अनुभवविश्वाच्या माणसातील माणसांचा वास्तविक दर्पण
प्रसंग असतात लहानसे पण त्यातून अनुभवायला येणारे कांगोरे खूप काही शिकवून जातात. मानवी मनाच्या डोहात किती साचलं नी मुरलेल आहे हे अनुभवण्यासाठी कधीतरी गटांगड्या खाव्याच लागतात, तेव्हाच त्याचा थांग लागते. वरवर शांत वाटणारा मानवी डोह आतून किती खोल असावा याची मर्यादा आपल्या आकलनापलीकडे असते याची कित्येकांना प्रचिती आली असली तरी माणसातील माणसांची खरी प्रतिमा आजवरी कोणालाच पाहता आली नाही.
काही मानवी मनाचे डोह तरून जाण्यासाठी सहाय्यकारी ठरतात तर काही डोह नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरायला झाले तरी जीव घ्यायला मागेपुढे पाहत नाही. अशा किंवा याहीपेक्षा कधी भयानक तर कधी काटेरी फणसाहून मऊ वास्तवाचे विविधांगी दर्शन घडविणारा माणसातील माणसांचा दर्पण गवसने आज दुर्भिक्ष होऊन बसले आहे.
मानवी संस्कृतीच्या इतिहासाच्या निकषात कधी खोटे पाडायला लावतील असे आभासी आरसे बाजारात राजरोसपणे वावरत आहेत. त्यात फक्त एखादाच आरसा खरी प्रतिमा दाखवून जातो, नाहीतर क्षणोक्षणी मानवी मूल्याचे तुकडे करणारे आरसे असा आभास निर्माण करतात की फुटलेली काच रुतल्यानंतर जितक्या वेदना होणार नाहीत त्यापेक्षा बदनामीच्या धनुर्वाताने एखाद्याला आत्महत्यारूपी शस्त्र हाताळायला मजबूर केल्याशिवाय खरे रूप प्रकट करीत नाही.
अनुभव सर्वांना असतो, प्रत्येकाचे विश्व ठरलेले असते. सरळढोप मार्गात त्यांचा वैश्विक चेहरा डागाळण्यासाठी काही बुरसटलेले मानवी दर्पण जागोजागी बसवलेले असतात याचा साधा मागमूसही मनाला शिवत नसताना विश्वासघाताची मालिका किती जीवघेणी ठरू शकते याचे उदाहरण पदोपदी घेणारे विकृत अजूनही माणुसकीचा कर्दनकाळ ठरत आहेत. हीच या पृथ्वीतलाची शोकांतिका ।
लक्ष्मण खोब्रागडे
जुनासुर्ला , ता. मूल, जि.चंद्रपुर
९८३४९०३५५१
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.