November 17, 2025
मालवणी भाषेला रंगभूमीवर प्रतिष्ठा देणारे नाटककार गंगाराम गवाणकर. ‘वस्त्रहरण’, ‘वेडी माणसे’, ‘वात्रट मेले’ यांसारख्या नाटकांतून विनोद, व्यंग आणि वास्तवाचा संगम साकारला.
Home » गंगाराम गवाणकर : मालवणी भाषेला कलात्मक रूप देणारा मोठा नाटककार
मनोरंजन

गंगाराम गवाणकर : मालवणी भाषेला कलात्मक रूप देणारा मोठा नाटककार

अर्थात मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांची स्वतंत्र वाट निर्माण करण्याचे श्रेय गवाणकर यांनाच जाते. ‘वेडी माणसे’ हे त्यांचे पहिले नाटक असून, त्यानंतर ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ यांसारखी अनेक महत्त्वाची अनेक नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या लेखनात विनोद, व्यंग आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ आढळतो.

अजय कांडर

एखादं चांगलं नाटक दिग्दर्शकामुळे मोठे होते की त्या नाटकाच्या लेखकामुळे ? असा प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा बहुसंख्य वेळा दिग्दर्शक नाटक कशा प्रकारे दिग्दर्शित करतो त्यावर त्या नाटकाचे यश अवलंबून असते असे सांगितले जाते. मात्र ‘ वस्त्रहरण’ हे अमाप लोकप्रिय झालेले असे नाटक आहे की ते दिग्दर्शकाबरोबर नाटकाचे मुख्य अभिनेते आणि या नाटकाचे लेखक या तिघांच्या संयोगातून लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. आधी या नाटकाचे दिग्दर्शक रमेश रणदिवे गेले. नंतर या नाटकाचे निर्माते आणि मुख्य अभिनेते बाबूजी म्हणजेच मच्छिंद्र कांबळे गेले आणि आता वस्त्रहरण नाटक लिहून मालवणी भाषेला कलात्मक रूप देणारे मोठे नाटककार गंगाराम गवाणकर गेले. मात्र त्यांच्या वस्त्रहरणाची लोकप्रियता अशी आहे की जोपर्यंत मालवणी बोली या जगात टिकून आहे तोपर्यंत वस्त्रहरण नाटक राहणार आहे आणि पर्यायाने गंगाराम गवाणकर हे नावही या जगात राहणार आहे.

एक काळ असा होता मालवणी भाषा म्हणजे अडाण्याची भाषा असं समजलं जायचं. मालवणी माणूस चाकरमानी म्हणून आपल्या गावी आला की तो स्वतःच्या घरातही आपल्या नातेवाईकांबरोबर मालवणीतून संवाद साधायचा नाही. गावात तर फिरताना तो, मालवणी बोलणाऱ्या माणसाकडे कुत्सितपणे पाहून त्याच्याशी मराठी भाषेतूनच संवाद साधायचा ! बोलीभाषेची ही न्यूनगंडता सार्वत्रिक असली तरी मालवणी बोलीला प्रतिष्ठा मिळवून देऊन तिला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम वस्त्रहरणमुळे मच्छिंद्र कांबळी आणि गंगाराम गवाणकर या दोघांनी केल्याचे श्रेय निर्विवादपणे या दोघांनाच द्यावे लागते. ८० च्या दशकाच्या प्रारंभी वस्त्रहरण आले. या नाटकाची लोकप्रियता अशी की वस्त्रहरण पाहण्यासाठी इतर बोलीभाषिकही जाऊ लागले आणि नाट्यगृहावर बाहेर हाउसफुलचा बोर्ड लागू लागला. मग चाकरमानी गणेश चतुर्थी, दिवाळी, होळी या सणांना गावी येऊ लागले की या नाटकाच्या संवादाची सीडी घेऊन यायचे आणि स्वतः सोबत आणलेल्या टेप रेकॉर्डमध्ये ती घालून गावभरच्या लोकांना ते संवाद ऐकवत राहायचे. मग गावातील लोकही वस्त्रहरणचे संवाद ऐकण्यासाठी मं8ल दिराच्या पारावर, घराच्या अंगणात, गावच्या सार्वजनिक चावडीवर जमायचे. या नाटकाची मौखिक चर्चा तर दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यातून या नाटकाचा प्रवास असा होत गेला. नाट्य रसिकांचा असा प्रतिसाद मिळणे यापेक्षा एखाद्या नाटककारासाठी अजून काय हवे असते !

ज्या भाषेला अडाण्यांची भाषा म्हणून लोक हिणवू लागले होते तेच लोक मालवणी भाषा बोलणे हे वस्त्रहरणमुळे प्रतिष्ठेचे समजू लागले. वस्त्रहरण गाजल्यानंतर मुंबईत मालवणी माणूस एकमेकांशी बोलताना प्रतिष्ठेने मालवणीतून बोलू लागला. ट्रेनमध्ये तर दोन मालवणी माणसं मोठ्या मोठ्याने मालवणीत संवाद करू लागले आणि मालवणी माणसांचे इतर भाषिक मित्र तर गौरवाने आपल्या मालवणी बोली मित्राला मुंबई लोकलमध्ये मालवणी बोलीतून हाक मारू लागले. बघता बघता मराठी चित्रपट मराठी मालिका मनोरंजनाच्या मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये हटकून मालवणी व्यक्तिरेखा ठेवली जाऊ लागली. एवढंच नाही तर मुंबई विद्यापीठासारख्या देशातील महत्त्वाच्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मालवणी भाषा साहित्याचा समावेश करण्यात आला.शेवटी मालवणी भाषा सातासमुद्रापार जाऊन इतर देशातही मालवणी माणूस अभिमानाने एकमेकांशी मालवणी बोलू लागला. अर्थात मालवणीला हा सन्मान निव्वळ वस्त्रहरणचे अभिनेते मच्छिंद्र कांबळी आणि वस्त्रहरणचे लेखक गंगाराम गवाणकर यांच्यामुळेच प्राप्त झाला !

लोकभाषेचा नाटककार किंवा साहित्यिक जेव्हा हरवत असतो तेव्हा त्या बोली भाषेचे मोठे नुकसान होत असते. बोलीभाषेतील नाटकांचे श्रेय ज्या बोलीभाषेतील नाटकककारांकडे जातात त्यातील अग्रेसर नाव गंगाराम गवाणकर यांचे असून मालवणी बोली मराठी नाटकाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे सारे श्रेय गवाणकर यांच्याकडे जाते म्हणूनच मराठी आणि बोली नाटकाचा इतिहास लिहिताना गवाणकर यांच्या उल्लेखाशिवाय तो अधुरा राहील !

अर्थात मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांची स्वतंत्र वाट निर्माण करण्याचे श्रेय गवाणकर यांनाच जाते. ‘वेडी माणसे’ हे त्यांचे पहिले नाटक असून, त्यानंतर ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ यांसारखी अनेक महत्त्वाची अनेक नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या लेखनात विनोद, व्यंग आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ आढळतो. ‘वात्रट मेले’ या नाटकाचे तब्बल दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले, तर ‘वन रूम किचन’ या नाटकाने हजारावर प्रयोगांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि वस्त्रहरणने इतर पाच हजाराचा पेक्षा जास्त प्रयोग करून आता ते सेलिब्रिटी संचात सादर होत आहे ! याच नाटकाने मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा मालवणी नटसम्राट घडवला. या नाटकाचे प्रदर्शन दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या ‘भारत रंगमहोत्सव’ मध्येही झाले.त्या काळातील अनेक गाजलेल्या किश्श्यांना साठवून ठेवणारे गवाणकर यांचे आत्मकथन ‘व्हाया वस्त्रहरण’ हे पुस्तक रसिकांच्या मनात आजही लोकप्रिय आहे. आता मात्र दारिद्र्य आणि संघर्ष यांचा मिलाफ नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर आपल्या लेखनातून सादर करणाऱ्या गवाणकर यांच्या निधनामुळे आपल्या सोबतीला त्यांच्या या आत्मचरित्रासारख्याच फक्त अनेक आठवणीच असतील!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading