July 21, 2024
Monsoon is accompanied by MJO wave
Home » एमजेओच्या लाटेमुळेच मान्सूनची साथ
काय चाललयं अवतीभवती

एमजेओच्या लाटेमुळेच मान्सूनची साथ

‘एम.जे.ओ.’ची लाट म्हणून सध्या मान्सूनची साथ आहे, त्यामुळे पुढील ५ दिवस चांगल्या पावसाची शक्यता !

एमजेओ वर्तन व महाराष्ट्रातील व येत्या ५ दिवसातील पाऊस कसा असु शकतो.?

                    ‘एमजेओ'(मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन) ची विषुवृत्तीय मार्गक्रमणातील वारी सध्या भारतदेश समुद्रीय क्षेत्रातून २७ जून ते १० जुलै दरम्यान मार्गस्थ होत आहे. त्याची बळकटी दाखवणारा ‘आम्प्लिटुड’ एकच्या आसपास आहे.
                   ‘एमजेओ’ च्या ह्या वारीचे जेंव्हा २७ जूनला अरबी समुद्रातून प्रयाण झाले, तेंव्हा मरगळलेला मान्सून सक्रिय झाला. तो सह्याद्रीचा घाट चढला. आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात २७ जूनपासून तो मध्यम पाऊस देत आहे.
                     एमजेओची ही वारी सध्या बंगालउपसागरात प्रवेशली आहे. मान्सूनच्या बंगालउपसागरीय शाखेलाही त्यामुळे बळ मिळू लागले आहे व मराठवाड्यात  येत्या दोन दिवसानंतर (६ जुलैपासून तेथे ) तर विदर्भात आजपासुनच पावसाचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
                     त्याचबरोबर उत्तर प्रदेश, उत्तराखण्ड, पश्चिम बंगाल व आसामकडील ७ राज्यात १० जुलैपर्यन्त अतिजोरदार ते अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यताही त्यामुळे जाणवत आहे.

महाराष्ट्रात ५ दिवसात पाऊस कोणत्या प्रणाल्यामुळे आता शक्य आहे ?

                   मान्सूनने देश काबिज केल्यामुळे देश मध्यावरचा पुर्वो-पश्चिमी मुख्य मान्सूनी आस सरासरी जागेवर तसेच अरबी समुद्रातील  पश्चिम किनारपट्टीसमोरील दक्षिणोत्तर तटीय आस, स्थापित झाले आहे.
                       त्यामुळे महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता उद्या शुक्रवार दि. ५ जुलै पासून पुढील पाच दिवस म्हणजे १० जुलैपर्यन्त एमजेओ व मान्सुनच्या तसेच तटीय अश्या दोन्हीही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

महाराष्ट्रात  ५ दिवसातील विभागवार पावसाची तीव्रता कशी असु शकते ?

मध्य महाराष्ट्र –
                   गेल्या १० दिवसापासून हलकेसा का होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर, नंदुरबार धुळे जळगांव जिल्ह्यात व पेठ सुरगाणा कळवण सटाणा मालेगांव देवळा तालुक्यात अजुनही कायम आहे.परंतु  रविवार दि. ७ जुलैपासुन  ह्या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणल्यातून तेथे मध्यम पावसाची शक्यता ही टिकूनच आहे.
                  पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर दिंडोरी निफाड येवला नांदगाव चांदवड तालुक्यात उद्या शुक्रवार दि. ५ जुलै पासून पुढील पाच दिवस म्हणजे १० जुलैपर्यन्त मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.

मराठवाडा –
                   मराठवाड्यात उद्यापासून १० जुलैपर्यन्तच्या पाच दिवसात मात्र जालना हिंगोली नांदेड परभणी धाराशिव लातूर  जिल्ह्यात मध्यम तर सं.नगर बीड जिल्ह्यात किरकोळच पावसाचीच शक्यता जाणवते.

कोकण व विदर्भ –
                 कोकण व विदर्भात जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी वातावरणीय प्रणल्याच्या प्रमाणात अपेक्षित अतिजोरदार पाऊस अलीकडे तेथे जाणवत नाही. विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवत आहे. येत्या पाच दिवसात ह्या ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा करू या!
                     रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेंच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
                     कोकणातून सह्याद्रीवर चढलेला मान्सूनची घाटमाथ्यावर सक्रियता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात आवक वाढून जल साठवण टक्केवारीच्या मापनास सुरवातही होवु शकते,असे वाटते.

मग महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाचे चित्र कधी पाहावयास मिळू शकते?

                     विभागवार प्रणल्यातून चांगल्या पावसाची अपेक्षा असतांना महाराष्ट्रात सध्या व्यापक जोरदार पाऊस न होता भाग बदलतच मध्यम पाऊस २७ जूनपासून होत आहे. काही जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. उतार आलेल्या पिकाबाबत जिरायत  शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण जाणवत आहे.
                     परंतु आता देशाच्या मध्यावर स्थापित झालेला मुख्य मान्सूनी आस त्याच्या सरासरी जागेपासून अधिक दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही, तोपर्यंत नद्या खळखळून धरणात आवक वाढणार नाही. अर्थात ही शक्यता ह्या जुलै महिन्यात घडून येऊ शकते. त्यामुळे घाबरू नये, असे वाटते,

माणिकराव खुळे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक

आली किती दिसांनी ही पौर्णिमाच दारी..

 नफरत छोडो… भारत जोडो

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading