November 8, 2025
गगनचुंबी इमारतींतील अनधिकृत अंतर्गत सजावट इमारतीचे सौंदर्य आणि सुरक्षितता धोक्यात आणते. नियमबद्ध सजावट व वास्तुविशारदाच्या मार्गदर्शनाचे महत्त्व जाणून घ्या.
Home » गगनचुंबी इमारतींवर घोंगावणारा धोका – अंतर्गत सजावट की विध्वंस?
विशेष संपादकीय

गगनचुंबी इमारतींवर घोंगावणारा धोका – अंतर्गत सजावट की विध्वंस?

वास्तुविशारद आपले सर्व आर्किटेक्चरल कौशल्य पणाला लावून इमारतीचे बाह्य सौंदर्य अत्यंत आकर्षक आणि देखणे बनवतो. हे नियोजित सौंदर्य अस्तित्वात आणण्यासाठी काही ठिकाणी डमी वॉल, आरसीसी फिन्स (परदी), परगोला, डक्ट तसेच ओपन डक्टसहित गोलाकार बाल्कनी यांसारखी रचना केली जाते. काही वेळा या परदीचा उपयोग आजूबाजूच्या फ्लॅट्सची प्रायव्हसी जपण्यासाठी खास करुन केलेला असतो. मात्र, अंतर्गत सजावटकार वेगळाच असल्याने तो आपल्या सजावटीच्या कल्पकतेतून ओपन डक्ट बंद करण्याचा सल्ला देतो. अशा बदलांमुळे समोरच्या फ्लॅटमधील प्रायव्हसी बिघडते आणि शेजाऱ्यांमध्ये गैरसमज किंवा तणाव निर्माण होतो. म्हणूनच अंतर्गत सजावटकारांनी मुख्य वास्तुविशारदाची मूळ संकल्पना अबाधित ठेवूनच आपले काम पूर्ण करणे ही जबाबदारी आहे.

महादेव पंडित
संरचनात्मक दुरुस्ती विषयातील तज्ज्ञ

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या पारंपरिक मूलभूत गरजा आहेत. मात्र आजच्या शहरी वास्तव्यात निवारा केवळ छपरापुरता मर्यादित नाही; तो प्रतिष्ठेचे, सुरक्षिततेचे आणि सौंदर्यदृष्टीचे प्रतीक झाला आहे. झोपडी, चाळ, वन-आरके, टू-आरके ते अलिशान फ्लॅट तसेच डुप्लेक्स, ट्रिप्लेक्स व पेंटहाऊस अशा विविध वास्तूंच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होत असते. म्हाडा, सिडको तसेच खासगी प्रवर्तक विविध उत्पन्न गटातील लोकांसाठी गृहनिर्माण योजना महानगरांत राबवत आहेत. भारतीय नागरिक मात्र शक्यतो स्वतःच्या घरात राहणेच पसंत करतात. रेंटल हौसिंग ही प्रणाली आपल्या देशात अजून तितकीशी प्रचलित नाही.

स्वतःचे घर विकत घेतल्याशिवाय बहुतेकांना चैन पडत नाही कारण स्वत: घर खरेदी केल्यानंतर त्याला एक प्रकारे “यशस्वी” झाल्याचे समाधान त्याचप्रमाणे शिक्कामोर्तब मिळते, तसेच लग्नाच्या विचारसरणीत घर असणं ही मानक चौकट झाली आहे; वधू-मंडळी सहज विचारतात – ‘तुमच्याकडे स्वतःचं घर आहे का?’ म्हणूनच प्रत्येक नोकरदार किंवा व्यावसायिक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार घर विकत घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. घराचा ताबा मिळाल्यानंतर लगेचच अंतर्गत सजावट करून गृहशांती साजरी करण्याची आजची सामाजिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे निवाऱ्यासोबतच घराची अंतर्गत सजावट ही एक “मूलभूत गरज” झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर बिल्डरकडून घराचा मालकी ताबा ग्राहकाला मिळतो. त्यानंतर लगेच घरमालक अंतर्गत सजावटकार नेमून घर सजवण्यास सुरुवात करतात. आज बांधकामात पारंपरिक कॅालम- बीम – स्लॅब पध्दत तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञाना मध्ये प्रीकास्ट आणि मायवन अशा पद्धती वापरल्या जातात. बिल्डर काही बेसिक सजावटीच्या सोई सुविधा पुरवतो, पण त्या प्रत्येक ग्राहकाला पसंत पडतीलच असे नाही. स्वतःचा फ्लॅट २००० चौरस फुटांचा म्हणजेच चार बेडरूमचा जरी असला, तरी अजून क्षेत्रफळ कुठे वाढवता येईल याचा विचार अनेक घरमालक करताना दिसतात. यावरून जागेसाठी त्यांची उतावीळ वृत्ती स्पष्टपणे दिसून येते. परिणामी एकाच इमारतीत अनेक इंटेरियर डिझायनर्स एकाच वेळी काम करत असतात.

घराच्या आराखड्यात बीम, कॉलम, स्लॅब, सज्जा, परदी, डक्ट,पोटमाळा किंवा वॉर्डरोब यांसाठी आरसीसीमध्ये प्रोव्हिजन केलेल्या असतात. काही ठिकाणी फ्रेंच विंडोज ठेवलेल्या असतात. आज महानगरांत गगनचुंबी इमारतींचे साम्राज्य पसरले आहे. रेरा कायद्यामुळे बिल्डरवर बंधने आली आहेत त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळतो आहे. तरीही घराचे चटई क्षेत्र वाढवणे हा मोह अनेकांना आवरत नाही.

वास्तुविशारद आपले सर्व आर्किटेक्चरल कौशल्य पणाला लावून इमारतीचे बाह्य सौंदर्य अत्यंत आकर्षक आणि देखणे बनवतो. हे नियोजित सौंदर्य अस्तित्वात आणण्यासाठी काही ठिकाणी डमी वॉल, आरसीसी फिन्स (परदी), परगोला, डक्ट तसेच ओपन डक्टसहित गोलाकार बाल्कनी यांसारखी रचना केली जाते. काही वेळा या परदीचा उपयोग आजूबाजूच्या फ्लॅट्सची प्रायव्हसी जपण्यासाठी खास करुन केलेला असतो. मात्र, अंतर्गत सजावटकार वेगळाच असल्याने तो आपल्या सजावटीच्या कल्पकतेतून ओपन डक्ट बंद करण्याचा सल्ला देतो. अशा बदलांमुळे समोरच्या फ्लॅटमधील प्रायव्हसी बिघडते आणि शेजाऱ्यांमध्ये गैरसमज किंवा तणाव निर्माण होतो. म्हणूनच अंतर्गत सजावटकारांनी मुख्य वास्तुविशारदाची मूळ संकल्पना अबाधित ठेवूनच आपले काम पूर्ण करणे ही जबाबदारी आहे.

सर्व साधारणपणे घरातील गृहिणीच सजावटकाराला अंर्तगत सजावटीचे बदल सुचवतात. घर मालक फक्त आर्थिक जबाबदारी सांभाळत असतात. सजावटकार आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी विविध युक्त्या तसेच बदल सांगतात. जसे की विंडो ग्रील बाहेर सरकवणे, डमी डक्ट तोडून स्टोरेज बनवणे, वेदर शेड किंवा सज्जा हॉल-बेडरुमला जोडणे. वास्तू शास्त्राप्रमाणे स्वच्छता गृहाची रचना बदलणे, दोन सलग फ्लॅट एकत्र करणे तसेच दोन माळ्यावरचे फ्लॅट डुप्लेक्स करणे अशा प्रस्तावांनी घरमालक आकर्षले जातात, पण कळत नकळत ते स्वतःच्या इमारतीची सुरक्षितता धोक्यात घालतात. तसेच विंडो ग्रील बॅाक्स टाईप बाहेर काढून त्यावर फायबर किंवा पत्र्याची व्हेदर सेड तिरकस करून बसविण्यात येते आणि यामुळे इमारतीचे बाह्य सौंदर्य अत्यंत विद्रूप दिसते. वरील सर्व बदल करताना, काहीजन सील लेव्हलची भिंत तोडतात तर कोणी डुप्लेक्स फ्लॅट बनविताना स्लॅबमध्ये एक चौरस मीटरचा कटआऊट घेतो तर अन्य कोणी अंर्तगत भिंती तोडून किचन व हॅाल एकसंध बनवतात , तर काही फ्लॅट धारक आपल्या फ्लॅट मधील कॉंक्रिटच्या भिंतीत आडव्या खोल खाचा तयार करून त्यामध्ये ग्रानाईटच्या लांब व रुंद फरश्या बसवतात असे अनेक प्रकारचे तोडफोडीचे काम अंर्तगत सजावटीच्या वेळी करुन घेतले जाते.

एका घरमालकाने केलेले अंतर्गत बदल पाहून इतरही तसेच करतात आणि त्यामुळे सतत तोडफोड चालू होते. त्यामुळे संपूर्ण इमारतीत पाणी गळती, कॉंक्रिट कार्बोनेशन, भेगा आणि स्ट्रक्चरल तडे निर्माण होतात. खालच्या मजल्यांवरील लोकांचे रंगकाम, लाकडी काम खराब होते. सोसायटी कमिटी वारंवार नोटीस देते, पण त्या बहुतेक वेळा कचर्‍यात जातात.

२५ माळ्याच्या इमारतींमध्ये साधारणपणे १५० ते २०० फ्लॅट्स असतात. त्यापैकी किमान ८०% घरमालक अंतर्गत सजावट करतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बदल झाले तर वास्तुविशारदाने दिलेली Elevation Treatment (इमारतीच्या बाह्य भागाचे डिझाईन, सौंदर्यदृष्टी व देखावा) कशी अबाधित राहील? हे विचारायलाच नको.

अनेक सजावटकार “ही वाढवलेली जागा आत्ताच्या बाजार भावाने इतक्या लाखांची आहे” असे दाखवून ग्राहकांची समजूत काढतात आणि तो अनाधिकृत बदल घडवून आणतात. पण या हव्यासापोटी इमारतीच्या आत-बाहेर किती गंभीर नुकसान होते, याची कल्पना बहुतेक घरमालकांना तसेच सजावटकाराला नसते.

महापालिका प्रशासन त्याच्या दैनंदिन कारभाराच्या भाराने या बदलांकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे फ्लॅटमालक मनमानी करतात आणि इमारतींचे बारा वाजवतात. प्रत्यक्षात, बिल्डरने हस्तांतरित केलेल्या फ्लॅटमध्ये अंतर्गत सजावटीदरम्यान अनधिकृत बांधकाम होऊ नये तसेच बाह्यरुप वेढभ दिसू नये यासाठी काटेकोर नियमावली असणे आवश्यक आहे. कॉलम, बीम आणि स्लॅब ही इमारतीची प्रमुख हाडे आहेत. ती जर तोडली तर संपूर्ण स्ट्रक्चरचा तोल तसेच सुरक्षितता बिघडतो. म्हणूनच अंर्तगत सजावट करताना काटेकोर नियमावली करून त्याची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

अंतर्गत सजावट करताना घरमालक बहुधा तोडकामातून निर्माण झालेला डेब्रिज आपल्या पार्किंगमध्ये दिवसन्‌दिवस साठवून ठेवतात. या डेब्रिजमध्ये ओले व सुके दोन्ही प्रकारचे घटक असतात – लाकडाचा भुसा, प्लॅस्टिक व लोखंडी तुकडे, तसेच प्लॅास्टर ऑफ पॅरिसचा भुसा व पावडर. हा सर्व कचरा एकत्रित साचल्यामुळे त्या ठिकाणी डास वाढण्याची शक्यता निर्माण होते, ज्यामुळे रहिवाश्यांना रोगराईचा धोका संभवतो.याशिवाय, पार्किंगमध्ये वाळू आणि बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवले जाते. तोडफोड केलेला डेब्रिज आणि नवे बांधकाम साहित्य इमारतीच्या चालू लिफ्टमधूनच आत-बाहेर केले जात असल्याने बहुतेक वेळा रहिवाश्यांना लिफ्टसमोर थांबावे लागते, आणि लिफ्ट व लॉबीच्या सौंदर्याला तसेच सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. बांधकाम साहित्य आणि डेब्रिजच्या गोंधळात सुसूत्रता आणण्यासाठी सोसायटी कमिटीने आवश्यक नियमावली आखणे गरजेचे आहे. त्यानुसार, प्रत्येक आठवड्याच्या कालावधीत सर्व डेब्रिज सोसायटीच्या बाहेर पाठवणे बंधनकारक केले पाहिजे.

अंतर्गत सजावट ही खरं तर वरवरची सुंदरतेची शस्त्रक्रिया आहे. पण ही शस्त्रक्रिया एकाच इमारतीत अनेक वेळा क्षेत्र वाढीच्या हव्यासापोटी करण्यात येते आणि भविष्यात ती सर्वात मोठी शस्त्रक्रिया ठरते आणि संपूर्ण इमारत मृत्यूच्या दाढेत ढकलली जाते . अंतर्गत सजावट जर नियमबाह्य झाली, तर ती इमारतीवर झालेला अतिरेकी हल्ला ठरते—आणि तो कायद्याच्या कठोर चौकटीत रोखणे अत्यावश्यक आहे.

सुंदर घराचा हव्यास करताना आपल्या व शेजाऱ्यांच्या सुरक्षिततेशी व शांततेशी तडजोड करू नका—हीच खरी माणुसकी आहे ! एकंदरीत, जर सर्व १५० घरमालकांनी संपूर्ण इमारत म्हणजेच आपले एकच घर आहे असे समजून अंतर्गत सजावटीची कामे केली, तर इमारतीचे बाह्य सौंदर्य, सुरक्षितता आणि स्ट्रक्चरल स्थिरता अबाधित राहील. अशा सामूहिक जबाबदारीमुळे इमारत दीर्घायुषी तर ठरेलच आणि आपल्याला सुरक्षित सेवा देत राहील. इमारत ही जरी निर्जीव वास्तू असली, तरी तिला जिवंत मानून तिचे बाह्य सौंदर्य न बिघडतां अंर्तगत सौंदर्यीकरण केले, तर खऱ्या अर्थाने ‘घर’ या संकल्पनेला न्याय देता येईल.”

घर म्हणजे नुसत्या चार भिंती नसून , त्यात प्रेम, आपुलकी, विश्वास, जिव्हाळा, परस्परसंबंध, अर्थपूर्ण संवाद आणि सुरक्षितता यांचा समावेश असला पाहिजे . घराच्या भौतिक अस्तित्वापेक्षा तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये भावनिक आणि मानसिक एकता असणे आवश्यक आहे , ज्यामुळे संपूर्ण इमारत एक आनंदी आणि सुरक्षित वास्तू बनते. म्हणूनच फ्लॅटचे अंर्तगत सजावटीकरण सुरक्षित होण्या बरोबरच बाह्य सौदर्य बिघडू नये यासाठी खालील १२ कलमी कार्यक्रम सोसायटी व्यवस्थापन कमिटीने पारदर्शक पद्धतीने राबविला पाहिजे.

अंतर्गत सजावटीच्या अनधिकृत बदलांमुळे सोसायटी व्यवस्थापन समिती आणि फ्लॅटमालक यांच्यात सतत वादविवाद उभे राहतात. काही वेळा हे वाद केवळ कामापुरते मर्यादित न राहता वैयक्तिक पातळीवरही कटुता व राग निर्माण करतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सोसायटी कमिटीचे सदस्य हे पगारी कर्मचारी नसतात; ते इतर कामांबरोबरच सोसायटीच्या हितासाठी जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यामुळे प्रत्येक फ्लॅटमधील अंतर्गत सजावटीच्या कामांवर रोज लक्ष ठेवणे त्यांच्या दृष्टीने अशक्यच असते. अनधिकृत बदल कायमचे रोखायचे असतील, तर सुरुवातीपासूनच सर्व सभासदांमध्ये एकोपा, शिस्त आणि एकवाक्यता असणे अत्यावश्यक आहे.

अंतर्गत सजावटीचा आराखडा अधिकृत किंवा मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून तपासून घेणे बंधनकारक करण्यात यावे. कारण स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रत्येक इमारतीचे संरचनात्मक नियोजन सखोल विचार करून करतात. त्यांनी डिझाइन केलेल्या मेंबर्समध्ये तोडफोड करणे किंवा त्यांच्यावर खोलवर खाचा पाडणे हे इमारतीच्या स्थिरतेवर गंभीर आणि धोकादायक ठरू शकते

महापालिकेसाठी तसेच सोसायटी व्यवस्थापन कमिटीसाठी १२ कलमी शिफारसीय नियमावली…

१. प्रत्येक घरमालकाने अंतर्गत सजावटीचे आराखडे महापालिकेकडे व कमिटीकडे काम सुरू करण्यापूर्वी कमीतकमी १५ दिवस अगोदर सादर करणे बंधनकारक करावे.
२. फक्त मान्यताप्राप्त अंतर्गत सजावट आराखड्यानुसारच काम करण्यास परवानगी द्यावी.
३. कोणत्याही परिस्थितीत बीम, कॅालम, स्लॅब आणि लोड बेयरिंग वॅाल या भागांमध्ये तोडफोड किंवा बदल केल्यास तो गंभीर गुन्हा म्हणून नोंद व्हावी.
४. इमारतीमधील कोणत्याही स्ट्रक्चरल बदलांसाठी दंड व फौजदारी कारवाईची तरतूद करावी.
५. ग्रील्स, सज्जा, डमी डक्ट, विंडोज आदी बाह्य घटकांना बदलण्यास सक्त मनाई करावी.
६. इमारतीचे एकसंध सौंदर्य व सुरक्षितता अबाधित ठेवणे बंधनकारक करावे.
७. पावसाचे पाणी व ड्रेनेजसाठी केलेली व्यवस्था (डक्ट, वेदर शेड) कोणत्याही कारणाने बदलता किंवा बंद करता येणार नाही.
८. सोसायटी कमिटीला अनधिकृत सजावट थांबवण्यासाठी तात्काळ कारवाईचा कायदेशीर अधिकार द्यावा.
९. महापालिका व सोसायटी यांचे संयुक्त निरीक्षण समिती किंवा स्वतंत्र कक्ष स्थापन करावा.
१०. केवळ अधिकृत वास्तुविशारद / इंटेरियर डिझायनरद्वारेच सजावटीचे काम करावे. तसेच परवाना नसलेल्या व्यक्तींमार्फत केलेले काम अवैध समजले जावे.
११. इमारतीतील अंतर्गत बदलांची वार्षिक तपासणी करून तो अहवाल सोसायटी व महापालिकेकडे सादर करणे बंधनकारक करावे.
१२. अनधिकृत बदल करणाऱ्या घरमालकावर आर्थिक दंड, तसेच इमारतीच्या संरचनेला धोका झाल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद करावी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading