January 26, 2025
Rupali Jadhav dedicated to awareness work
Home » प्रबोधनकार्यास वाहून घेतलेली रुपाली
मुक्त संवाद

प्रबोधनकार्यास वाहून घेतलेली रुपाली

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ६
३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज रूपाली जाधव यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244

रूपाली जयदेव जाधव यांना मी प्रथम ऐकले ते डॅा. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे सन २०१० मधे झालेल्या धर्म परिषदेत. त्यानंतर २/३ वेळा रूपाली जाधव यांचे धम्मवर्गातील भाषण ऐकले. एक उत्तम, अभ्यासू वक्ता कसा असावा ? तर रूपाली ताईंसारखा. ते अशासाठी म्हणावेसे वाटते की, सामान्य महिलांचे प्रबोधन करताना ‘धर्म, रूढी परंपरा, कर्मकांड व आपण’ याविषयी त्या सर्वांना पटेल व पचेल असे प्रबोधन करतात. विविध बौध्द विहारांमध्ये त्या महिला व पुरुषांसाठी एक दिवसीय व तीन दिवसीय शिबीरांचे आयोजन करतात याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे.

रूपाली ताईंचा जन्म १९७९ मध्ये येरवडा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे महानगरपालिकेच्या कर्नल यंग शाळेत तर हायस्कूलचे शिक्षण नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालयात झाले. आणि बी.ए. (अर्थशास्त्र) त्या डॅा. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येरवडा येथून झाल्या. लहानपणापासूनच ताईंना वक्तृत्वाची आवड होती त्यामुळे शालेय जीवनातच त्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असत. तसेच त्यांना नृत्याचीही विशेष आवड असल्याने इ.७ वीत असताना त्यांना दूरदर्शनवर बालचित्रवाणी या कार्यक्रमात आपली कला सादर करायची संधी मिळाली होती तसेच बालगंधर्व रंगमंदिरातही त्यांनी आपली कला सादर केली होती.

कॅालेजातही ताई नृत्यस्पर्धेत सहभागी होत होत्या. रूपालीताईंसह पाचही बहिणींना आई वडीलांनी मुलगा मुलगी भेद न मानता पदवीपर्यंत शिक्षण दिले आहे. ही अतिशय अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. डॅा. बाबासाहेबांनी सांगितलेला ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ हा विचार ताईंच्या घरात पूर्ण पटलेला असल्याने आई वडीलांचा ताईंना पूर्ण पाठिंबा होता.

कॅालेजात असतानाच सन २००० साली चळवळीचा विचार मनात रुजलेल्या जयदेव जाधव या तरूणाशी ताईंची ओळख झाली. त्यांची वैचारिक मैत्री वाढत गेली. सन १९५६ ला जरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली असली तरी ती त्यावेळेस असलेल्या लोकांना दिली होती. बौद्ध परंपरेत प्रत्येकाला नव्याने दीक्षा घ्यावी लागते, त्याप्रमाणे १२ डिसेंबर २००३ या दिवशी ताई विधीवत बौध्द धम्माची दिक्षा घेऊन विवाहबद्ध झाल्या. दोघांची वैचारिक नाळ जुळली असल्याने रूपाली ताईंनी जयदेव जाधव यांना गुरू केले. इतिहास व धर्म या विषयावरील प्रशिक्षण त्यांनी आपल्या पतीकडून घेतले. स्त्रीला माहेरी वडील व सासरी पतीचा जर पाठिंबा मिळाला तर ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकते हे आपण अनेक कुटुंबात पाहातो.

रूपाली व जयदेव जाधव हे समविचारी जोडपे तर आहेच परंतु एका स्त्रीबद्दलचा आदर किती असावा याचे ते उत्तम उदाहरण आहेत. ‘रूपालीताई’ असे आदरार्थी बोलणे मी कायम ऐकलेय, ते ताईंना आदरार्थी बोलतात याचे मला विशेष कौतुक वाटते. लग्नानंतर फक्त संसार करावा असे न करता जयदेव जाधव यांनी रूपालीताईंना पाली भाषा शिकण्याचा सल्ला दिला. पालीमध्ये बौध्द धम्माचे प्रचंड साहित्य आहे त्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे असे वाटून ताईंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सलग आठ वर्षे पाली भाषेचे प्रशिक्षण घेतले.

सन २०१३ मधे त्यांचा अभ्यास पूर्ण झाला. ताईंना कनिष्क नावाचा एक मुलगा आहे. तो लहान असल्यापासूनच ताई शिक्षण व सामाजिक काम करत आहेत. पाटील इस्टेट या वसाहतीपासून ताईंनी खऱ्या अर्थाने प्रबोधनास सुरूवात केली. स्वतःच्या घरात धम्मवर्ग सुरु केले. एक वर्षाचा मुलगा व सासू यांना घरी ठेवून विद्यापीठात प्रशिक्षण व धर्मप्रचारार्थ विविध वस्त्यात ताईंनी भटकंती केली आहे व करत आहेत. विश्रांतवाडी, मुंढवा, केशवनगर, खराडी, घोरपडी, खांदवेनगर, चंदननगर, वडगावशेरी अशा विविध भागांत त्या कायम धम्मप्रचार व प्रसाराचे व प्रबोधनाचे कार्य करतात.

सर्वच महापुरुष व महामानवांचे विचार त्या स्वतः अंमलात आणतात व इतरांना सांगतात परंतु महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे त्यांचे विशेष आदर्श आहेत. त्यांच्या विचारांमुळेच आपल्यात हे सारं करण्याचे धाडस निर्माण झाले हे त्या नम्रपणे सांगतात. जात पात धर्मापलीकडे जाऊन आपण मानवतेचा विचार करायला हवा. स्त्री सन्मान गरजेचा आहे. मुलींना शिक्षण दिले पाहिजे. सर्वच धर्मातील अंधश्रद्धा सोडून आपण विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे अशा पध्दतीचेही प्रबोधन त्या महिलांना करतात. त्या प्रसिध्दीपराड्मुख अशा पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना त्यांच्या कामासाठी सावित्रीबाई फुले पुरस्कार व आदर्श परिवार पुरस्कार मिळाला आहे.

अशा या धडपड्या, उत्तम वक्तृत्व लाभलेल्या, समाज सुधारणेसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या, कशाचीही अपेक्षा न करता पूर्ण वेळ प्रबोधनकार्यास वाहून घेतलेल्या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading