गेल्या सात दशकात ज्ञानेश्वरी मात्र टिकून राहीली कारण त्यात ज्ञान सांगितले आहे. ज्ञानासाठी त्याचे वाचण केले जाते. त्याची पारायणे केली जातात. यामुळे हा ग्रंथ आजही मराठीत टिकूण आहे. बदलत्या काळातही हे ज्ञान उपयुक्त असे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ।। 12 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे ज्या दैवाच्या योगाने वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते.
दिपावली हा सण अंधार दूर करणारा. जीवनात प्रकाश आणणारा असा आहे. पूर्व दिशेला सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याची येण्याची चाहूल ही पहाटेपासूनच लागते. अंधार हळूहळू दूर करत सर्वत्र प्रकाश होतो. जीवनातही अचानक ज्ञानाचा उजेड पडत नाही. हळूहळू उजेत पडतो. अज्ञान हळूहळू दूर होते. जसे प्रकाशाचे राज्य सर्वत्र पसरते तसे आयुष्यात ज्ञानाच्या प्रकाशाचे राज्य येते.
पूर्वीच्या काळी नागरिकात भीती असायची. संध्याकाळ होण्या आधी घरी परतावे लागे. कारण रात्र झाल्यानंतर अंधारात मार्ग काढणे सोपे नसायचे. तर वन्यप्राण्यापासूनही धोके असायचे. अधाराचा फायदा घेत दुर्घटना घडण्याचाही धोका असायचा. वीजेची सोय नव्हती आणि दिव्यांचा प्रकाशात सर्व रात्र काढावी लागत असे. अधाराचे साम्राज्य हे भीती वाढवणारे होते. अशा या भीतीतूनच नवनवे शोध लावण्याचे प्रयत्न झाले. अंधार दूर करण्यासाठीच प्रयत्न केले गेले. ज्ञानानेच हा प्रकाश पडला.
मराठी भाषा ज्ञान भाषा व्हावी असे वारंवार सांगितले जाते. कारण ज्ञान भाषा झाली तरच ती भाषा शाश्वत होते. अन्यथा ती भाषा नष्ट होते. मराठी बाबतही हाच नियम आहे. नवनव्या तंत्रज्ञानात भाषेचा वापर वाढला तरच त्या भाषेचे संवर्धन होईल. मुळात मराठी ही ज्ञान भाषा आहे. ज्ञानेश्वरीच्या रुपातून हे ज्ञान गेली सातशे-आठशे वर्षे मराठीत नियमित सांगितले जात आहे. अनेक धार्मिक ग्रंथ आले अन् गेलेही पण गेल्या सात दशकात ज्ञानेश्वरी मात्र टिकून राहीली कारण त्यात ज्ञान सांगितले आहे. ज्ञानासाठी त्याचे वाचण केले जाते. त्याची पारायणे केली जातात. यामुळे हा ग्रंथ आजही मराठीत टिकूण आहे. बदलत्या काळातही हे ज्ञान उपयुक्त असे आहे. ज्ञानाचे अमरत्व ज्ञानेश्वरीत सांगितले असल्यानेत ती आजही टिकूण आहे. त्या ज्ञानाचा सुकाळ या मराठी नगरीत करण्याचे स्वप्न ज्ञानेश्वरांना पाहीले आहे. यामुळे ही भाषा आजही ते ज्ञान वाटत आहे. या ज्ञानाचा प्रकाश पाडून सर्वत्र दिपावली साजरी व्हावी.
ज्ञानेश्वरीचे पारायण हे ज्ञान मिळवण्यासाठीच करावे. जीवनातील अंधार दूर करण्यासाठी करावे. आत्मज्ञानाचा प्रकाशातून जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. प्रकाश अंधार दूर करतो. त्या उजेडात आपण उत्तम कार्य करू शकतो. कामात सुलभता येते. तसे शब्दाचा प्रकाश अज्ञान दूर करतात. त्या ज्ञानाच्या प्रकाशात आपला जीवन प्रवास उत्तमप्रकारे करू शकतो. याच ज्ञानासाठी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. ती अनुभवायला हवी. जीवनात ज्ञानाची दिवाळी साजरी करायला हवी.