April 29, 2025
A smartphone displaying Google Maps navigation with a highlighted route, symbolizing modern GPS travel guidance.
Home » गुगलबाबा प्रवासात मार्गदर्शक
संशोधन आणि तंत्रज्ञान

गुगलबाबा प्रवासात मार्गदर्शक

जगातील १२२ देशांमध्ये गुगलचे नेव्हिगेशन ॲप वापरण्यात येते. ॲपलचे वाझे हे स्वतंत्र ॲप्लिकेशन असले तरी ॲपलचे फोन सर्वानाच घेणे शक्य होत नाही. बहुतांश लोकांकडे अँड्रॅईड यंत्रणा असणारे विविध कंपनीचे मोबाईल फोन आहेत. त्यामुळे जगातील काही अपवाद वगळता सर्वत्र गुगलबाबा प्रवासात मार्गदर्शन करत असते.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

मार्गदर्शक गुगलबाबा !

पर्यटन, प्रवास लोकांची सवयीचा झाला आहे. लोक पर्यटनासाठी, कार्यक्रम असेल, कार्यशाळा, चर्चासत्र असेल तर आवर्जून प्रवासाला जातात. मात्र आज प्रवासाला जाताना एखाद्या ठिकाणाला शोधून कसे काढायचे, ते ठिकाण लोकांना माहीत असेल का, लोक व्यवस्थित पत्ता सांगतील का, असे प्रश्न कोणाला पडत नाहीत कारण सर्वांच्या मदतीला आजकाल ‘गुगलबाबा’ असते. भारतात तर अनेकांना माहीत असलेल्‍या ठिकाणी जातानाही गुगलबाबाला स्क्रीनवर कार्यरत ठेवून प्रवास करण्याची सवय झाली आहे. अशी ही गुगलबाबा कार्यरत असते त्या यंत्रणेला जीपीएस म्हणून मराठीतही ओळखतात. तसे या तंत्रज्ञानाचे नाव ‘‍ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम’ म्हणजेच ‘वैश्विक स्थाननिश्चिती यंत्रणा’ असे आहे. अजून मराठी नाव लोकांच्या परिचयाचे झालेलेच नाही. मात्र त्याअगोदरच ही यंत्रणा सर्वदूर पसरली आहे. अगदी इंग्रजी न येणारेही सुरळीतपणे वापरतात. बहुतांश मिळणारे परिणाम समाधानकारक असतात. या यंत्रणेच्या शोधाने सर्वसामान्यांच्या सवयीत बदल झाले आहेत. बाबा

ध्रुवतारा अन् चुंबकसूची

अगदी सुरुवातीला दूरवरच्या प्रवासाला ध्रुवतारा हा संदर्भकेंद्र म्हणून वापरला जात असे. ध्रुवतारा उत्तर ध्रुव दर्शवतो असे मानण्यात येते. तो संदर्भ धरून रात्री कोणत्या बाजूला प्रवास करावयाचा, हे निश्चित करून सकाळी प्रवासाला सुरुवात करत. पुढे चुंबकसूचीचा शोध लागला. ख्रिस्तपूर्व २०० सनामध्ये चुंबकसूचीचा चीनमध्ये सर्वप्रथम वापर सुरू झाला. आज चुंबकसूची उत्तर ध्रुवदर्शक मानली जात असली तरी सुरुवातीस तिचा वापर दक्षिण ध्रुवदर्शक मानत असत. या सूईचा शोध लागला तेव्हा या सूईचा उपयोग अनेक भोंदूनी भविष्य सांगणारी सूई असा केला. मात्र संशोधकांना चुंबकसूचीचे दक्षिणोत्तर राहणे दिशा समजण्यासाठी उपयुक्त असल्याचे लक्षात आले. या सूईचा सर्वप्रथम जहाजाना दिशा समजावी यासाठी उपयोग सुरू झाला. त्यानंतर चुंबकसूचीचा वापर करून अचूक नकाशे बनवण्यात आले.

पोस्टमन कसे पत्ते शोधत हे गुढच

नकाशे तयार झाल्यानंतर रस्ते वाहतुकीमध्ये बऱ्याच अंशी सुरळीतपणा आला. मात्र अगदी सूक्ष्म स्थाननिश्चिती करता येणे शक्य होत नव्हते. पोस्टमन कसा पत्ता शोधून काढायचे आणि नेमक्या व्यक्तीला पत्र कसे पोहोचवायचे, हे गुढ केवळ पोस्टमनलाच माहीत. मात्र अगदी पाहुण्याना पोस्टाचे पत्र ज्या पत्त्यावर मिळते, तो पत्ता देऊनही नेमके ठिकाण शोधून काढणे कठीण होत असे. पत्ता शोधायला त्रास पडू नये अशी प्रार्थना प्रवासाला निघण्यापूर्वीच करत असत. आज मात्र असा विचार प्रवासाला निघताना कोणाच्याच मनात नसतो, कारण सोबत असते नेमक्या ठिकाणी जाण्यास मदत करणारा गुगलबाबा.

गुगलचे नेव्हिगेशन ॲप

गुगलबाबा नाव लोकांनी दिले आहे. त्याचे कारण म्हणजे, आपण प्रवासाला निघताच गुगलचे नेव्हिगेशन ॲप सुरू करतो. जेथे आपण आहोत त्या ठिकाणापासून जाण्याचे स्थान दर्शवणारा मार्ग दाखवायला सांगतो. त्यानंतर रस्त्यात कोठे वळायचे, किती अंतरावर वळायचे, हे एक महिला सांगते. त्यामुळेच मदत करणारे गुगल ॲप आहे, असे सांगण्याऐवजी पत्ता गुगलबाबा सांगेल, असे लोक सहज म्हणतात. प्रवासाचा मार्गदर्शक म्हणून आज हे ॲप्लिकेशन ओळखले जाते. हे तंत्रज्ञान आंतरजालाच्या माध्यामातून कार्यरत असते. या ॲपच्या माध्यमात दिवसेंदिवय बदल येत आहेत. अधिक अचूकता येत आहे. यामुळे प्रवास सुकर आणि सुरक्षीत होत आहे.

यासाठी उपग्रहांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य घेण्यात येते. सर्वप्रथम अमेरिकेच्या संरक्षण दलासाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यावेळी दुसऱ्या देशावर पाळत ठेवण्यासाठी, शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी हे तंत्र विकसित करण्यात आले. साल होते १९७८. त्यानंतर याचा प्रवासासाठी उपयोग करता येऊ शकेल, याचा संशोधकांना अंदाज आला आणि त्यादृष्टिने तंत्रज्ञान विकसित झाले. गुगल मॅपप्रमाणे ‘वाझे’ ॲप्पलचे ॲप्लिकेशन कार्यरत आहे. चीनने स्वत:चे असे बैदू ॲप्लिकेशन विकसित केले. युरोपियन देशामध्ये गॅलिलिओ नेविगेशन ॲप्लिकेशन आहे. रशिया ग्लोनास ॲप्लिकेशन वापरते. ते अन्य देशांना उपलब्ध नाही. या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यासाठी आणि त्यामध्ये अचूकता आणण्यासाठी गुगल ३१ उपग्रहांची मदत घेते. यासाठी गुगल सर्वप्रथम गुगल अर्थ आणि गुगल मॅप या दोन ॲप्लिकेशनसाठी मूलभुत माहिती थेट उपग्रहांच्या सहाय्याने घेते. ज्या ठिकाणी नवा रस्ता तयार होत आहे, त्या रस्त्याच्या सर्व तपशिलांचे छायाचित्रण करते. ती माहिती संगणकास पुरवते. संगणकास पुरविण्यात आलेल्या माहितीच्या सहाय्याने नव्या माहितीचा जुन्या माहितीत समावेश करण्यात येतो आणि अधिक अचूकता आणली जाते.

सर्व रस्त्यांची माहिती संगणकास असते. आपण ज्यावेळी प्रवासास निघतो, तेव्हा आपला मोबाईल किंवा वाहनाला असणारे सीम उपग्रहांशी आंतरजालाच्या माध्यमातून जोडले जाते. इंटरनेट नसेल तर हे ॲप्लिकेशन काही काळ ऑफलाईन चालत असे. मात्र आता काही अँड्रॉइड भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल संचात जाण्याचा पूर्ण मार्ग सुरुवातीलाच समजून घेऊन पुढे पूर्ण काळ मार्गदर्शन करणारी यंत्रणा विकसित झाली आहे. आपले वाहन जाताना या जुळणीमध्ये आपण कोणत्या प्रकारच्या वाहनाने प्रवास करत आहोत, किती वेगाने प्रवास सुरू आहे, आपण कोठे थांबलो आहोत, ही सर्व माहिती गुगलकडे जात असते. गुगलने एवढी सक्षम यंत्रणा बनवली आहे की आपण न सांगता अनेक गोष्टी गुगलला समजतात. तरीही अनेकदा गुगल आपणास प्रश्न विचारून आपल्याकडून खात्री करून घेते आणि त्यानुसार स्वत:कडील माहिती अद्ययावत करत असते. जगातील १२२ देशांमध्ये गुगलचे नेव्हिगेशन ॲप वापरण्यात येते. ॲपलचे वाझे हे स्वतंत्र ॲप्लिकेशन असले तरी ॲपलचे फोन सर्वानाच घेणे शक्य होत नाही. बहुतांश लोकांकडे अँड्रॅईड यंत्रणा असणारे विविध कंपनीचे मोबाईल फोन आहेत. त्यामुळे जगातील काही अपवाद वगळता सर्वत्र गुगलबाबा प्रवासात मार्गदर्शन करत असते. मात्र त्याच वेळी आपली आवश्यक असणारी वा नसणारी सर्व माहिती गुगलचा सर्वर जमा करतो. त्यामुळेच अनेक गुन्ह्यांचा तपास करणे सोईचे झाले आहे.

अर्थात ही सर्व यंत्रणा उपग्रहावर कार्यरत आहे. अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने आपले संशोधन सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत चीन, रशिया, युरोप अशा देशांची स्वतंत्र ॲप्लिकेशन्स असतील तर भारताची स्वत:ची यंत्रणा का नाही, असा प्रश्न पडतो. भारत स्वत:ची जीपीएस यंत्रणा विकसित करत आहे आणि त्याला ‘नाविक’ असे नाव देण्यात आलेले आहे. अनेक उपग्रहांच्या माध्यमातून माहितीचे संकलन करण्यात येत आहे. भारतभर यासाठी माहिती संकलन करणारी २१ केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यातून संकलीत होणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून हे ॲप्लिकेशन लवकरच भारतात प्रवास करताना वापरता येईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading