भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल किंवा शेतीतील नुकसानीचा प्रश्न असेल शेती करणे आता तितके सोपे राहीलेले नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने पाहून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आज १९ मार्च या दिवशी शेतकरी उपवास करतात. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात अन् शेतकरी समृद्ध व्हावा याचा मनोकामनेने हा उपवास राखण्यात येतो. काय आहे यामागचे कारणे या संदर्भातील हा लेख…
१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्यांने त्याची बायको व लहान लहान चार मुलांसह सामुहिक आत्महत्या केली. सामुहिक आत्महत्येची ही पहिलीच घटना होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने पाहायला हवे याची जाणीव यातून झाली. पण करपे कुटूंबाने आत्महत्या का केली हे जाणून घेणे गरजेचे आहे तरच हा प्रश्न आपणास सोडवणे सोपे होईल.
करपे हे विदर्भातील शेतकरी. येथील शेती कोरडवाहू. पाणी असेल तरच बागायती शेती करता येऊ शकते. त्यामुळे विहिरीसाठी साहेबरावांनी घरची काही शेतजमीन विकलीआणि शेतात विहीर खोदली. या पाण्यावर त्यांनी रब्बी हंगामात गव्हाचे पिक घ्यायला प्रारंभ केला. १९८६ मध्येही त्यांनी गहू पेरला. पिक चांगले डोलायला लागले होते. एक दोन पाण्याच्या पाळ्या दिल्या की भरघोस उत्पन्न मिळेल असा त्यांचा अंदाज होता. पण शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या समस्या ह्या केवळ नैसर्गिक नसतात तर काही कृत्रिम समस्याही असतात. शासनाच्या काही चुका शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करतात. लोकप्रतिनिधी अशा प्रश्नांकडे केवळ मतांची गोळाबेरीज म्हणून पाहातात. निवडून आल्यानंतर हे प्रश्न आहे तसेच ठेवले जातात. ती सोडविण्याची मानसिकता लोकप्रतिनिधींची नसते. विहीरीत पाणी आहे पण ते पिकाला देण्यासाठी वीजच नसेल तर शेतकरी काय करणार ? हेच साहेबरावांच्या बाबतीत घडले. पिक जोमात असतानाच वीज मंडळाने वीज तोडली. अशाने पिक वाळून नुकसान होणार या भितीने साहेबराव अस्वस्थ झाले. वीज मंडळाला विनंत्यावर विनंत्या करून ते थकले. पण वीज काही त्यांनी जोडली नाही. यात झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण ? चुक कुणाची ? अखेर साहेबराव आणि त्यांच्या कुटुंबियांनी टोकाचा निर्णय घेतला अन् आपली जीवनयात्रा संपवली. या अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या चित्त विचलीत करतात. शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या आत्महत्या आपण थांबवू शकत नाही कारण आपण सामान्य माणसे आहोत. पण त्यांच्या बद्दल सहवेदना तरी व्यक्त करु शकतो. म्हणूनच आज १९ मार्च ला अन्नत्याग, उपवास, उपोषण करून याचे स्मरण सरकारला शेतकरी देतात.
याबाबत बोलताना किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब म्हणाले, हे उपोषण राजकीय पक्षांसारखे नाही कारण या वेळेस आम्ही कोण्या सरकारी अधिकाऱ्याला निवेदन देत नाही. मेलेली माणसे परत करणे सरकारच्या आवाक्यात नाही, याची आम्हाला कल्पना आहे. हा उपवास धार्मिकही नाही, कारण आम्ही यात उपवासाचे खात नाही पण पाणी मात्र पितो. हा उपवास/अन्नत्याग सहवेदनेचा आहे. उत्स्फूर्तपणे करायचा आहे. हा अन्नत्याग सक्तीचा नाही. तुमच्यावर दुसरा कोणी देखरेख करीत नाही. तुम्हीच तुमचा प्रामाणिकपणा जपायचा आहे. क्रूर शासनावर एक दिवसाच्या उपवासाने परिणाम होणार नाही याची जाणीव आम्हाला आहे, पण या अन्नत्यागाने आम्हाला शेतकरी स्वातंत्र्याचे बळ मिळणार आहे, याची आम्हाला खात्री आहे. नि:शस्त्र सामान्य माणूस अशा आपत्तीच्या काळात उपवास करूनच आपला एल्गार व्यक्त करू शकतो. तुम्ही या अन्नत्याग/उपवासात सहभाग घेऊन आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करु शकता. साहेबराव करपे कुटुंब असो की त्या आधी व त्या नंतर झालेल्या लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या ‘आत्महत्या’ नसून सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांचा दुष्परिणाम आहे, याबद्दल आमच्या मनात शंका नाही !
एवढ्या मोठ्या संख्येने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विचार करण्याची, त्याची कारणे शोधण्याची आणि उपाय सांगण्याची जबाबदारी आपली आहे. किसानपुत्र आंदोलनाने यावर अभ्यास केला आहे अन् जमिनीची तुकटे, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण या कायद्यांचा हा दुष्परिणाम आहे असे मत मांडले आहे. हे कायदे रद्द करणे हाच यावर खरा उपाय आहे. यासाठी त्यांनी ही चळवळ उभा केली आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.