आज घरातील गॅस संपला किंवा घरातील विद्युत शेगडीसाठीचा विद्युत पुरवठा खंडीत झाला तर… घरात पीठ, मीठ, साखर, तांदूळ, भाजी सारे काही आहे. मात्र शिजवायला अग्नी नसेल तर… कच्चे अन्न खावे लागेल. पहा थोडी कल्पना करून, आपल्याला शक्य होईल का ते? मात्र आपले पूर्वज असेच कच्चे अन्न खात. आज जी खाद्यसंस्कृती विकसीत झाली आहे, त्यामध्ये अग्नीचे स्थान अनन्यसाधारण आहे. अग्नी पूर्वीपासून होता. पुढे आपण केवळ त्याला नियंत्रीत केले आणि त्याने आपले विश्व बदलले.
डॉ. व्ही. एन. शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पंचमहाभूतातील एक अग्नी. भारतीय संस्कृतीत संपूर्ण अवकाशात पाच मूलभूत घटक मानण्यात आले होते. त्यांना पंचमहाभूते असे म्हणत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश ही ती पंचमहाभूते. मानवी शरीरासह संपूर्ण सृष्टीची निर्मिती या पाच घटकांपासून झाल्याचे मानले जाते. त्यांचे परस्परात रूपांतर होते, असे मानले जात असे. ही पंचमहाभूते परस्परांशी पाच संवेदनानी जोडण्यात आली आहेत. आवाज, स्पर्श, दृष्य, चव आणि वास या त्या पाच संवेदना होत. पृथ्वीपासून या पाचही संवेदनांची अनुभूती मिळते. त्यामुळे पृथ्वी सर्वात सामर्थ्यवान मूलद्रव्य मानले जाते. त्यानंतर सामर्थ्यवान पाणी. पाण्याला वास नाही. मात्र आवाज, स्पर्श, दृष्य, आणि चव या चार संवेदनाची अनुभुती पाण्यापासून मिळते. पुढचा क्रमांक अग्नीचा. अग्नीपासून चव आणि वास या संवेदनांची अनुभुती मिळत नाही. मात्र आवाज, स्पर्श, दृष्य यांची अनुभुती अग्नीपासून मिळते. हवेपासून स्पर्श आणि आवाजाची अनुभुती मिळते, तर आकाशातून केवळ ध्वनी येतो. या पंचमहाभुतातील एक अग्नी. तिसऱ्या क्रमांकाचे सामर्थ्यवान मूलद्रव्य किंवा घटक.
निसर्गात सुरुवातीपासून अग्नी अस्तित्वात होता. मात्र अगदी सुरुवातीला मानवाची अवस्था अन्य प्राण्याप्रमाणेच होती. आज जसे काही प्राणी, जीव आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात, अगदी तसेच जंगलात राहणारे आपले पूर्वज, आदिमानव जंगलातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असतील. सुरुवातीला आकाशातून, ढगाच्या घर्षणातून निर्माण झालेल्या वीजेमुळे आग लागत असे. वाळलेल्या लाकडांचे एकमेकांवर घर्षण होऊनही आग लागून ती जंगलात पसरत असे. आग बेकाबू असल्याने इतर प्राणी आणि पक्षी जसे आपला अधिवास सोडून पळू लागतात, अगदी तशीच मानवाची अवस्था होती. आग आजही बेकाबू होते, मात्र मानवाने तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच अंशी यश मिळवले आहे.
मानवाने वीस लाख ते अडीच लाख वर्षांपूर्वी दोन पायावर चालायला सुरुवात केली, असे संशोधकांचे मत आहे. पंधरा ते दहा लाख वर्षांपूर्वी थंडीपासून उब मिळवण्यासाठी मानवाने अग्नीचा वापर सुरू केला असावा. त्या काळात मानवाला अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा वापर करण्याचे तंत्रही अवगत नव्हते. मूळात अग्नीमध्ये भाजून अन्न खाण्याची कल्पना मानवाला अपघातातून आली असावी. म्हणजे एखाद्या वणव्यानंतर खाण्यासाठी अर्धवट जळालेले प्राण्यांचे मांस आणि भाजलेली कंदमुळेच शिल्लक राहिली. नाईलाजाने तसे अर्धवट जळालेले प्राणी आणि कंदमुळे खाल्ली. त्यावेळी खाणे सोपे आणि चविष्ट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अग्नीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातूनच केलेली शिकार भाजून खाणे आणि कंदमुळेही भाजून खाणे सुरू झाले असावे. ही मानवी संस्कृती विकासाची सुरुवात होती. आपल्या जिभेच्या आनंदासाठी अग्नी उपयुक्त ठरतो, हे लक्षात आल्यानंतर अग्नीवर नियंत्रण मिळवण्याचा मानवाने सातत्याने प्रयत्न केले.
अगदी सुरुवातीला वारंवार लागणाऱ्या वणव्यावर मानवाला नियंत्रण मिळवणे, शक्य नव्हते. मात्र गारगोटी एकमेकांवर घासून अग्नी प्रज्वलीत करण्याचे आणि त्या ठिणग्या शेवरी, कापूस यावर घेऊन अग्नी प्रज्वलीत करण्याचे तंत्र विकसित करण्यात मानवाला यश मिळाले. हा पाषाण युगाचा अखेरचा कालखंड होता. या काळात मानवाने शेती आणि पशूपालनास सुरुवात केली होती. या वणव्यांमुळे त्या कालखंडामध्ये वातावरणामध्ये वाढलेला ऑक्सिजन आणि लाकूड गवत यांचे प्रमाण नियंत्रित होत असे. मानवाच्या दोन पायांवर चालण्याच्या युगातच अग्नीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात मानवाला यश मिळाले, असे मानले जाते. ज्वालामुखीतून निर्माण झालेली आग आणि आकाशातून पडलेल्या वीजेमुळे लागणाऱ्या अग्नीवर १० ते २० लाख वर्षापूर्वी प्रथम नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.
पुढे अनेक वर्षे अग्नी निर्माण करण्यासाठी दोन दगडांचे घर्षण करण्यात येत असे. त्यातून हवा तेव्हा हवे तेथे अग्नी प्रज्वलीत करणे सोपे नव्हते. मात्र सतराव्या शतकांपर्यंत अग्नी असाच प्रज्वलीत करत. सतराव्या शतकामध्ये, सन १६६९ मध्ये जर्मन संशोधक हिनंग ब्रँड यांनी फॉस्फरसचा शोध लावला. तरीही, आजही सर्वांच्या परिचयाची असणारी आणि घराघरामध्ये आढळणारी आगकाडी शोधायला एकोणिसावे शतक उजाडावे लागले कारण फॉस्फरसला स्थीर ठेवणे कठीण होते. या पदार्थाचा वापर करून लोक सोने बनवतील म्हणून ब्रँड यांनीही अनेक वर्षे फॉस्फरसचा शोध गुप्त ठेवला. पुढे रॉबर्ट बॉईल या संशोधकाने गंधक आणि फॉस्फरस एकमेकांवर घासून अग्नी प्रज्वलीत करता येतो, याचा शोध लावला. तरीही पुढे दिडशे वर्षे रसायनांचा उपयोग करून अग्नी प्रज्वलीत करण्याचे तंत्र विकसीत करावे, असे संशोधकांना वाटले नाही.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच पॉटेशियम क्लोरेट, साखर आणि डिंक यांचे मिश्रण सल्फ्युरिक आम्लात टाकले तर अग्नी प्रज्वलीत होतो, हे लक्षात आले. मात्र ही पद्धत फारच धोकादायक होती. पुढे आगकाडीचा शोध अपघाताने लागला. सन १८२७ साली एक डॉक्टर जॉन वॉकर प्रयोगशाळेत प्रयोग करत होता. तसे वॉकर डॉक्टर असले तरी त्यांना रसायनशास्त्रात मोठी रूची होती. त्यांनी एका पात्रात अँटीमनी सल्फाईड, पॉटेशियम क्लॉरेट, स्टार्च आणि डिंक यांचे मिश्रण करून ठेवले होते. ते घुसळण्यासाठीची काठी त्या भांड्यातच राहिली. थोड्या वेळात काठीभोवती त्या मिश्रणाचा गोळा तयार झाला. तो काढण्यासाठी त्यांनी त्या गोळ्याला घासले आणि गोळ्याने पेट घेतला. …आणि आगकाडीचा शोध लागला.
जॉन वॉकरच्या लक्षात या शोधाचे महत्त्व आले. त्यांनी तीन इंच लांबीच्या ५० आगकाड्या आणि त्या घासण्यासाठी एक कागदाचा तुकडा एका पेटीत भरून, अशा पेट्या पुस्तकाच्या दुकानात विक्रीला ठेवल्या. तत्काळ अग्नी मिळवण्याची ही पद्धत लवकरच लोकप्रिय झाली. या शोधाचे स्वामित्व हक्क मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र वॉकर यांनी हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले ठेवले. पुढे फॉस्फरसचा वापर करून १८५५ मध्ये जोहान एडवर्ड लुंडस्ट्रॉमनी आज वापरात असलेल्या आगपेट्या तयार केल्या. पुढे लायटरचाही शोध लागला. हाच अग्नी आज आपल्या संस्कृती, सवयीचा भाग बनला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
