October 6, 2024
The Supreme and Supreme Leader Narendra Modi
Home » Privacy Policy » सर्वोच्च आणि उत्तुंग नेता…
सत्ता संघर्ष

सर्वोच्च आणि उत्तुंग नेता…

राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, विजयन पिनराई, एम. के. स्टॅलिन, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, लालू आणि तेजस्वी यादव, डॉ. फारूख आणि ओमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन अशा नेत्यांनी मोदींच्या विरोधात कंबर कसली आहे. हे सर्व नेते मोदींवर सतत आगपाखड करीत असतात. पण त्या सर्वांपेक्षा राष्ट्रीय नेते म्हणून मोदी सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

डॉ. सुकृत खांडेकर

केंद्रातील एनडीए सरकारच्या कारभाराचे १०० दिवस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७४ वा वाढदिवस एकाच दिवशी साजरा होतो, हा एक योगायोग आहे. गेली दहा वर्षे केंद्रात मोदी सरकार अशी ओळख होती. पण यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत प्राप्त न झाल्याने मित्रपक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन करावे लागले. यापूर्वी दहा वर्षे केंद्रात एनडीएचेच सरकार होते, पण भाजपकडे २०१४ व २०१९ मध्ये स्पष्ट बहुमत असल्याने भाजपचे नेतेही मोदी सरकार असे अभिमानाने म्हणत असत. पण यावेळी मात्र अब की बार ४०० पार अशी घोषणा देणाऱ्या भाजपला अपेक्षेपेक्षा १६० जागा कमी मिळाल्या व यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या ६३ खासदारांचा पराभव झाला. यावर्षी भाजपला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची मदत घेऊन केंद्रात सरकार स्थापन करावे लागले आणि दुसरीकडे विरोधी पक्षांचे मोठ्या संख्येने खासदार निवडून आलेत. लोकसभा निवडणुकीत ४०० पारची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपची संख्या २४० वर येऊन थांबेल असे भाकीत कोणीही केले नव्हते. त्यामुळे यापुढे संघटन कौशल्य, मुत्सद्दीपणा व कुटनिती याचा अचूक व पुरेपूर वापर करूनच एनडीएचे सरकार मोदींना चालवावे लागणार आहे.

मोदींनी पंतप्रधानपदाची हटट्रीक तर साध्य केलीच पण पंडित नेहरूंनंतर मोदींनी सलग तिसऱ्यांदा बिगर काँग्रेसी पंतप्रधान होण्याचा विक्रम केला. यावेळी लोकसभेत विरोधी पक्ष प्रबळ असल्याने यापुढे सरकारला एकतर्फी कारभार करता येणार नाही. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत असल्याने त्यांना संसदेत रोखता येणार नाही. जसे राहुल गांधींच्या प्रत्येक भाषणावर भाजपचे बारीक लक्ष असते तसेच मोदींच्या कारभारावर इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांचे विशेषत: काँग्रेसचे सतत लक्ष असते. त्यामुळे संधी मिळाली की, काँग्रेस आणि भाजपाचे आयटी सेल्स एकमेकांवर तुटून पडतात, हे वेळोवेळी अनुभवायला मिळते. पंतप्रधान मोदींनी गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेतले, पूजा व आरती केली. देशाचे पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जातात म्हणजे काही भयंकर अघटित घडले असा कांगावा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुरू केला.

मोदी चंद्रचूड यांच्या घरी गेलेच कसे अशा प्रश्नांनी काहूर माजवले. सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावले असेल, तर ती चूक आहे, जर पंतप्रधान त्यांच्या घरी आपणहून गेले असतील तर ती त्यांची चूक होती, असे सरन्यायाधीशांनी सांगावे असा काही विद्वान कायदेपंडितांनी सल्ला दिला. पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणे ही न्यायव्यवस्थेला धोक्याची घंटा आहे असा इशारा काहींनी दिला. गणपती, दिवाळी, होळी, दसरा यानिमित्ताने अनेक लोक दुसऱ्यांच्या घरी जातात व एकमेकांना भेटतात, सदिच्छा देतात, आनंद घेतात, ही भारतीय परंपरा आहे. अशा भेटीत राजकारण नसते हे समजण्याइतपतही मोदी विरोधकांची तयारी नाही. आपल्या भेटीचा व्हीडिओ स्वत: पंतप्रधानांनी पोस्ट केला. त्यात सद्भावना व पारदर्शकता हा हेतू होता.

पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांची काही लपून-छपून भेट घेतलेली नाही. जगातल्या सर्वात मोठ्या संसदीय लोकशाही देशाचे पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतात, यात हल्ला-गुल्ला करण्यासारखे काय आहे? या दोन्ही व्यक्ती सर्वोच्च घटनात्मक पदावर कार्यरत आहेत. त्या दोघांकडून देशातील १४० कोटी जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या दोन्ही दिग्गजांची झालेली भेट हे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे, अशी मानसिकता विरोधकांकडे का दिसत नाही?

फलि नरिमन यांनी एका लेखात म्हटले आहे : बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती एम. सी. छागला व तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे दरमहा चहापानासाठी एकत्र भेटत असत. त्यावेळी ते विविध विषयांवर चर्चा करीत. पण त्या दोघांच्या भेटीविषयी तेव्हा कोणी आक्षेप घेतला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बालकृष्ण हे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी योजलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले होते. तेव्हाही कोणी आक्षेप घेतला नव्हता. भारत सरकार व सर्वोच्च न्यायालय यांच्यात अनेक विषयांवर व विविध मुद्द्यांवर मतभिन्नता प्रकट झाली आहे. सरकारचे काही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य किंवा रद्द ठरवले आहेत. निवडणूक रोखे खरेदी हे त्याचे ताजे उदाहरण आहे. सरकारी यंत्रणांवर सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा ताशेरे मारलेले आहेत. मग पंतप्रधान व सरन्यायाधीश यांच्या एका भेटीतून न्यायालयाच्या विश्वासार्हतेला तडा कसा जाऊ शकतो ?

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्वीट केले, त्यात ते म्हणतात, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजेला उपस्थित राहिलो. श्री गणेश आम्हा सर्वांना सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो… मोदी गेली अकरा वर्षे देशाच्या केंद्रस्थानी आहेत. राजकीय क्षितीजावर मोदीच नंबर १ आहेत. सारे विरोधी पक्ष गेली अकरा वर्षे त्यांच्या विरोधात रान उठवत आहेत, मोदी हटाव म्हणून दोन डझन पक्षांनी इंडिया नामक विरोधी आघाडी स्थापन केली, सन २०२४ मध्ये विरोधकांचे लोकसभेतील बळ वाढले पण मोदींना सत्तेवरून हटविण्यात त्यांना अपयश आले.

राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, विजयन पिनराई, एम. के. स्टॅलिन, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, लालू आणि तेजस्वी यादव, डॉ. फारूख आणि ओमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन अशा नेत्यांनी मोदींच्या विरोधात कंबर कसली आहे. हे सर्व नेते मोदींवर सतत आगपाखड करीत असतात. पण त्या सर्वांपेक्षा राष्ट्रीय नेते म्हणून मोदी सर्वाधिक लोकप्रिय आहेत. केंद्रात पाय भक्कम रोवून उभे आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने सध्या ढवळून निघत आहे. ३७० कलम रद्द झाल्यानंतर प्रथमच निवडणूक होते आहे. जम्मू-काश्मीरच्या विभाजनानंतर या राज्याची सत्ता कोणाला मिळणार हा कळीचा मुद्दा आहे. भाजप विरोधात काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स अशी लढत आहे. पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी ३७० कलमासाठी आटापिटा करीत आहे.

हरियाणातही विधानसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. गेली दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. अँटी इन्कबन्सी हे भाजपपुढे आव्हान आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा दोन्ही राज्यांत भाजप मोदींच्या करिष्म्यावर लढत आहे. मोदींनी पहिल्या दोन टर्ममध्ये अयोध्येत राम मंदिर उभारून दाखवले, पंडित नेहरूंच्या काळापासून जम्मू- काश्मीरला दिलेले ३७० व्या कलमाचे सुरक्षा कवच काढून घेतले, तिहेरी तलाक पद्धत रद्द करून लक्षावधी मुस्लीम महिलांना दिलासा दिला, संसदेत व विधिमंडळात ३३ टक्के महिला आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले, एक देश, एक कर या सूत्रानुसार जीएसटी लागू केला, नोटाबंदीचे धाडसी पाऊल उचलले, सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला. यापुढे समान नागरी कायदा, एक देश, एक निवडणूक, सीसीए हा अजेंडा आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आहे.

गेल्या दहा वर्षांत मोदी आणि भाजपला काही मुद्द्यांवर अपयश आले किंवा माघार घ्यावी लागली हे वास्तव आहे. काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपचे नेते देत होते पण काँग्रेसचे यंदा १०० खासदार लोकसभेत निवडून आले. दहा वर्षे लोकसभेला कोणी विरोधी नेता नव्हता. आता लोकसभेत राहुल गांधी व राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे असे दोन्ही विरोधी पक्षनेते काँग्रेसचेच आहेत. मोदींच्या कारकिर्दीतच भारतीय जनता पक्षाचा देशात मोठा विस्तार झाला. देशात एकाच वेळी २१ राज्यांत भाजपची सत्ता असण्याची नोंद याच काळात झाली.

भाजपचे देशात १८ कोटी सदस्य आहेत, जगात भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. भाजपची देशात ५६३ कार्यालये आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे सुसज्ज कार्यालय आहे. भाजपाचे भव्य व प्रशस्त नवीन मुख्यालय दिल्लीत उभारण्याचे कामही मोदींच्या कारकिर्दीत घडले. देशभरात मतदार याद्यांवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या २ कोटी प्रमुखांची फौज भाजपकडे आहे. मे २०१३ मध्ये मोदींनी नवीन संसद भवन उभारले. जानेवारी २०१४ मध्ये अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाली. ऑक्टोबर २०१८ मध्ये गुजरातमध्ये स्टॅच्यु ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १६८ मीटर उंचीच्या भव्य पुतळ्याचे अनावरण झाले. फेब्रुवारी २०१७ मध्ये नॅशनल वॉर मेमोरिअर उभे राहिले. फेब्रुवारी २०२१ अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन झाले. ऑक्टोबर २०१४ मध्ये आकाशवाणीवरून ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू झाला. आजवर ११३ कार्यक्रम झाले. २३ कोटी लोक हा कार्यक्रम नियमित पाहतात. जानेवारी २०१९ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण देणारा ऐतिहासिक निर्णय मोदींनी घेतला. चाय पर चर्चा, परीक्षा पर चर्चा अशा कार्यक्रमातून मोदी घराघरात पोहोचले. मोदींचे एक्सवर १० कोटी १० लाख व फेसबुकवर ४ कोटी ९० लाख, इंस्टाग्रामवर ९ कोटी १० लाख, यू ट्युबवर अडीच कोटी फॉलोअर्स आहेत.

मोदींच्या तिसऱ्या कारकिर्दीत एनडीएमध्ये सर्व काही अलबेल असे नाही. मित्रपक्ष त्याची किमत मोजून घेत आहेत. काही मित्र आपला अजेंडा तडजोड न करता राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून मित्रपक्षांना गोंजारून एनडीए सरकार चालवावे लागते आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपलेला नाही, मणिपूरची आग शमलेली नाही, भ्रष्टाचार कुठेही आटोक्यात आलेला नाही, पक्षाच्या विस्तारासाठी आणि सत्ता काबीज करण्यासाठी अन्य पक्षांची तोड-फोड जनतेला आवडत नाही. शेतकऱ्यांचा रोष आणि वाढलेली प्रचंड बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि न्यायाला विलंब, महागाई आणि हमी भाव, विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यातील वाढलेला संघर्ष, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मागे चौकशी यंत्रणांचा लावण्यात आलेला ससेमीरा, विरोधी नेत्यांना चौकशीच्या नावाखाली तुरुंगात डांबण्याच्या घटना या सर्वांचा परिणाम मतदानावर होतो हे लोकसभा निकालावरून दिसून आले आहे. विरोधकांची भक्कम एकजूट नाही ही भाजपच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी हेच आजही देशात सर्वोच्च व उत्तुंग नेते आहेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading