September 9, 2024
Marbat-Badgya Festival in Nagpur Myth and Reality
Home » नागपुरातील मारबत – बडग्या महोत्सव : आख्यायिका आणि वास्तविकता
संशोधन आणि तंत्रज्ञान

नागपुरातील मारबत – बडग्या महोत्सव : आख्यायिका आणि वास्तविकता

स्वच्छतेकरिता स्थानीय, राज्य व सर्व देशभर आज विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, पण दीर्घकाळापासून नागपुरात हे आयोजन होत आहे, हे विसरता येत नाही. मात्र या महोत्सवाचे व्यवस्थित संयोजन आवश्यक आहे.

डॉ. चन्द्रशेखर गुप्त
(विदर्भातील जेष्ठ इतिहासतज्ञ आणि संशोधक)

नागपुरची प्रसिद्धी फक्त संत्र्यांकरिताच नसून अनेक राजकीय व सांस्कृतिक घटना, घडामोडी, व्यक्ती व वस्तूंच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींमुळे देश-विदेशात नागपूर विख्यात आहे. आज सर्वात मोठे प्रश्न म्हणजे वातावरण आणि पर्यावरणाचे संरक्षण, त्याचे असंतुलन, त्यात व्याप्त प्रदूषण आणि या सर्वांचे प्रकृती (निसर्ग) सकट संपूर्ण जगाच्या अस्तित्वाला धोकादायक आहे. नागपूर परिसरात दीर्घकाळापासून एक परंपरा उत्सवरूपात प्रचलित आहे, ज्यास या दृष्टीने, विशेषकरून वर्तमान संदर्भात, जेव्हा प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ वातावरणाची अत्याधिक गरज आहे, एक आगळे-वेगळे महत्त्व आहे.

या उत्सवाचे नाव आहे ‘मारबत महोत्सव’. हिंदू कालगणनेप्रमाणे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या (पाडवा) दिवशी नागपुरात मोठ्या स्वरूपात हा उत्सव साजरा केल्या जातो. पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि संलग्न भागात याचे कमीअधिक प्रचलन आढळते. हा फक्त एका दिवसाचा उत्सव असला तरी याची तयारी बरेच दिवस आणि मेहनत लागते. दुर्दैवाने आज सणाचे मूळ स्वरूप व महत्त्व धूसर झालेले दिसते. मारबतीचा इतिहास आणि स्वरूपाविषयी माहिती घेण्यापूर्वी त्याची वर्तमान जडणघडण जाणून घेणे आवश्यक आहे.

मारबतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी लोक पळसाच्या (सं. पलाश, किंशुक; हिं. ढाक, टेसू; Butea monasperma = Butea Trondosa) दोन-चार फांद्या आणून घराच्या दारावर आणि कोनाड्यात ठेवतात. याला ‘मेढी’ आणि ‘बडगे’ म्हणतात. पाडव्याच्या दिवशी या मेढ्यांना घेवून घराजवळ असलेल्या चौक (चव्हाट्या) वर जमा करून पेटवतात. घरातून बाहेर जाता वेळी या मेढ्यांना हातात उंचावून खासी-खोकला, ईडा पीडा, रोगराई, मासे-मुरकुटे घेवून जा गे मारबत! अशाघोषणा आणि ललकारी देत आणि मेढ्यांचा सोट्यासारखा वापर करत या ‘ईडा पीडा’ इत्यादींना झोडपून काढण्याचे नाटक करीत असत. याला प्रकाराला ‘मारबत काढणे’ असे म्हटले जाते.

नागपुरात मारबतीचे आणखी एक रूप प्रचलित आहे, यात बांबुच्या कमच्या, कागद, तरट, कापड, ताग, माती, बेगड-चमकी इ.च्या मदतीने मानवाकार पुतळे तयार करून काढतात. ठळक मानाने हे पुतळे दोन प्रकाराचे असतात. स्त्री व पुरुष स्वरूपाचे. पहिल्या स्त्री प्रकारात दोन मुख्य स्वरूपाच्या, एक काळी व दुसरी पिवळी मारबत या येतात. दोन मोठ्या आकाराच्या मारबती, अंदाजे पाच ते साडे सात मीटर उंचीच्या, क्रमशः उभ्या आणि बसलेल्या स्थितीत बनवल्या जातात. या व्यतिरिक्त काही छोट्या मोठ्या मारबतींचे पुतळेही बनवितात. ज्या नवसाची किंवा आपल्या लहरीची (सणकेची) पूर्तता करण्याच्या उद्देशाने बनवल्या व काढल्या जातात. नावाप्रमाणे या मारबतींचे रंग काळे तथा पिवळे रंगाचे असतात. यांची चर्चा आपण थोड्या विस्ताराने पुढे करु.

