आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – गेल्या काही दिवसात थंडी कशी होती ?
माणिकराव खुळे – गेल्या गुरुवार दि. ९ जानेवारीपासून ते आजपर्यंत महाराष्ट्रात केवळ दिवसाच गारवा आणि रात्री ऊबदारपणा जाणवला. ह्यातून गेले १० दिवस विशेष अशी थंडी जाणवली नाही.
आज तर राज्यात रत्नागिरी, कोल्हापूर नाशिक सातारा सांगली येथील पहाटेचे किमान तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ४ डिग्री से. ग्रेडची वाढ जाणवली. परंतु त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा १ ते ३ डिग्री से. ग्रेडची घसरणही जाणवली.
प्रश्न – परंतु आता पुढील थंडी कशी असेल ?
माणिकराव खुळे – उद्या रविवार दि. १९ जानेवारी पासून पुढील १० दिवस म्हणजे मंगळवार दि. २८ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात पहाटे ५ चे किमान तापमानात ४ ते ५ डिग्री से. ग्रेडची घसरण होवून १० ते १२ डिग्री से. ग्रेड पर्यन्त स्थिरावण्याची शक्यता जाणवते.
त्यामुळे आता रात्रीचा सध्याचा ऊबदारपणा कमी होवून, भले कडाक्याची नसली तरी, महाराष्ट्रात उद्यापासून पुढील दहा दिवस, माफक अश्या थंडीची शक्यता जाणवते.
प्रश्न – कमी-अधिक अशा ह्या थंडीचा प्रभाव राज्यात कोठे आणि कसा असेल ?
माणिकराव खुळे – विशेषतः संपूर्ण दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अश्या २३ जिल्ह्यात थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल. तर कोकण, खान्देश, नाशिक नगर, छ.सं नगर अश्या १३ जिल्ह्यात किमान तापमान सरासरीइतके किंवा काहीसे किंचित अधिक राहून तेथे केवळ साधारण थंडीचीच शक्यता जाणवते.
प्रश्न -कश्यामुळे थंडीची शक्यता निर्माण झाली ?
माणिकराव खुळे – याची तीन कारणे सांगता येतील.
i) समुद्रसपाटीपासून एक किमी. उंचीपर्यंत गुजराथ पासून राजस्थानपर्यंत सध्याचा तिरपा असलेला कमी दाब क्षेत्राचा आस
ii) उत्तर भारतात एकापाठोपाठ मार्गस्थ होणारे पश्चिमी प्रकोप आणि अरबी समुद्रातून नैरूक्त दिशेकडून येणाऱ्या आर्द्रतेचा पुरवठा ह्यातून तेथे सध्या होणारा पाऊस, बर्फबारी व थंडी तसेच
iii) ओरिसावरील उच्चं दाब क्षेत्र आता राजस्थान मध्य प्रदेशकडे सरकले आहे. त्यामुळे घड्याळकाटा दिशेने वहन होणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तर भारतातील थंडी, बिहार झारखंड मार्गे पूर्वेकडून महाराष्ट्रात खेचल्या जाण्याच्या शक्यतेमुळे आता पुढील १० दिवसात थंडीची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रश्न – ला-निना व एमजेओ चा परिणाम कसा असेल ?
माणिकराव खुळे – प्रशांत महासागरात सध्या अपेक्षित पण कमकुवत असे ‘ ला- निना ‘चे अस्तित्व जरी असले, तरी त्याचे हे अस्तित्व, केवळ जानेवारी ते मार्च अश्या तीन महिन्यासाठीच अल्पजीवी ठरु शकते. एप्रिल नंतर पुन्हा एन्सो तटस्थ अवस्थेत जाण्याची शक्यता आहे.
सध्याच्या ला-निना चे अस्तित्व तसेच भारत महासागरीय विषववृत्तीय परीक्षेत्रात सध्याच्या दोन आठवड्यासाठी संचलनित असलेले एम.जे.ओ. चे अस्तित्वही महाराष्ट्राच्या वातावरणावर विशेष असा कोणताही परिणाम करणार नाही, असे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.