September 9, 2024
Prof. Suhas Bartakke is a writer who mix in nature
Home » प्रा. सुहास बारटक्के : निसर्गाशी एकरूप झालेला लेखक
मुक्त संवाद

प्रा. सुहास बारटक्के : निसर्गाशी एकरूप झालेला लेखक

निसर्गाचे संदर्भ येतील असे लेखन करणे ही स्वतःची अंतःप्रेरणा लेखक प्रा.सुहास बारटक्के मानतात. मात्र साहित्य चळवळ आणि लेखनाविषयी स्वतःची स्वतंत्र मते असणाऱ्या आणि ती जाहीरपणे मांडणाऱ्या प्रा. बारटक्के यांच्यासारख्या कोकणातील लेखकाला जास्त काळ दुर्लक्षित करून ठेवता येणार नाही.

आजवर कोकणात विपुल साहित्य लेखन केलं गेलं. भाऊसाहेब तथा वि. स. खांडेकर ते आजच्या नव्या पिढीतील लेखकांच्या साहित्यात वेगवेगळे विषय हाताळले गेले. मात्र कोकणातील असा एकमेव लेखक आहे, की तो माणूस म्हणून आपण आखून घेतलेल्या चौकटी पलिकडे नैसर्गिक जगणे हीच गोष्ट श्रेष्ठ मानतो. तसेच निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गसंवर्धनाचं काम करता करता निसर्गाचे संदर्भ येतील असे लेखन करणे ही स्वतःची अंतःप्रेरणा मानतो.

या लेखकाचं नाव आहे प्रा. सुहास बारटक्के. बहुआयामी लेखन करणाऱ्या प्रा. बारटक्के यांनी कोकणातल्या साहित्य सांस्कृतिक चळवळीत अग्रक्रमाने काम केले आहे. मात्र आता कोकणच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीत साहित्यिक कमी आणि देखावा करणारे साहित्यप्रेमी जास्त वाढले आहेत. कोटी कोटी रुपये खर्च होणाऱ्या या संमेलनांमध्ये राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढला असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.

बालपणापासूनच प्रा. बारटक्के यांना निसर्गाशी एकरूप होणे आणि त्याबद्दलची निरीक्षण मांडणे याचा छंद जडला. याविषयी आणि त्यांच्या एकूणच लेखनाविषयी “अरण्यऋषी “अशी उपाधी मिळालेल्या मारुती चितमपल्ली यांनीही कौतुक केले. या वाटचालीविषयी बोलताना प्रा बारटक्के म्हणाले, झाडे लावणे व ती जगविणे हा माझा छंद. लहानपणी शाळेला जाताना वाटेत एक पाणपिचकारीचे झाड होते. आमच्याकडे पाटी पुसण्यासाठी स्पंज नसायचा. मग आम्ही त्या झाडाच्या कळ्या खिशातून न्यायचो. पाटी पुसायच्या वेळी ती कळी दाबली, की पाण्याची पिचकारी पाटीवर उडायची. मजा वाटायची.तिथून हे झाड जपावं अशी भावना निर्माण झाली. पुढे जंगलतोडीमुळे भकास होत चाललेल्या कोकणावर अनेक वृत्तपत्रे, मासिके यातून लिहिलं. दुर्मिळ झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न केले.पक्षांचं विश्रांतीचं झाड तोडू नये म्हणून वार्तापत्रे केली. कथा लिहून समाज प्रबोधन केले. माझ्या ‘रानफुलांचा झुला’ या दिलीपराज प्रकाशनने काढलेल्या ‘सप्तरंगी’ पुस्तकाला दोन महत्वाचे पुरस्कार मिळाले. शासनाचा सृष्टीमित्र पुरस्कारही कथेसाठी मिळाला. माझे वृक्षप्रेम नावाचा लेख वसंत मासिकाने छापला. माझ्या लेखनात सदैव निसर्ग डोकावत असतो, असे कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी म्हंटले आहे.

प्रा. बारटक्के यांनी बालवाङमय लिहायला प्रथम सुरुवात केली. लहानपण कोकणातील खेड्यात गेल्यामुळे तिथले अनुभव, तिथले वातावरण, गोष्टी, किस्से यांवर लिहित राहिले.मग पुढे किशोर मासिकात सातत्याने लिहिलेल्या गोष्टींची पुस्तके झाली. स्वभाव त्यांचा मिश्किल असल्याने विडंबन काव्ये व विनोदी गोष्टी लिहायला सुरुवात त्यांनी केली. आवाज , जत्रा,बुवा, श्यामसुंदर यामध्ये लिहित राहिले.त्याचेच पुढे परचुरे प्रकाशनने ‘वडापाव’ नावाने पुस्तक काढले. दिवाळी अंकात लिहिण्याची निमंत्रणे येऊ लागली.संपादकांनी सुचवलेल्या विविध विषयांवर अभ्यास करून ते लिहीत राहिले. त्यातील कथा निवडून रोहन प्रकाशनने कथासंग्रह प्रकाशित केले. विविध वृत्तपत्रातून लिहिता लिहिता प्रा.बारटक्के महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार बनले. वेगवेगळया वृत्तपत्रातून त्यांनी सदरे लिहिली. वैचारिक व खुसखुशीत लेखनाला खूप वाचक मिळाले. त्याची ह्यव नाईस डे, कळत नकळत, पटलं तर होय म्हणा, अशी पुस्तके झाली. एका वृत्तपत्राने लग्नानंतर कराव्या लागणाऱ्या पती-पत्नीच्या तडजोडी विषयी लिहायला सांगितले.त्याचेही ‘ वेव्हलेंग्थ जुळता ‘ नावाने पुस्तक प्रसिद्ध झाले. दरम्यान त्यांची देशी-विदेशी भटकंती सुरूच होती. प्रवासवर्णने, प्रवासात भेटलेल्या व्यक्ती, निसर्ग यावर तब्बल सहा पुस्तके प्रा. बारटक्के यांनी लिहिली.

प्रा. बारटक्के म्हणतात,”लेखकाने लिहित रहावं.चांगल्या लेखनाची दखल घेतली जातेच. सध्या साहित्यिक व्यवहारात ग- तट आहेत. हे नाकारून चालणार नाही. पूर्वी साहित्यिक कमी, साहित्यप्रेमी जास्त व वाचक भरपूर होते.आज परिस्थिती उलट झाली आहे. दूरदर्शन मोबाईलच्या जमान्यात वाचकसंख्या घटली आहे. लेखकसंख्या वाढली आहे. लेखकांमधे स्पर्धा वाढली आहे. अशावेळी फक्त सकस लेखनच तरु शकते.आता साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ कमी झालेली नाही. मात्र त्यात साहित्यिकांपेक्षा साहित्यप्रेमींचा वावर वाढला आहे. कोटी कोटी रुपयांच्या संमेलनात राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. तसेच वाचकांच्या मताला फारशी किंमत राहिली नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागते.

प्रा. बारटक्के यांची आजवर २७ पुस्तके प्रकाशित झाली असून पाच प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेक पुस्तकांना प्रतिष्ठित सन्मान लाभले आहेत. साहित्य चळवळ आणि लेखनाविषयी स्वतःची स्वतंत्र मते असणाऱ्या आणि ती जाहीरपणे मांडणाऱ्या प्रा. बारटक्के यांच्यासारख्या कोकणातील लेखकाला जास्त काळ दुर्लक्षित करून ठेवता येणार नाही हे मात्र नक्की.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भटकंतीवरील आगळीवेगळी पुस्तके…

साखर हंगाम 2021-22 मध्ये 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा (LMT)अधिक उसाचे उत्पादन

आंतर सांस्कृतिक रुची आणि सहयोग वाढवणे हा चित्रपट महोत्सवाचा मुख्य उद्देश

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading