January 26, 2025
It is necessary to use creative reading methods Dr Sunilkumar Lavte
Home » निर्मितीक्षम वाचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे: डॉ. सुनीलकुमार लवटे
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

निर्मितीक्षम वाचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे: डॉ. सुनीलकुमार लवटे

कोल्हापूर: बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या मोहिमेअंतर्गत डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे ‘वाचनाची विस्तारित क्षितिजे’ या विषयावर व्याख्यान राजर्षी शाहू  सभागृहामध्येआयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील होते.शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे कार्यक्रमास उपस्थित होते. 

‘’वाचनाची विस्तारित क्षितिजे या विषयावर बोलताना डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वाचनास आईच्या दुधाची उपमा दिली. ते म्हणाले की, वाचन तुटले तर, व्यक्ती सांस्कृतिक दृष्ट्या रोडावते त्यामुळे वाचन व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे. सध्या मुक्त संसाधन चळवळ म्हणजेच ओपन सोर्स मुव्हमेंट जगभरामध्ये सुरू आहे. 

 वाचन हे ज्ञानामृत असल्याचे नमूद करून त्यानी वाचनाचे विविध प्रकार,  मनस्वी वाचन कसे महत्त्वाचे आहे याविषयी भाष्य करत विद्यार्थ्यांनी वाचन अधाशीपणे करावे, असा मंत्र दिला. आपल्या भाषणात त्यांनी वर्तमानपत्रांच्या विश्वाचा  धांडोळा घेतला. विविध लेखक कसे वस्तुपाठ देतात याविषयी भाष्य केले. ते म्हणाले , विद्यार्थ्यांत व्यासंगामुळे वाचन वाढत जाते आणि वाचन प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव करते. विद्यार्थ्यांनी वाचन व्यवहार समजून घ्यावा. वैचारिक वाचन साहित्याची गरज व्यक्तिमत्व विकासाकरिता आवश्यक आहे. वाचनातून होणारी बौद्धिक समृद्धी महत्त्वाची तसेच वाचनामुळे सांस्कृतीक श्रेष्ठता वाढीस लागते. ग्रंथवाचनासोबत विद्यार्थ्यांनी सभोवतालचा निसर्ग, जंगल, व्यक्ती इ. सर्व गोष्टींचे वाचन करणे आवश्यक आहे.  विद्यार्थ्यानी वाचनाचा परिघ वाढवून विश्वव्यापी ज्ञान मिळवण्याचे आवाहन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी विद्यार्थ्यांना केले.  

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये कौशल्य आधारीत शिक्षण प्रणाली तसेच राष्ट्र विकासामध्ये तरुणांचे वाचनाद्वारे योगदान वर्धित करता येते, असे नमूद केले . वाचनाचे व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये असलेले महत्त्व देखील विषद करून विद्यार्थ्यानी क्रमिक पुस्तकांबरोबर अवांतर वाचन करावे, असे आवाहन केले. 

 बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्राचे प्र-संचालक डॉ. डी. बी. सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय उप-ग्रंथपाल डॉ. पी. बी. बिलावर यांनी केला. सूत्रसंचालन सुधाराणी हजारे यांनी केले. शिवाजी  कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात यांनी केले. डॉ. शरद बनसोडे, डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. युवराज जाधव आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींसह सुमारे ३५०  विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच  नागरिक  कार्यक्रमास  उपस्थित होते. 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading