July 11, 2025
"Book cover of 'Samaj Ani Madhyam' by Dr. Alok Jatratkar with launch event at Kolhapur’s Rajarshi Shahu Hall"
Home » समाजभान बाळगणाऱ्या पत्रकाराचा प्रत्यय
मुक्त संवाद

समाजभान बाळगणाऱ्या पत्रकाराचा प्रत्यय

जत्राटकर नेहमी ‘नाही रे’च्या बाजूने विषयाचा शोध घेत, भांडवलशाहीचे समर्थन करणारे गरिबांना पुन्हा खोल दरीत कसे ढकलत आहेत, याचे आकलन मांडतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमांनी नातेसंबंधांत जटिल प्रश्न निर्माण केले आहेत. या प्रश्नांचा साक्षेपी वेध जत्राटकर यांनी घेतलेला आहे. हा शोध घेत असताना या माध्यमांचा सर्जक उपयोग करता येऊ शकतो, हे भानही त्यांनी आपल्या लेखनात बाळगलेले आहे. भारतासारख्या देशात भ्रामक मायाजाल माध्यमे कशी पसरवू शकतात, याचा विचारही त्यांनी अत्यंत गंभीरपणे केलेला आहे.

डॉ. राजन गवस

डॉ. आलोक जत्राटकर हे अत्यंत संवेदनशील, विवेकी आणि स्वतंत्र दृष्टी असणारे माध्यमकर्मी आहेत. या क्षेत्रात त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधन केले असून त्यांच्या संशोधनास व्यापक पातळीवर मान्यताही मिळालेली आहे. त्यांनी अनेक नियतकालिकांतून व प्रसारमाध्यमांतून विविधांगी कामगिरी केलेली आहे. स्तंभलेखक म्हणूनही ते मान्यताप्राप्त आहेत. अशा व्यासंगी व अभ्यासू जत्राटकर यांनी ‘समाज आणि माध्यमं’ हे महत्त्वाचे लेखन केलेले आहे. हे संपूर्ण लेखन त्यांच्या चिंतनशीलतेचा आणि समाजभान बाळगणाऱ्या पत्रकाराचा प्रत्यय देतात. त्यांच्या या ग्रंथात त्यांनी माध्यमांविषयी आणि समाजाविषयी अत्यंत सजगपणे आपले विचार प्रकट केले आहेत.

या ग्रंथात एकूण २५ लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे पंचवीस लेख वेगवेगळ्या विषयांचा परामर्श घेणारे आहेत. असे असले तरी, या सर्व लेखांचे आशयसूत्रानुसार वर्गीकरण करायचे झाल्यास काही लेख विश्वव्यापी माध्यमांतराचा शोध घेणारे आहेत; तर, काही लेख सोशल मीडियातील उलाढालींचा शोध घेणारे आहेत. सोशल मीडियामुळे समाजात निर्माण झालेल्या विविध गुणदोषांची उकल करणारे आहेत. या सर्व लेखांतून एकच एक असे सूत्र न गिरवता, विविध आशयसूत्रे आणि उप-आशयसूत्रे यामुळे एकांगी मांडणी न होता तिला एक भरघोसपण उपजतच प्राप्त होते. या सर्व लेखांतून त्यांचा समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि सांस्कृतिक उलाढाली यांचा असणारा व्यासंग आपल्याला थक्क करून टाकतो. कोणत्याही गोष्टीकडे एकांगीपणे न पाहता समग्र दृष्टीने त्याचा वेध घेणे, आलोक जत्राटकर यांना महत्त्वाचे वाटते. पूर्वग्रह न बाळगता अभ्यासविषयाकडे तटस्थ आणि संदर्भासहित पाहण्याची दृष्टी त्यांना लाभलेली आहे, याचा प्रत्यय हे सर्व लेख देतात.

जत्राटकर प्रारंभीच्या काही लेखांतून माध्यमक्रांतीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, विश्वव्यापी माध्यमांतर हे लेख याची साक्ष देतात. भारतासारख्या विकसनशील देशात ही माध्यमक्रांती झाल्यानंतर कोणते बदल झाले, याचा समूळ ऊहापोह ते या ठिकाणी करतात. ज्या देशात मानवी संपत्ती विपुल प्रमाणात आहे, अशा देशात जेव्हा माध्यमक्रांती होते, तेव्हा निर्माण होणारे प्रश्न त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. गरिबीने गांजलेल्या देशात जेव्हा डिजीटल माध्यमे येतात, तेव्हा निर्माण होणारे गुंते अनाकलनीय होऊन जातात. भारतासारख्या देशात जेव्हा अशा स्वरूपाची माध्यमे येतात, तेव्हा त्याचे परिणाम कमालीचे व्यामिश्र स्वरूपाचे असल्याचे दिसते. या सर्व व्यामिश्र वास्तवाचा उभा-आडवा छेद जत्राटकर घेतात. भारतासारख्या विकसनशील देशात तंत्रज्ञान विकासाला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास प्रारंभी सर्वांनाच वाटत होता. पण, या माध्यमांच्या आगमनानंतर आपल्या देशाच्या विकासाला खरोखरच हातभार लागला का, हा गंभीरपणे विचारात घेण्याचा मुद्दा आहे.

अत्यंत सूचकपणे जत्राटकर या प्रश्नाचा शोध घेतात आणि संपूर्ण ग्रंथात याबाबतची अभ्यासू मांडणी करतात. सोशल मीडियातील सर्वाधिक वावर हा पौगंडावस्थेतील विशी-पंचविशीतील तरुणांचा आहे. हा वावर कोणते गुंते निर्माण करतो आहे, याचे सहजसूचन जत्राटकर यांनी केलेले आहे. फेसबुक गेल्या दोन दशकांत आपल्यासारख्या गरीब देशांत काय धुमाकूळ घालते आहे, याचाही या ग्रंथकर्त्याने सूक्ष्म वेध घेतलेला आहे. ज्या देशात भाकरीचा प्रश्न गंभीर आहे. बेरोजगारांचे थवेच्या थवे सर्वदूर पसरलेले आहेत, अशा देशात फेसबुकचे जग कोणते भ्रम निर्माण करते आहे, याचा शोधही जत्राटकर यांनी घेतलेला आहे. हे सर्व शोधत असताना त्यांची शोधक दृष्टी सूक्ष्मातिसूक्ष्म होते आणि विविध तपशील निवडक पद्धतीने वाचकासमोर ठेवते.

जत्राटकर नेहमी ‘नाही रे’च्या बाजूने विषयाचा शोध घेत, भांडवलशाहीचे समर्थन करणारे गरिबांना पुन्हा खोल दरीत कसे ढकलत आहेत, याचे आकलन मांडतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमांनी नातेसंबंधांत जटिल प्रश्न निर्माण केले आहेत. या प्रश्नांचा साक्षेपी वेध जत्राटकर यांनी घेतलेला आहे. हा शोध घेत असताना या माध्यमांचा सर्जक उपयोग करता येऊ शकतो, हे भानही त्यांनी आपल्या लेखनात बाळगलेले आहे. भारतासारख्या देशात भ्रामक मायाजाल माध्यमे कशी पसरवू शकतात, याचा विचारही त्यांनी अत्यंत गंभीरपणे केलेला आहे.

कोरोना काळात ‘ऑनलाइन एज्युकेशन’ हा शब्द परवलीचा बनला. याबाबत विविधांगी चर्चा सुरू झाल्या. ऑनलाइन एज्युकेशन हे कसे फायद्याचे आहे आणि शिक्षणात क्रांती करणारे आहे, असे हिरीरीने मांडणारे बरेच तज्ज्ञ सगळ्या समाजात बोकाळले होते. त्यांनी ऑनलाइन एज्युकेशनमुळे आता वर्ग अध्यापनात क्रांती होणार, शिक्षकांची गरज संपणार, अशा स्वरूपाची विधाने सरसकट करून हैदोस घातला, ऑनलाइन एज्युकेशनचा गौरव करणाऱ्या लोकांना या देशात गोरगरीब, शेतकरीही राहतात, भटके-विमुक्त, दलित, शोषित वर्ग येथे जगतो, याचे यत्किंचितही भान नव्हते. या विषयाचा समग्र शोध व्यापक पातळीवर आलोक जत्राटकर यांनी घेतलेला आहे. ऑनलाइन एज्युकेशनचे फायदे आणि तोटे त्यांनी एका छोट्याशा लेखात सूक्ष्मपणे मांडले आहेत. जत्राटकर यांच्या लेखनाचे विशेष हे आहे की, ते विषयाची समग्र मांडणी करतात; पण, त्याबरोबरच सहजसुंदर भाषेचा वापर करून कोणत्याही वर्गातील वाचकाला आशय अवगत होईल, याची काळजी घेतात. त्यासाठी शब्दनिवड करताना ते विशेष जागृत असतात, याची साक्ष त्यांचे सर्वच लेख देतात. संशोधनासाठी डिजीटल क्रांती कशी उपकारक ठरली आहे, याची मांडणी त्यांनी एका लेखात केली आहे; पण, या डिजिटल क्रांतीमुळे संशोधनातील गडबड घोटाळे आणि उथळपणा याकडे जाणे त्यांनी हेतूतः थांबवलेले आहे. व्यावसायिक जबाबदारीच्या मर्यादा त्यांना या ठिकाणी निर्बंध घालत असाव्यात, असे वाटते.

डिजीटल क्रांतीने भारतातील सर्वच व्यापारविश्वाला कसे व्यापलेले आहे, याचेही चित्रण त्यांनी आपल्या लेखांतून केलेले आहे. डिजीटल क्रांतीमुळे व्यापाराचे स्वरूपच बदलून गेले असल्याचे ते सुचवतात. ऑनलाईन मार्केटिंगमुळे छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांच्या जीवनात आलेल्या संकटाचे स्वरूपही किती भयावह आहे, याचे सूचन ते आपल्या लेखनातून करतात. माध्यमक्रांतीने व्यापारक्रांती केली आहे, हे खरे असले तरी या व्यापाराचे स्वरूप बदलले असून त्यांनी माणसाच्या मानसिकतेचा पुरता बोजवारा उडवलेला आहे, याचे सूचनही जत्राटकर करतात. माणसाचे वस्तूत होणारे रूपांतर किती भयावह स्वरूपाचे आहे, याचे दर्शनही सहजपणे या लेखातून आपल्याला होते. प्रचंड भांडवली गुंतवणुकीच्या आधारावर आपले जाळे देशभरात विणणे, त्यासाठी आवश्यक त्या सर्व साम-दाम-दंड-भेद नीतींचा अवलंब करणे आणि स्थानिक व्यावसायिकांचा जीव घेणे हे या संपूर्ण ऑनलाइन डिजिटल मार्केटिंगचे सत्य अस्वस्थ करणारे आहे. जत्राटकर यातील साम्राज्यवादी वृत्तीचा सखोलपणे शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या परीने करतात.

या सर्व बदलत्या प्रसारमाध्यम क्रांतीने माणसाच्या जगण्यात कोणकोणते बदल घडवले आहेत, याचा शोध प्रस्तुत लेखक सखोलपणे घेतो. माणसा-माणसांत निर्माण झालेले अंतर, माणसाची संवेदनाहीन वृत्ती, नात्यातील निर्माण झालेली दरी, जगण्यातील हरवलेले समाधान, दुभंगलेले मानसिक जग आणि यातून निर्माण झालेल्या विविध विकृती या सर्वांमुळे आपले सामाजिक अस्तित्वच पोखरले जाते आहे. समाज म्हणून आपले असणारे समाजजीवन लोप पावत आहे. याचे भानही वाचकांना देण्यासाठी जत्राटकर विविध तंत्रांची योजना आपल्या लेखनात करतात. या माध्यम क्रांतीमुळे राजकारण कसे बदलले आहे आणि कडेलोटाच्या टोकावर उभे आहे, याचे चिकित्सक दर्शन जत्राटकर यांनी घडवलेले आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारे नेता होता येते, याचे एक नवीन दर्शन संपूर्ण भारताने अनुभवले आहे. भारतात झालेले सत्तांतर हे माध्यमक्रांतीचे अपत्य आहे. राजकारणात माध्यमक्रांतीने कोणते बदल घडवले, याचे सूचन जत्राटकर करतात. याबरोबरच या माध्यमक्रांतीने कोणत्या लैंगिक समस्या नव्याने उभ्या केल्या आहेत, याचा वेधही ते आपल्या लेखनातून घेतात. या माध्यमाने संपूर्ण समाज आणि समाजाची नैतिकता यामध्येच हस्तक्षेप करून प्रचंड ढवळाढवळ सुरू केली आहे, याचे स्वरूपही या ग्रंथात मांडले गेले आहे. जागतिकीकरण, प्रसारमाध्यमे आणि कुटुंबव्यवस्था यांचा एकत्रित विचार या ग्रंथात वेळोवेळी केलेला आहे. सर्व ग्रंथभर याबाबतची मांडणी आपल्याला सापडते. प्रसारमाध्यमांचे भवितव्य काय असेल, याबाबतही जत्राटकर यांनी गंभीरपणे मांडणी केलेली आहे.

हा एकूण ग्रंथ माध्यमक्रांती आणि भारत याबाबत व्यापक मांडणी करतो. भारतीय समाज व्यवस्था, या समाज व्यवस्थेची नैतिक मूल्ये, या समाज व्यवस्थेचा अर्थव्यवहार, सांस्कृतिक व्यवहार, राजकारण याबरोबरच या समाजातील स्त्रीची असणारी शोषित अवस्था, लहान मुलांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्था, संशोधनाचे क्षेत्र, कृषी क्षेत्र, याबरोबरच दलित, पीडित, शोषित समाज या साऱ्यांना आपल्या आस्थेच्या कवेत घेऊन जत्राटकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. व्यासंग, संदर्भांची योग्य निवड, तपशील याबाबतची जागरूकता आणि पूर्वग्रहाला कुठेही थारा न देता तटस्थ अभ्यासक म्हणून जत्राटकर ही सगळी मांडणी करतात. ती करत असताना आवश्यक ते परिश्रम घेण्यात त्यांनी कोठेही टाळाटाळ केलेली नाही.

सहजसुलभ भाषा, छोट्या छोट्या वाक्यांची निर्मिती, त्यातून निर्माण होणारी लय त्यांच्या लेखनाला समृद्धता प्राप्त करून देते. जत्राटकर अभ्यासक म्हणून या क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे. त्याबरोबरच ललित लेखनातही त्यांनी स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या लेखनाला उपजत लाभलेले लालित्यबळ अधिक गुणवत्ता प्राप्त करून देते. अशा अभ्यासकाला आपल्या समाजात आज तरी फार काही किंमत उरलेली आहे, असे दिसत नाही. त्यामुळे जत्राटकर यांची होणारी ससेहोलपट मी माझ्या डोळ्याने पाहात असलो, तरी उद्याचा एक अभ्यासक, महत्त्वाचा माध्यमकर्मी आणि चांगला लेखक मला आश्वासित करतो. त्यामुळे जत्राटकर यांचे भवितव्य उज्वल आहे, याची साक्ष हे संपूर्ण लेखन देते. म्हणूनच मला ते गंभीर, व्यासंगी आणि तटस्थ अभ्यासक म्हणून महत्त्वाचे वाटतात.

पुस्तकाचे नाव – समाज आणि माध्यमं
लेखक – डॉ. आलोक जत्राटकर
प्रकाशक: अक्षर दालन, कोल्हापूर
पृष्ठे – १८४
किंमत: रु. ३००/-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading