December 7, 2022
book review of sahityatil panditya by Ishwrya Patekar
Home » साहित्यकृतीचा सहृदयतेने घेतलेला शोध
मुक्त संवाद

साहित्यकृतीचा सहृदयतेने घेतलेला शोध

साहित्यकृतीच्या अंतरंगात शिरून तिचा काही एक अन्वयार्थ सहज सोप्या शब्दांत मांडणं हा डॉ. पंडितराव पवारांचा स्थायीभाव आहे. आहे जो वाचकांना कलाकृतीपर्यंत येण्यासाठी उद्युक्त करणारा आहे. तो खूप महत्वाचा आहे.

– ऐश्वर्य पाटेकर

साहित्यकृतीला जनमानसात रुजविण्यासाठी समीक्षाच कारणीभूत ठरली आहे. वाचकाला कलाकृतीपर्यंत पोहचण्यासाठी समीक्षकाच उद्युक्त करते. मात्र अलीकडे समीक्षेचा प्रवाह क्षीण झाला की काय असे वाटायला लावणारी परिस्थिती उत्पन्न झाली आहे. साठोत्तरी कालखंडापर्यंत समीक्षाचा प्रवाह फोफावत आला. पुढे साहित्यनिर्मिती तर होत राहिली मात्र त्यामानाने समीक्षा काही झाली नाही. समकालात नव्या दमाचे समीक्षक पुढे येतांना दिसतात त्यात प्रामुख्याने डॉ. रणधीर शिंदे, नितीन रिंढे, पी विठ्ठल आणखीही नावे सापडतील फार झाले तर बोटावर मोजण्याइतकी ही संख्या आहे. तरीही अशी काही नावे आहेत जी समीक्षेचा नंदादीप आपल्यापरीने देवता ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यात प्रामुख्याने नाव घ्यावं लागतं डॉ पंडितराव पवार यांचं. एखादं व्रत घ्यावं तसं आपलं समीक्षालेखनाचं काम ते करत आहे. ‘साहित्यातील पांडित्य’ हा त्यांचा समीक्षालेखांचा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास, शिक्षण इत्यादी विषयावरील अतिह्य सहृदय मनाने त्यांनी वेध घेतला आहे.

रूपनिष्ठ समीक्षा हा प्रकार मराठी साहित्याला नवा नाही. परंतु रूपनिष्ठ समीक्षेचा नवा अध्याय डॉ. पंडितराव पवार यांनी या ग्रंथातील सोळा लेखांच्या आधारे निर्माण केला आहे. या लेखांतून त्यांची विलक्षण अशी साहित्यदृष्टी प्रत्ययाला येते. समीक्षेची समीक्षेचा करणाऱ्या या लेखांतून साहित्यिकांचे वैचारिक व्यक्तिमत्त्व रसिक वाचकांच्या दृष्टीसमोर उभे करण्यात डॉ. पंडितराव पवार कमालीचे यशस्वी झालेले आहेत. त्यांच्या सांस्कृतिक परिसराची त्यांनी केलेली समीक्षा वाचकांना एका वेगळ्या सृष्टीत नेते आणि विचार करायला प्रवृत्त करते. हेच त्यांच्या समीक्षेचे मुलभूत वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. अशा सार्थ शब्दात मराठीतील महत्वाच्या अभ्यासक डॉ. स्नेहल तावरे यांनी त्यांची पाठराखण केलेली आहे. हे पुस्तक अभ्यासताना त्याचा निश्चितच खरेपणा येतो.

साहित्यकृतीच्या अंतरंगात शिरून तिचा काही एक अन्वयार्थ सहज सोप्या शब्दांत मांडणं हा डॉ. पंडितराव पवारांचा स्थायीभाव आहे. आहे जो वाचकांना कलाकृतीपर्यंत येण्यासाठी उद्युक्त करणारा आहे. तो खूप महत्वाचा आहे. अन्यथा समीक्षेत नको ते विद्वजड शब्द वापरून वाचकांना भेवाडून सोडण्याचे प्रकार समीक्षेला नवे नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांचे काम मला महत्वाचे वाटते. डॉ. द. ता. भोसले यांच्या ‘इथे फुलांना मरण जन्मता’ या कादंबरीतील जीवनमूल्यांचा आणि समाजातील ढोंगी प्रवृत्तींचा संघर्ष यांचे विवेचन एका लेखातून केले आहे. सर्वांगानी कादंबरीला त्यांनी स्पर्श केला आहे. हा लेख कादंबरीच्या अभ्यासकांनी मुद्दाम वाचायलाच हवा. शिवाय ‘त्रिकोणातल वादळ पेलताना’ या लतिका चौधरी यांच्या आत्मकथना अतिशय मर्मज्ञ वेध लेखक घेतात त्यातून एका संघर्षसिद्धेचा वेदनामय प्रवास वाचकांना ज्ञात होतो.

डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे या लोकसाहित्याच्या व्यासंगी संशोधकांच्या योगदानाचा आढावा घेणारे लेखही येथे समाविष्ट केले आहेत. त्यातून लोकसाहित्याचे स्वरूप, त्याचे सादरीकरण आणि वेगळेपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या साहित्याचीही ओळख त्यांनी अतिशय मोजक्या शब्दात केली ज्यात त्यांच्यातील लेखक, समीक्षक, कवी यास स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे.

इतरही लेख अतिशय उत्तम उतरले आहेत उल्लेखच करायचा झाल्यास ज्ञानरचनावादाचे यथार्थ स्वरूप, श्रीलंकेचा भौगोलिक, सांस्कृतिक लोकजीवनाचा परिचय, सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते श्री. रा. ना. चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय, मराठी साहित्यातील कृषिवलांचे दर्शन आणि समाज-जीवनातील उणिवांसंबंधीचे प्रबोधन करणाऱ्या ‘कॉलम ऑफ थेट’ या ग्रंथाचा परिचय यामुळेच सदर ग्रंथाचे मोल वाढलेले आहे.

सदर ग्रंथ समीक्षेचा असूनही ओघवती भाषा, सुगम विवेचन आणि अतिशय सहृदयतेने कलाकृतीचा विचारांचा घेतलेला मागोवा यामुळे वाचनीय झाला आहे शिवाय साहित्य-पांडित्याचा प्रत्ययही देणारा आहे. मराठी समीक्षाप्रवाहात एका मोलाच्या ग्रंथाची भर पडली आहे. हे खात्रीने सांगता येते.

साहित्यातील पांडित्य
लेखक: डॉ. पंडितराव पवार
मुखपृष्ठ: संतोष घोंगडे
प्रकाशन: स्नेहवर्धन प्रकाशन
पाने: १७२
किंमत: ३०० रु.

Related posts

समाजाचे सत्यदर्शन घडविणारा कथासंग्रह

मुलं गेली अवकाशात’ : गोष्टींचा गुच्छ!

Neettu Talks : आला उन्हाळा ! अशी घ्या काळजी..

Leave a Comment