मुंबई कॉलिंग –
आशिया खंडातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाची नोंद झाली. राज्यातही देवेंद्र फडणवीस हे तीन वेळा मुख्यमंत्री झाले, पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर भाजपाचा महापौर कधी झाला नाही. यावर्षी झाले्ल्या महापालिका निवडणुकीने मुंबईकरांनी भाजपाला सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून मान दिला, अमराठी मतदारांनी भाजपाला भरघोस मतदान केले.डॉ. सुकृत खांडेकर
वाट्टेल ते करून मुंबई महापालिका काबीज करायची हा संकल्प भाजपाने साध्य केला. मुंबई महापालिकेची निवडणूक नऊ वर्षांनी झाली. गेली तीस वर्षे मुंबई महापालिकेवर असलेली ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता यंदाच्या निवडणुकीत संपुष्टात आली. मुंबई महापालिकेच्या चाव्या आता भाजपा व शिवसेना ( शिंदे ) च्या हाती आल्या आहेत. भाजपा जो ठरवेल तोच मुंबईचा महापौर असणार आहे. भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यापासून गेल्या पंचेचाळीस वर्षात या पक्षाने केंद्रात व विविध राज्यात सत्ता काबीज केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले.
आशिया खंडातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाची नोंद झाली. राज्यातही देवेंद्र फडणवीस हे तीन वेळा मुख्यमंत्री झाले, पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर भाजपाचा महापौर कधी झाला नाही. यावर्षी झाले्ल्या महापालिका निवडणुकीने मुंबईकरांनी भाजपाला सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून मान दिला, अमराठी मतदारांनी भाजपाला भरघोस मतदान केले. या पक्षाचे ८९ नगरसेवक निवडून आहे. महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २८ नगरसेवक विजयी झाले. २२७ जागा असलेल्या सभागृहात बहुमतासाठी ११५ हा जादुई आकडा आहे. महायुतीला मुंबईकरांनी बहुमत दिल्याने आता मुंबईवर नवा कारभारी येण्याचा मार्ग मोकळा झाला.
भाजपाचे सन २०१७ मधे मुंबई महापालिकेत ८२ नगरसेवक होते, अविभाजित सेनेचे ८४ होते. सन २०२६ मधे भाजपाचे ८९ निवडून आले व ठाकरेंच्या सेनेचे ६५ निवडून आले. मधल्या काळात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर शिवसेना फुटली. मावळत्या महापालिकेतील ठाकरेंचे ४४ व अन्य पक्षांचे मिळून एकूण ५४ नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत गेले. सन २०१२ पासूनचे ठाकरेंच्या शिवसेनेचे ८० नगरसेवक शिंदेंकडे गेले.
ठाकरेंच्या पक्षाचे नाव शिंदेंना मिळाले. निवडणूक चिन्ह धनुष्य बाण हेही शिंदेना मिळाले. शिवसेना फोडल्याचे बक्षिस म्हणून भाजपाने शिंदेंना अगोदर मुख्यमंत्रीपद व आता उपमुख्यमंत्रीपद दिले. सरकारमधील दहा मंत्रीपदे त्यांच्या पक्षाला दिली. ठाकरेंच्या पक्षाकडे जेमतेम वीस नगरसेवक शिल्लक राहिले. विधानसभेतही वीस आमदारच निवडून आले. तोडफोडीनंतर ठाकरेंचा पक्ष कमकुवत झाल्यानंतरही ६५ नगरसेवक ( ठाकरे बंधुंचे मिळून ७१ ) निवडून आले हे मोठे यश म्हणावे लागेल. उलट भाजपाची संख्या ८२ वरून ८९ झाली. पण बहुमताची संख्या महायुतीकडे असल्याने मुंबई महापालिकेचा रिमोट थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे.
आपली शिवसेना खरी आहे, आपणच शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे सच्चे वारसदार आहोत, निवडणूक आयोगाने आपल्याच पक्षाला शिवसेना हे नाव व धनुष्य बाण हे अधिकृत चिन्ह दिले आहे असा दावा एकनाथ शिंदे हे नेहमीच करीत असतात. महापालिका निवडणुकीत ठाकरेंचा टांगा पटली, घोडे फरार अशी अवस्था होईल असेही त्यांनी भाकीत केले होते. निकालानंतर ठाकरेंचा पक्ष संपला असे म्हणता येणार नाही. मुंबईत भाजपा नंतरचा नंबर २ चा पक्ष ठाकरेंची शिवसेना आहे. मुंबईत ९० जागा लढवणाऱ्या शिंदेची शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे.
सन २०२७ मधे मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते, यंदा ६ निवडून आले. पण यंदाच्या निवडणुकीत मनसेपेक्षा जास्त म्हणजे अससुद्दीन ओवेसी यांच्या एममआयएम चे ८ नगरसेवक निवडून आले आहेत. एमआयएमला मिळालेले यश ही काँग्रेस, सपाची चिंता वाढविणारे आहे. उबाठा सेनेचे ६५, मनसेचे ६, काँग्रेसचे २९ व राष्ट्रवादी काँग्रेस ( शप ) १ अशी बेरीज १०३ होते. एमआयएमचे ८ कुणाबरोबर जाणार हे सांगता येत नाही. अकोटमधे झालेली युती लक्षात घेता त्यांनी मुंबईत भाजपाला साथ दिल्यास आश्चर्य वाटायला नको.
स्वातंत्र्यानंतर १८४७ ते १९६७ वीस वर्षे मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा महापौर होता. १९९२ ते २०२२ महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेची सत्ता होती. १९९२ ते २०१२ याकाळात भाजपा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत भागीदार होती. २०१७ नंतर भाजपाने सत्तेत सहभागी न होता पाहरेकरी म्हणून राहु असे म्हटले होते. शिंदे यांच्या बंडापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिथे महापौर होते, अशा कल्याण- डोंबिवली, नाशिक, संभाजीनगर, उल्हासनगर, अहिल्यानगर आदी ठिकाणी आता भाजपाचे महापौर दिसणार आहे. राज्यातील २९ पैकी २५ महापालिकांमधे भाजपाचे कमळ फुलले आहे. अनेक महापालिकांमधे भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली आहे.
मुंबईमधे ठाकरे बंधुंनी महायुतीशी निकराने लढत दिली. पण मुंबई महानगर प्रदेशातील आठ महापालिकांमधे त्यांना कुठेच यश लाभले नाही. हिंदी सक्तिच्या विरोधात ते पाच जुलै २०२५ रोजी मुंबईत एकत्र आले होते. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असे उध्दव सांगत होते पण राज मोकळेपणाने भूमिका मांडत नव्हते. मराठीच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहेत एवढेच म्हणत होते. वेगवेगळ्या निमित्ताने झालेल्या डझनभर भेटीनंतर महापालिका निवडणूक एकत्र लढवणार हे जाहीर करायला त्यांना पाच महिने लागले. ते मुंबईबाहेर कुठे गेले नाहीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जोडीने प्रचारही जोरदार केला नाहीत. त्याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३७ जाहीर सभा, रोड शो, टीव्हीला मुलाखतींचा सपाटा चालवला होता, एकनाथ शिंदेही फिरत होते. पण ठाकरे बंधुंनी नाशिक, मुंबई व ठाणे या तीन सभांवरच समाधान मानले.
उध्दव यांनी शाखाशाखांना भेटी दिल्या हे चांगलेच झाले. पण जून २०२२ मधे सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर त्यांना संघटना बांधणीचे काम करायला साडेतीन वर्षे मिळाली होती, त्यात त्यांनी काय केले ? आदित्य ठाकरेही मुंबईत फिरत नाहीत. शाखांवर जाऊन संवाद साधत नाहीत. मुंबई, ठाणे परिसरात पक्षाच्या शाखा ही शिवसेनाप्रमुखांची देणगी आहे. तोच पक्षाचा आधार आहे. पण त्याकडे पक्ष नेतृत्वाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. मुंबईच्या नादात ठाकरे बंधुंनी अन्य महापालिका, नगर परिषदा निवडणुकांकडे दुर्लक्ष केले, पक्षाचे कार्यकर्ते व मतदार यांना वाऱ्यावर सोडले, देवाभाऊ व भाजपाची केडर सर्वत्र दिसत होती. ठाकरे म्हणजे मराठी नाही, मुंबई नाही, महाराष्ट्र नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षापूर्वी मुंबईतील सोमय्या कॉलेजच्या मैदानावर झालेल्या पक्षाच्या जाहीर सभेत बजावले होते, ते आज त्यांनी खरे करून दाखवले. मुंबई व राज्यात देवाभांऊंचा ब्रँड यशस्वी ठरला.
अंबरनाथला भाजपाने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्या निवडून आलेल्या बारा नगरसेवकांना पावन करून पक्षात घेतले, बदलापूरला अत्याचार पिडीत मुलीच्या प्रकरणातील सहआरोपीला स्वीकृत नगरसेवक केले, तामिळनाडूच्या के. अण्णा मलाई यांनी बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे सांगून आगीत तेल ओतले, कृपाशंकर सिंह यांनी मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होऊ शकतो असे भाकीत केले , भाजपाच्या नेत्यांनीच मुंबईचा महापौर कधी खान तर कधी मराठी हिंदू होईल असे तारे तोडले. राज ठाकरेंनी गेल्या दहा वर्षात अदानी उद्योग समुहाचा राज्यात वदेशात कसा विक्रमी विस्तार झाला याचा नकाशा शिवतीर्थावरील सभेत सादर केला. पण या कश्याचा परिणाम मुंबईकरांवर झाला नाही हेच निकालाने दाखवून दिले.
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाकरे बंधुंनी चांगली लढत दिली असा दावा केला आहे. भाजपाने अमाप पैसे ओतून व माणसे चोरून निवडणूक जिंकली असा त्यांनी आरोप केला आहे. आमच्या उमेदवारांचे फॉर्म रद्द केले. आमचे उमेदवार, शाखाध्यक्ष, कार्यकर्ते पळवले, तुमचा पक्ष मोठा आहे ना, मग आमची माणसे का पळवता ? असा प्रश्न त्यांनी ( भाजपाला विचारला ) आहे. महायुतीकडे अपाम पैसा होता, कमळाच्या पाकिटातून पैसे वाटण्यात आले, शिंदे भाजपाच्या लोकांना व भाजपा शिंदेंच्या लोकांना पकडत होते, ते एकेका मताला पाच ते दहा हजार देत होते, आम्हाला तसे करायचे नाही, असे शर्मिला ठाकरेंनी म्हटले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
