“युक्त आहार विहारस्य….” असा सल्ला भगवतगीतेत श्रीकृष्णांनी दिला आहे, त्यानुसार आहार योग्य असल्यास आणि विहार योग्य असल्यास येणारे रोग निश्चित कमी होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहिजे.
सचिन आत्माराम होळकर,
कृषीतज्ञ साहित्यिक लेखक, मोबाईल – ९८२३५९७९६०
भरड धान्यांचे महत्त्व:-
विज्ञानाने खूप प्रगती केली विविध यंत्रणा आणि तंत्रज्ञान विकसित केले मात्र हे सर्व असून देखील मानवी आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत आहोत हे लक्षात आले. नवनवीन आजार आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती रोज अस्तित्वात येत आहे पण हे सर्व उपचार खरंच परवडणारे आहेत का हा खरा प्रश्न आहे, त्यापेक्षा आजारी पडणार नाही याबाबतची काळजी घेतल्यास पुढचा होणारा संघर्ष आणि त्रास कमी करता येईल का हे पाहणे गरजेचे झाले आहे.
“युक्त आहार विहारस्य….” असा सल्ला भगवतगीतेत श्रीकृष्णांनी दिला आहे, त्यानुसार आहार योग्य असल्यास आणि विहार योग्य असल्यास येणारे रोग निश्चित कमी होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहिजे. आज राष्ट्रीय पातळीवर भूकबळीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्याचप्रमाणे अन्नातील पोषक घटकांच्या प्रमाणांची झालेली घसरण देखील चिंताजनक आहे. एकीकडे अनेकांना खायला अन्न नाही तर दुसरीकडे खाल्लेले अन्नातून व्यक्तीचे पोषण व्यवस्थित होत नाही कारण आजकालच्या आहारात झालेला मोठा बदल हा कारणीभूत आहे. फास्ट फूड, जंक फूड फायबर आणि अन्नद्रव्य नसणारे आहार सेवनात असल्याने आहारात पोषण मूल्यांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. या सर्व परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी भरड धान्य किंवा तृणधान्याचा आहारात वापर वाढवणे खूप आवश्यक आहे असे लक्षात आले.
भरड धान्यांचा आहारात समावेश गरजेचा
प्राचीन काळापासून या भरड धान्याला आहारात मोठे महत्त्वाचे स्थान आहे. कमी खते आणि औषधांच्या वापरातून निर्मित भरड धान्य अर्थात मिलेट्स हे आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे हे महत्त्व लक्षात घेता भारताच्या पुढाकाराने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी 70 देशांनी यात पुढाकार घेतला आणि या भरड धान्याला संपूर्ण जगाने सुपरफुड्स म्हणून स्वीकारले. रक्तातील साखर कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे स्थूलता कमी करण्यासाठी याशिवाय रक्तातील आयर्न, कॅल्शियम यासारखे घटक वाढवण्याच्या दृष्टीने भरड धान्यांचा आहारात समावेश असणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे भरड धान्यांमध्ये ग्लुटेनचे प्रमाण नसल्याने तसेच फैट्स अत्यंत कमी असल्याने याशिवाय भरड धान्यांमध्ये तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स, विटामिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, झिंक, आयोडीन यासारखे सूक्ष्म घटक मोठ्या प्रमाणात असल्याने शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ते सर्व मदत करतात.
भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटकी, सावा, कुट्टू, राजगिरा अशा दहा धान्यांचा समावेश होतो. ही धान्य मानवाला तसेच पशुपक्षांना देखील खूप उपयुक्त आहे. भरडधान्य पचायला हलकी असतात ज्येष्ठ नागरिक वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना देखील ही खाण्यासाठी खूप उपयुक्त असतात. भरड धान्य सेवन केल्याने रक्तातील ट्रायग्लीसराईड, सी रिएक्टिव्ह प्रोटीन यांच्या प्रमाणात घट होऊन हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंदर्भातील रोग यामुळे कमी होतात. तंतुमय पदार्थ भरड धान्यात जास्त असल्यामुळे शरीरातील टॉक्सिसिटी अथवा विषारी पदार्थ बाहेर टाकन्यामध्ये हे सहाय्यक आहे. आपल्या शरीरातील उपयुक्त जिवाणू अर्थात प्रोबायोटिक्सच्या वाढीसाठी ही धान्य मदत करतात त्यामुळे बद्धकोष्ठता पासून आपली सुटका होते. या धान्यामध्ये कोलेस्टेरोल कमी करण्याची क्षमता आहे. यात साखरेचे प्रमाण अत्यल्प असल्याने मधुमेह असताना देखील भरड धान्यांचा उपयोग करता येतो. भरड धान्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट, क्षार, जीवनसत्वे असल्याने त्याचा शरीराला चांगला उपयोग होतो.
भरडधान्य उत्पादनातील अडचणी :
कोणत्याही पिकाचे उत्पादन वाढवणे हे जितके बोलणे सोपे असते प्रत्यक्षात तितकेच अवघड असते हे आपणाला यापूर्वी देखील अनेकदा अनुभवास आले आहे. भरड धान्याच्या बाबतीत देखील असाच काहीसा प्रकार आहे. मुळात भरड धान्यांना मिळणारे दर हे शेतकरी म्हणून किंवा धान्य उत्पादक म्हणून परवडतात का ? हा एक प्रश्न आहे. कारण दिवसेंदिवस शेतीचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चांगले बागायती आणि उत्पन्न देणारे पिके देखील न परवडण्यासारखे झाले आहे. भरड धान्याचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना किती शिल्लक राहील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र मिलेट मिशन सुरू केले आहे ते अंतर्गत राज्य सरकारने ज्वारीसाठी 73% बाजरीसाठी 65 टक्के आणि नाचणीसाठी 88% इतकी आधारभूत किंमत वाढवली आहे हा निर्णय जरी खूप चांगला असला तरी देशाला पुरेल इतके उत्पादन घेण्यासाठी फक्त आधारभूत किंमत वाढवणे हा उपाय योग्य ठरणार नाही, त्यासाठी बरेचसे बदल करावे लागणार आहे हे नक्की. मागील काही वर्षांचा अभ्यास करता पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत असल्याचे पाहायला मिळाले आहे यावरून भरड धान्य लागवडीकडे शेतकऱ्यांचा फारसा कल असल्याचे दिसत नाही. खरीप ज्वारी पिक 80 टक्के तर रब्बी ज्वारी 53% उत्पादन घटले आहे, बाजरीचे देखील जवळपास 50 टक्के इतके उत्पादन घटले आहे. नाचणीची देखील गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये पीछेहाट झाली आहे. महाराष्ट्रातील क्रॉप पॅटर्न चा अभ्यास केला तर आपल्याकडे सिंचन आणि पाण्याची उपलब्धता असल्याने ऊस, तूर, सोयाबीन, मका असे नगदी पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळालेले आहे अशा शेतकऱ्यांना तृणधान्याकडे वळवणे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढून घेणे हे मेहनतीचे आणि जिकरीचे काम आहे. भरड धान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्वात अगोदर नवनवीन सुधारित जाती शोधून त्या विकसित करून त्यांचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. चांगल्या उत्पादन देणाऱ्या आणि रोग-कीड़ीला बळी न पडणाऱ्या भरड धान्यांच्या जाती विकसित करणे हे शास्त्रज्ञान समोरचे सध्याचे मोठे आव्हान आहे. बाजरी सारख्या आणि ज्वारी सारख्या पिकांना पक्षी आणि इतर प्राण्यांचा त्रास होऊ नये यासाठी देखील आपल्याला उपाययोजना करणे आवश्यक आहे. बाजरी पिकासाठी केसाळ बाजरीच्या जाती अधिकाधिक प्रमाणात विकसित करून पक्षांच्या खाण्यापासून ते आपल्याला वाचवता येतील त्याचप्रमाणे भविष्यकाळात ज्वारीच्या देखील या प्रकारच्या जाती बनवण्याची आवश्यकता आहे. भरड धान्याची काढणी इतर पिकांच्या तुलनेत काहीशी खर्चिक आणि किचकट असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्वारी आणि बाजरी वगळता इतर पिकांची काढणी ही बहुतांश भागात मॅन्युअल अर्थात माणसांकडून केली जाते, यासाठी यंत्रणा आहे मात्र क्षेत्र कमी असल्याने आणि यंत्रांचा फारसा प्रसार नसल्याने शक्यतो या प्रकारे कधी काढली जात नाही या सर्व बाबी लक्षात घेता भरड धान्याची काढणी करण्यासाठी सहकारी संस्था, शेतकरी संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून भाडेतत्त्वावर भरड धान्य काढणीचे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, याशिवाय भरड धान्य काढण्यासाठीच्या यंत्रांवर शासनाने सबसिडी अथवा अनुदान देऊन त्यांचे दर कसे कमी करता येईल याकडे बघणे अत्यावश्यक आहे. कारण माणसांकडून केलेल्या काढणीमध्ये निश्चितच उत्पादन खर्च हा जास्त असतो त्यात वेळ आणि नुकसान दोन्हीही होते. त्यामुळे भरड धान्यांचे उत्पादन वाढवताना आणि त्याची लागवड वाढवताना आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मक दोन्हीही बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. भरडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी फक्त आधारभूत किमती न वाढवता आधारभूत किमतींचे संरक्षण या पिकांना देणे आवश्यक आहे, फक्त श्रीधान्य असे नामकरण करून आपण त्यांचा गुणगौरव करण्यापेक्षा प्रत्यक्ष हे धान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशात पैसा कसा पडेल हे बघितले पाहिजे तरच लागवड वाढू शकते.
विविध भरड धान्य लागवड:-
साधारणपणे मुख्य भरड धान्य दुय्यम भरडधान्य आणि सुडोमिलिट्स असे भरड धान्याचे विविध प्रकार आहेत. मुख्य भरड धान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा समावेश असून दुय्यम मध्ये राजिगरा, राळे, वरी, कोद्रा आदी पिकांचा समावेश आहे.
ज्वारी:- ज्वारी पिकाची इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व 2000 वर्ष मध्ये लागवड केल्याचे पुरावे उपलब्ध आहे. याशिवाय आफ्रिका भारत, चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि इतर देशात देखील ज्वारीची लागवड होते. भारतात भातानंतर मनुष्याचे अन्नधान्य म्हणून ज्वारीचा क्रमांक लागतो. भारतातील ज्वारीच्या एकूण क्षेत्रापैकी 34 टक्के क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. राज्यात रब्बी ज्वारीचे पीक हे हलक्या मध्यम आणि भारी बागायती जमिनीत घेतली जाते. ज्वारीच्या लागवडीसाठी जमिनीची योग्य मशागत करून जमीन तयार करावी. लागवडीसाठी साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा कालावधी निवडावा प्रती हेक्टरी दहा किलोपर्यंत बियाणे वापरावे. बियाण्यास ऍझोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया करावी. ज्वारी लागवडीसाठी अंतर साधारण 45 बाय 15 सेंटिमीटर असे ठेवावे. साधारण 110 दिवसात ज्वारीचे पीक काढणीसाठी येते.
ज्वारीच्या फुले माउली, फुले सुचित्रा, माळदांडी, फुले वसुधा, फुले यशोदा, पीकेव्ही क्रांती, परभणी मोती या जाती आहेत. हुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी फुले पंचमी या जातींची निवड करावी. भारी आणि बागायती जमिनीसाठी फुले रेवती या जातीची निवड करावी लागते.
बाजरी:- कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामान आणि वातावरणात देखील उत्पादन देण्याची क्षमता असणारे बाजरी हे पीक आहे. अनिश्चित स्वरूपाचा आणि कमी पाऊस झाला तरी इतर सर्वच पिकांपेक्षा बाजरीचे उत्पादन येऊ शकते. साधारण बाजरीची लागवड खरिपात आणि उन्हाळी हंगामात केली जाते. बाजरीची पेरणी करताना खूप खोलवर न करता थोडीशी वरचेवर करणे आवश्यक असते. पावसाळ्यातील पेरणी ही 15 जून ते 15 जुलै या काळात करणे आवश्यक आहे, तर उन्हाळी बाजरी ही 15 फेब्रुवारी पर्यंत पेरावी लागते. पेरणीचा हंगाम बदलल्यास उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. पीक वाढीच्या महत्त्वाच्या काळात विशेषतः पोटरीच्या अवस्थेत आणि कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. साधारण 120 दिवसात बाजरी पिकाची काढणी केली जाते.
बाजरीसाठी श्रद्धा, सबुरी, शांती, समृद्धी, परभणी संपदा याशिवाय बाजारामध्ये विविध प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. सध्या पक्षांपासून बाजरीचे संरक्षण होण्यासाठी केसाळ बाजरीच्या जाती बाजारात आल्या असल्याने त्यांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
नाचणी – नाचणी पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी नवनवीन सुधारित जातींची लागवड करणे गरजेचे आहे. साधारण लागवडीसाठी प्रती हेक्टरी 10 किलो इतके बियाणे वापरावे. तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटिमीटर अंतरावर नाचणीची पेरणी करतात. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. रोपे तयार करून लागवड केल्यास म्हणजेच पूणर्लागवड पद्धतीने बियाणे पेरल्यास पाच किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते.
वी आर 708, पीएस ४००, आर यु आठ, आरएच ३७४, दापोली, पीएस 110, यासारख्या अनेक जाती सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. नाचणी हे पीक उष्णकटिबंधीय असून साधारण 12 ते 28 अंश सेल्सिअस तापमान पिकासाठी योग्य आहे. बी उगवणीसाठी 16 ते 21 अंश सेल्सिअस तापमान तर फुटवेच्या वाढीच्या काळात 15 ते 18 अंश सेल्सिअस तापमान लागते. नाचणी पिकाची काढणी पक्व झाल्यानंतर कमीत कमी वेळात करावी लागते अन्यथा बोंडातील दाणे खाली गळतात. पक्व झालेल्या नाचणीची बोंडे खुडून त्याची काढणी करावी त्यानंतर ती मळून त्यापासून दाण्यांचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. साधारण प्रति हेक्टरी 20 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादन नाचणी पिकापासून मिळते.
राजगिरा:- राजगिरा हे दलवर्गीय आणि जलद वाढणारे पीक असून महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात सर्वत्र लागवड आढळते. साधारण 110 ते 120 दिवसांमध्ये राजगिरा पीक काढण्यासाठी येते. पाच ते सात फूट उंच राजगिऱ्याचे झाड वाढते. प्रति हेक्टरी पाच ते आठ क्विंटल इतके उत्पादन राजगिऱ्यापासून मिळते. राजगिऱ्याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी काळी कसदार जमीन उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक आहे. एकरी साधारण 600 ग्रॅम ते 900 ग्रॅम पर्यंत बियाणे लागते. हरभरा आणि गव्हामध्ये मिश्र पीक म्हणून घेतले जाते. रब्बी हंगामात सलग पीक म्हणून लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. मध्यम ते भारी प्रतीच्या जमिनीत पेरणी करावी लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. पेरणी साधारण ऑक्टोबर 15 ते 7 नोव्हेंबर या दरम्यान करावी. हेक्टरी दीड ते दोन किलो बियाणे लागते.
अन्नपूर्णा, सुवर्णा, फुले कार्तिकी या सुधारित जाती आहे. बियाणे बारीक असल्याने वाळलेली बारीक माती मिसळून दीड फुटी पांभरीने 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर एक ते दीड सेमी. खोलीपर्यंत पेरणी करावी. पेरणीनंतर सारे पाडून लगेच हलके पाणी द्यावे. आठ दिवसांच्या आत पिकाची विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होते आणि रोपांतील योग्य अंतर राखले जाते.
राळे:- राळे हे धान्य बारीक तांदळासारखे दिसते. प्राचीन काळी राळ्याचे सेवन केल्याचे अनेक पुरावे आहे. भारतातील या पिकाची लागवड आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाना, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात केली जाते. कमी पक्वता कालावधी असणारा आणि हलक्या जमिनीत उत्तम वाढ या पिकाची होते. सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास राळ्या पिकाचे चांगले उत्पादन येऊ शकते. आपल्या राज्यात रब्बी पीक लागवडीसाठी पीडीकेव्ही यशश्री हे वान उपलब्ध करून देण्यात आले आहे. राळा पिकाची लागवड ही खरीप हंगामात केली जाते. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड करावी. रोपांची लागवड करायची असल्यास रोपे वीस ते पंचवीस दिवसांच्या वयाची झाल्यावर जुलै च्या पहिल्या आठवड्यात राळ्याची लागवड करता येते. साधारण प्रति हेक्टरी आठ ते दहा किलो बियाणे वापरावे. बियाणे बारीक असल्याने त्यात माती मिक्स करून पेरणी करावी. साधारण दोन ओळीमध्ये तीस सेंटीमीटर तर दोन रोपांमध्ये दहा सेंटिमीटर इतके अंतर ठेवावे.
वरी:- वरई अर्थात वरी यापासून भगर बनवली जाते. आपल्याकडे उपवासासाठी मोठ्या प्रमाणात भगरीचा आहार घेतला जातो. यात ग्लूटेन अजिबात नसल्याने तसेच प्रथिने आणि तंतुमय पदार्थ चांगल्या प्रमाणात असल्याने उपवासासाठी भगरीची शिफारस केली जाते. महाराष्ट्रामध्ये या पिकाची लागवड नाशिक, अकोले, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, धुळे तसेच कोकणामध्ये पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये केली जाते. वरीच्या लागवडीसाठी उष्ण व समशीतोष्ण हवामानाची आवश्यकता असते. या पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी हलक्या ते मध्यम मगदूराची मात्र निचऱ्याची जमीन आवश्यक असते. जमिनीची मशागत करून त्यावर शेणखत टाकून साधारण टोकन आणि रोप लागवड पद्धतीने या पिकाची लागवड करतात. फुले एकादशी हा उशिरा पक्व होणारा वाण असून 120 ते 130 दिवसात काढणीस येतो महाराष्ट्र राज्यासाठी फुले एकादशी या वाणाची शिफारस केलेली आहे. साधारण प्रति हेक्टरी 10 ते 12 क्विंटल पर्यंत या पिकाचे उत्पादन येते.
जव:- बार्ली अथवा जव हे गवत वर्गीय कुटुंबातील समशीतोष्ण हवामानात वाढणारे एक पीक आहे. साधारण पंधरा ते वीस सेंटीग्रेड समशितोष्ण भागात बार्ली पिकाचे उत्पादन घेतले जाते. बार्ली हे भारतातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. उत्पादनाच्या दृष्टिकोनातून भात, गहू, मका या धान्यानंतर बार्ली पिकाचा चौथा क्रमांक लागतो. भारतातील डोंगराळ प्रदेश, उत्तर पश्चिम मैदानी प्रदेश, उत्तर पूर्व मैदानी प्रदेश आणि मध्य भारतामध्ये बार्ली अथवा जवाची लागवड केली जाते. सध्या भारतात दहा हजारहून अधिक शेतकरी गट या पिकाचे उत्पादन घेत आहेत. बार्ली पिकाच्या पेरणीसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर चा पहिला आठवडा हा उत्तम काळ आहे. बागायती भागात बार्ली पिकाच्या पेरणीसाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येते. प्रति एकरी साधारण 40 किलो बियाणे वापरावे. बार्लीची लागवड करताना साधारण दोन ओळीमध्ये 25 सेंटीमीटर अंतर ठेवावे. पाच ते सहा सेंटीमीटर खोलीवर बार्लीची पेरणी करतात.
कोद्रा:- कोद्रा हे एक आशिया खंडातील विशेषता भारत आणि नेपाळमधील एक भरड धान्य आहे. हे एक वार्षिक धान्य असून याला अनेक जण नाचणी समजतात. भारत फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हीयतनाम, थायलंड, पश्चिम आफ्रिका या देशांमध्ये या पिकाची लागवड होते. भारतामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र इत्यादी राज्यात या पिकाची लागवड होते. हे एक अत्यंत चिवट पीक असून दुष्काळ सहन करणारे आहे. कमी पाण्यात देखील हे पीक तग धरू शकते. साधारण प्रति हेक्टरी साडेचारशे ते नऊशे किलो धान्य व बाराशे ते पंधराशे किलो पेंडा इतके उत्पादन या पिकाचे निघते.
सावा:- जून महिन्यात साधारण सावा या पिकाची लागवड करतात. दोन ओळीतील अंतर 20 सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर 10 सेमी इतके ठेवावे. व्हीएल २९ ही साधारण 115 ते 120 दिवसात तयार होणारी जात आहे. सहावा पिकाला खिरा अशा स्थानिक नावाने संबोधतात. या पिकाची लागवड मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र राज्यात केली जाते. पाण्याची सोय असल्यास वर्षभरात केव्हाही पेरणी करता येते. परंतु हलक्या जमिनीत आणि वरकस जमिनीत पेरणी करायची असल्यास खरीपाच्या सुरुवातीस आणि जूनच्या चौथ्या आठवड्यात पेरणी करावी. महाराष्ट्रात याची लागवड पुनरलागवड पद्धतीने केली जाते. पुनरलागवड करण्यासाठी साधारण प्रति हेक्टरी आठ ते दहा किलो बियाणे लागते. एक ते दीड मीटर रुंद आणि आठ ते दहा सेंटीमीटर उंच उतारानुसार लांबी ठेवून गादीवाफे तयार करावे लागते. खरिपाच्या सुरुवातीला लागवड करायची असल्यास सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पीक काढणीस तयार होते. सुधारित पद्धतीने लागवड केल्यास साधारण प्रति हेक्टर 20 क्विंटल इतके उत्पादन सावाचे येते.
कुटकी:- कुटकी पिकाची लागवड साधारण जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या काळात करण्यात येते. कुटकीच्या लागवडीसाठी साधारण प्रति हेक्टरी तीन ते साडेतीन किलो बियाणे लागते. दोन ते तीन सेंटीमीटर खोलीवर कुटकीची पेरणी करतात. लागवडीचे अंतर साडेबावीस सेंटीमीटर बाय साडेसात सेंटीमीटर इतके असून कुटकीसाठी दिंडोरी एक, दिंडोरी दोन, पीआरसी एक, जेपीयूपी आठ या जाती आहेत साधारण चार ते साडेचार क्विंटल इतके उत्पादन या पिकाचे मिळते.
भरड धान्यावरील प्रक्रिया:-
कुठलाही शेतीमाल असला त्यावर प्रक्रिया केल्यास व्हॅल्यू ॲडेड म्हणजे मूळ पदार्थापेक्षा अतिरिक्त पैसे मिळतात हे आपण अनेक अनुभवातून बघितलेल आहे. याव्यतिरिक्त अनेक पदार्थांच्या प्रक्रिया केल्यानंतर त्यांचा खप देखील वाढतो त्याचे कारण प्रक्रियायुक्त पदार्थ आणि चांगल्या चवीची प्रक्रियायुक्त पदार्थ दिल्यास निश्चितच आहारामध्ये त्याचा समावेश केला जातो. याच प्रकारे भरड धान्यांच्या देखील प्रक्रिया केल्यास निश्चितच भरड धान्यांचे प्रमाण आहारात वाढू शकते, शिवाय भरड धान्यांचा खप देखील यामुळे वाढतो. येत्या काळात फक्त पारंपारिक पद्धतीने पदार्थ बनवून भरडधान्यांचा खप वाढणार नाही यासाठी भरड धान्याच्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांचा समावेश आहारात करणे आवश्यक आहे.
भारतीय आहार परंपरेमध्ये आपल्याकडे ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेश भागामध्ये ज्वारी उडीद एकत्र दळून केलेले पीठ, नागलीची भाकर, ज्वारीचे पापड, लाह्या, बिबडे याशिवाय बाजरी पासून देखील लाह्या आणि इतर पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया सर्वसाधारणपणे केली जाते, आहारात भरड धान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी तांदूळ किंवा गव्हाचे प्रमाण कमी करून तांदळा ऐवजी भरड धान्यातील इतर पदार्थ घेणे आवश्यक आहे. डोशासारखा आणि इडली सारखा पदार्थ बनवताना त्यात तांदूळ कमी करून भरड धान्यंपैकी ज्वारीचा वापर केल्यास आहारात भरड धान्याचे सेवन वाढेल. पुलाव, मसालेभात त्याचप्रमाणे बिर्याणी तयार करताना तांदळाबरोबरच एखादे भरड धान्य त्यात एकत्र केल्यास निश्चितच चव देखील वाढेल आणि पोषण मूल्य देखील वाढतील यात शंका नाही. भरड धान्यांच्या पुऱ्या, शंकरपाळे, शेवया, नूडल्स, लाह्या बनवता येतात. गुळाचा उपयोग भरड धान्यांबरोबर करून विविध पदार्थ तयार करता येतात. बेकरी पदार्थांमध्ये सुद्धा भरड धान्यांचा वापर करता येतो.
भरड धान्यांपासून बिस्किटे तसेच नानकटाई बनवता येते. बर्गर हा पदार्थ आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो शिजवलेल्या शेंगा आणि मटार एकत्र करून बर्गर बनवता येतो, त्याचप्रमाणे मका, बटाटा, ब्रेड आणि भरड धान्यांचा वापर करून टिक्की देखील बनवता येते तव्यावर थोड्याशा तेलावर ही टिक्की भाजून घेतल्यास चवदार लागते. आपल्या आवडीचे भरडधान्य स्वच्छ धुऊन पाण्यात भिजून कुकरमध्ये वाफवून त्याची फोडणी दिल्यास एक चांगला पौष्टिक नाष्टा म्हणून त्याचा उपयोग आपल्याला करता येतो. याशिवाय नागलीच्या पिठाला फोडणी देऊन शिजवून त्यापासून अत्यंत पौष्टिक आणि चवदार नाष्टा बनवता येतो.
मॅगी सारखे नूडल्स बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ आणि भाजीपाला इतर पदार्थ वापरून उत्कृष्ट असे नूडल्स बनवता येतात. नागलीचे पीठ अर्थात नाचणी पिठापासून एक चांगल्या प्रकारे केक देखील बनवता येतो. ज्वारीचे धान्य भिजवून त्यामध्ये तांदूळ, मूग डाळ आणि इतर भाजीपाला टाकून उत्कृष्ट खिचडी बनवता येते. नाचणी आणि इतर काही भरड धान्यांपासून तांदूळ एकत्र करून डोसे बनवता येतात. आपल्याकडे तांदळाची खीर प्रचलित आहे मात्र बाजरीची देखील गोड अथवा तिखट खीर तयार करता येते यासाठी बाजरीचे पीठ तुपावर किंचित भाजून त्यात पाणी आणि कीसलेला गूळ मिसळून शिजवून घेणे आवश्यक आहे. ज्वारी आणि नाचणी यांची एकत्रित इडली बनवता येते.
गावोगावी भरडधान्यांपासून करण्यात येणाऱ्या प्रक्रिया आणि प्रक्रिया युक्त पदार्थांची माहिती शासनामार्फत दिल्यास किंवा या स्वरूपाचे कोर्सेस काढल्यास भरड धान्याचे पदार्थ आणि भरडधान्य मानवी आहारात वाढेल. बिस्किटे, नूडल्स, पापड, नानकटाई आणि इतर टिकाऊ पदार्थ भरड धान्यांपासून तयार केल्यास एक स्वतंत्र प्रक्रिया उद्योग उभा राहू शकतो त्यापासून शेतकऱ्यांना तसेच बचत गटांना चांगला नफा होऊ शकतो या दृष्टीने काम होणे अपेक्षित आहे..
सचिन आत्माराम होळकर
लासलगाव, ता. निफाड, जि नाशिक
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.