February 19, 2025
Continuous treatment of language is necessary seminar at Shivaji University
Home » भाषेची सातत्याने चिकित्सा आवश्यक
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भाषेची सातत्याने चिकित्सा आवश्यक

 शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर

कोल्हापूर: भाषेला सौष्ठव आणि श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागलेली असतात. काळानुरुप तिचे स्वरुप बदलत असते. भाषेचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तिला भाषिक राजकारणापासून जपण्याची आवश्यकता असते. त्यासाठी सातत्याने तिची मीमांसा, चिकित्सा केली पाहिजे, असा सूर शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात आज उमटला.

विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यांतर्गत ‘मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मीमांसा’ या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आज आयोजन करण्यात आले. परिसंवादामध्ये रवींद्र इंगळे-चावरेकर (बुलडाणा) यांनी बीजमांडणी केली, तर डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड) आणि डॉ. गोमटेश्वर पाटील (कोल्हापूर) यांनी परिसंवादात सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते.

रवींद्र इंगळे-चावरेकर यांनी आपल्या बीजमांडणीमध्ये मराठी भाषेच्या इतिहासाची संशोधनात्मक आणि अभ्यासपूर्ण रितीने उकल करण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषेचे धागेदोरे सिंधुसंस्कृतीपर्यंत मागे नेता येऊ शकतात, याविषयी त्यांनी साधार मांडणी केली. ते म्हणाले, उपलब्ध साहित्यावरुन भाषेचे प्राचीनत्व आणि अभिजनत्व यांची निश्चिती केली जाते. मराठी भाषेमध्ये सन ११२९ मध्ये ‘मानसोल्हास’, त्यानंतर बाराव्या शतकात विवेकसिंधु, लीळाचरित्रापासून ते पुढे ज्ञानेश्वरीपर्यंत असे नऊ ग्रंथ सापडतात. या ग्रंथांतील मराठीचे भाषावैभव उच्च दर्जाचे आहे. मात्र, भाषा जन्मली आणि लगेच त्या भाषेमध्ये समृद्ध वाङ्मय निर्माण झाले, असे होत नाही. भाषेला तिचे श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी वर्षानुवर्षांचा कालखंड जावा लागतो. मराठीतील या उपलब्ध साहित्यामध्येही ग्रंथभाषा आणि लोकव्यवहार भाषा असा फरक दिसतो. एक भाषा संस्कृतविरहित आहे, तर दुसरी संस्कृतधार्जिणी आहे, हे अभ्यासांती स्पष्ट झालेले आहे. अशा दोन संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या भाषांचा प्रवास प्राकृत, महाराष्ट्री, मराठी आणि अभिजात असा झाला आहे. यातील मारहरट्टी भाषेचा सांधा आपल्याला मागे नेत सिंधुसंस्कृतीशी जोडता येतो. मराठी भाषेची पुनर्मीमांसा करीत असताना तिच्या प्रवासातील विविध प्रवाहांचा, बदलांचा आणि परंपरांचा नव्याने वेध घेण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले.

‘मराठी भाषा: बहुविध इतिहासाची दृष्टी’ या विषयावर बोलताना डॉ. दिलीप चव्हाण म्हणाले, ब्रिटीश काळात मराठीविषयी भाषाशुद्धीच्या अनुषंगाने अधिक चांगले विचार मांडण्यात आले. ऐतिहासिक भाषाविज्ञान हे मराठीच्या बाबतीत अधिक सजग होते. भांडारकर, चिपळूणकर, तर्खडकर, दामले इत्यादी व्याकरणकारांवर तौलनिक भाषाविज्ञानाचा मोठा प्रभाव दिसतो. जर्मन आणि ब्रिटीश अभ्यासकांनी संस्कृत आणि इतर भाषांचा सहसंबंध जोडून घेतला. भाषांमध्ये हा आंतरिक व्यवहारही समृद्धतेच्या दिशेने घेऊन जातो, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्राचीन संदर्भ देत त्यांनी मराठी भाषेची लेखनपद्धती कशी असावी, तिचे स्वरुप कसे असावे, याविषयीही विवेचन केले.

‘मराठीच्या पूर्वेतिहासाचा शोध’ या विषयावर बोलताना गोमटेश्वर पाटील म्हणाले, महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषेतून मराठी भाषेचा पूर्वेतिहास आपल्याला शोधता येतो. महाराष्ट्रीय प्राकृत आणि महाराष्ट्रीय अपभ्रंश यांचा सहसंबंधही जोडता येतो. महाराष्ट्रीय अपभ्रंश आणि मराठी यांची सलगता शब्दसंपत्तीमधून शोधता येते. तसेच महाराष्ट्रीय मध्ययुगीन कवींच्या साहित्यातूनही मराठीच्या पूर्वेतिहासाचा शोध घेता येतो. शिलालेख, ताम्रपट, गद्यलेखन यांमधून मराठीची वेगवेगळी रुपे सापडतात. महाराष्ट्राबाहेरही लिहीत असणाऱ्या कवींचे प्राचीन साहित्य मराठीची विविध रुपे वेळोवेळी सामोरे आणण्याचे काम करीत असते, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख म्हणाले, व्यवहारात भाषेची अनेक रुपे प्रचलित असतात, तिची रुपांतरणेही होत असतात. भाषा आणि बोलीभाषा तसेच भाषा आणि लिपी यांच्यातही फरक असतो. या रुपांतरणाचा आणि फरकांचा अभ्यास व्हायला हवा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठात होत असलेल्या या परिसंवादाचे दस्तावेजीकरण व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात सुरवातीला मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून दिले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यशाळेला प्राचार्य जी.पी. माळी, डॉ. अनिल गवळी, डॉ. मेघा पानसरे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अरुण शिंदे यांच्यासह विविध महाविद्यालयांतील मराठीचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading