September 8, 2024
The secret of the creation of the universe
Home » विश्वाच्या, सृष्टिच्या निर्मितीचे रहस्य
विश्वाचे आर्त

विश्वाच्या, सृष्टिच्या निर्मितीचे रहस्य

विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हे ऋषींनीही स्पष्टपणे सांगितलेले नाही, परंतु सर्व भूते वायूत लीन होतात व वायू हेच सर्वांचे अधिदैवत आहे, असा विचार त्यांनी नमूद केला आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल -९०११०८७४०६

हेंही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टिकरिती ।
ते जया एका आवृत्ती । नामाचिये ।। ३३५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा

ओवीचा अर्थ – हें देखील राहूं दे. ब्रह्मदेवामध्यें जी सृष्टि उत्पन्न करण्याची शक्ति आहे, ती ज्या एका नामाच्या आवर्तनानें आली आहे.

विश्वाची निर्मिती कशी झाली याबद्दल अद्यापही संशोधन सुरू आहे. विविध तर्कवितर्क लावण्यात येतात. स्टीफन हॉकिंग यांच्यामते विश्वाची निर्मिती ही एक उत्स्फूर्त घटना आहे. तर विश्वाचा कोणीतरी निर्माता असणे आवश्यक आहे अन्यथा अशी जटिल निर्मिती उद्भवू शकली नसती असे मत एका संशोधकाने व्यक्त केलेले आढळते. महास्फोट सिद्धांत अर्थात बिग बँग थिअरी हा विश्वाच्या निर्मितीचा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. या सिद्धांतामध्ये हे विश्व कधी व कसे निर्माण झाले हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिद्धांतानुसार सुमारे १५ अब्ज वर्षापूर्वी सर्व भौतिक घटक आणि ऊर्जा एका बिंदूमध्ये केंद्रिय होती. मग ते हळूहळू पसरू लागले. बिग बँग हा बॉम्बस्फोटासारखा स्फोट नव्हता तर त्यात विश्वाचे कण अवकाशात पसरले आणि एकमेकांपासून दूर पळू लागले. असे सांगण्यात आले.

विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हे ऋषींनीही स्पष्टपणे सांगितलेले नाही, परंतु सर्व भूते वायूत लीन होतात व वायू हेच सर्वांचे अधिदैवत आहे, असा विचार त्यांनी नमूद केला आहे. ऋग्वेदामध्ये विश्वाच्या उत्पत्तीबाबत विविध कल्पना मांडण्यात आल्या आहेत. विश्वाच्या उत्पत्तीसाठी प्रजापतीने तप केले. तपाच्या श्रमामुळे त्याच्या शरीतातून निथळलेला घाम म्हणजेच विश्वाच्या आरंभी निर्माण झालेले जळ होय. विविध संस्कृतींत आढळून येणाऱ्या विश्वोत्पत्तिविषयक मिथ्यकथांमध्ये विश्व अस्तित्वात येण्यापूर्वीचा एक काळ आणि अवकाश कल्पिलेला असतो. असे उल्लेख आढळतात.

एका वर्गीकरणानुसार विश्वोत्पत्तिविषयक मिथ्यकथांचे सहा प्रकार केले गेले आहेत. ते असे – शून्यातून वा पोकळीतून झालेली विश्वोत्पत्ती, निर्व्यवस्थेच्या वा गोंधळाच्या अवस्थेतून सुव्यवस्थित अशा विश्वाची निर्मिती, वैश्विक अंड्यातून झालेली विश्वोत्पत्ती, एखाद्या दांपत्यापासून प्रजोत्पत्ती व्हावी तशी होणारी विश्वोत्पत्ती, नवोद्‌भवाच्या (इमर्जन्स) प्रक्रियेतून झालेली विश्वोत्पत्ती, पाण्यात बुडी मारून त्यातून विश्वनिर्मितीस उपयुक्त असे द्रव्य बाहेर काढणाऱ्यावर आधारलेल्या मिथ्यकथा अशा या सहा प्रकारात सांगितल्या गेल्या आहेत.

असे विविध उल्लेख विश्वाच्या निर्मितीबाबत आढळतात. पोकळीचा शेवटही सांगता येत नाही. हा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा साहजिकच घाबरायला होते. पण हा उल्लेख घाबरे करून, भिती दाखवून अध्यात्माकडे ओढण्याचा नाही. उलट आपणास जागे करणारा आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपण कोण आहोत यावर विचार करण्यास भाग पाडणारा आहे. मी म्हणजे कोण ? या विश्वात आपण कशासाठी आलो आहोत ? हे माझे, हे माझे म्हणून आपण दिवस-रात्र अगदी वेड्यासारखे फिरतो आहोत. यावर विचार केला तर आपणात निश्चितच माणूसकी उत्पन्न होऊ शकते.

जन्माला येताना श्वास सुरु होते अन् मृत्यूनंतर श्वास बंद होतो. श्वास म्हणजे वायू अर्थात प्राण. हा या शरीरात येतो अन् मृत्यूनंतर पुन्हा तो वायू शरीरातून निघून जातो. सृष्टीची निर्मिती नामाच्या आवर्तनाने झाली आहे. नाम म्हणजेच स्वर, ध्वनी, लहरीतूनच उत्पन्न झालेल्या शक्तीतून या सृष्टीची निर्मिती झाली आहे. हा स्वर वायू रुपात आहे. सोहमचा स्वर हा वायू रुपात आहे. सोहम हे नामही वायूरुप ध्वनी आहे. श्वासातील आत अन् बाहेर जाण्याचा हा स्वर आहे. मग मी म्हणजे कोण ? या विश्वात सर्वत्र मी सामावलेलो आहे म्हणजेच मी कोण आहे ? मी ब्रह्म आहे. मी आत्मा आहे. मी सोहम आहे. मी स्वर आहे. मी श्वास आहे. मी प्राण आहे. मी वायू आहे. याचे ज्ञान होणे म्हणजेच ब्रह्माचे ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्म्याचे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान होणे असे आहे. हे ज्ञान झाल्यानंतर सर्व सृष्टिचे ज्ञान आपणास होते. सृष्टिचा, विश्वाचा जन्मही यातूनच झाला आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गुलाम…

शेतकऱ्यांचे नवे रुप – अॅग्रीप्रिन्युअर

2024-25 साठी खरीप पिकांसाठी किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading