February 19, 2025
Ishawary Patekar wrote on Dharmaveer Patil Poetry Book
Home » दिवस कातर होत जाताना : आतबाहेरच्या कल्लोळाची काळीज-पासोडी
मुक्त संवाद

दिवस कातर होत जाताना : आतबाहेरच्या कल्लोळाची काळीज-पासोडी

ही कविता अस्वस्थेची असंख्य चित्रं, प्रतिमांच्या कॅनव्हासवर रंगवते. आणि खरा कवी न्याहाळायचा तर त्याच्या प्रतिमासंभार अभ्यासला की त्याचे कसब कळते. नाहीतर प्रतिमा-प्रतीकांच्या निवडीतच कवीचा खरा कस लागत असतो. या कसाला धर्मवीर पाटील पुरून उरतात. म्हणून मला त्यांचे कवी म्हणून महत्व आहे.

ऐश्वर्य पाटेकर, नाशिक

हरेक कवी-कलावंत काळाची झाडा-झडती त्याच्या वकुबानुसार घेत असतो. त्यात तो किती यशस्वी झाला आहे; याचा निकाल पुन्हा काळच देत असतो. मात्र यात असेही काही सर्जक असतात की ते काळाने झडती घेतलेला प्रदेश आपल्या चिंतनाच्या कह्यात घेऊन त्यास भिडून जो अभिव्यक्तीचा आविष्कार मांडतो; तो अत्यंत वास्तव खराखुरा आणि समकालाच्या निर्मितीच्या बजबजपुरीपासून बाजूला जाऊन निवांतपणे आपल्या निर्मितीला साक्षात करतो. यात एक नाव आग्रहाने घ्यावे लागेल ते म्हणजे धर्मवीर पाटील यांचे. ‘दिवस कातर होत जाताना…’ हा आपला कवितासंग्रह घेऊन काव्यप्रदेशात दमदार पाऊल टाकत आहे. त्यांनी आपल्या कवितेतून अवताल-भवतालाची बेमालूम झाडा झडती घेतलेली आहे. आपल्या प्रतिमा-संकेतातून काळाने केलेली पडझड तंतोतंत रेखाटली आहे. तसे आपण या कवीस त्याच्या पहिल्या ‘संभ्रमाच्या तळाशी’ या कवितासंग्रहापासून ओळखतो. मात्र धर्मवीर पाटील यांनी आपल्या या संग्रहाला ओलांडून फार पुढचं पाऊल सदर संग्रहात टाकलं आहे.

“काळाच्या जबड्यात अडकलाय हात
आणि मनाच्या घनघोर चिंध्या सावरीत
आत-बाहेर कोलाहल माजलेला असताना
अपरिमित हालचालींना सावरू पाहतेय वातावरण”
हे उदाहरण पुरेसे आहे.

थोडक्यात सांगायचे तर ही कविता दु:खाचा अनुवाद करते. ही कविता अस्वस्थेची असंख्य चित्रं, प्रतिमांच्या कॅनव्हासवर रंगवते. आणि खरा कवी न्याहाळायचा तर त्याच्या प्रतिमासंभार अभ्यासला की त्याचे कसब कळते. नाहीतर प्रतिमा-प्रतीकांच्या निवडीतच कवीचा खरा कस लागत असतो. या कसाला धर्मवीर पाटील पुरून उरतात. म्हणून मला त्यांचे कवी म्हणून महत्व आहे.

उदाहरणादाखल काही प्रतिमा, ‘छिन्नविछिन्न काळाच्या अस्ताव्यस्त घड्या’, ‘निद्रिस्त आणि अवाढव्य कल्पनांचा पर्वत’, ‘आयुष्याला चिकटलेली ही निराशेची प्रेषिते’, ‘तकलादू प्रयत्नांचे जंजाळ’. ‘जगण्याचे कल्पित संदर्भ’, ‘कोवळ्या क्षणांचे सुखद धुमारे’, ‘एकाकीपणाच्या गंभीर अवस्थेला न सापडणारी वाट’, ‘अजूनही अंगणाच्या भोवती चिकटलेले स्पर्श’, ‘आजूबाजूला साचलेले असंख्य हातांचे खड्डे’, ‘मनात निपजलेलं तणकट’, ‘दीर्घकाळ आयुष्याला चिकटून राहणाऱ्या अपेक्षांच्या सावल्या, ‘समस्येची आदिम मुळं जन्माला घालणारं शहर’, ‘हिंस्र श्वापदांचं पालकत्व’, ‘सतत दौडत राहणारे प्रश्नांचे बेलगाम घोडे’, ‘भयाण शांततेच्या दाराशी गोठलेला समुद्र’, ‘दगाबाज सावल्यांचा प्रदेश’, ‘आयुष्यभर पाठ न सोडणारं आतलेपण’, ‘भूतकाळात गाडले गेलेले परिवर्तनाच्या हाकेचे दिवस’, ‘बालिशपणाच्या खुंट्याला बांधले गेलेले लोक’… या प्रतिमा कवितेच्या स्वभावाशी आपल्याला रूबरू करतात.

प्रख्यात अभ्यासक दा. गो. काळे यांनी या संग्रहाची पाठराखण केली आहे. त्यातील एखाद-दुसरीच ओळ इथे उधृत करतो ‘दिवस कातर होत जातानाच्या पार्श्वभूमीवर हा कवी संभ्रमाच्या तळाशी असलेली आपली गतकातरता तपासतो. त्या अनुभवातून आजच्या आपल्या असण्यातला एक अर्थ देतो. काळ आणि त्याने निर्माण केलेली दु:खाची धग या कवितेत आहे. सभोवतालातील अस्वस्थता, त्याला जोडणाऱ्या मानसिक व्यथांचे एक कोलाज निर्माण होते…’ हे अतिशय अचूक वाचन आपल्यापुढे या कवितेचे केले आहे.

या कवितेचे मला मोल वाटण्याचे कारण मंगेश नारायणराव काळे हा कवी आहे. या कवीने आपलं व्यक्तित्व ज्या पद्धतीने समोर ठेवलं आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्या कृती आणि उक्तीचा सकारात्मक प्रभाव माझ्यावर आहे. वाड्मयक्षेत्राकडे विलक्षण गांभीर्याने पाहणारा अन एखाद्या व्रतस्थासारखा आपला वस्तुपाठ गंभीर लिहित्या लेखकांपुढे ठेवणारा. याच्या नजरेच्या चाळणीतून पारखून आलेली धर्मवीर पाटील यांची कविता आहे. हे मला अधोरेखित करायचे आहे. मंगेश नारायणराव काळे यांच्याच ‘रेड स्पॅरो ए मीडिया हाऊस’ या प्रकाशनाडून सदर संग्रह प्रकाशित झाला आहे. संग्रहाच्या श्रीमंत निर्मितीच्या बाबतीत अलीकडे प्रकाशित झालेले कवी राजू देसले यांचा ‘अवघेचि उच्चार’ हा एकमेव संग्रह मला आवडला होता आणि आता कवी धर्मवीर पाटील यांचा ‘दिवस कातर होत जाताना’ वाचायलाच हवा असा संग्रह!

कवितासंग्रह-दिवस कातर होता जाताना
कवी:
धर्मवीर पाटील
प्रकाशन:
रेड स्पॅरो ए मीडिया हाऊस’
मुखपृष्ठ:
अन्वर हुसेन
किंमत:
२९९ रुपये
संपर्क:
७५८८५८६६७६


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading