नवी दिल्ली – अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील अनाहिम कन्व्हेन्शन सेंटर येथे 4 ते 7, मार्च 2025 या कालावधीत आयोजित केलेल्या नैसर्गिक उत्पादन प्रदर्शनात अपेडा (APEDA) अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने भारताच्या समृद्ध कृषी वारशाचे आणि उदयोन्मुख सेंद्रिय शेती क्षेत्रातील उत्कृष्टतेचे प्रदर्शन केले.
जागतिक सेंद्रिय बाजारपेठेतील भारताच्या वाढत्या वर्चस्वाला अधोरेखित करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणाने तांदूळ, तेलबिया, औषधी वनस्पती, मसाले, डाळी, काजू, आले, हळद, मोठी वेलची, दालचिनी, आंबा प्युरी आणि आवश्यक तेले यासारख्या विविध प्रकारच्या सेंद्रिय उत्पादनांच्या 13 आघाडीच्या भारतीय निर्यातदारांना यात सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त केले. भारताचे कृषी क्षेत्रातील सामर्थ्य आणि शाश्वतता, गुणवत्ता तसेच आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत राहण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला या प्रदर्शनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.
कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 4 मार्च 2025 रोजी विशेष आंतरराष्ट्रीय ग्राहक-विक्रेते बैठक तसेच सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. या अत्यंत प्रतिष्ठित अशा कार्यक्रमांमुळे सेंद्रिय उद्योगातील जागतिक स्तरावरील आघाडीच्या उद्योजकांना परस्पर संवाद, अर्थपूर्ण सहयोग आणि व्यावसायिक संधींसाठी उत्कृष्ट मंच उपलब्ध झाला.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे महावाणिज्यदूत अभिषेक कुमार शर्मा यांच्या हस्ते 5 मार्च 2025 रोजी नैसर्गिक उत्पादन प्रदर्शन, वेस्ट 2025 मधील इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन झाले. या पॅव्हेलियनमध्ये आलेल्या अतिथींना भारताचे सेंद्रिय कृषिक्षेत्रातील प्रभुत्व अनुभवायला मिळाले तसेच देशाच्या सेंद्रिय शेती क्षेत्रातील पारंपरिक मूल्यांचाही अनुभव घेता आला. भारताच्या सेंद्रिय समृद्धतेचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केलेल्या मान्यवरांना आणि खरेदीदारांना बाजरीची खिचडी, बाजरीचा पास्ता, मिश्र भाज्यांचा पराठा, हळदीचे लाटे, आलू टिक्की आणि बऱ्याच चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता आला. या प्रदर्शनात मांडलेल्या सर्वच पदार्थांचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
अपेडाच्या सहभागाने नैसर्गिक उत्पादन प्रदर्शन, वेस्ट 2025 मध्ये सेंद्रिय शेतीमधील उदयोन्मुख जागतिक नेतृत्व म्हणून भारताची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली. झपाट्याने विस्तारणाऱ्या सेंद्रिय क्षेत्रासह, भारत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उच्च-गुणवत्तेची, शाश्वत उत्पादने निर्माण करत आहे.
अपेडा ही भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे जी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न निर्यात सुलभ करण्यासाठी विकास, प्रोत्साहन, यांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जागतिक सेंद्रिय अन्न बाजारपेठेत भारताचे अस्तित्व ठळकपणे अधोरेखित करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.