मुंबई कॉलिंग –
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मते मोठ्या प्रमाणावर मिळाली. ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल प्रेम म्हणून नव्हे तर भाजपला विरोध म्हणून मुस्लिम व्होट बँक ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधुंच्या युतीमुळे मराठी मतदार मोठ्या संख्येने उबाठा सेना व मनसे यांना मतदान करण्याची शक्यता आहे. मराठी आणि मुस्लिम मतदार ठाकरे बंधुंकडे मोठ्या संख्येने आकर्षित झाले तर भाजपचे समिकरण बिघडण्याची शक्यता आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असली तरी सर्व देशाचे लक्ष सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. मुंबईवर सुरूवातीच्या काळात काँग्रेस पक्षाचे अनेक महापौर झाले. शिवसेना फोफावल्यापासून शिवसेनेचा मुंबईवर महापौर आहे. काँग्रेसच्या काळात गुजराती आणि हिंदी भाषिकही मुंबईचे महापौर झाले पण त्यावेळी मराठी- अमराठी असा वाद निर्माण झाला नव्हता. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा सेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाल्याने सर्वाधिक शक्तिशाली असलेली भाजप काहीशी गोंधळून गेली आहे. मुंबई महापालिकेवर आजवर भाजपचा महापौर झालेला नाही. शिवसेना्प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना व भाजप यांची युती होती, पण पंचवीस वर्षाच्या युतीच्या काळात मुंबईचे महापौरपद कधीच भाजपला मिळाले नाही. ठाकरेंची शिवसेना कमजोर केल्याशिवाय मुंबईत आपले लक्ष्य साध्य होणार नाही हे भाजपने ओळखले होते. जून २०२२ मधे शिवसेनेत मोठी तोड फोड करण्यात भाजपला यश मिळाले. म्हणूनच येत्या निवडणुकीनंतर मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असा चंग पक्षाने बांधला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मते मोठ्या प्रमाणावर मिळाली. ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल प्रेम म्हणून नव्हे तर भाजपला विरोध म्हणून मुस्लिम व्होट बँक ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधुंच्या युतीमुळे मराठी मतदार मोठ्या संख्येने उबाठा सेना व मनसे यांना मतदान करण्याची शक्यता आहे. मराठी आणि मुस्लिम मतदार ठाकरे बंधुंकडे मोठ्या संख्येने आकर्षित झाले तर भाजपचे समिकरण बिघडण्याची शक्यता आहे. म्हणूनच भाजपने महामुंबईत आपल्या हल्ल्याचा नेम ठाकरे बंधुंवर धरला आहे. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी अस्मिता या मुद्द्यावर ठाकरे बंधू निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. महामुंबईतील मराठी मतदार विचलित करायचा असेल तर मराठीच्या मुद्यावरूनच ठाकरे बंधुंना जाब विचारण्याची रणनिती भाजपने आखली आहे.
उबाठा सेना व मनसे यांची युती मुंबई महापालिकेत सत्तेवर आली तर मुंबईचा महापौर कुणीतरी खान होईल, अशी भिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनीच मुंबईकरांना घातली आहे. सत्तेवर आलो तर आमचा महापौर कोण होणार हे ठाकरे बंधुंनी जाहीर करावे असे आव्हान ते रोज देत आहेत. प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी तर मीरा- भाईंदर येथे बोलताना, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होईल असे जाहीर करून टाकले. ठाकरे बंधुंवर टीका करताना एकाने खान महापौर होईल म्हणायचे दुसऱ्याने उत्तर भारतीय महापौर होईल म्हणून सांगायचे. ठाकरें बंधुंना चिडविण्यासाठी भाजपा अशी खेळी खेळत आहे.
मुंबई आणि महामुंबईतील महापालिका निवडणुकांचा प्रचार मराठीच्या मुद्यावर फिरत राहिला तर अमराठी मते भाजपकडे ठामपणे राहतील आणि मराठी मतांचेही विभाजन होईल असे गणित आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम व महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण , तसेच मुंबई व महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख अनुक्रमे आशिष शेलार व चंद्रशेखर बावनकुळे हे सर्व मराठी असताना मुंबईचा महापौर खान किंवा उत्तर भारतीय होईल ही पुडी कशासाठी सोडली जात आहे ? भाजपच्या उमेदवारांमधेही सर्वाधिक मराठी आहेत तरीही खान व उत्तर भारतीय मुद्दा ऐरणीवर आणून भाजपला काय साध्य करायचे आहे ?
उत्तर भारतीय महापौर होईल इतके नगरसेवक निवडून आणू, असे वक्तव्य कृपाशंकर सिंह यांनी मीरा भाईंदर मधे केले होते. मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे , या महापालिका क्षेत्रात उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. ठाकरे बंधुंनी युतीची घोषणा करताना मुंबईचा महापौर हा मराठी असेल व आमचाच असेल असे म्हटले होते. भाजपानेही मुंबईचा महापौर हिंदू असेल असे सांगताना ठाकरे बंधुंची सत्ता आली तर कोणी खान महापौर होऊ शकेल, असे भाकीत केले. कृपाशंकर सिंह यांनी महापौर उत्तर भारतीयच होईल असे सांगून नव्या वादाला तोंड फोडले. कृपाशंकर सिंह हे मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत. तीस पस्तीस वर्षापूर्वी ते मुंबईत आले.
काँग्रेस पक्षात सक्रीय झाल्यापासून त्यांची भरभराट सुरू झाली. ते उत्तम मराठी बोलतात. काँग्रेस सत्तेवर असताना त्यांच्या भोवती मराठी तरूणांचा नेहमी गरडा असायचा. मुंबई काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. प्रदेश काँग्रेसमधेही त्यांचे वजन होते. बेहिशेबी संपत्ती जमवली म्हणून त्यांच्यामागे चौकशीचा फेरा लागला होता. नंतर ते अचानक भाजपमधे आले व बराच काळ शांत राहिले. भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवली. पण ते तेथे पराभूत झाले. त्यांना पद, प्रतिष्ठा, पैसा सारे काही मुंबईने दिले. भाजपाचे ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ज्या मुंबईने कृपाशंकर सिंह यांना भरभरून दिले, त्या मुंबईचा वा मीरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीयच होईल हे धाडसी विधान त्यांनी का केले ? पक्षाने सांगितले म्हणून ते असे बोलले काय ? मुंबईवर हिंदी भाषिक महापौर होईल असे वक्तव्य केले तर काय प्रतिक्रिया होते हे भाजपला जाणून घ्यायचे आहे का ?
कृपाशंकर सिंह यांचे वक्तव्य म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट आहे, अशी प्रति्क्रिया मनसेने व्यक्त केली आहे. मराठी माणसाच्या तोंडावर पान खाऊन पिचकारी मारण्याचे काम आहे, अशा शब्दात उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कृपाशंकर सिंह यांच्यावर टीका केली आहे. कृपाशंकर हा भाजपचा बोलका पोपट आहे, हे विधान त्यांनी चुकून किंवा भावनेच्या भरात केलेले नाही तर पूर्णपणे ठरवून केलेले आहे. भाजपने त्यांच्याकडून ते वदवून घेतले आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
भाजप प्रत्येक निवडणूक पूर्ण तयारीनिशी लढवते. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , विविध राज्यांचे भाजपचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री मुंबई, महाराष्ट्रातील प्रमुख शहरात हजेरी लावतील. हिंदी भाषिक राज्यांतील मुख्यमंत्री येतील. मुंबईत पंचावन्न लाखापेक्षा जास्त उत्तर भारतीय आहेत असे भाजपच्या उत्तर भारतीय नेत्यानेच दहा वर्षापूर्वी म्हटले होते. त्यात आता आणखी वाढ झाली असावी. मुंबईत जवळपास एक कोटी लोकसंख्या अमराठी भाषिकांची आहेत. केवळ मराठी- मराठी करून निवडणुका जिंकता येणार नाहीत. रस्त्यावरील फेरीवाले, पदपथावरी विक्रेते, झोपडपट्टीत राहणारे, इलेक्ट्र्रीशन, प्लंबर , इस्त्री, पेंटर्स, भाजीवाले, फळविक्रेते, मासे विक्रेते, दूध विक्रेते सोसाट्यांमधील वॉचमेन, हॉटेलमधील वेटर्स व सफाई कामगार, रेल्वेच्या उपनगरी स्थानकांवर बूट पॉलिश करणारे व स्टॉल्सवर काम करणारे बहुसंख्य हिंदी भाषिकच आहेत.
रोजंदारीवर काम करणारे सर्वात जास्त मजूर हिंदी भाषिक आहेत. मुंबईतल्या रस्त्यांना युपी – बिहारमधील साहित्यिक, कवि, हिंदी भाषिक नामवंतांची नावे आहेत. त्यासाठी काय उचापत्या कराव्या लागतात हे उघड गुपित आहे. अन्य राज्यात मराठी साहित्यिक, कवि, कलावंतांची नावे तेथील रस्त्यांना कुठे कुठे आहेत, हिंदी भाषिक राज्यात मराठी आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री किती आहेत, परप्रांतीयांच्या गौरवाचा बोझा केवळ मुंबई महाराष्ट्रावरच का ? संयु्क्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या एकशे सात जणांपैकी कोणा एकाचे नाव तरी मुंबईच्या रस्त्याला आहे काय ? निवडणुकीचे रण तापले असताना मुंबईचा महापौर खान होणार की उत्तर भारतीय असा वाद निर्माण केल्याने मराठी माणूस मात्र मनातून अस्वस्थ आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
