कवीता कशी सुचते हे एखाद्या कवीला विचारले तर तो सांगेल अंतःकरणातून येते. म्हणजेच त्या वातावरणाशी एकरूप झाल्यानंतर जे विचार प्रकट होतात यातून त्या कवितेचा जन्म होतो. यासाठी पांडित्य आवश्यक आहे का ? पांडित्य, पदव्या मिळवून समाजात मान मिळवता येतो. पण साहित्य विचार हा आतूनच यावा लागतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
म्हणोनि रिकामे तोंड । करुं गेले बडबड ।
कीं गीता ऐसें गोड । आतुडले ।। 21 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा
ओवीचा अर्थ – म्हणून माझें रिकामें (शास्त्र वैगरे न पढलेले) तोंड बडबड करूं गेले. तो त्या बोलण्यांत गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसानें भरलेले गोड शास्र सहज सापडलें.
ज्ञानेश्वरीमध्ये चमत्काराला थारा नाही. चमत्कार करुन कोणी अंगठी काढतो, कोणी वेगवेगळ्या वस्तू काढतो. पण ते चमत्कारी पुरुष गोरगरीबांचे दारिद्र का दुर करत शकत नाहीत ? असल्या चमत्काराच्या गोष्टी येथे सांगितलेल्या नाहीत. तर येथे अनुभवाला आलेले विश्व यात मांडले आहे. अनुभुतीतून अध्यात्मिक प्रगती साधत आत्मज्ञानी होणारे तत्त्वज्ञान यात सांगितले आहे. अनुभव, अनुभुतीवर आधारित हे शास्त्र उभे राहीले आहे.
हे शब्द कसे प्रकट होतात ? हे विचार कसे सुचतात ? इतकी सुंदर रचना कशी निर्माण होते ? यासाठी किती अभ्यास केलेला असेल ? किती वाचन केलेले असेल ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण हे तत्त्वज्ञान चक्क अनुभुतीतून प्रकट झाले आहे. पूर्वीच्या काळी महिल्या जात्यावर गाणी गात. किंवा पेरणी वा भांगलणी करताना कामगार महिला गाणी म्हणत. या महिला कधीही शाळेत गेलेल्या नाहीत. या अडाणी महिलांना इतकी सुंदर रचना कशी सुचते ? ना शिक्षणाचा गंध ना कविता, साहित्याचा अभ्यास. पण त्या शिकल्या सवरल्यांच्यापेक्षाशी सुंदर रचनांची निर्मिती त्यांनी केलेली पाहायला मिळते. हे सर्व त्या कोठे शिकल्या ? अशा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. हा चमत्कार नाही. हे अनुभवविश्व आहे. निरिक्षणातून, अनुभवातून, अनुभुतीतून प्रकट झालेले ते विचार आहेत.
कवीता कशी सुचते हे एखाद्या कवीला विचारले तर तो सांगेल अंतःकरणातून येते. म्हणजेच त्या वातावरणाशी एकरूप झाल्यानंतर जे विचार प्रकट होतात यातून त्या कवितेचा जन्म होतो. यासाठी पांडित्य आवश्यक आहे का ? पांडित्य, पदव्या मिळवून समाजात मान मिळवता येतो. पण साहित्य विचार हा आतूनच यावा लागतो. निसर्गाशी एकरूप झाल्यानंतर निसर्ग सुद्धा आपणाशी बोलतो. त्याला सुद्धा भाषा असते. ती भाषा शिकावी लागत नाही, तर ती त्या वातावरणाशी झालेल्या एकरूपतेतून प्रकट होते. उत्स्फुर्तपणे ती बाहेर येते. म्हणूनच या अडाणी महिला सुंदर रचना करू शकतात. कारण ते अनुभवाचे बोल असतात. त्या वातावरणाशी एकरुप झाल्यानंतर आलेल्या अनुभुतीतून प्रकट झालेले ते शब्द असतात. अनुभवाला आलेले विश्व, त्यातील भाव-भावना या शब्दात सहज व्यक्त होतात. मग त्यात प्रेम असेल, विरह असेल, दुःख असेल, आनंद असेल सर्व भावविश्व त्यात उतरलेले असते. ते शब्द वाचताना आपणही त्या वातावरणात जातो इतक सामर्थ्य त्या शब्दांमध्ये असते.
अध्यात्मिक प्रगतीसुद्धा अशा एकरूपतेतूनच होत असते. यासाठी त्या विश्वाचा अनुभव, अनुभुती घ्यायला शिकायला हवे. तरचं ते विश्व आपले होईल. आपण त्याच्याशी एकरूप झालो तर आपणही गुरुंच्या प्रमाणे आत्मज्ञानी होऊ. गुरुंच्या प्रमाणे, ज्ञानेश्वर माऊली प्रमाणे आपणातही ते शब्द सामर्थ्य उत्पन्न होईल. आपलीही अध्यात्मिक प्रगती होईल.
सर्वसामान्य वारकरी कोठेही विद्यापीठात पदवी घ्यायला गेला नाही तरी तो विद्यापीठातील विद्वान प्राध्यापकापेक्षाही अधिक सुंदर निरुपण करु शकतो. कारण त्याच्या भक्तीने त्याच्यात ही शक्ती प्रकट होते. तो सहज जरी बोलला तरी त्याच्या शब्दातून ब्रह्मज्ञान प्रकट होते. कारण त्याच्याशी झालेली त्याची एकरुपता यातून ते प्रकट होत असते. फुटणाऱ्या प्रत्येक शब्दाला ब्रह्मज्ञानाचा वास असतो. यातूनच तो ते सुंदर निरुपण करत असतो. इतका हा सहजयोग आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.