नागपूर जिल्हा गॅझेटीयरच्या मराठी आवृत्तीत ह्या छोट्या प्रतिमा मारबत आणि बडग्यांच्या मुली असल्याचे विधान केले गेले आहे, ते सपशेल चुकीचे आहे. इतवारी नेहरू पुतळा, धान्य- बारदाना बाजारातून काळी, तांडापेठ चौक, जागनाथ बुधवारी येथून पिवळी मारबत, तसेच दुसऱ्या काळ्या आणि पिवळ्या मारबती विविध आयोजक आपापल्या ठिकाणातून मोठ्या, गाज्या वाज्याने काढतात. प्रमुख दोन्ही काळ्या आणि पिवळ्या मारबती इतवारीतील शहीद चौकाजवळ भेटतात व पुढे ं सराफा, बडकस चौक, महाल, टिळक मार्ग, शिवाजी पुतळा, गांधीबाग, गांजाखेत, गोळीबार चौक असा फेरा घेऊन परततात. पिवळी मारबत नाईक तलाव येथे जाळण्यात येते. तसेच काळी इ. मारबत आपापल्या ठिकाणी परत आणून जाळतात. एक लाल मारबतही एका पुढाऱ्याद्वारे काढण्याचे योजण्यात आले होते, पण ते अल्पजीवी ठरले.

मारबतीसोबत येणारा पुरुषाकार पुतळा ‘बडग्या’ हा आपल्या मूळ रूपात राहिला नसून, त्याचे स्वरूप आता पूर्णपणे बदललेले आहे. वर सांगितल्याप्रमाणे पळसाच्या फांदीचा सोटा किंवा दंडरूपात त्याचा मारबतीला पिटाळून वस्तीच्या बाहेर काढण्यासाठी उपयोग होत होता. त्याचे मानवीकरण करून समाजात अमान्य ठरलेल्या. व जनसामान्यास हानिकारक वागणाऱ्या, अमान्य ठरलेल्या, अशा प्रवृत्तींचा निषेध म्हणून धिंड काढणे आवश्यक आहे. अशा व्यक्ती व मुद्द्यांचे प्रतीक म्हणजे ‘बडग्या’. जसे भ्रष्टाचारी बडगा, अत्याचारी बडगा, तेलगी कांड बडगा, चंदन चोर वीरप्पन बडगा इ. नावाने ओळखला गेला.स्त्री भारत ही जिथे ईडा पीडा, खासी-खोकला, रोगराई, आरोग्याशी संबद्ध मुद्द्यांशी जोडली जाते, त्या विपरीत बडगे, समाजातील विविध वाईट प्रसंग, जसे प्रदूषण, भ्रष्टाचार, लाचलुचपत, हंडा, सामाजिक-कौटुंबिक अत्याचार, घोटाळे इ. या निषेध नोंदविण्यास्तव, त्या त्या वाईट गोष्टींना (अमूर्त असूनही) मूर्त रूपात ह्या बडग्याचे प्रतीक रूप देऊन या माध्यमाद्वारे जनआक्रोश काढतात. मारबतीप्रमाणेच यांची धिंडवजा मिरवणूक काढून परत आल्यावर अग्निसंस्कार करतात. या बडग्यांच्या गळ्यात त्यांचे नांव, निषेध विषयक मुद्दे/माहिती, तयार करणाऱ्या व्यक्ती/संस्थेची माहिती इ. चे फलक असतात.

वास्तविक पाहता प्राचीन काळात पावसाळ्यात दळणवळणाच्या चांगल्या व्यवस्थेचा अभाव, पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या अभावामुळे झालेली सांडपाण्याची डबकी, त्यामुळे डास, माश्यादी मुरकुटे कीटक, स्वास्थ्यासंबंधी अनेक प्रकारचे आजार, रोगराईचा प्रकोप अधिक होण्याची भीती होती. म्हणून थोडा पाऊस झाल्यावर केरकचरा स्वच्छ करण्यासाठी, तसेच विविध रोग पसरविणाऱ्या डास, माश्यादी कोड्यांचे उच्चाटन व्यवस्थापन करण्यासाठी मारबतींचे आयोजन करण्यात आले असावे.

या प्रमाणे मारबत व बडगे यांच्या मार्फत, समाजातील आरोग्य, वातावरण, पर्यावरण आणि या बरोबर सामाजिक, राजकीय इ. शी जुळलेले अन्याय आणि अन्यान्य मुद्द्यांमागचे खलनायकत्व, लोकांसमोर आणण्याच्या दृष्टीने दिले जाणारे धडे शिकविणे, इ. उद्दिष्टे, या मागे आहेत, यात शंका राहत नाही.

‘मारबत’ हे नाव बहुतेक गोंडी बोली/बोलभाषेतून आले असावे, असा प्रस्ताव गोंडी संस्कृतीचे एक विद्वान अभ्यासक कै. मोतीराम उर्फ मोतीरावण कंगाली यांनी मांडले होते. मारबतीचा इतिहास कोणत्याही साहित्यिक किंवा पुरातात्विक प्रमाणातून प्राप्त होत नाही. मात्र काही रूढ असलेल्या स्थानिक परंपरांच्या संदर्भात जुळवून सांगता येतो.

इंग्रज काळात, जिल्हेवार ऐतिहासिक सांस्कृतिक माहिती देणारे ‘गॅझेटियर’ हा एक चांगला उपक्रम सुरू करण्यात आला. विदर्भातील काही जिल्ह्यातील विवरणात या विषयक थोडी सामुग्री मिळते, ती येथे देणे उपयोगी ठरेल.

एक अर्धनग्न म्हणजे फक्त कंबरेवर काही कपडे गुंडाळलेला व्यक्ती, हातात कोरी हांडी घेऊन गावात दारोदारी फिरत असे. घरचा केरकचरा, माश्या, कीडे, इ. घरच्या लोकांनी जमा करून हंडीत टाकलेला असेल, तो घेऊन गावाच्या वेशीवर किंवा तेथील शिवेवरील नदीनाल्यात विसर्जित करीत असे. नंतर पूजा करून सर्व लोक आंघोळ करून आपापल्या घरी परत जात.काही ठिकाणी एकदोन दिवसापूर्वी मातीची एक मूर्ती तयार करून, पौर्णिमेच्या दुसऱ्या (प्रतिपदेच्या) दिवशी सकाळी मारबतीच्या नावाची ‘ललकारी’ देत गांवाच्या शीवेवर जाऊन पूजा, विसर्जन, आंघोळ इ. करतात व घरी जातात. या मातीच्या मूर्तीचा एक हात कंबरे वर तर दुसरा डोक्यावर असतो, जिथे एक दिवनाल (पणती) केली असते. त्यात तेलवात लावून दिवा पेटवतात. हे प्रकार गोंदिया (बहुतेक मूळ स्वरूपात ‘गोंडिया’) जिल्ह्यातील गुदमा गावात आजही प्रचलित आहे. अश्याच, पण कुंभाराद्वारे बनविलेल्या मूर्तीचे नागपुरात आजही पाचपावली भागात चलन दिसून येते. ही माहिती आमचे स्नेही श्री ओम शिव यांनी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

कालांतराने नागपुरसारख्या काही मोठ्या शहरांत बांबू, कमची, कागद, पन्नी व इतर सामुग्रीच्या साह्याने मोठी स्त्री प्रतिमा तयार करून मारबत काढण्याची परंपरा प्रचलित झाली. ही मूर्ति एका आदिम देवीच्या स्वरूपात, दोन्ही बाजूनी हात पसरून उभी एक मुक्तकेशी, काळ्या रंगाची, तीक्ष्ण दात आणि लाल लांब जीभ काढलेली, भयानक दिसणारी असते. बंगालच्या काली-महाकाली सारखी दिसणाऱ्या देवीची आहे. कालीघाट, कोलकाता येथील मूर्तीशी हिचे साम्य लक्षणीय आहे. नुकतेच एका नैसर्गिक आपत्तीचे मानवीकरण (तेही काली किंवा महाकाली देवीशी) करून काढलेले कालीघाट शैलीचे चित्र, डॉ. आनंद कर्णद्वारे फेसबुकावर टाकलेले दिसले. ह्यावरून अशा परंपरेची विदर्भातच नव्हे तर अन्य भागातही रूढी असण्याचे अनुमान करता येते.

नागपुरात यास ‘काळी मारबत’ म्हणतात. कारण काळ्या रंगाव्यतिरिक्त आणखी एका मारबतीची येथे परंपरा आहे जी ‘पिवळी मारबत’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही दुसरी मारबत मोढ्या (मचिया, घडवंची) सारख्या एका आसनावर अशी बसलेली असते की तिचा डावा पाय खाली लोंबता आणि उजवा पाय गुडघ्यापासून दुमडून थोडा उंच ठेवलेला असतो. या गुडघ्यावर तिचा उजवा हात टेकून पुढे पदर घेतलेला आणि डावा हात लंबरूपाने खाली आसनावर टेकलेला असतो.

ही पिवळी मारबत लोकांच्या समजुती प्रमाणे, नागपुरच्या भोंसला राजघराण्याच्या दुसऱ्या रघुजी महाराजांच्या दुसऱ्या राणी बाकाबाई भोसले यांच्या नावाने काढली जाते. या मागे राणीसाहेबांची इंग्रजांप्रती निष्फळ निष्ठाच नाही तर आपल्याच लोकांविरुद्ध जाऊन त्यांची मदत करण्याचे कारण मुख्य होते. ईस्ट इंडिया कंपनी बरोबर सन १८१९ मध्ये झालेल्या सीताबर्डीच्या लढाईतच नव्हे तर नंतर १८५७ च्या उठावाच्या वेळीही त्यांचे धोरण तसेच असल्यामुळे मारबतीचे निमित्त साधून लोकांनी त्यांचा निषेध व्यक्त करण्याचे ठरविले असावे. राणींची प्रकृती आधीच खराब होती आणि त्यात या निर्णयामुळे त्यांच्या मनावर धक्का बसणे स्वाभाविक होते. संयोगाने त्याच दिवशी म्हणजे मारबत काढण्याच्या दिवशी त्यांचे निधन झाल्यामुळे हे सर्व जोडले गेले. नागपुरच्या लोकपरंपरेत पिवळी मारबत आणि बाकाबाई संबंध असे खोलवर रूजून बसले. या समजुतीचा एक आधार या मारबतीचे मूर्तीलक्षण आणि यासंबंधी वाचिक परंपरेचे दिसते. या भागात ‘घरात बाकाबाई/मारबत शिरणें’ असा एक वाक्प्रचार वऱ्हाडी बोली/लोकसाहित्याचे एक ज्येष्ठ संशोधक आणि वऱ्हाडी बोलीचे कोशकार देवीदास सोटे यांनी नोंदवून ठेविला आहे. याचप्रमाणे नागपुरचे सांस्कृतिक इतिहासकार देवीदास गो. लांडगे म्हणतात, त्याप्रमाणे ‘मारबतीच्या दिवशीच बाकाबाईची मारबत गेली’ असा हीनात्मक उल्लेख तिच्याबद्दल जुन्या पिढीतील लोकांत कालपरवापर्यंत करण्यात येत होता.

पिवळी मारबत ही द्वापारयुगीन हिडिंबा किंवा पूतना, तसेच काळी मारबत व बाकाबाई राणीच्या एकरूपतेच्या भ्रामक कल्पनाही पसरविण्यात आल्या. आज या दोन मारबतीशिवाय आणखी काही (लाल, छोटी पिवळी, छोटी काळी) मारबत काढण्याचे उद्योगही झालेले आढळतात.

स्त्री रूपातील मारबत जिथे घाण, प्रदूषण, खासी-खोकलापासून सर्व रोगराईची प्रतीकात्मक देवता म्हणून समाजातून हाकलून काढण्यात येत होती, तिथे या सर्व बाबींचे ‘पुरुषरूपात निषेध करण्याकरिता ‘बडग्या’ची संकल्पना करण्यात आली, असेही समज होते. बहुतेक पहिला बडगा ‘इंग्रज’ शासन किंवा त्याचे प्रतिनिधी असलेल्या नृशंस अधिकाऱ्याच्या नावांवर काढण्यात आला असावा. समाजात जे काही ‘वाईट’ घडते त्याचा निषेध नोंदविण्याकरिता बडगे काढतात. हा व्यक्ती खलनायक ठरविल्यावर त्याच्यासारखी वेशभूषा त्या बडग्यास सामान्यपणे देण्यात येते. एखादी संस्था/त्याच्या प्रतिनिधी प्रतीकाद्वारे दाखविण्यात येते. व्यक्तीनुसार भ्रष्टाचार, लाचलुचपत, घोटाळा, वीज कपात, हुंडा (प्रकरण, अत्याचार इ. स्वरूप सकट) इ. चे अमूर्त अथवा मूर्तरूपात हे बडगे काढून, शेवटी त्यांना रावणदहनासारखे पेटवून देतात.

मारबत आणि बडग्यांचे एक नितांत काल्पनिक, अवास्तव व सर्वथा ‘बकवास’ म्हणण्यासारखे विधानही एका विद्वाना (?) द्वारे करण्यात आले आहे. यात ‘बडग्याला मारबतीचा नवरा समजतात’ असे म्हटलेले आहे. इतकेच नव्हे तर यांची मिरवणूक चालू असताना ठिकठिकाणी या पतिपत्नींची भेट घडवून आणतात. अशीच आणखी एक लहान स्त्रीमूर्ति, मारबतीची मुलगी बनवितात आणि माशा, मुरकुट्या, रोगासोबत पिशाच्च इ. चे नामोच्चार करतात. अशी अभिनव माहिती (?) मांडण्यात आली आहे. यात सत्यांश नाही हे उघड आहे.

बडगा तत्कालीन खलनायकीकडे बोट दाखवून त्याचे नायनाट करण्याकरिता आव्हान करतो. हे खलनायक कायमचे म्हणजे प्रत्येक वर्षी ‘तेच ते’ काढले जातात असे नसून त्यांच्याऐवजी नवीन मुद्यांवर किंवा वेगळ्या मुद्यांवर काढले जातात. म्हणून त्यांच्यात ह्या कल्पनेनुसार नवरा-बायकोचे संबंध असणे शक्यच नाही. ही मूर्खतेच्या नंदनवनाचीच कल्पना दिसते हे उघड आहे.

बडग्याची ओळख स्पष्ट करण्याकरिता त्याच्या गळ्यात/सोबत ठळक अक्षरात त्याच्या नावाचा फलक/बॅनर इ. लावले जातात. पाकिस्तानी षडयंत्र व भारताविरुद्ध त्याचे निंद्य धोरण, सद्दाम हुसैनचे कुवेतवर आक्रमण, आंतरराष्ट्रीय इस्लामिक कट्टरवादी संघटन, अब्दुल करीम तेलगी घोटाळा, चंदन तस्कर वीरप्पन द्वारे चंदन तस्करी व त्यास मिळणारे राजकीयांचे संरक्षण इ. अनेक मुद्यांवर बडगे काढण्यात आले आहेत व काढले जातात.

या संदर्भात एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी आहे की बरेचदा या काही विषयावर केलेली अभिव्यक्ती अत्यंत सटीक व मर्मावर आघात करणारी ठरते. उदाहरण म्हणून वीरप्पनच्या बडग्यावर लावलेला एक फलक किती बोलका आहे पहा

‘मेरे पीछे नेता छप्पन ।
मैं हूँ – चंदनचोर वीरप्पन ।’

कर्नाटक, तामिळनाडु केरळ व आंध्र प्रदेश राज्यांची किंवा केंद्र सरकारची संयुक्त कारवाई अनेकदा त्याच्यापुढे कमी पडली. मात्र पत्रकार, कलाकार किंवा सामान्य माणसांना तो सहज भेटू शकत होता. असो.

आज पिवळ्या मारबतीचे स्वरूप पूर्णपणे बदललेले दिसते. आज ती ईडा पीडा, रोगराई, प्रदूषण, वाईट वृत्तीची प्रतिनिधी नसून एक लोकप्रिय देवी झाली आहे. तिचा महोत्सव बऱ्याच मोठ्या पातळी वर करण्यात येतो. या दरम्यान डहाक्या, गोंधळ, भजन, कीर्तन, ओटी भरणे, नवस करणे व ते पूर्ण झाल्यावर फेडणे, आरती, पूजा-पाठ इ. बरेच कार्यक्रम त्या दिवशी साजरे केले जाते.

आज मारबत सवाष्ण (सधवा किंवा सौभाग्यवती) स्त्रीसारखी बनविली जाते. ती गोलसाडी नेसलेली पण उघड्या डोक्याची, काळेभोर मागे विंचरलेले केस, कुंकू, विविध दागदागिने इ. घातलेल्या एका कुलीन महिलेसारखी बनविण्यात येते. तिच्या स्वरूपात हा बदल कां व केव्हा झाला, याबाबत काहीच बोलता येत नाही.

स्वच्छतेकरिता स्थानीय, राज्य व सर्व देशभर आज विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, पण दीर्घकाळापासून नागपुरात हे आयोजन होत आहे, हे विसरता येत नाही. मात्र या महोत्सवाचे व्यवस्थित संयोजन आवश्यक आहे.

संदर्भ :

१. प्रा. चन्द्रशेखर गुप्त, २०२३ : नागपुर – विदर्भ का मारबत महोत्सव, लोकमत समाचार उत्सव प्लस दिवाली २०२३, पृष्ठ ३०४-०६.
(सदर संशोधनपर लेख विदर्भ संशोधन मंडळाच्या संशोधन क्षितिज-2023च्या अंकात प्रकाशित झाला आहे.)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आशीर्वाद पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

भारतातील कृषीखाद्य प्रणालीचे रूपांतरण करण्याची गरज!

भाजपने तुंगभद्रा घटना गांभिर्याने घेण्याची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading