कधीच मोठा न होणाऱ्या मुलाच्या नजरेतून, ‘साँग्ज ऑफ अॅडम’ हा चित्रपट एका देशाच्या आत्म्याचे प्रतिबिंब दाखवतो
IFFIWood – ‘साँग्ज ऑफ अॅडम’, ‘स्किन ऑफ युथ’ आणि ‘के पॉपर’ या चित्रपटांचे कलाकार आणि इतर संबंधित मंडळींनी त्यांच्या चित्रपटांना आकार देणाऱ्या व्यक्तिगत, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रेरणांविषयी लक्षवेधक विचार सामायिक केले. या पत्रकार परिषदेने कथाकथनाची खोली, चित्रपटनिर्मितीतील आव्हाने आणि पडद्यावर व्यक्त झालेले सशक्त विचार अधोरेखित केले.
“साँग्ज ऑफ अॅडम”: स्मृती आणि संक्रमणाधीन देश यांना वाहिलेले एक जादुई-वास्तववादी कवन
सह-निर्माता आसमा रशीद यांनी साँग्ज ऑफ अॅडम या चित्रपटाचे अत्यंत जिव्हाळ्याचे उगमस्थान सामायिक केले. हा प्रकल्प वर्षानुवर्षे जोपासण्यात आला आणि त्याचे मूळ दिग्दर्शकाला बालपणी सहन कराव्या लागलेल्या वैयक्तिक हानीमध्ये रुजलेले आहे.
“आम्ही या चित्रपटावर तीन वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. दिग्दर्शकासाठी या चित्रपटाचा विषय अत्यंत व्यक्तिगत आहे – त्यांना त्यांच्या आजोबांचा मृत्यु झाल्यानंतर, वयाच्या 12 व्या वर्षी ही कल्पना सुचली,” ते म्हणाले. मेसोपोटेमियाने या कथेसाठी विशाल आणि सुपीक भूमी उपलब्ध करून दिली, आणि कथेत जे उलगडत जाते ते त्या कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या लहान मुलाच्याही पलीकडे जाऊन पोहोचते. ही कथा इराकने अनुभवलेल्या सामाजिक परिवर्तनांचे प्रतिबिंब दाखवते,” आसमा पुढे म्हणाले.
त्यांच्या शब्दांतून चित्रपटाची भावनिक खोली दिसून येते –जेथे कालातीतता, दंतकथा आणि राष्ट्रीय इतिहास एकमेकांच्यात गुंफलेले आहेत असे शब्द
चित्रपटाची थोडक्यात माहिती
इराक | 2025 | अरेबिक | 97’ | रंगीत
साँग्ज ऑफ अॅडम ही कथा 1946 मध्ये मेसोपोटेमिया मध्ये घडते आणि ती अॅडम या 12 वर्षांच्या मुलावर केंद्रित आहे. आजोबांच्या दफनविधीचा साक्षीदार असलेला हा मुलगा कधीच मोठे न होण्याची शपथ घेतो. चमत्कारिकरित्या, इतर सर्वजण वृद्धत्वाकडे झुकले तरी हा मुलगा लहानच राहतो. शापाच्या भीतीने त्याचे वडील त्याला इतरांपासून वेगळे करतात आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे त्याच्या कालातीत उपस्थितीशी झुंजतात. इराक देश 1950 च्या बंडापासून आताच्या समकालीन युद्धांपर्यंत अनेक उलथापालथींना तोंड देत असताना, अॅडम एक गूढ व्यक्तिमत्त्व बनतो. जादुई वास्तववादाच्या माध्यमातून हा चित्रपट त्या मुलाचे दैवी तारुण्य आणि प्रवाहाच्या ओघात असलेले राष्ट्र यांच्यातील विरोधाभासाचा शोध घेतो आणि त्याला अविरत होत राहणाऱ्या बदलांच्या वातावरणात आठवण, नुकसान आणि स्थैर्याची इच्छा यांचे मार्मिक रूपक बनवते.
“स्किन ऑफ युथ”: ट्रान्सजेंडर व्यक्तीची ओळख, प्रेम आणि लवचिकता यांचे प्रेममय व्यक्तिचित्र
केवळ एक चित्रपट नव्हे तर स्मरण आणि स्नेहाची कलाकृती अशा शब्दात लेखक आणि दिग्दर्शक ऍशले मेफेअर यांनी ‘स्किन ऑफ युथ’ चे वर्णन केले.
“ही अत्यंत व्यक्तिगत कहाणी आहे. आम्ही तीन भावंडे आहोत आणि माझे सर्वात लहान भावंड ट्रान्सजेंडर आहे. हा चित्रपट तिच्या प्रवासाचा – तिचा सन्मान, तिचे हक्क, तिचे भय आणि तिची स्वतःची ओळख यांचा शोध घेतो. तिची ही कहाणी ट्रान्सजेंडर समुदायातील अनेकांना स्वतःचीच कहाणी वाटेल,” त्यांनी ठामपणे सांगितले.
या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री व्हॅन क्वान ट्रॅन हिने दृश्यमानतेच्या निकडीबाबत प्रांजळपणे मत व्यक्त केले.
“चित्रपटांच्या विश्वात ट्रान्सजेंडर समुदायाबद्दल फारसे चित्रपट निर्माण झालेले नाहीत, आणि त्या समुदायाची स्थिती अजूनही कठीण आहे. आपला समाज ट्रान्सजेंडर लोकांच्या अस्तित्वाची किंमत ओळखायला शिकेल, अशी मला आशा आहे. या चित्रपटात दाखवलेल्या कहाणीसारखी प्रत्येक कहाणी हे त्या मान्यतेच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे,” त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत सांगितले.
त्यांच्या या विचारांनी चित्रपटनिर्मितीमागील हेतू अधोरेखित केला: मानवीकरण करणे, प्रकाशमान करणे आणि मौनाला आव्हान देणे
चित्रपटाची थोडक्यात माहिती
व्हिएतनाम, सिंगापूर, जपान | 2025 | व्हिएतनामी | 122’ | रंगीत
1990च्या सुमाराच्या सायगावमध्ये घडणारी या चित्रपटाची कथा लिंगबदल शस्त्रक्रिया करू इच्छिणारा सॅन नामक वेश्या आणि मुलाला वाढवण्यासाठी भूमिगत केज फायटिंग करणारी नाम यांच्यातील उत्कट प्रेमाचा शोध घेते. सॅन ने स्त्री म्हणून जगण्याचा निर्णय घेतला आहे तर तिच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवण्याच्या उद्देशाने नाम अनेक क्रूर लढायांना लढते. त्यांच्या नात्याची किंमत मोजावी लागेल असे हिंसक भूमिगत विश्व, सामाजिक पूर्वग्रह आणि दुष्ट शक्तींचा सामना करताना, त्यांच्या प्रेमाला अनेक कठोर आव्हानांना तोंड द्यावे लागते
“के पॉपर”: स्वप्ने आणि समर्पिततेची हृदयंगम बहुपिढीजात कथा
के पॉपर हा चित्रपट पिढ्यानपिढ्यांमधील उत्कट आवड कशा प्रकारे एखाद्याची ओळख घडवते हे वैश्विक सत्य अचूक पकडतो ते निर्माते सज्जाद नस्रोल्लाही नसब यांनी स्पष्ट करून सांगितले.
“संगीत, गेम्स किंवा पॉप संस्कृती यांच्याप्रती समर्पित होणाऱ्या एका पिढीविषयी या चित्रपटात भाष्य केले आहे,” ते म्हणाले. “हा चित्रपट तीन वेगवेगळ्या पिढ्या आणि त्यांच्यातील फरक यांचे चित्रण करतो. त्या सगळ्यांसमोर उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांचे देखील तो दर्शन घडवतो. आम्हाला देखील चित्रपट तयार करताना जोरदार बर्फवृष्टीत चित्रण, दुर्गम खेड्यांमध्ये काम करणे अशी आमच्या वाटणीची आव्हाने झेलावी लागली. पण त्यामुळे कथेच्या सच्चेपणात भरच पडली.”
के पॉपर हा चित्रपट शेवटी जागतिक गोष्टींचे प्रभाव कुटुंब, परंपरा आणि आकांक्षांच्या अंतर्गत वास्तवतांना कसे पूर्ण करतात याचे स्मरण करून देतो
चित्रपटाची थोडक्यात माहिती
इराण | 2025 | पर्शियन | 84’ | रंगीत
इराणमधील एक किशोरवयीन मुलगी कोरियातील लोकप्रिय के-पॉप गायकाच्या प्रेमात पडली आहे. त्याला कार्यक्रम सादर करताना प्रत्यक्ष पाहण्यासाठी तिला सेऊलला जायचे आहे तसेच त्या स्पर्धेत देखील भाग घ्यायचा आहे. स्पर्धेत तिची निवड झालेली आहे, मात्र तिची आईला आपल्या मुलीने तिकडे जावू नये असे वाटते, त्यामुळे मुलीच्या जाण्याला तिचा विरोध आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
