मानवी जीवनाचे चिंतन, जीवनाचे क्षणभंगुरत्व, मानवी नातेसंबंधातील ताणेबाणे, निसर्गभान, मानवधर्म याबाबत त्यांची कविता बोलते. मानवी जीवन, अनुभवातले शहाणपण नोंदवत असताना आनंदी जीवनाचे स्वप्न साकारण्याचा आशावाद कवितेत आला आहे.
डॉ. योगिता राजकर, वाई
शब्दांचे हे गाणे
गाऊ आज आनंदाने
शब्दांच्या झुल्यावर
झुलू आनंदाने
शब्दांच्या झुल्यावर झुलत कवी सुरेश बिले यांचा ‘बोल अंतरीचे’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.प्रभा प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
शब्द हे कवीला किती प्रिय असतात हे त्यांच्या कवितेतील शब्दांवरून समजते. शब्द हेच त्यांचे खरेखुरे धन. कवीच्या प्रतिभेतून शब्दांचा जन्म होतो. माणसाच्या स्वभावात माणुसकीचे दर्शन घडायला हवे असा आग्रह धरणारी ही कविता मानवी मूल्यांना प्राधान्य देते. त्यामुळे आजच्या मन कोरडं होत गेलेल्या काळात या कवितेचे मोल अनन्यसाधारण आहे.
सद्याच्या ताणतणावाच्या जगात माणसाला मनातून बोलायला, संवाद साधायला वेळ नाही. तो आपल्याच विश्वात हरवून गेला आहे. आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधायला वेळ नाही. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारत नाही. विचारलीच तर अगदी वरवरची. त्यात अंतरातली ओल कुठेच नसते. म्हणूनच कवी आपल्या कवितेत माणसातील संवेदनशीलता, प्रेम, उमेद जागविण्याची प्रेरणा देतात. संवेदनशीलता हरवत चाललेली असताना संवेदनशीलतेचा जागर कवी सुरेश बिले यांच्या कवितेतून व्यक्त होतो.
मानवी जीवनाचे चिंतन, जीवनाचे क्षणभंगुरत्व, मानवी नातेसंबंधातील ताणेबाणे, निसर्गभान, मानवधर्म याबाबत त्यांची कविता बोलते. मानवी जीवन, अनुभवातले शहाणपण नोंदवत असताना आनंदी जीवनाचे स्वप्न साकारण्याचा आशावाद कवितेत आला आहे. फुलता फुलता इतरांनाही फुलवत जगायचं. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत मनभरून जगायचं. संकटाना धीराने सामोरे जात आत्मबलाच्या जोरावर पुढे पुढे जात रहायचं. हे चिंतन त्यांच्या कवितेत येते. मानवी नात्यात ओढाताण होत असताना. कवी आपुलकीच्या धाग्यांनी एकमेकांना जोडू पाहत आहेत.
जगावं आणि जगावावं ही पाखरांची निती माणसाने आचरावी. ज्ञानाने समृध्द ,विचारांनी प्रगत व्हावे. जगताना माणुसकी जपत ,आपुलकीने जगायला हवं हे मानवतेचे मूल्य बिले यांच्या कवितेतून अधोरेखित होते. हसत,खेळत, धुंद होऊन जगावं. स्वतःमधील दुर्गुणांचे विसर्जन करून सद्गुणांचे बीजारोपण करायला कवी आग्रह धरत आहेत.
मानवी नात्यांना कवेत घेऊन जगणं समृध्द करत संवेदनांचा जागर त्यांच्या कवितेत जागविला आहे. मनात आशावाद पेरणारी ,एकमेकांना मानवतेच्या सूत्रात जोडू पाहणारी त्यांची कविता माणुसकीची वैश्विक प्रार्थना गात आहे. ‘माणुसकीला जागून,मनुष्य धर्म पाळूया ‘ असे आयुष्याचे मर्म ते उलगडतात.कवी सुरेश बिले यांची कविता वाचकांना नक्की आवडेल.शब्द झुल्यावर झुलताना त्यांच्या अंतरातील बोल लेखणीतून उत्तरोत्तर झरत राहो.
पुस्तकाचे नाव – बोल अंतरीचे (काव्यसंग्रह)
कवी – सुरेश बिले
प्रकाशक – प्रभा प्रकाशन, कणकवली
पृष्ठसंख्या – ५६, मूल्य – १३० ₹
पुस्तकासाठी संपर्क – ९४०४३९५१५५
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.