September 8, 2024
Mahadev Pandit article on Plumb bob
Home » ओळंब्याचे जीवन अन् राहणीमान साधे पण कार्य महान
संशोधन आणि तंत्रज्ञान

ओळंब्याचे जीवन अन् राहणीमान साधे पण कार्य महान

ओळंबा हा बांधकाम तंत्रज्ञानात वापरला जाणारा आणि स्थापत्य अभियांत्रिकी शिकविणाऱ्या पुस्तकात आढळणारा शब्द. ओळंबा हा शब्द सर्वत्र सर्रास वापरला जातो. आजकाल क्रिकेटच्या समालोचनात सुध्दा एल.बी. डब्लू. या प्रकारात फलंदाजाला बाद ठरवताना Batsman’s legs in plumb in-front of stumps असे बोलतात. घराचे बांधकाम करत असताना भिंतीची रचना बरोबर काटकोनात व उभ्या सरळते मध्ये म्हणजेच अनूलंबते मध्ये (Verticality)बरोबर चालली आहे की नाही? हे पडताळण्यासाठी ओळंबा वापरतात.

ओळंबा म्हणजे एक लोखंडाचा टोकदार भोवरा असतो व त्याच्या मध्य अंगातून एक बारीक दोरी बांधून बाहेर काढलेली असते. कधी कधी आडवी छोटी भोवर्‍याच्या रुंदीची एक बेल त्याच्या डोक्यावर असते. गवंडी भिंत बांधताना त्या भिंतीचा प्रत्येक दगड किंवा वीट बरोबर उभ्या पातळीत व सरळतेत आहे की नाही ते सतत बघत असतो. ओळंबा हा शब्द उच्चारणे सोपे तसेच गावठी असले, तरी ती कृती व त्याची व्याप्ती तेवढी सोपी नाही तसेच त्याचे कार्य खुप महान आहे. ओळंबा तयार करताना वापरला जाणारा लोखंडी टोकदार भोवरा, त्याच्या मध्य अंगातून एक दोरी व भोवर्‍याच्या रुंदी एवढीच आडवी वर खाली होणारी बेल या तिन्ही वस्तूंचा एकत्रित तांत्रिक मिलाफ म्हणजे ओळंबा त्याला इंग्रजीमध्ये plumb bob असे संबोधतात. सामान्यत: स्टील प्लंब बॉब पितळापेक्षा कमी महाग असतात . पितळी प्लंब बॉब तथापी अधिक चांगले बनवले जातात – फुल-बॉडी टेपर मध्ये छान मशीनिंग केलेले असते. बऱ्याच जणांकडे बदलण्यायोग्य टणक-स्टील टीप देखील असते.

इजिप्तिशियन लोकांनी 4000 वर्षांपूर्वी प्लंब बॉबचा म्हणजेच ओळंब्याचा शोध लावला. त्याचे दोन भाग आहेत – एक तार आणि वजन. इजिप्तच्या इमारती, पिरॅमिड आणि कालवे यांच्या बांधकामात महत्त्वपूर्ण असलेल्या उभ्या बिंदूंची स्थापना करण्यासाठी प्लंबचा वापर केला गेला. ओळंब्यामुळेच उंच पिरॅमिड तसेच गगनचुंबी इमारती बांधता आल्या आणि आजतागायत त्या ताठ व सुरक्षित उभ्या आहेत अन्यथा त्या तांत्रिक आयुष्य पूर्ण न करताच कोलमडून पडल्या असत्या. वळंब्याने त्यांचे आयुष्य मान तसेच नाव वृद्धिंगत केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गड किल्ल्यांची तटबंदी व टेहळणी बुरूज बांधताना ह्या ओळंब्याच्या उपयोग खुपच महत्त्वाचा होता. उंच डोंगराच्या कड्यावर मोठ मोठाले दगड रचताना, ते कारागीर छोट्या ओळंब्या ऐवजी दोराला मोठा साधारणतः: एक दिड किलो वजनाचा गोल दगड दोराच्या शिंक्यात बांधून सोडत व डोंगराचा उभा कडा व कड्यावर रचलेले दगड एकाच उभ्या सरळ रेशेत उभे आहेत की नाही ते पडताळताना या स्थानिक ओळंब्यांचा वापर करत असत. मोठं मोठे घडईचे दगड तटबंदीवर ओळंब्यात रचण्यासाठी मुरलेलाच हात लागतो तसेच टोकदार नजर लागते. गड किल्याचे मोठ मोठे दरवाजे सुध्दा बसवताना कारागीर लोक सुध्दा ओळंब्याचा वापर करूनच दरवाजा बसवत असत. नाहीतर कडी कोयंडा व दरवाजा व्यवस्थित बसत नसायचा त्यामुळे सुध्दा गडांची सुरक्षितता धोक्यात यायची. कधी कधी भिंतीच्या चालू बांधकाम पातळी वरुण सुध्दा एखादा बारीक खडा टाकून भिंतीची उभी सरळता पडताळून पहात असत पण येथे स्पर्श आणि नजरही खुप महत्त्वाची असे.

आपल्याला भिंत नक्की कशी हवी तसेच खिडकीच्या व दरवाज्याच्या उभ्या चौकटी, गगनचुंबी इमारतींचे खांब व उड्डाण पुलाचे खांब एकदम उभ्या सरळतेत आहेत का ? आणि त्या कशा पद्धतीत हव्या आहेत, हे सांगणारे सूत्र म्हणजे ओळंबा करणे. आपण काय पाहावे, कसे वागावे त्याच प्रमाणे उभे कसे राहावे व इतरांच्या रचनेबाबत हा नियम लावता येतो. अर्थातच, हा ओळंब्याचा सर्वसाधारण नियम नाही. तसा लावायला गेल्यास त्यातून बरेच वादविवाद निर्माण होतील. ओळंबा कधीही एखाद्याच्या तिरकस पणाबाबत (Out of plumb) खोटे नाटे बोलत नाही तसेही आपल्याला हवे तेच दाखवतो आणि तेवढेच माप किंवा उभी तीरकसता (Verticality) प्रकल्प पर्यवेक्षका सोबत इतरांना पण दाखवितो आणि नंतर ती कमतरता नव्वद अंशात अचूक उभ्या सरळतेत आणण्यास मदत करतो.

ओळंब्याचा हा नव्या व जुन्या जमान्यातील समाज माध्यमातला प्रकार आपल्या ओळखीचा आहे. त्यातून भविष्यात निर्माण होणारे प्रश्नही माहीत आहेत. ओळंबा नेहमी इतरांच्या चुका निदर्शनात आणतो व नेहमी सरळ वागतो आणि म्हणूनच त्याचे बांधकाम क्षेत्रातील नाव अजरामर आहे. ओळंबा करण्याचा नियम लावायचा, तो खाली नमूद केलेल्या प्रकारांना. आपण समाजात ताठ सरळ मानेने उभारतो कि नाही? आणि कोणासमोर झुकतो व कशासाठी झुकतो तसेच आपण सरळ बोलतो कि वाकडे कि तिरकस?

ओळंबा कोणासमोर झुकत नाही तसेच तो स्वत:च्या तत्वात राहतो, तर मग आपण, आपले नेते, अधिकारी पदासाठी व पैशासाठी आपली तत्त्वे व प्रतिष्ठा खुंटीला टांगून इतरांसमोर का झुकतात? याचे उत्तर त्यांच्या अंत:करणातील ओळंबाच देऊ शकतो. ओळंब्यात नसलेले बांधकाम काढून टाकतो त्याच प्रमाणे आपण आपल्या स्वभावातील वाईट वाकडेपण व कुत्सित तिरकस बाणा बाहेर काढून टाकला पाहिजेत. स्वाभिमान गहाण टाकून तात्पुरत्या फायद्यासाठी कोणासमोरही झुकणे थांबविले पाहिजेत तसेच आपल्या मनातील वाईट विचार, चमचेगिरी व तीरकसता बाहेर काढून स्वाभिमान व सरळता जागविणे यालाच खरा कणखर जातिवंत असे म्हणता येईल.

छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथील १२ मे १६६६ रोजीच्या औरंगजेबाच्या दरबारात ताठ व सरळ स्वाभिमानाने कणखर तत्त्वाने वागले म्हणूनच ते छत्रपती म्हणून पृथ्वी तलावर अजरामर झाले आहेत तसेच आपण जातिवंत मुल्याचा कणखर लढवय्या मराठा आहे हे औरंगजेब बादशहाला दाखवून दिले. ओळंबा हे एक खुप लहान मोजमाप आहे. ओळंब्याचे जीवन व रहाणीमान अगदी साधे व सोपे आहे पण त्याचे कार्य खुपच महान व अमृततुल्य आहे. स्थापत्य अभियंत्यांनी सुध्दा आपले कामकाज व अंतरंग एकदम तंतोतंतच व ओळंब्याप्रमाणे अनूलंबते मध्ये सरळ ठेवले तर समाजात अभियंत्याचे नाव व पत नेहमीच उच्च राहिल व विकास कामांची गुणवत्ता व आयुष्य मान नक्कीच वृद्धिंगत होईल.

महादेव पंडित
लेखक स्थापत्य अभियंता आहेत


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मनुष्य अन् त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील बंधांचा शोध घेणारा चित्रपट सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स)

वाहनाची तंदुरुस्ती… पुढे धोका आहे !

राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीची साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading