सुपर केन नर्सरीची नेमकी शास्त्रीय पद्धत कशी आहे, हे करताना कोणत्या चुका घडू शकतात आणि त्या कशा टाळायच्या याची माहिती देणारी ही पुस्तिका आहे.
डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नि, ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ
नरसोबावाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
२००७ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून कडधान्य संशोधन प्रकल्पाच्या प्रमुख शास्त्रज्ञ या पदावरून सेवानिवृत्त झालो. दिग्विजय, विराट, कृपा, राजस, हे हरभऱ्याचे वाण आणि विपुला तूर यांच्या निर्मितीचे समाधान पदरी बांधून नृसिंहवाडी या माझ्या जन्मगावी राहण्यासाठी आलो. आणि स्वतःच्या शेतीत लक्ष घातले. कृष्णाकाठच्या या परिसरात ऊस हेच मुख्य पीक. चांगली कार्यक्षमता असलेले उत्तमोत्तम साखर कारखाने इकडे आहेत. उसाचे सरासरी उत्पादन एकरी ४० ते ४५ टन एवढेच होते. वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ म्हणून स्वतःच्या शेतातच प्रयोग सुरू केले. दोन महत्त्वाची टेक्निक हाती आली. एक म्हणजे “सुपर केन नर्सरी टेक्निक”, आणि दुसरे विक्रमी ऊस उत्पादन देणारे” ऊस संजीवनी” !
हे प्रयोग साकारताना मित्रवर्य प्राध्यापक अरुण मराठे यांच्याशी सतत सल्लामसलत होत असे. शिरोळच्या श्री दत्त सहकारी साखर कारखाना येथे ते ऊस उत्पादन मोहिमेसाठी सल्लागार म्हणून येत असत. सुपर केन नर्सरीची कृती प्रणाली अगदी सोपी. बेणे कांड्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायच्या. या पाण्यात कीटकनाशक आणि बुरशीनाशक घातले तर बेण्यावरील किडी, रोग नष्ट होतात. एक हजार लिटर पाण्यासाठी तीन किलो भाजलेल्या चुन्याची निवळी करून द्रावण त्याच पाण्यात घातले तर कोंभ रुजण्याची क्रिया वेगाने घडते. एक एकर एवढे क्षेत्र डोळ्यांपुढे ठेवून त्यासाठी रोप करण्याची प्रणाली विकसित केली. यासाठी सहा फूट रुंद आणि दहा फूट लांब, दोन फूट खोल एवढा खड्डा (जलकुंड) शेतामध्ये तयार करायचा. यामध्ये आतून प्लास्टिकच्या कागदाचे अस्तर घालावयाचे म्हणजे पाण्याचा झिरपा होत नाही. त्यामध्ये पंधराशे लिटर पाणी भरायचे. या पाण्यात ७५० ग्रॅम कार्बेनडेन्झिम हे जंतुनाशक, ७५० मिली क्लोरोपायरीफॉस आणि तीन किलो भाजलेल्या चुन्याची निवळी मिसळायची.
अशा या पाण्यामध्ये उसाच्या एक डोळा टिपऱ्या रात्रभर (सुमारे १८ तास) बुडवून ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी शेतात तयार केलेल्या वाफ्यामध्ये हे बेणे डोळे वर ठेवून मांडायचे. हे वाफे तयार करण्यासाठी रासायनिक खताच्या जुन्या रिकाम्या गोण्या वापरायच्या. अशा गोण्या दोन्ही बाजूने उत्सवल्या तर सहा फुट लांब आणि तीन फूट रुंद एवढी पट्टी मिळते. एक एकरचे रोप करण्यासाठी अशा २५ ते ३० पट्ट्या लागतात. त्यांची मांडणी जलकुंडाजवळच करायची. या पट्ट्यावरती ज्या शेतात लागण करायची तिथल्याच थोडी बारीक केलेल्या मातीचा दोन इंच थर पसरायचा. रात्रभर भिजलेले उसाचे एक डोळा बेणे या बेडवर एकमेकाला चिकटून ठेवायचे आणि त्यावर अगदी हलका मातीचा थर द्यायचा. यावर पाचटाचा एक हलका थर द्यायचा. या बेडवर वारंवार शिंपण करून तो ओला राहील हे पाहायचे.
सहा सात दिवसात लाल कोवळे कोंभ बेडवर दिसू लागतात. वीस दिवसात कीड आणि रोगमुक्त जोमदार रोपे लागणीसाठी तयार होतात. आमच्या स्वतःच्या शेतीत लावण्यासाठी मी अशी रोपे करु लागलो. त्याला सुपर केन नर्सरी हे नाव दिले. श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव आणि माती संशोधक तज्ज्ञ ए. एस. पाटील हे आमच्या शेतीवर नर्सरी पाहण्यासाठी आले. त्यांना ही जोमदार रोपे फार आवडली. ही रोपे त्यांनी कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना दाखवली. त्यांनाही ती फार आवडली. रोपे करण्याची इतकी सोपी पद्धत शेतकऱ्यांच्या शेतावर पोचवण्याचे त्यांनी ठरवले. स्वतःच्या शेतीमध्ये त्यांनी अशी हजारो रोपे तयार केली. अनेक शेतकरी मेळावे आयोजित करून सुपर केन नर्सरी टेक्निकची अनेक प्रात्यक्षिकेही त्यांनी घेतली.
एकदा राहुरीचे माझे पत्रकार मित्र अनिल देशपांडे नृसिंहवाडीला आले होते. त्यांनी सुपर केन नर्सरी समजून घेतली आणि एक छोटेखानी लेख दिला. यातूनच पुढे सुपर केन नर्सरी पद्धतीने रोपे तयार करुन उसाची लागण करण्याची एक लोक चळवळ सुरु झाली. जुन्नर तालुक्यातील उत्तमराव जाधव यांनी सुपर केन नर्सरी फार्मर क्लब स्थापन केला .परिसरातील २०० गावांमध्ये स्वतः जाऊन प्रात्यक्षिके दाखवली. ग्रामपंचायतींच्या भिंतीवर सुपर केन नर्सरी करण्याची पद्धत रंगवली. यामध्ये ४५०० शेतकरी सहभागी झाले.
जुन्नर तालुक्यातील मुक्काम पोस्ट पारगाव मंगरूळ येथील कृषीतज्ञ विकास हरिभाऊ चव्हाण यांनीसुद्धा असाच सुपर केन नर्सरी क्लब स्थापन केला. त्याला डॉ . बाळकृष्ण जमदग्नी सुपर केन नर्सरी क्लब हे नाव दिले. अशा नर्सरीतील रोपांची लागवड करुन त्याच्या जोडीला ऊस संजीवनी या टेक्नॉलॉजीतील संजीवकांच्या चार फवारण्या घेऊन त्यांनी एकरी १२६ टन उत्पादन घेतले. या उसाचे खोडवेसुद्धा एकरी एकशे दहा टन निघाले. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, प्रधानमंत्री कौशल्य योजना, सहकारी साखर कारखाने, खत कारखाने यांच्या माध्यमातून सुपर केन नर्सरी अत्यंत लोकप्रिय झाली. विकास चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाने कृषी मित्र पुरस्कार देऊन गौरव केला. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यांनी त्यांना संचालक मंडळावर घेतले. शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत आणि अत्यंत प्रभावी असे तंत्रज्ञान मिळाले.
सातारा जिल्ह्यातील कृषि अधिकारी अंकुश सोनावळे यांनी तर कराड तालुक्यातील निसराळे या गावचा सुपर केन नर्सरीच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलला. सुपर केन नर्सरी गाव अशी या गावाची ख्याती झाली. या रोपांच्या जोडीला सेंद्रिय खते, जीवामृत, गांडूळ खत, हिरवळीचे खत, विद्राव्य खत, ठिबक सिंचन आणि ऊस संजीवनी फवारण्या असा एकात्मिक कार्यक्रम हाती घेऊन एकरी ५० टनावरून ८० ते १०० टन उत्पादन घेण्याचे विक्रम केले. सातारा जिल्ह्याच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी असलेल्या डॉ . भाग्यश्री फरांदे यांनी या उपक्रमाला मोठी बळकटी दिली. या जिल्ह्यामध्ये दहा हजार एकरावर सुपर केन नर्सरी पद्धतीने रोपे तयार करुन लागण करण्याची त्यांनी योजना आखली. एका शासकीय कार्यक्रमात या टेक्नॉलॉजीची उपयुक्तता त्यांनी समर्थपणे मांडली.
दरम्यानच्या काळात सुपर केन नर्सरी आणि ऊस संजीवनी या दोन्ही तंत्रांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे सलग तीन वर्ष ट्रायल झाल्या. त्यातील निरीक्षणांच्या आधारे प्रमाणिकरण होऊन शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी ही दोन्ही तंत्रे शिफारस करण्यात आली. पुण्यातील डी.एस.टी.ए. या संस्थेच्या २०१७ च्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये सुपर केन नर्सरी या विषयावरील एक संशोधन निबंध मी आणि माझे मित्र डॉ. सुरेश पवार (निवृत्त ऊस विशेषज्ञ, पाडेगाव) संयुक्तपणे लेखन करून सादर केला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकरयांना ही दोन्ही टेक्निक्स फार आवडली. ऊस उत्पादन क्रांती करण्यासाठी या तंत्रज्ञानामध्ये मोठे पोटेन्शिअल असल्याचे त्यांना जाणवले. त्या संशोधन निबंधाला प्रथम पुरस्कार मिळाला.
लखनऊ येथील राष्ट्रीय ऊस संशोधन केंद्राच्या संशोधन सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. या दोन्ही तंत्राचा देशभर प्रसार व्हावा, अशी शिफारस त्यांनी केली. कमी वेळात कमी खर्चात ऊसाची निरोगी जोमदार कणखर रोपे तयार करणारे सुपर केन नर्सरी तंत्र म्हणजे ऊस शेतकऱ्याला वरदानच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत सरकारच्या लखनऊमध्ये असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च या संस्थेमध्ये उसाच्या रोप लागणीसंबंधी एक महत्त्वाचा प्रयोग झाला आहे. उसाच्या को ९९७, कोए ७६०१ आणि कोए ७७०१ या तीन जातींमध्ये साखरेचे प्रमाण आणि साखरेचे हेक्टरी उत्पादन याचा अभ्यास करण्यासाठी एक डोळा कांडे, दोन डोळे कांडे, आणि रोपांची (रेयंगन) लागण यांचा अभ्यास करण्यात आला. रोपांची लागण केली असता उसातील साखरेचे प्रमाण वाढते आणि हेक्टरी साखरेचे उत्पादन वाढते, असा निष्कर्ष या प्रयोगातून निघाला. या अनुषंगाने सुपर केन नर्सरी रोपांची लागण ही साखर उद्योगाच्या दृष्टिनेसुद्धा अत्यंत फायदेशीर आहे, हे स्पष्ट होते.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी खर्चाचा देखील अभ्यास केला आणि प्रतिरोप एक रुपयापेक्षा कमी खर्च येतो, हे सिद्ध केले. या सर्व अनुभवातून शेतकऱ्यांच्या श्रद्धा या टेक्नॉलॉजीशी जोडल्या गेल्या, याचा मोठा आनंद वाटतो.
उसाचे उत्पादन हे तोडणीच्या वेळी प्रति एकरी ऊस संख्या किती आहे, यावरती अवलंबून असते. दोन डोळा कांडी किंवा तीन डोळ्यांचे टिपरे लावले तर वाढीच्या काळामध्ये भरपूर फुटवे निर्माण होतात. उसांची परस्परांशी अन्नद्रव्य, प्रकाश, पाणी आणि जमीन यासाठी मोठी स्पर्धा होते. परिणामी ऊस बारीक राहून मोठ्या संख्येने मरुन जातात. एकरी केवळ २५ ते ३० हजारच ऊस एवढेच शिल्लक राहतात. यामुळे उत्पादन फार कमी येते .सुपर केन नर्सरीतील रोपांची विवक्षित अशी एकरी सहा ते सात हजार संख्या लागण करता येते. त्यावर लागणीपासून ३० दिवसानंतर वीस-वीस दिवसाच्या अंतराने वाढीच्या वेगवेगळ्या भरणीपर्यंत ऊस संजीवनीच्या चार ते पाच फवारण्या घेतल्या तर तोडणीपर्यंत एकरी ४० हजार सशक्त ऊस जोपासता येतात. प्रत्येक उसाचे वजन अडीच ते तीन किलो राहू शकते आणि एकरी शंभर टन उत्पादन सहज शक्य होते.
कृषीरत्न डॉ. संजीव माने आणि त्यांचे सुपुत्र अजिंक्य माने यांचे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तिन्ही राज्यात ऊस उत्पादन वाढीच्या उपक्रमात फार मोठे योगदान आहे. एकरी शंभर टन सहज शक्य असे त्यांच्या व्याख्यानाचे बोधवाक्य असते. या एकूणच टेक्नॉलॉजीचा वापर करून उरण इस्लामपूरचे अशोकभाऊ खोत यांनी एकरी १६८ टन असा उत्पादन विक्रम केला आहे. कर्नाटकातील ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ रुद्रकुमार हल्पनावार यांनी सुपर केन नर्सरी आणि ऊस संजीवनी या दोन्ही तंत्रज्ञानाचा कानडी भाषेमध्ये पुस्तिका काढून प्रसाराचे मोठे काम केले आहे.
२०२४-२५ हा गाळप हंगाम ऊस उद्योगाला थोडा चिंतेचा गेला. एरवी सरासरी साडेचार महिने चालणारा गाळप हंगाम ८० दिवसांपेक्षा कमी कालावधीत संपुष्टात आला. साखरेचे उत्पादन घटले. कारणांचा शोध घेतला. बऱ्याच शेतकऱ्यांनी व्यवसायिक नर्सरीतून रोपे आणून लावली. काही व्यवसायिकांनी शुद्ध बेण्याऐवजी त्यांच्या छोट्या आकाराच्या पोर्ट्रेमध्ये बसतील अशा बेताने खोडवा, निडवा, बारीक उसाच्या कांड्या बेणे म्हणून वापरल्या. अशा बेण्यापासून निर्माण झालेल्या रोपांना जोम नसतो. अशा उसावरती रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी किडक्या, बारक्या आणि मरक्या उसांची संख्या वाढते. उत्पादन फार घटते.
याउलट सुपर केन नर्सरीची रोपे रसरशीत मोठ्या कांड्यापासून तयार केलेली असतात. किड व रोगमुक्त असतात. कणखर आणि जोमदार असतात. अशी रोपे लावली असता आरंभापासूनच पिकाला जोम येतो. ऊस संजीवनीच्या प्रत्येक घटकाला चांगला प्रतिसाद मिळतो आणि अपेक्षित विक्रमी उत्पादन हाती येते. या अनुषंगाने सुपरकेन नर्सरीच्या रोपांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. साखर उद्योगाला नवी उभारी देण्याच्या दृष्टीने ही टेक्नॉलॉजी अत्यंत महत्त्वाची आहे. हे जाणून महाराष्ट्र शासनाच्या कृषी पुणे येथील कृषी आयुक्तालय येथे १६ जुलै २०२५ या दिवशी एक विशेष बैठक झाली. मला निमंत्रण होते. सुपर केन नर्सरीमध्ये खर्चाच्या बाबी कोणत्या यावर विचार विनिमय झाला आणि एकरी चार हजार रुपये अनुदान सुपर केन नर्सरी करुन उसाची लागण करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याची मंजुरी झाली. याच हंगामापासून हे अनुदान सुरु होत आहे.
सुपर केन नर्सरीची नेमकी शास्त्रीय पद्धत कशी आहे, हे करताना कोणत्या चुका घडू शकतात आणि त्या कशा टाळायच्या याची माहिती देणारी ही पुस्तिका प्रकाशित करणे गरजेचे वाटले. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनचे रावसाहेब पुजारी आणि अजयकुमार यांनी ही जबाबदारी घेतली. आवश्यक तेथे छायाचित्रे देऊन मुख्य तपशील चांगला स्पष्ट होईल, याची काळजी त्यांनी घेतली. हे तंत्र विकसित करण्यामध्ये आणि सर्वदूर शेतकऱ्यांच्यापर्यंत डॉ. बी. पी. पाटील आणि प्राध्यापक अरुण मराठे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
पुस्तकाचे नाव – सुपरकेन नर्सरी टेक्निक्
लेखक – डॉ. बाळकृष्ण जमदग्नि, डॉ. बी. पी. पाटील
प्रकाशन – तेजस प्रकाशन, कोल्हापूर 9322939040, 8308858268
किंमत – ८० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
