वनस्पतींचे काटे आपल्याला त्रास देत असले तरी ते आपल्याला दिसतात. ते सांगतात, ‘जवळ आलास तर टोचेन’. आपण त्यांच्याजवळ गेलो नाही तर ते आपल्याला त्रास देत नाहीत. पण माणसातील काटे अनेकदा दिसत नाही. समाजात जगताना असे काटे पदोपदी भेटतात. नेहमी गोड बोलणारी माणसे हिवराच्या काट्यासारखी असतात. गोड बोलून जवळीक साधून गळा कापण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही. उलट काट्यासारखे बोचणारी माणसे ही खऱ्या अर्थाने आपली हितचिंतक असतात. आपले भले व्हावे, म्हणून त्यांचे ते टोकणे, बोलणे असते. समाजाच्या भल्यासाठी आपल्या पदाचा पूर्ण क्षमतेने वापर करणारी माणसे जनसामान्यांच्या मनातील नायक असतात. मात्र त्यांचे कर्तव्यकठोर नियमाप्रमाणे काम करणे ज्यांच्या स्वार्थाच्या आड येते, त्यांच्या दृष्टीने ती काटा असतात. एरवी काटा सहज दूर करता येतो, पण हे खऱ्या अर्थाने काटे नसल्याने त्यांना कायमचे दूर करणे शक्य नसते. अशा कर्तव्यप्रिय अनेक अधिकाऱ्यांना बदल्यांना सामोरे जावे लागते. अशा अधिकाऱ्याना काट्यासारखे बाजूला करून अडगळीत टाकून दिले जाते. शेवटी काय, काटा बाजूला करण्यातच धन्यता मानली जाते. खरे तर समाजाचा गाडा त्यांच्यामुळेच नीट चालत असतो. असे अधिकारी जनतेच्या गळ्यातील ताईत असतात. जनता त्यांच्यावर मनापासून प्रेम करते. मात्र त्यांना संरक्षण देऊच शकते, असे नाही. ‘काटा’ ही गोष्ट त्यामुळेच सापेक्ष आहे.काटेही सुंदर असतात, असेच निसर्ग सांगतो. तसे असते म्हणूनच त्यांच्या संगतीत गुलाब फुलतो.  गुलाबाला जवळ करणारे काट्यांना दूर करतात- गुलाबाला तो कितीही जवळ हवा असला तरी…. मग गुलाबाला तोडण्यापेक्षा काट्यातच फुलत राहू दिले तर..?


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading