मुंबई कॉलिंग –
जो देश वर्षानुवर्षे सातत्याने भारतावर दहशतवादी हल्ले घडवून आणतो. दहशतवाद्यांना प्रशिक्षण , पैसा व शस्त्रे देऊन भारतात रक्तपात घडवतो, जो देश भारतात अशांतता व अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी सदैव प्रयत्न करतो मग त्या देशाच्या संघाबरोबर क्रिकेट खेळायचा हट्ट कसाशाठी ? कोणासाठी ? आशिया चषक जिंकला भारताने, पाकिस्तानचा पराभव केला भारताने आणि ट्रॉफी घेऊन गेला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष मोहसिन नकवी… हे कसे चालेल ? त्यामुळे कटुता वाढली आहे. क्रिकेटचा सामना संपला तरी युध्दभावना कायम आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
ज्येष्ठ संपादक, मोबाईल ९५९४२२४०००
दुबई येथे झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पाच विकेटसनी पराभव करून नवव्यांदा आशिया चषक जिंकला. आशिया चषकाच्या सामन्यात सलग तीन वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव करून एक विक्रम निर्माण केला. मात्र आशियायी क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्याने भारताने जिंकलेली ट्रॉफी व भारतीय खेळाडूंना मिळालेली पदके घेऊन नकवी निघून गेले. नकवी हे पाकिस्तानचे मंत्री आहेत आणि पाकिस्तानी क्रिकेट कंट्रोल बोर्डाचेही अध्यक्ष आहेत. ट्रॉफी लेके भाग गया वो… अशीच चर्चा जास्त झाली.
भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव करून मुंबईत परतला तेव्हा खेळाडूंच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या हालचालीत देशाभिमान दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला भारतीय संघाचे अभिनंदन करणारा संदेश जगभर व्हायरल झाला. मोदींनी केलेले ट्वीट त्याच दिवशी एक कोटी दहा लाख वेळा रिपोस्ट केले गेले. दोन कोटी ८० लाख वेळा तरी पाहिले गेले. किमान ३५ हजार जणांनी मोदींच्या पोस्टवर तत्काळ प्रतिक्रीया नोंदवली. साडे चार कोटी लोकांनी पोस्टला लाईक केले. नंतरही ही संख्या वाढतच राहिली. भारतीय संघाने मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर मोदींनी एक्स वर म्हटले – खेळाच्या मैदानावरही ऑपरेशन सिंदूर. परिणाम तोच.
भारताचा विजय…. काश्मीरमधील पहलगाम येथे २६ भारतीय पर्यटकांची पाच महिन्यापूर्वीच दहशतवाद्यांनी पॉईंट ब्लँक हत्या केली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवून पाकिस्तानमधे घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले व नऊ हवाई तळांवरही क्षेपणास्त्रे टाकून त्यांचे मोठे नुकसान केले. पंतप्रधानांच्या ट्वीटवर भारतीय संघाचा कप्तान सूर्यकुमार यादवने म्हटले आहे – जब देश का नेता खुद फ्रंटफूट पर बल्लेबाजी करता हैं, तो अच्छा लगता है, उनका पोस्ट देखकर ऐसा लगा जैसे उन्होंने स्ट्राइक ली और ताबडतोब रन बना डाले. जब वो सामने से नेतृत्व कर रहे हो, तो निश्चित रूप से खिलाडी खुलकर खेलेंगे… सूर्यकुमार हा मुंबईकर आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकीया यांनी म्हटले, आमच्या देशाशी युध्द पुकारणाऱ्या व्यक्तिकडून आम्ही चषक स्वीकारणार नाही. याचा अर्थ भारताला मिळालेला चषक व भारतीय खेळाडूंना मिळालेली पदके नकवी यांना बरोबर घेऊन जाण्याचा अधिकार नाही.
नकवी यांच्या हस्ते चषक स्वीकारायचा नाही हा निर्णय भारतीय संघानेच एकमताने मैदानावरच घेतला होता, भारत सरकार किंवा बीसीसीआयने तशी कोणतीही सुचना आम्हाला केली नव्हती असे सूर्यकुमार यादव याने स्पष्ट केले.
आशिया क्रिकेट चषक जिंकल्यावर जो अभिमान, जल्लोष, आनंद, विजयोत्सव भारतात दिसायला हवा होता तो यंदा दिसलाच नाही. पाकिस्तानला धडा शिकवला, पाकिस्तानला अद्दल घडविली, पाकिस्तानचा बदला घेतला अशी भावना भारतीय खेळाडूंमधे आणि भारतातील क्रिकेटप्रेमींमधे दिसून आली. खरं तर भारताने पाकिस्तानचा सलग तीन वेळा पराभव करून इतिहास निर्माण केला. पण चषक जिंकल्यानंतर आनंद व सन्मानाऐवजी राजकीय प्रतिक्रियांना महत्व आलेले दिसले. पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याची गरज होती का इथपासून केवळ पैशापुढे बीसीसीआयला देशभक्तिचा विसर पडला इथपर्यंत मोदी सरकारला विरोधकांनी जाब विचारला. क्रिकेट हा ब्रिटीशांचा खेळ आहे. जगातील दहा बारा देशात हा खेळ खेळला जातो पण वन डे किंवा टी २० अशा सामन्यांमुळे क्रिकेटचे पूर्ण बाजारीकरण झाले आहे. अशा सामन्यांसाठी खेळाडूंचे लिलाव होतात आणि मालिका व सामन्यांवर अब्जोविधीची उलाढाल होत असते. जाहिरातदार, मार्केटींग, पर्यंटन व इव्हेंटवाल्या कंपन्याना भारत पाकिस्तान सामना पाहिजे असतो. त्यांना दोन देशातील राजनैतिक संबंध काय आहे, पाकिस्तानप्रेरीत दहशतवाद कसा चालू आहे, पहलगामधे २६ भारतीय पर्यंटकांना त्यांची नावे विचारून पॉइन्ट ब्लँक गोळ्या घालून त्यांची हत्या कशी झाली याच्याशी त्यांना काही देणे घेणे नसते. दोन देशातील सर्व व्यापार- व्यवहार बंद आहेत.
भारताने पाकिस्तानला वाहून जाणारे सतलज नदीचे पाणी रोखले आहे याच्याशी भारत पाकिस्तान सामन्यावर पैसे कमविणाऱ्यांच्या मनात काहीही महत्व नसते. पाकिस्तान प्रशिक्षित व प्रेरीत दहशतवादी निरापराध भारतीय लोकांच्या हत्या करतात किंवा भारतीय सै्न्यातील जवान असा हल्ल्यात दरवर्षी बळी पडतात, काश्मीरमधे रक्ताचा सडा सांडतात याचे सामना आयोजकांना काहीही पडलेले नसते. वन डे व टी २० मधून खेळाडूंना, संघाला व त्या त्या देशांच्या क्रिकेट बोर्डाला किती कोटीकोटी लाभ होतो, याच्या आकडेवारीतच त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. क्रिकेट हा जंटलमन गेम आहे याचा भारत पाकिस्तान खेळाच्या वेळी खेळाडूंना आणि दोन्ही देशातील सर्वसामान्य लोकांना विसर पडलेला असतो. एकमेकांच्या छाताडावर बसून खेळायचे अशी भावना दोन्ही संघात निर्माण होणार असेल तर क्रिकेट खेळाचे भान दोन्ही बाजुंना नाही असेच म्हणावे लागेल. खेळ म्हणून नव्हे तर भारत पाकिस्तान सामना म्हणजे युध्दभावना असेल तर त्यात खेळाचे वातावरण कधीच राहणार नाही. दोन अण्वस्त्रधारी देश एकमेकांशी मैदानावर क्रिकेट खेळायला उतरतात, तेव्हा खेळाची भावना नव्हे तर नेहमीच युध्दज्वर निर्माण होतो, यात आता आश्चर्य वाटेनासे झाले आहे.
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना नेहमीच दोन्ही देशांत वादळी ठरला आहे. क्रिकेटचे मैदान म्हणजे रणभूमि आहे असे समजून दोन्ही देशांचे खेळाडू खेळतात आणि दोन्ही देशातील जनता त्याच भावनेने अगदी मुठी आवळून या सामन्याकडे बघत असते. दुसऱ्या संघातील खेळाडू अपमानीत कसे होतील हे दोन्ही देशातील जनता पहात असते. स्टेडियममधील प्रेक्षकही तसेच वागत असतात. आता तर मैदानावर सामना खेळताना खेळाडूही तसेच वागू लागले आहेत . क्रिकेट खेळाची शान, मान, प्रतिष्ठा व गुणवत्ता त्यात लोपून जाते आणि बदला घेण्याची भावना प्रत्येक चेंडूवर व फटक्यावर बळावत जाते. प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार किंवा विकेट यात खेळाचा निर्भेळ आनंद कधीच लोप पावला आहे तर दोन्ही देश एकमेकांशी युध्दभूमीवर हल्ले आणि प्रतिहल्ले करीत आहेत असे वातावरण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यातून निर्माण झालेले दिसते. दोन्ही देशात गरीबी आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे. भ्रष्टाचाराने दोन्ही देशात कळस गाठलाआहे. पण हे सारे विसरून क्रिकेटप्रेमी व सामान्य जनता भारत पाकिस्तान सामन्याकडे युध्द म्हणून पाहात असते. भारत पाकिस्तान सामन्यामुळे दोन्ही देशात शत्रुत्वाची भावना वाढते. एकमेकांविषयी व्देष मत्सर भावना चेतवली जाते.
भारत – पाकिस्तानमधील सैन्यातील युध्द असो की क्रिकटे सामने असोत, दोन्ही देशातील मूळ प्रश्न बाजुला पडतात आणि देशभक्तिच्या नावाखाली दोन्ही देशात शत्रुत्वाची भावना अधिक दृढ होते. ऑपरेशन सिंदूर नंतर भारत – पाकिस्तान दरम्यान कटुता आणखी वाढली आहे. दुबईतील आशिया किक्रेट चषक सामन्याने त्यात आणखी भर घातली आहे. अर्थात दोन्ही देशातील राज्यकर्त्यांना जे पाहिजे तेच घडले आहे, त्यामुळे त्या त्या देशातील दैनंदिन भेडसविणाऱ्या समस्यांकडे काही काळ तरी जनतेचे लक्ष दुसरीकडे भरकटले जात आहे.
ऑपरेशन सिंदूर पासून भारत पाकिस्तान या देशातील अब्जावधी रूपयांचा व्यापार व व्यवहार थंडवला आहे. दुबईतील सामन्यानंतर तो नजिकच्या काळात सुरूळीत होण्याची शक्यता नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. क्रिकेट आणि चित्रपट या दोन घटकांकडे जात, पात, धर्म , भाषा, समाज या पलिकडे जाऊन लोकांमधे एकी घडविण्याची ताकद आहे. क्रिकेट व चित्रपट हे दोन मुद्दे शत्रुंनाही एकत्र आणू शकतात. पण हे दोन्ही घटक भारत पाकिस्तान या दोन देशांमधे संबंध सुरळीत ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानातील मिडियातून भारतीय खेळाडू हे जणू राक्षस आहेत असे चित्र रंगवले जाते तर भारतीय मिडियातून पाकिस्तानी खेळाडू हे खलनायक हे अशी टीका केली जाते.
अर्थात पाकिस्तानी खेळाडूंचा अतिरेक त्याला जास्त कारणीभूत आहे. त्यामुळे क्रिकेट हा या दोन देशात खेळ म्हणून खेळला जात नाही तर एकमेकांवर सूड उगविण्याचे साधन म्हणून त्याचा वापर होतो असे म्हणावे लागेल. असेच कायम होणार असेल तर पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळावे तरी कशाला ? इंग्लड, ऑस्ट्रेलिया, बांगला देश, दक्षिण ऑफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, आदी देशांबरोबर क्रिकेटचे सामने होतात तेव्हा दोन्ही बाजुचे खेळाडू जिद्दीने खेळतात, अनेक खेळाडू नवे नवे विक्रम निर्माण करतात, पण भारत पाकिस्तान सामन्यात उत्तम खेळण्यापेक्षा दुसऱ्याला कशी अद्दल घडवता येईल, दुसऱ्याचा कसा पाणउतारा केला जाईल याकडेच अधिक लक्ष असते. क्रिकेटचा खेळ खरे तर दोन देशांना जोडणारा पूल किंवा सेतू असतो पण भारत पाकिस्तान दरम्यान क्रिकेटच्या नावाखाली एक मोठा अ़डसर किंवा भिंत उभारली गेली आहे. क्रिकेटच्या खेळातून दोन्ही देशातील संबंध सुधारण्याची मुळीच शक्यता दिसत नाही. कदाचित राज्यकर्त्यांचीही तीच इच्छा असावी.
मोहसिन नकवी हे दिड वर्षापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. नकवी हे कॉर्पोरेट व्यक्तिमत्व आहे. सीएनएनमधे ते निर्माते होते. नंतर सिटी मिडिया ग्रुपची स्थापना केली व पाकिस्तानात सहा वृत्तवाहिन्या व एक वृत्तपत्र त्यांनी सुरू केले.आशियायी क्रिकेट परिषदेकडून दर दोन वर्षांनी चषक स्पर्धा आयोजित केली जाते. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला परिषदेच्या अध्यक्षांकडून चषक दिला जातो. भारत- पाकिस्तान अगोदरच्या सामन्यात पाकच्या एका फलंदाजाने अर्धशतक झाल्यावर बंदूक सेलेब्रेशन केले होते. पाकच्या एका गोलंदाजाने मैदानावर आक्षेपार्ह हातवारे केले होते. दुबईत अंतिम सामना होण्यापूर्वीच नकवी यांनी पाकिस्तानी संघाचा फोटो त्यांच्या एक्स अकौन्टवरून शेअर केला होता. त्यात पाकिस्तानी खेळाडूंना फायटर जेटच्या समोर फ्लाइट सूटमधे दाखवले होते. चिथावणीखोर पोस्टना नकवी समर्थन देत आहेत हेच त्यातून दिसून आले.
मालिका जिंकल्यावर कप्तान सूर्यकुमारने पाकिस्तानी कप्तानाशी हस्तांलोदन केले नाही आणि पाकिस्तानी मंत्र्याकडून चषकही स्वीकारला नाही. आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत दुबईच्या मैदानावर भारताने आपले वर्चस्व सिध्द केले याबद्दल मुंबईकर असलेल्या सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे मन:पूर्वक अभिनंदन. टीम इंडियामधे मुंबईकर आहेत पण मराठी भाषिक मावळा कोणी नाही याची मात्र खंत अनेकांच्या मनात आहे. जो देश वर्षानुवर्षे सातत्याने भारतावर दहशतवादी हल्ले घडवून आणतो. दहशतवाद्यांना प्रशिक्षण , पैसा व शस्त्रे देऊन भारतात रक्तपात घडवतो, जो देश भारतात अशांतता व अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी सदैव प्रयत्न करतो मग त्या देशाच्या संघाबरोबर क्रिकेट खेळायचा हट्ट कसाशाठी ? कोणासाठी ? आशिया चषक जिंकला भारताने, पाकिस्तानचा पराभव केला भारताने आणि ट्रॉफी घेऊन गेला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष मोहसिन नकवी… हे कसे चालेल ? त्यामुळे कटुता वाढली आहे. क्रिकेटचा सामना संपला तरी युध्दभावना कायम आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
