- आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कवी अजय कांडर यांची प्रकट मुलाखत
- विद्यापीठ अभ्यासक्रमात ‘युगानुयुगे तूच’च्या हिंदी अनुवादा निमित्त मुलाखत
कणकवली – जगातील कोणताही महामानव आपल्याला वैश्विक भानच देत असतो. मात्र आपली विचार दृष्टी तेवढी विस्तारत नसल्यामुळे आपण महामानवांना आपापल्या जातीत जखडून ठेवतो. समाज जात मुक्त करायचा असेल तर प्रथम आज महामानवाना जातीत जखडून ठेवणाऱ्या भक्तांपासून सावध रहायला हवे. आज जातीच्या भक्तांनी महामानवांच्या विचारालाच सुरुंग लावला असून विवेकी समाजाने याचा गंभीर विचार करायला हवा नाहीतर समाजच धोक्यात येईल, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आयोजित केलेल्या मुलाखत कार्यक्रमात केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (छत्रपती संभाजीनगर – औरंगाबाद ) हिंदी एम.ए.च्या अभ्यासक्रमात यावर्षीपासून कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच ‘ या दीर्घ कवितेचा ‘युग युग से तू ही ‘ या हिंदी अनुवादाचा समावेश करण्यात आला. यानिमित्त विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे कवी अजय कांडर यांची विशेष मुलाखत विद्यापीठात आयोजित करण्यात आली. यावेळी युगानुयुगे तूच चे अनुवादक प्रा.डॉ. सुधाकर शेंडगे, विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय राठोड, कवी तथा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दासू वैद्य आदी उपस्थित होते.
अजय कांडर म्हणाले, एखाद्या महामानवावर कविता लिहिणे ही आजच्या काळात जोखीम पत्करण्याची गोष्ट आहे. कारण सगळ्याच महामानवांना आपापल्या जातीत वाटून घेण्यात आले. पण कुठल्याच महामानवाला एका जातीत बांधता येत नाही याचे भान तीव्र होणे ही आजची गरज आहे. महामानवावर आपण जेव्हा कविता लिहितो तेव्हा लिहिणाऱ्या कवीवर एक मोठी जबाबदारी असते. लिहिल्या गेलेल्या कवितेच्या प्रत्येक शब्दाशी स्वत: जगताना कवीने प्रामाणिक राहिले पाहिजे. मी बाबासाहेबांवर कविता लिहिली आणि मी कोणत्याही जातीच्या व्यासपीठावर जात असेन तर मी बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली असा त्याचा अर्थ होतो. दुर्दैवाने आज लिहिती माणसे मात्र जातीचे समर्थन करताना दिसतात आणि स्वतःच्या जातीच्या कोंढावड्यात स्वतःच मिरवत राहतात. स्वतःच्या जातीच्या लोकांना पुरस्कार देतात. स्वतःच्या जातीच्या लोकांचे गुणगौरव आयोजित करतात आणि स्वतःच्याच जातीच्या लोकांमध्ये विचारवंत म्हणून मिरवतात. या देशात दोन विचारवंत सर्वश्रेष्ठ आहेत ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. आंबेडकर आणि गांधी यांच्यात मतभेद जरूर होते पण मनभेद नव्हते. तसे असते तर गांधींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देशाची घटना लिहिण्यासाठी सुचवलं नसतं. आपण त्या त्या वेळचे प्रसंग समजून घेत नसल्यामुळे आंबेडकर आणि गांधी यांच्यात सतत दुश्मनीची विभागणी करतो हे फार चुकीचे आहे.
युगानुयुगे तूच’ राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याचे श्रेय अनुवादकांचे
‘युगानुयुगे तूच’ बाबासाहेबांवरील दीर्घ कवितेचा दिल्ली वाणी प्रकाशनतर्फे हिंदीत अनुवाद झाला. त्यामुळे ही कविता राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आणि अवघ्या काही महिन्यात या अनुवादाची पहिली आवृत्ती संपली. याचे सारे श्रेय अनुवादक सुधाकर शेंडगे यांना जाते. यानिमित्ताने मी केलेले बाबासाहेबांवरील भाष्य भारतातल्या सर्व भाषिकांपर्यंत पोहोचले याचा आनंद होत आहे.असेही कवी कांडर यांनी या मुलाखतीत सांगितले.
हिंदी एम. ए.च्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या मुलाखत कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.डॉ.शेंडगे यांनी केली. तर आभार प्रा.डॉ.संजय राठोड यांनी मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.