July 20, 2024
Modi vs Gandhi in Parliament
Home » संसदेत मोदी विरुद्ध गांधी
सत्ता संघर्ष

संसदेत मोदी विरुद्ध गांधी

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात कटुता किती टोकाला गेली आहे, याचेच दर्शन घडले. निवडणूक प्रचारात देशभर एनडीए विरुद्ध इंडिया, काँग्रेस विरुद्ध भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सातत्याने संघर्ष बघायला मिळाला. तोच संघर्ष संसदेच्या अधिवेशनात पाहायला मिळाला.

भाजपला २०१४ व २०१९ ला स्वबळावर बहुमत मिळाले होते, २०२४ च्या निवडणुकीत अब की बार ४०० पार अशी घोषणा भाजपने दिली होती, पण भाजपला २४० वरच मतदारांनी रोखले. दुसरीकडे काँग्रेसचे २०१४ ला केवळ ४४ खासदार निवडून आले होते, २०१४ मध्ये ५२ खासदार विजयी झाले होते, २०२४ मध्ये काँग्रेसचे काय होणार अशी भाकिते वर्तवली जात होती, प्रत्यक्षात काँग्रेसचे १०० खासदार निवडून आले. काँग्रेसचे १०० आणि भाजपचे २४० हा जनतेने दिलेला कौल आहे. पण राहुल गांधी आपणच विजय मिळविल्याच्या थाटात भाषणे ठोकताना दिसत आहेत. लोकसभेत बहुमतासाठी २७२ हा जादुई आकडा आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार हाच जनतेचा कौल आहे, पण तो स्वीकारायला काँग्रेस तयार नाही.

मोदी लाटेत २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत व्हायचेच केवळ बाकी होते. आता २०२४च्या निकालानंतर लोकसभेत विरोधी पक्ष मजबूत झाला आहे. गेली दहा वर्षे विरोधी पक्ष दुर्बल होता, खचलेला होता, विरोधकांना आवाज नव्हता, विरोधकांना मान्यताप्राप्त नेताही नव्हता. आता चित्र बदलले आहे. सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांचा आदर ठेऊन व सन्मान राखून कामकाज करायला हवे, प्रत्यक्षात मोदी विरुद्ध गांधी अशा सामन्यात आरोप-प्रत्यारोपांचाच धुरळा जास्त उडाला. आता पुढील पाच वर्षे हेच ऐकायचे का, हेच पाहायचे का, हा प्रश्न सुन्न करणारा आहे.

राहुल गांधींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी कमालीचा राग, द्वेष आणि संताप आहे. संघावर हल्ला हे त्यांच्या भाषणाचे सूत्र असते. त्याचीच प्रचिती लोकसभेतील त्यांच्या भाषणाने आली. लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी संयमाने व जबाबदारीचे भान ठेऊन बोलायला हवे पण संघावर टीका करताना त्यांना काय आनंद मिळतो हे त्यांनाच ठाऊक. भाजपचे केंद्रातील बहुतेक मंत्री हे संघाच्या संस्कारातून वाढलेले आहेत. स्वत: मोदी-शहा हे बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदींचे सरकार आल्यापासून गेल्या दहा वर्षांत सरकारी-निमसरकारी क्षेत्रात सर्व महत्त्वाच्या व संवेदनशील पदांवर संघाच्या विचाराच्या लोकांना बसवले आहे, असे राहुल गांधी वारंवार सांगत आहेत.

देशाचा सर्व कारभार पीएमओमधून चालतो असे ते भासवत आहेत. संघाचा व हिंदुत्वाचा अजेंडा गेली दहा वर्षे सरकार राबवत आहे, असा त्यांचा आरोप आहे. मोदी सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारले, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केले, अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे प्रयोग बंद केले, यात वाईट काय आहे ? आज ना उद्या समान नागरी कायदा देशात येणार आहे, या भयगंडाने काँग्रेस व इंडियामधील मित्र पक्षांना पछाडले आहे. आम्ही तुष्टीकरण करीत नाही, संतुष्टीकरण करतो या पंतप्रधानांच्या उत्तराने काँग्रेसलाही काय बोलावे हे कळेनासे झाले.

राहुल यांनी लोकसभेत भगवान महादेवाची प्रतिमा हातात धरून भाषण केले, हे सर्व पूर्वनियोजित असावे. त्यातून आपल्याला हिंदूंची सहानुभूती मिळेल असा त्यांचा कयास असावा. पण हिंदूंना हिंसक ठरविल्यामुळे सहानुभूती निर्माण होण्याऐवजी संताप प्रकट झाला. निवडणूक काळात राहुल वेगवेगळ्या मंदिरात जाऊन पूजा-आरत्या करून प्रसाद घेतानाचे फोटो व व्हीडिओ व्हायरल होत होते. आता संसदेत महादेवाची प्रतिमा हातात घेऊन भाषण केले.

मोदी म्हणजे हिंदू नाहीत, भाजप म्हणजे हिंदू नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदू नाही, असे राहुल यांना चार-चार वेळा ओरडून का सांगावे लागले ? सत्ताधारी हिंदू नाहीत, आम्ही खरे हिंदू आहोत हे त्यांना देशाला सांगायचे आहे का ? पंडित नेहरू, इंदिरा गांधींच्या काळात अल्पसंख्य व्होट बँक काँग्रेसकडे होती. आता अल्पसंख्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी राहुल हे हिंदूंचा संबंध हिंसेशी जोडत आहेत का ? हिंदूंना हिंसक ठरवणे हे राहुल काही अनावधानाने बोलले नाहीत, ते जाणीवूर्वक बोलले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राधा कुमुद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. वनवासी कल्याण केंद्र, सेवा भारती किंवा विद्याभारतीच्या माध्यमातून संघाचे वर्षानुवर्षे चालू असलेले सामाजिक काम अद्वितीय आहे. पण केवळ जळीस्थळी मोदींची छाया दिसणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याला संघाचे संस्कारक्षम पिढी घडविण्याचे व राष्ट्रबांधणीचे काम बघायला वेळ आहेच कुठे?

