November 17, 2025
उद्धव भयवाळ लिखित जादूचा आरसा हा मनोरंजनासोबत संस्कार, उद्बोधन आणि शिकवण देणारा बालकथासंग्रह. प्रत्येक कथेत जीवनमूल्यांची जाणीव करून देणारा उत्कृष्ट संग्रह.
Home » जादूचा आरसा : मनोरंजनाचा वसा !
मुक्त संवाद

जादूचा आरसा : मनोरंजनाचा वसा !

एकंदरीत ‘जादूचा आरसा’ हा संग्रह मनोरंजनाचा वसा घेऊन येत असला तरीही त्यात संस्कार आहेत, उद्बोधन आहे, शिकवण आहे. लेखक उद्धव भयवाळ यांच्या नाविन्याचा वसा घेतलेल्या लेखणीतून लिहिलेल्या कथा ह्या बालकांना नक्कीच आवडतील यात शंकाच नाही. भयवाळ यांनी हा कथासंग्रह त्यांच्या नातवांना अर्पण केला आहे. त्यामुळे ते नातवंडांच्या अर्थात बालकांच्या छोट्या विश्वात पूर्णतः मग्न झालेले असून याच मग्नावस्थेत असताना त्यांना सापडलेली बीजं त्यांनी उत्कृष्ट जोपासून त्याचे गोष्टीरुप पिकं बाल वाचकांना भरघोस प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे.

नागेश सू. शेवाळकर, पुणे.
९४२३१३९०७१

महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ज्येष्ठ साहित्यिक उध्दव भयवाळ यांचा ‘जादूचा आरसा’ हा बालकथा संग्रह वाचण्यात आला. सातत्याने साहित्य निर्मितीचा वसा घेतलेले भयवाळ यांचा हा कथासंग्रह शॉपिजन या साहित्य संस्थेने अत्यंत आकर्षक स्वरूपात प्रकाशित केला आहे. मुलांना आवडेल आणि मुलं तत्काळ हातात घेतील असे मुखपृष्ठ, उच्च दर्जाचा कागद, आकर्षक मांडणी, सुयोग्य असा अक्षरांचा आकार अशी अनेक वैशिष्ट्यं घेऊन जादूचा आरसा हा बालगोपालांच्या भेटीला आला आहे. लेखक भयवाळ यांचा यापूर्वी ‘हसरी फुले’ हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्याचे बच्चे कंपनीने उत्स्फूर्त स्वागत केले आहे. त्याचबरोबरीने भयवाळ यांची ‘इंद्रधनू’ आणि ‘आले आभाळ भरुन’ हे कवितासंग्रह आणि ‘तारांबळ’ हा विनोदी कथासंग्रह अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सातत्याने साहित्याच्या प्रांगणात अक्षरांचा मळा फुलविणे हा जणू लेखकाचा स्वभाव धर्म आहे.

जादूचा आरसा या बालकथा संग्रहात वाचनीय, मनोरंजनात्मक आणि त्यासोबत प्रबोधन करणाऱ्या चौदा कथांचा समावेश आहे. ‘शंभराची नोट’ ही पहिलीच कथा अत्यंत हृदयास्पर्शी आहे. या कथेचा नायक रघू असून त्याला त्याची मावशी शंभर रुपये बक्षीस म्हणून देते. आनंदलेल्या रघूला शंभर रुपयांचे काय करावे असा प्रश्न पडतो. त्याचे आईबाबा त्याला ‘तुला हवे ते आण’ असे सांगतात. रघू आनंदाने आपल्या मित्राकडे निघतो. वाटेत त्याला एक भिकारी भेटतो जो अनेक दिवसांपासून उपाशी असतो. इतर कुणी त्या भिकाऱ्याला मदत करीत नसताना रघू त्याची प्रेमाने चौकशी करतो. तो भिकाऱ्याला कशी मदत करतो ? पुढे गेल्यानंतर रघूला कुणी ना कुणी अडचणीत सापडलेले भेटत राहते. त्यांची परिस्थिती पाहून रघू त्यांना कशी आणि काय मदत करतो हे लेखक उद्धव भयवाळ यांच्या शब्दात वाचायला मजा येईल. गरजुला मदत करणे, समोरच्या व्यक्तीची गरज लक्षात घेऊन स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे ही शिकवण या कथेतून देण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत.



‘विनूचा संकल्प’ ही कथा वाचताना डोळे नकळत ओले झाल्याशिवाय राहत नाहीत. विनूला वडील नसतात. त्याची आई काबाडकष्ट करुन विनूला शिकवत असते. तो चांगला शिकावा, मोठा व्हावा ही तिची प्रामाणिक इच्छा असते परंतु विनू म्हणजे अत्यंत कामकंटाळा मुलगा! स्वतःची कामेसुद्धा तो करीत नाही. आई नेहमी त्याला रागावत असते, मारत असते. एकेदिवशी मित्राकडे निघालेल्या विनू मित्राकडे न जाता एक आगळावेगळा संकल्प करुन घरी परततो. विनूला रस्त्यात कोण भेटते? विनू कोणती प्रतिज्ञा करुन घरी परततो हे सारे अतिशय ओल्याचिंब शब्दांनी लेखकाने रेखाटले आहे.

मोबाईल ! आजच्या युगात आबालवृद्धांना वेडं करणारं हे यंत्र ! आठव्या वर्गातील रघूही पूर्णपणे मोबाईलच्या आहारी गेलेला मुलगा. त्याचे मोबाईल प्रेम एवढे ऊतू जाते की घरी असला म्हणजे त्याच्या हातात सतत मोबाईल असतो. जेवण करताना, पाणी पिताना त्याला मोबाईल तर हवाच असे परंतु हे सारे आई त्याला बसल्या जागी आणून देत असे. हुशार असणारा रघू काही दिवसातच अभ्यास आणि वर्गातील क्रमवारी यात मागे पडतो. शाळेतील वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने ‘मोबाईल शाप की वरदान’ या विषयावर होणार असलेल्या वादविवाद स्पर्धेत रघू भाग घ्यायचे ठरवितो. मोबाईल आवडता असल्यामुळे तो ‘वरदान’ या बाजूने बोलायचे ठरवतो. परंतु अचानक त्याचे मत परिवर्तन होते. तो स्पर्धेत भाग घेतो का? घेतल्यास शाप की वरदान यापैकी कुठल्या बाजूने बोलतो? या प्रश्नांची उत्तरे आपणास भयवाळ यांच्या कथेत वाचायला मिळतील. मोबाईलच्या होणाऱ्या अतिरिक्त वापरावर चपखल भाष्य करणारी कथा बालकांसोबत पालकांच्याही डोळ्यात झणझणीत अंजन घालते.

कष्टकरी आई आणि तिचा मुलगा या नातेसंबंधावर प्रकाश टाकणारी ‘बक्षीस’ ही कथा म्हणजे संस्काराची बीजं खोलवर रुजलेल्या एका प्रामाणिक, ध्येयवादी, कष्टाळू मुलाची कथा आहे. परिस्थिती कशीही निर्माण झाली तरी तत्त्व सोडायचे नाही अशी शिकवण देणाऱ्या या कथेचा नायक सुरेश बालकांसाठी आदर्श असाच लेखकाने भक्कमपणे उभा केला आहे. एकीकडे आजारी आई आणि दुसरीकडे ‘आई’ या विषयावर निबंध लिहायचा अशा विचित्र अवस्थेत सापडलेला कथानायक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवितो. सुरेश हे कसे साध्य करतो ते उद्धव भयवाळ यांनी अत्यंत सोप्या, रसाळ भाषेत मांडले आहे.

‘फुगेवाला मुलगा’ ही कथाही श्रम मूल्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. एकीकडे कारमधून फिरणारी मुले तर दुसरीकडे आणि याच मुलांना खारमुरे, खेळणी आणि फुगे विकणारी मुले असा हा पूर्वापार चालत आलेला भेदभाव आपण अजून किती दिवस जोपासणार आहोत अशा या कायम अनुत्तरीत प्रश्नाला पुन्हा ठळकपणे समाजापुढे आणण्याचे काम भयवाळ यांच्या लेखणीने जोरकसपणे केले आहे. आईवडिलांच्या काबाडकष्टाची जाणीव मुलांना करुन देणारी ही कथा संस्कारक्षम अशी आहे.

‘सुशयचा बूट’ ही कथाही अशीच डोळे पाणवणारी आहे. हट्टी सुयश हा नायक आणि त्याचे ह्रदयपरिवर्तन या दोन्ही बाबी भयवाळ यांनी अत्यंत सकारात्मकेने लिहिल्या आहेत. हट्टी बालके ही घरोघर असतात त्याचप्रमाणे हट्टी असणारा सुयश स्वतःचा हट्ट बाजूला ठेवून आईच्या मदतीला कसा धावून जातो हे लेखक भयवाळ यांनी नेमकेपणाने मांडले आहे.

शाळा म्हटली की, हुशार, चतुर, खोडकर अशी मुले असतातच. शेखर नावाचा मुलगाही असाच व्रात्य! दांडगाई करण्यात पटाईत असणाऱ्या शेखरची मजल चक्क गुरुजींना दगड फेकून मारण्यापर्यंत जाते. परंतु त्या गडबडीत पळताना त्याचा स्वतःचा अपघात होऊन तो जखमी होतो. अशावेळी त्याच्या मदतीला कोण धावून येते? जखमी झालेले गुरुजी शेखरला शिक्षा करतात की मदत ह्या औत्सुक्याचे निराकरण ‘शेखरची गोष्ट’ या कथेत निश्चितच होईल.

कथासंग्रह हातात घेतला की एक औत्सुक्य असते ते म्हणजे संग्रहाचे शीर्षक झालेली कथा कशी असेल? दशकानुदशके आबालवृद्धांना ‘जादू’ ची अत्यंत आवड आहे. मग ती कुणी सांगितलेली गोष्ट असो, कुठे छापून आलेली कथा असो सारेच जादूकडे आकर्षित होतात. बालकथा लिहिणारे बहुतांश लेखक आपल्या ‘जादूमयी’ लेखणीतून बालकांचे मनोरंजन करीत असतात. उद्धव भयवाळ ही या जादूकडे आकर्षित झाले नसते तर नवल वाटले असते. त्यांच्या लेखणीतून उतरलेली ‘जादूचा आरसा’ ही कथाही बालकांना नक्कीच आवडेल असा विश्वास आहे. शीला नावाची बालनायिका तिला परीकडून मिळालेल्या आरशाच्या मदतीने सतत त्रास देणाऱ्या प्रत्यक्ष जन्मदात्यालाही कसा धडा शिकविते. मनाला भिडणारी ही कथा पालकांनाही बोधप्रद ठरु शकेल अशीच आहे.

‘ओजसचा वाढदिवस’ ही कथा एका वेगळ्या धाटणीची आहे. मुलाचा वाढदिवस सारेच पालक आपापल्या परीने साजरा करतात परंतु तरीही अनेक कुटुंबात अशी परिस्थिती असते की, इच्छा असूनही अनेकांना आपल्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करता येत नाही. ओजस आणि मदन हे दोघे मित्र! ओजसच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली आणि त्या उलट मदनची असते. योगायोगाने दोन्ही मित्रांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. अशावेळी ओजस काय करतो? मदनचा वाढदिवस कोण आणि कुठे साजरा होतो हे सारे भयवाळ यांनी अत्यंत उत्कृष्टपणे मांडले आहे.



‘ससा रे ससा दिसतो कसा
कापूस पिंजून ठेवलाय जसा’ हे लोकप्रिय गीत ऐकताना काही पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. बोलगोपालांचे हे गीत आवडते तर आहेच पण ससा हा प्राणीही अत्यंत आवडता, लाडका असा आहे. बच्चे कंपनीचा हा भाव लक्षात घेऊन लेखक भयवाळ यांनी ‘एका सशाची गोष्ट’ ही कथा वेगळा बाज आणि विषय घेऊन लिहिलेली आहे. हा ससाही बालकांचे भरपूर मनोरंजन करील यात शंका नाही.

‘आदित्य आणि लालू’ ही या कथासंग्रहात असलेली संस्कारक्षम अशी कथा आहे. नायक आदित्य एक सुंदर, छोटीशी फुलझाडे जोपासतो. दररोज त्या फुलझाडांचे निरीक्षण करणे हा त्याचा छंद होऊन बसतो. एकेदिवशी त्याला दिसते की एका फुलावर एक फुलपाखरू येऊन बसले आहे. ते पाहून आदित्यच्या मनात एक भीती घर करते की, हे पाखरु या फुलाला त्रास देत आहे, त्याला कदाचित जखमी करीत आहे म्हणून तो एक उपाय करतो. कोणता असावा बरे, हा उपाय? त्यामुळे खरेच फुलपाखरु येण्याचे बंद होते का? फुलपाखरू काय करते? फूल काय म्हणते? हा सारा भाग अत्यंत वाचनीय तर झालाच आहे परंतु बालकांना एक आगळीवेगळी शिकवण देण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत.

अनेक वर्षांपूर्वी हिंदी विषयाच्या अभ्यासक्रमात ‘दादाजी की ऐनक’ हा धडा समाविष्ट होता. या कथेची आठवण करुन देणारी ‘आजोबांचा मोबाईल’ ही कथा या कथासंग्रहात वाचायला मिळते. आज मोबाईलच्या जगात सारे जण त्याच्यासाठी वेडे झालेले आहेत. अगदी आजोबा-आजीही सर्रासपणे मोबाइलचा वापर करतात. त्या कथेत आजोबांचा चष्मा हा त्यांच्या कपाळावर असतो तर भयवाळ यांच्या कथेतील आजोबांचा मोबाईल असाच कुठेतरी दडून बसलेला आहे. खूप शोधाशोध केल्यानंतर त्यांची नात प्रज्ञा हिला तिच्या आजोबांचा मोबाईल कसा आणि कुठे सापडतो हे वर्णन भयवाळ यांनी उत्तम रीतीने लिहिले आहे.

दसरा आणि दिवाळी हे सर्वांचेच त्यातही बालगोपाळांचे आवडते सण! नवीन कपडे, आवडत्या पदार्थांची चंगळ आणि सोबत नयनरम्य फटाक्यांची आतशबाजी! ‘अनोखी दिवाळी’ या कथेतील ऋचा आणि मयंक हे दोघे बहीणभाऊ शाळेच्या नियोजनानुसार एका वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात. ही कथा वाचताना ‘छोटेसे बहीण भाऊ, आनंद देऊ नि घेऊ’ अशी वाचकांची अवस्था होते. एक परोपकाराचा आणि आपल्या आनंदात इतरांना समाविष्ट करुन घेण्याऱ्या संदेशाची पखरण करण्यात लेखकाचा हातखंडा असल्याचे याच नव्हे तर अनेक कथांमधून जाणवते. तसेच हे केवळ कथांचे वैशिष्ट्य नसून लेखक भयवाळ यांचा स्थायीभाव असल्याचे जाणवते.

‘अनिकेतचा निश्चय’ या कथेत आदित्य आणि अनिकेत हे दोघे जीवाभावाचे मित्र असतात. परंतु दोघांचे स्वभाव विशेष परस्परविरोधी असतात. आदित्य हा अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी असतो. अनिकेत मात्र त्याच्या विरुद्ध असतो. त्याला अभ्यासाचा कायम कंटाळा असतो. त्यामुळे त्याची आई त्याला सतत आदित्यचे उदाहरण देत रागावत असते. आईकडून सतत आदित्यची स्तुती ऐकणारा अनिकेत एक अविचारी पाऊल उचलतो. त्याची परिणती काय होते? अनिकेत कोणता निश्चय करतो हे वाचणे जसे मनोरंजनात्मक आहे तसेच त्यात दडलेला एक फार मोठा संदेश अनुकरण करता येण्यासारखा आहे.

एकंदरीत ‘जादूचा आरसा’ हा संग्रह मनोरंजनाचा वसा घेऊन येत असला तरीही त्यात संस्कार आहेत, उद्बोधन आहे, शिकवण आहे. लेखक उद्धव भयवाळ यांच्या नाविन्याचा वसा घेतलेल्या लेखणीतून लिहिलेल्या कथा ह्या बालकांना नक्कीच आवडतील यात शंकाच नाही. भयवाळ यांनी हा कथासंग्रह त्यांच्या नातवांना अर्पण केला आहे. त्यामुळे ते नातवंडांच्या अर्थात बालकांच्या छोट्या विश्वात पूर्णतः मग्न झालेले असून याच मग्नावस्थेत असताना त्यांना सापडलेली बीजं त्यांनी उत्कृष्ट जोपासून त्याचे गोष्टीरुप पिकं बाल वाचकांना भरघोस प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. भयवाळ यांच्याजवळ असलेली अनुभवाची शिदोरी ते एखाद्या कादंबरीच्या स्वरुपात बालकांना निश्चितच भेट देतील.

जादूचा आरसा : बालकथासंग्रह.
लेखक : उद्धव भयवाळ
प्रकाशक : शॉपिज़न. इन
पृष्ठसंख्या : ५६
किंमत : ₹ १५३/-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading