ग्लोबल कल्चरच्याही पुढे जाऊन टीव्ही चॅनेल्सची बिझिनेस वाढीची रेस म्हणजे तरुण नव्हे तर कुमार पिढीपासून ते म्हाताऱ्यांना चळ लावण्यापर्यंतची कुसंगत देत आहे. अर्थात काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. टीव्ही तुम्हाला बांधून ठेवत नाही. रिमोट तर आपल्याच हातात ना.
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
ओढाळाच्या संगे सात्विक नासली। क्षण एक नाडली समागमे ।।१।।
डांकाचे संगती सोने हीन जाले। मोल ते तुटले लक्ष कोडी ।।२।।
विधाने पक्वाने गोड कडू जाली। कुसंगाने केली तैसी परी ।।३।।
भावे तुका म्हणजे सत्संग हा बरा। कुसंग हा फेरा चौऱ्यांशीचा ।।४।। संत तुकाराम गाथा (२५४१)
तुकाराम हे वारकरी संप्रदायातील एक स्वतंत्र बाण्याचे सुधारक संत होत हे त्यांच्या वाङ्मयातून वारंवार दिसून येते. चांगले काय आणि वाईट काय हे आपणच समजून घ्यावे. आपण ज्यांची संगत करायची त्यांना पूर्ण निरखून घ्यावे, त्यांचे गुण पारखावे. ‘तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा.’ समाजात अनेक विचार-आचार, वृत्ती-प्रवृत्ती, उक्ती-कृतीचे लोक असतात. म्हणून माणसांची पारख करण्याची गरज तुकाराम वर्तवितात. अगोदर स्वप्रामाण्याची ओळख करून घ्यावी. मंगल-अमंगल, चांगले-वाईट, इष्ट-अनिष्ट, योग्य- अयोग्य, सदाचार-दुराचार यातील फरक व परिणामांची जाणीव करून घेण्याची आवश्यकता आहे. मगच कोणाची संगत करायची याचा निर्णय घेणे सोपे होते.
आपण अगदी प्रामाणिक, सदाचारी, सात्विक वर्तनाचे असलो तरी समाजात अवती भवती असणाऱ्या लोकांमध्ये अप्रामाणिक, असत्य व असहिष्णू मंडळी असतात. अशा मंडळींचा सहवास व संगत केल्यास त्या दुर्गुणांची लागण होऊ शकते, असे तुकारामांनी जाणवून दिले. कारण मनुष्य स्वभाव अनुकरणप्रिय आणि मन चंचल असल्याने तशी शक्यता नाकारता येत नाही. हा भावार्थ तुकारामांनी अभंगात मांडला आहे. तो मांडताना दिलेल्या उपमा म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता, व्यावहारिक शहाणपण, शब्दसंचय व उपमांचा अचूकता याचीच प्रचिती होय. जो हिरा घणाच्या घावाने फुटत नाही, त्यास ढेकणाचे रक्त लागले असता तो साहजिक फुटतो. त्याप्रमाणे वाईट संगतीने सज्जन माणूस काय पण साधूसुद्धा फसला जातो. चांगली गुणी गाय जर ओढाळाच्या संगतीने एक रात्र बाहेर गेली, गोठ्यात नाही आली तर मालक तिला लोढणे बांधतो. ही त्या गाईच्या चुकारपण करण्याच्या संगतीमुळे वेळ येते.
एखाद्या अनैतिक वर्तन करणाऱ्या स्त्रीच्या संगतीत सात्विक बाई देखील आचार भ्रष्ट होते. असंगामुळे, अनिष्ट समागमामुळे बुद्धी भ्रष्ट होते. डाग लावल्याने सोन्याचा कस कमी होतो. चोख सोन्याची किंमत कमी करण्यास डाग हाच कारणीभूत ठरतो. तोच तर कुसंगतीचा परिणाम होय. अशा सोन्याची असो वा माणसाची किंमत सुद्धा कमी होते. गोड असलेले पक्वान्न विषाच्या संगतीने कडू होते. तसाच प्रकार वाईटाच्या संगतीने चांगल्या लोकांचा होतो. कारण गोड पक्वान्न, मग बासुंदी वा श्रीखंड, दूध असो वा साखरभात त्यामध्ये विष पडले तर काय होणार?
अशा उपमांच्या सहाय्याने सामान्य माणसांनी दुर्जनांच्या दुष्ट वृत्तीच्या संगतीत राहू नये असे आपले मत सांगून जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याकाळचा समाज हा अडाणी, भोळा भाबडा, धर्म व अध्यात्माच्या वेडगळ कल्पना उराशी बाळगून राहिलेला. त्यामुळे तुकाराम त्यांच्याच भाषेत कुसंगतीचा परिणाम कथन करण्याचे कौशल्यपूर्ण औचित्य दाखवितात. अशा त्याकाळच्या समाजात संगत कोणाची असावी याबद्दलची दिलेली ही मते निर्विवाद निरंतर मूल्य सांगणारी आहेत याबद्दल दुमत नाही. दुर्जनाच्या संगतीने चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या फेन्यात पडावे लागेल. त्यापेक्षा खरा भक्तिभाव व श्रद्धेने संताची संगत धरावी हाच मार्ग उत्तम आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.
तुकारामांचा हा अभंग म्हणजे सर्वच जाती, धर्म, पंथ, वर्ण, भाषा, लिंग, वंश यांना लागू पडणारा आहे. कारण कुसंगत ही भल्याभल्यांना बिघडवणारी ठरत असल्याची उदाहरणे सार्वत्रिक आणि आजच्या काळात अधिक प्रमाणात दिसत आहेत. व्यसनी माणसाच्या संगतीने व्यसनाधीनता वाढत आहे. रेव्ह पार्टीचे आणि ३१ डिसेंबर पार्ट्यामध्ये काय घडत आहे ? पब, क्लब, पार्टी यामध्ये ड्रिंक, ड्रग यांचा तर धुमाकूळ आहेच, पण विवाहबाह्य संबंध, अविवाहित तरुणांना सेक्सची चटक, कॉलगर्ल्स बार वगैरेंचे वाढते प्रमाण हे कुसंगतीतून फैलावत आहे.
विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता व कौमार्यभंग, व्हायोलन्स, बेताल वर्तन, अगदी चोरी करण्यापासून ते घरातून पळून जाण्यापर्यंतचे प्रकार तेही चांगल्या कुटुंबांमधून घडत आहे. कारण उनाड व वाया गेलेले मित्र व मैत्रिणी, बिघडलेले नातेवाईक, व्यसनी व अनैतिक वर्तनाचे काही पालक हे जबाबदार आहेत. अर्थात अशांची संगत सोडणार तरी कशी? मनाचा निर्धार हवा की संगतीत राहूनही अवगुण न घेण्याचा.
हल्ली तर टीव्ही व चित्रपट यांच्यामधून सेक्स व व्हायोलन्सचा नंगानाच दाखविला जातो. जेवढे म्हणून मानवी संबंधातील तिडे, डावपेच, मत्सर, द्वेष, नात्यातील अनीती दाखविता येईल तेवढी दाखविली जात आहे. ग्लोबल कल्चरच्याही पुढे जाऊन टीव्ही चॅनेल्सची बिझिनेस वाढीची रेस म्हणजे तरुण नव्हे तर कुमार पिढीपासून ते म्हाताऱ्यांना चळ लावण्यापर्यंतची कुसंगत देत आहे. अर्थात काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. टीव्ही तुम्हाला बांधून ठेवत नाही. रिमोट तर आपल्याच हातात ना.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.