नाटकाच्या अब्राह्मणी परंपरेचा शोध जेव्हा विचारशील रंगकर्मी प्रा.डॉ.सतीश पावडे ‘नाट्यमीमांसा ‘ या ग्रंथातून घेतात तेव्हा नाटक ही क्रांतिकारी चळवळ आहे हे आपोआप अधोरेखित होतं.
अजय कांडर, मोबाईल – ९४०४३९५१५५
नाटक म्हणजे मनोरंजन असा एक समज सर्वत्र पसरला आहे. पण अब्राह्मणी परंपरेत नाटक म्हणजे प्रबोधन, हस्तक्षेप, जनजागरण. दोन हजार वर्षापूर्वी भरत ही हेच सांगतो तर समकालीन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्त ही तेच सांगतो. स्वातंत्र्योत्तर काळात सफदर हाश्मी यांचा खून झाला. ही नाटकाची ताकद आहे. नाटकाच्या या अब्राह्मणी परंपरेचा शोध जेव्हा विचारशील रंगकर्मी प्रा. डॉ. सतीश पावडे ‘नाट्यमीमांसा ‘ या ग्रंथातून घेतात तेव्हा नाटक ही क्रांतिकारी चळवळ आहे हे आपोआप अधोरेखित होतं.
प्रा. पावडे सध्या वर्धा येथे म. गां. आंतरराष्ट्रीय हिंदी (केंद्रीय) विश्वविद्यालय येथे थिएटर एंड फिल्म विभागात वरिष्ठ प्राद्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक रंगकर्मी म्हणून त्यांची जडणघडण बहुजन रंगभूमी, दलीत रंगभूमीतून झालेली आहे. अनेक वर्षे पथनाट्य चळवळीत ते होते. चळवळीसाठी क्रांतिकारक, समाज सुधारक यांच्यावर चरीत्र नाटके त्यांनी सादर केली. त्यामुळे साहजिकच नाट्यमीमांसामध्ये आपल्या नाट्यकलेच्या मुळांचा शोध त्यांनी घेतला आहे.
नाटक हे प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. सत्तेवर ते जरब बसऊ शकते. ब्रिटिश काळात स्वातंत्र्य लढ्यात रंगभूमीने मोलाची भूमिका बजावली आहे. तत्कालिन रंगकर्मींना घाबरून त्यांना नाटकासाठी सेन्सॉरशिप कायदा बनवावा लागला. व्यवस्थेत मानवी मुल्यांसाठी रंगभूमी हा आपला सकारात्मक हस्तक्षेप नोंदविते, नव्हे नोंदविलाच पाहीजे. त्यामुळे प्रा. पावडे यांनी सदर ग्रंथात मान्यतावादी इतिहास नाकारून नाट्यशास्त्र या ग्रंथाची नव्याने समिक्षा केली आहे. इप्टाच्या सांस्कृतिक जागरणाची माहिती दिली आहे. फुले-आंबेडकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कलाविचारांची चर्चा केली आहे.
तलेदंड हे क्रांतिकारक नाटक आहे, त्याची एतिहासिक समीक्षात्मक मांडणी केली आहे. जागतिक भारतीय नाटककार आतमजित सिह यांच्या मानवतावादी राष्ट्रवादाची समिक्षा केली आहे. पारसी रंगभूमी आणि स्त्रिया हा भारतीय रंगभूमीवरील क्रांतिकारक टप्पा आहे. सर्वच लेख केवळ माहिती द्यावी या उद्देशाने लिहीले नाहीत. त्यात प्रा. पावडे यांची सामाजिक बांधिलकी, सोशल कनसर्न त्यात दिसू येतो. रंगभूमीच्या पारंपरिक इतिहासाला छेद देणारे अनेक विषय या ग्रंथात आहेत. फुल्यांचे ‘तृतीय रत्न’ नाटक असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नाट्यसमीक्षा असो किवां डॉ. पंजाबराव देशमुख यांची कला दृष्टी असो, हे विषय या पुर्वी फार व्यापक रुपात चर्चिले गेले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाट्य समीक्षक म्हणून अपवाद वगळता अनेकांना या निमित्ताने प्रथमच कळले आहेत.प्रा.पावडे प्रवाह बाहेरच्या नाट्यमूल्यांचा शोध घेतात. त्यांची तीच दृष्टी या ग्रंथात सर्वत्र आढळत राहते. रंगभूमी: नव सर्जनाचे माध्यम आणि नाट्य सृजनाच्या तळाशी ‘ या ग्रंथातील हे दोन लेख या दृष्टीने आपण वाचू शकतो.
नाट्यमीमांसा या ग्रंथात सर्व लेख स्वतंत्र आणि वेगवेगळ्या विषयांवरील आहेत. हे सर्व लेखात नाटक, नाट्यकला, नाट्य सिद्धांत, नाट्य विचार आणि नाट्य व्यवहार आदींची चिकित्सा केली आहे. ही चिकित्सा बरचशी आस्वादात्मक आहे. ललित कलेचे विद्यार्थी, संशोधक आणि नाट्य अभ्यासक, नाट्य रसिक यांना उपयोगी ठरेल; असा प्रयत्न या पुस्तकाची मांडणी करतांना केला आहे. ते महितीवर्धक आणि ज्ञानवर्धक आहे. नाट्यशास्त्र, अश्वघोष, सार्त्र, कामु, गिरीश कर्नाड, मोहन राकेश, अब्सर्ड नाटकांची समिक्षा, नाट्यात्मक शिल्पकला इत्यादी अनेक विषयही येथे चर्चिले आहेत.
नाटकाच्या तरूण अभ्यासकांना माहिती आणि ज्ञान या पुस्तकातून मिळू शकेल. भारतीय ज्ञान परंपरा आणि नाट्य परंपराच नव्हे तर एकूणच भारतीय ललित कला परंपरेची त्यांना माहिती मिळेल. अनेक समकालीन आणि आधुनिक विषयावरील लेख सुध्दा यात सामाविष्ट आहेत. लेखांची मांडणी वर्गवारी उपशिर्षके देऊन केली आहे. लेख वेगवेगळे असले तरी त्यांचे केंद्रस्थान शीर्षकानुसार एकच आहे. प्रत्येक लेखाची विषयानुसार दृष्टी वेगवेगळी आहे. प्रत्येक लेखात आपणास एक चिकित्सक दृष्टी दिसते. विवेक आणि विज्ञान त्यावर आधारित ही दृष्टी आहे. मान्यतावादी दृष्टी नाकारून मीमांसा आणि चिकित्सा दृष्टीचा स्वीकार करण्यात आलेला आहे.
फुले आंबेडकरांची कलेसाठी कला नाही तर जीवनासाठी कला. कलेने जनसामान्य, शोषित- पीडित, सर्वहारा वर्गासाठी उभे राहिले पाहिजे. लेखक, कलावंतांनी समाजासाठी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. बहुजन सुखाय – बहुजन हिताय ही त्यांची व्यापक कलादृष्टी होती. फुले – आंबेडकर यांनी ही भूमिका स्वीकारली होती आणि त्यानुरुप आपला लेखन व्यवहारही केला होता. बाबासाहेब केवळ नाट्यरसिकच नव्हते तर ते साक्षेपी नाटयसमिक्षकही होते. फुले तर सुधारक प्रयोगशील लेखक विचारवंत होते. याचा प्रत्यय हा ग्रंथ अभ्यासताना येतो.
रंगकर्मीची सर्जनशीलता त्याच्या नाट्यकलेच्या विचार भूमिकेत असते या ग्रंथातून त्याच महत्त्व अधोरेखित होत. प्रत्येक नट, दिग्दर्शक, नाटककार आणि समीक्षक सुध्दा सर्जनशील असायला हवा. तरच तो काही नवे घडवू शकतो. अभ्यास, संशोधन वृत्त्तीने ते साध्य होऊ शकते. प्रा. पावडे केवळ एक लेखक नाहीत तर नाट्य लेखक, दिग्दर्शक, अनुवादक, नाट्य शिक्षक, प्रशिक्षक आहेत. तो अनुभव हे लेखन करताना त्यांच्या उपयोगी आला असेही लक्षात येते. नाट्यमीमांसा मधील लेखन हे एक प्रकारे प्रा. पावडे यांच्या अनुभवांचे सुद्धा शेअरिंग आहे.म्हणूनच ते बहुजनहिताय नाट्यपरंपरेला जोडलेले आहे.
(लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.