November 8, 2025
Diwali Message – The Divine Dwells Within All Beings | Pandurang Blessings
Home » दिन दिन दिवाळी…
मुक्त संवाद

दिन दिन दिवाळी…

सर्व देव-देवता निरनिराळ्या रूपांत प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात वास करत असतात. प्रत्येकाचा सर्वांगिण विकास व्हावा अशी त्यांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी अखंड परिश्रमाची गरज असते. ते प्रयत्न ज्यावेळी सफल होऊ लागतात त्यावेळी आयुष्यात दिवाळीची पहाट होते.अशी दिवाळी सर्वांच्या आयुष्यात यावी, यासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
जय गुरुदेव.

यशवंत जोशी, बेंगलोर
मोबाईल नं. ९४२२६१३१२१

“दीपावली” म्हणजे काय? “ज्यावेळी अंतरंगातले दिवे उजळलेले असतात, आणि ज्यावेळी मन आनंदी असतं.”मन आनंदी केव्हा असतं? “सोनं-नाणं, पैसा-अडका, धन-समृद्धी असेल तर!”पण हे कितीही असलं तरी मन आनंदी असेलच याची खात्री नाही.म्हणूनच आपल्या पूर्वजांनी, संपत्ती असली-नसली तरी आनंदानं कसं जगायचं ते, निरनिराळ्या उत्सवातून, सण-समारंभातून, पुराणकथातून शिकवलं आहे. त्यातूनच दैनंदिन जीवनात कितीही अडचणी आल्या तरीही आनंदानं, समाधानानं सदैव जगता येतं.

दसऱ्याला सोनं लुटायचं असतं. शमीची, आपट्याच्या झाडाची पानं, सोनं म्हणून लुटून आणायची आणि ती वाटून टाकायची. सोनं लुटायचं म्हणजे ते मिळवायचं आणि ते वाटायचं. त्यामुळं सोनं लुटल्यानंतर जो आनंद मिळाला तो, ते वाटल्यानंतर कितीतरी पटीनं वाढला! तसाच वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. वसू म्हणजे धन. पण कोणतं धन? ‘गोधन’. तेच खरं धन. पण फक्त गोधन नव्हे तर, ‘गोवत्स धन’. म्हणूनच ‘गोवत्स द्वादशी’ म्हणतात. गाई बरोबर तिचं वासरू. दोघं मायलेकरं एकत्र असतात, तेव्हा ते किती आनंदी असतात, ते प्रत्यक्ष पाहिल्यावरच अनुभवता येतं. अशा धनाची पूजा केल्यावर जो आनंद मिळतो, त्यालाच दिवाळी म्हणायचं‌.

आमच्या लहानपणी आम्ही बहिण-भाऊ मिळून दिवाळीला एक गाणं म्हणत असू,
“दिन दिन दिवाळी l गाई-म्हशी ओवाळी ll
गाई-म्हशी कोणाच्या?गाई-म्हशी लक्ष्मणतात्यांच्या ll
त्यावेळी त्या गाण्याचा अर्थ कळला नव्हता. पण नंतर खरा अर्थ उमगला. दिन दिन दिवाळी म्हणजे, प्रत्येक दिवशी दिवाळी. आणि ती खरोखर असत होती. अशावेळी ओवाळायचं म्हणजे त्यांच्या पण अंतरातले दिवे उजळावेत. हे फक्त माणसांच्या पुरतंच नाही, तर प्राणीमात्रांच्या बाबतीत सुद्धा. दिवाळीत गाई-म्हशींना पण ओवाळायचं.त्यांच्याबद्दल आपुलकी, कृतज्ञभाव ठेवायचा. तसेच त्यांना प्रत्यक्ष सांभाळणारे, त्यांची निगा ठेवणारे, यांच्या बद्दल पण कृतज्ञता भाव पाहिजे. आमच्या लहानपणी आमचे दोन नंबरचे वडीलबंधू लक्ष्मणतात्या. गोठ्यातल्या सगळ्या गाई-म्हशींना चारा-पाणी देणं, धारा काढणं, त्यांची स्वच्छता ठेवणं हे इतकं आपुलकीनं आणि प्रेमानं करायचे की, आमच्या अंतरातल्या दिवाळीत, त्यांना पण फार मानाचं स्थान होतं. हे गोवत्स धन सांभाळलं, तरच “दिन दिन दिवाळी”.

त्यानंतरचा दिवस धनत्रयोदशी. याच दिवशी समुद्रमंथनातून, देवांचे वैद्य धन्वंतरी आणि अमृत कुंभ घेऊन लक्ष्मी प्रकट झाली. त्यांची पूजा करायची. समुद्रमंथन करायचं म्हणजे, समुद्र ढवळून काढायचा. हे काम सोपं नाही,अहोरात्र कष्ट करून संपत्ती मिळवणं! ती संपत्ती म्हणजेच ‘लक्ष्मी.’

तिच्यामुळंच आपल्या जीवनात अमृताचे क्षण येतात. त्या अमृताचा एक एक थेंब मूल्यवान. अशी लक्ष्मी आणि तिच्यामुळं मिळालेलं अमृत.हे अखंड परिश्रमातून म्हणजेच समुद्रमंथनातून मिळालं. त्याचप्रमाणं आपणही ते भवसागरमंथनातून मिळवलेलं असतं. पण हे करताना शरीराच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. शरीर साथ देणारं नसेल, तर लक्ष्मीची कृपा होऊ शकत नाही. म्हणूनच समुद्रमंथनातून वैद्य-धन्वंतरी प्रकटले होते .त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय शरीर निरोगी राहू शकत नाही. म्हणूनच त्यांची पूजा करायची. म्हणजे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपलं कर्तव्य आहे.

त्यानंतरचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. याच दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. त्यावेळी श्रीकृष्णाच्या अंगावर नरकासुराच्या रक्ताचे थेंब पडले. ते धुण्यासाठी त्यांनी अभ्यंगस्नान केलं. म्हणूनच सर्वजण या दिवशी पहाटे उठून तेल-उटणे लावून अभ्यंगस्नान करतात. म्हणजे शरीरावरचा मळ घालवून शरीर स्वच्छ करायचं. संध्याकाळी पणत्या लावून घरातल्या अंध:काराचा नाश करायचा. त्याच प्रमाणं आपल्या अंतरात असलेल्या, विकारांच्या नरकासुरासारख्या राक्षसांचा नाश करून, अंतरंग प्रकाशमान करायचं. म्हणजेच या दिवशी शरीर अंतर्बाह्य स्वच्छ करायचं. ते करण्यासाठी शक्ती मिळावी म्हणून श्रीकृष्णाचं पूजन करायचं.
त्याचबरोबर यमराजाचे पण पूजन करतात. यम ही मृत्यूची देवता.

आपल्या संतांनी खूप वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं,”मरणाचं भय नको पण मरणाचं भान ठेवा.” याचा अर्थ आयुष्यातल्या केव्हातरी एका दिवशी यमराज येणारच. पण ते अकाली येऊ नयेत, यासाठी त्यांची पूजा करायची. पण नुसती पूजा करून उपयोग नसतो.जसं शरीर अंतर्बाह्य स्वच्छ, तसं ते सुदृढ ठेवणं गरजेचं असतं. त्यासाठी योग्य आहार-विहार-व्यायाम आवश्यक.अशी जीवन शैली ज्यामुळं यमराज येण्याचा दिवस, एक एक दिवस करत पुढं ढकलता येतो. तसंच मृत्यू म्हटलं की, मरणानंतर नरक, नरकयातना हा विचार मनात असतो. म्हणूनच आहार-विहारा बरोबरच आचार-विचार चांगले असले म्हणजे, नरक-नरकयातना यांची भीती वाटत नाही.तरीही यातून बाहेर पडण्यासाठी, श्रीकृष्णांनी जो मार्ग दाखवलाय,त्यावरून पुढे पुढे जायचं असतं. हे आठवण करून देणारा हा दिवस.

त्यानंतर लक्ष्मीपूजन. या दिवशी सायंकाळी लक्ष्मी घरी येते, म्हणून घराची सजावट करून दिव्यांनी घर उजळून टाकतात. घरातलं सोनं-चांदी -नाणी या धनलक्ष्मीची पूजा करतात. त्याचबरोबर विघ्नहर्त्या श्रीगणेशाची पूजा करतात. विशेष म्हणजे लक्ष्मी बरोबर कुबेराचीही पूजा करतात. कारण कुबेर हा लक्ष्मीचं रक्षण करतो. तो निस्वार्थी असल्यानं प्रामाणिकपणानं धनाचं रक्षण करतो.

कुबेराचा हा गुण आपल्याकडे यावा, यासाठी त्याची पूजा करायची. आपल्याकडं असलेलं धन योग्य कारणासाठी खर्च करता आलं पाहिजे. त्याचा सदुपयोग करणं महत्त्वाचं असतं. लक्ष्मी ही चंचल आहे. तिला सांभाळून ठेवता आलं पाहिजे. श्री म्हणजेच लक्ष्मी. पण लक्ष्मी म्हणजे फक्त धनदौलत-पैसा नव्हे.तर यश, कीर्ती, विद्या,धैर्य इत्यादी लक्ष्मीची आठ रुपे आहेत. म्हणून ती अष्टलक्ष्मी. अशी लक्ष्मी प्रसन्न असेल, तर जीवनातल्या प्रत्येक आघाडीवर सुख-समाधान मिळतं.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा. पूर्वी या दिवशी सकाळी भिक्षा मागायला येणारे, “इडीपीडी जाऊदे, बळीचं राज येऊ दे,” असं म्हणत. कारण बळीराजा इतका दानशूर होता की, देवाला सुद्धा त्याचा हेवा वाटला. त्याच़ं राज्य घेऊन, त्याला पाताळात पाठवून,पाताळचं राज्य दिलं.बळीराजा सारखा असा दानशूरपणा आपल्यात येण्यासाठी पाडव्याच्या दिवशी प्रार्थना करायची. शेतकऱ्याला पण बळीराजा म्हणतात. त्याने पिकवलेल्या धान्यावर सर्व समाजाचं जीवन अवलंबून असतं. शेतकरी सुद्धा दानशूर असतो. खेडेगावात शेतकऱ्यांच्या सहवासात राहिल्यावर, तो किती दिलदार आणि दानशूर आहे हे कळतंं. आणि खरोखरच तो “बळीराजा” असल्याची प्रचिती येते.

पाडव्याच्या दिवशी देवी सरस्वतीचं पूजन करतात.तसेच वह्या-पुस्तकांची पूजा करतात.देवी सरस्वतीच्या कृपेनं विद्यावैभव लाभावं आणि ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा अखंड राहावी.हीच मनोकामना असते.

दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज. सासरी गेलेल्या बहिणींनी हा दिवस भावासाठी राखून ठेवलेला असतो. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. भावाला ओवाळून त्याला दीर्घायुष्य, आरोग्य, संपदा यासाठी देवाकडं मागणं मागते. समाजात अशा कितीतरी बहिणी, नोकरीच्या ठिकाणी सहकारी म्हणून भेटतात. त्यासुद्धा आपल्या मानलेल्या भावासाठी देवाकडं मागणं मागतात. आणि भाऊ सुद्धा सगळ्या बहिणींना भरभरून प्रेम देत असतो. आपल्या जीवनात प्रसन्नता येण्यासाठी अशी नाती जपली पाहिजेत.

अशी ही चार-पाच दिवसांची दिवाळी. फक्त लाडू, चिवडा, चकली, करंजी खाणं म्हणजे दिवाळी नव्हे. जीवनातले क्षण आनंदी होण्यासाठी, फक्त पैसा-अडका महत्त्वाचा नाही, हे ती दिवाळी शिकवते. त्यासाठी सगळ्या प्राणीमात्रावर प्रेम करता आलं पाहिजे. शरीर हे परमेश्वरानं दिलेला ‘प्रसाद’ आहे.तो वाया न घालवता, त्याचा नीट सांभाळ करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यासाठी शरीर-मन-बुद्धी सगळं शुद्ध ठेवलं पाहिजे. समाज म्हणजे एक कुटुंबच आहे. कुटुंब सोबत असेल तरच आनंदानं जगता येतं.त्या सर्वांच्या बरोबर सुखदुःखात,सगळ्या प्रसंगात एकत्र राहता आलं की, ही दिवाळी चार-पाच दिवसांची दिवाळी न राहता, ती “दिन दिन दिवाळी” होणार हे नक्की.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading