सांगली – लेखक, चित्रकार सुरेन्द्र पाटील यांनी साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचन चळवळ – भाषा वृद्घीसाठी सातत्याने धडपडणाऱ्या लेखक, व्यक्ती यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांनी वडिलांच्या नावाने “रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार” देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी कोणतीही प्रवेशिका नाही किंवा वितरणासाठी समारंभ ते घेणार नाहीत तर हा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीपर्यंत स्वतः जाऊन तो सन्मानाने त्यांना दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख ५००० रुपये, शाल, ग्रंथभेट, मानचिन्ह असे आहे. यंदा हा पुरस्कार सचिन वसंत पाटील यांना देण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्यातील कर्नाळ येथील सचिन वसंत पाटील यांनी संपादित केलेल्या ‘मायबोली रंग कथांचे’ या पुस्तकास रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. २२ बोली भाषेतील कथा या पुस्तकात त्यांनी संपादित केल्या आहेत. कथाकार पाटील यांनी एका अपघातात दोन्ही पायातील शक्ती गमावली. कमरेखालचा भाग कायमचा निर्जीव झाला; परंतु पुस्तक वाचनाने त्यांच्या जगण्याला बळ मिळाले. लेखनकार्यात त्यांनी स्वत:ला गुंतवून सांगावा, अवकाळी विळखा, पाय आणि वाटा अशा दखलपात्र पुस्तकांची निर्मिती केली आणि वॉकरवर जिद्दीने पुन्हा उभे राहिले… त्यांचे जीवन अनेकांना प्रेरक आहे, म्हणून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुरेन्द्र पाटील यांनी पुरस्काराची घोषणा केली आहे. लवकरच युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार देविदास सौदागर समवेत सचिन पाटलांच्या घरी जाऊन हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.