पंतप्रधान विरुद्ध विरोधी पक्षनेता असा टोकाचा संघर्ष यापूर्वी संसदेने एवढा बघितला नसावा. लोकसभेत राहुल गांधी व राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षनेते आहेत. दोन्ही पदे काँग्रेसकडे आहेत. दोघांचा संघ द्वेष सर्वश्रूत आहे. दोन्ही नेत्यांचे टार्गेट मोदी हेच आहेत. विरोधी बाकांवर संख्या मोठी असल्याने संसदेत चर्चा चांगली व्हावी अशी अपेक्षा आहे, पण मोदी आणि संघ हेच विरोधी पक्षांचे टार्गेट राहणार असेल, तर संसदीय लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मुद्देसूद चर्चा होणार कशी? संसदीय व्यासपीठावर दुसऱ्याला बालक बुद्धी म्हणणे किंवा हिंदूंना हिंसक म्हणून संबोधणे हे दोन्ही टाळायला हवे होते…

राहुल गांधी यांच्या भाषणानंतर त्यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता पंतप्रधान मोदींनी लोकसभेत काही किस्से रंगवून सांगितले आणि ते किस्से विरोधी पक्ष नेत्यांना एकदम चपलख बसले…

(१) एक मुलगा शाळेतून घरी आला व जोरजोरात रडू लागला, त्याची आईसुद्धा घाबरून गेली व काय झालं असं विचारू लागली. त्या मुलाने, मला याने मारले, त्याने मारले, असे सांगितले व तो आणखी रडू लागला. मात्र त्याने कुणाला आईवरून शिविगाळ केली, कुणाची वही फाडली, कुणाची टिफीन चोरून खाल्ले हे मात्र आईला सांगितले नाही. आपण सभागृहात असेच बालीश वर्तन पाहिले, काल ते सांगत होते, मला याने मारले, त्याने मारले… सहानुभूती मिळविण्यासाठी नवे नाटक केले गेले पण ते हजारो कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी सध्या जामिनावर बाहेर आहेत, हे आहे. बेजबाबदार वक्तव्य केल्याबद्दल त्यांना सर्वोच्च न्यायालयाची माफी मागावी लागली होती…

(२) १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फार मोठे यश मिळाले होते, त्यानंतर १० लोकसभा निवडणुका झाल्या, पण काँग्रेसला कधीही २५० संख्येला स्पर्श करता आला नाही. यावेळी तर ९९ आकड्यातच अडकले आहेत. एक मूल ९९ टक्के मार्क्स मिळाले म्हणून सर्वत्र सांगत फिरत होते, ते ऐकून लोकही खूश होत होती व टाळ्या पिटत होती. मग एका शिक्षकानेच सांगितले, १०० पैकी ९९ गुण मिळाले नसून ५४३ पैकी मिळाले आहेत…

(३) शोले चित्रपटातील मावशी आणि अमिताभ बच्चनच्या संवादाचा हवाला देत मोदींनी किस्सा सांगितला. लोक म्हणत आहेत, ते फक्त तिसऱ्यांदा हरले आहेत. अरे मावशी, तेरा राज्यात झिरो सीट्स झाल्या आहेत. पण तो हिरो तर आहे ना ? असे मावशी, पार्टीची लुटीया बुडवली पण पार्टी अजून श्वास तर घेत आहे ना… माझे सांगे आहे की, खोट्या विजयाचा आनंद साजरा करू नका, देशाने दिलेला जनादेश समजावून घेऊन तो प्रामाणिकपणे स्वीकारा…

(४) विरोधी पक्षातील आमच्या सहकाऱ्यांनी (काँग्रेसचे जयराम रमेश) आमच्या सरकारला एक तृतियांश सरकार म्हणून हिणवले आहे. हो, आमचं सरकार एक तृतियांश आहे. आमच्या सरकारची १० वर्षे पूर्ण झाली आहेत व २० वर्षे बाकी आहेत…

सोशल मीडियावर राहुल गांधींचे कौतुक करणारी एक पोस्ट व्हायरल झाली. अमिताभ बच्चन एका गोदामात शिरतो, आतून दरवाजाला कडी लावतो, त्यावर कुलूप लावतो, त्याची चावी तेथील उन्मत्त गुंडाकडे फेकून म्हणतो, पिटर, अब ये ताला, तेरी जेब से चाबी निकालकर ही खोलूंगा… मग अमिताभ घुसतो, सर्वांना घायाळ करून सुखरूप बाहेर येतो… बाहेर थांबलेली व अन्यायाने पिचलेली मजदूर सेना त्याचा जयजयकार करीत त्याला खांद्यावर घेते, तो गरीब जनतेचा आवाज बनला… तसे राहुल गांधी भासले… धीट, निडर, सत्ताधाऱ्यांना पुरून उरले…

मुळात राहुल गांधी हे अमिताभ बच्चन नाहीत. लोकसभा म्हणजे दिवार सिनेमा नाही. राहुल यांचे भाषण ऐकून कोणी बाहेर जयजयकार केलेला नाही. उलट त्यांना हिंदूंना हिंसक म्हटले त्याचा निषेध सर्व देशभर झाला…

सुकृत खांडेकर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ब्रह्मवस्तूच्या वेगळेपणाची अनुभूती

वायुरुपी श्री गुरुदेवाचा जयजयकार

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी एक गोष्ट…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading