IFFIWood – 56व्या इफ्फी मध्ये “Reel Green: Sustainability and Storytelling Across Four Cinemas” या गटचर्चेत — चार चित्रपटांतील संतुलितता आणि कथाकथनाच्या अनुषंगाने चित्रपटांमधील हरित विचार यावर ऊहापोह करण्यात आला. यामध्ये भारत, जपान, स्पेन आणि ऑस्ट्रेलियाच्या चित्रनिर्मात्यांनी भाग घेऊन शाश्वत चित्रपटांच्या दुर्मिळ आणि महत्वपूर्ण विषयावर जागतिक पातळीवरील विचारांची देवाणघेवाण केली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पत्रकार आणि चित्रसमीक्षक नमन रामचंद्रन यांनी या गटचर्चेचे सूत्रसंचालन केले. पर्यावरणाविषयीची जबाबदारीची भावना केवळ चित्रनिर्मिती प्रक्रियेलाच आकार देते असे नाही, तर- कला, संस्कृती आणि जाणिवा यांचा मेळ घालून नॅरेटिव्हजना/ कथनांना देखील कसा आकार देते- याचा शोध या चर्चेतून घेतला गेला.
भारतीय चित्रनिर्माते आणि दिग्दर्शक नीलमाधव पांडा यांनी पर्यावरणावर पडणारा चित्रपटांच्या प्रभावाबद्दल उत्स्फूर्तपणे विचार मांडून सत्राची उचित सुरुवात केली. चित्रनिर्मितीचा कार्बनप्रभाव लक्षणीय असतो आणि लहान चित्रपट बऱ्याचदा अधिक पर्यावरणस्नेही पद्धती अवलंबू शकतात- तेवढी लवचिकता त्यांच्यात असू शकते- असे ते म्हणाले. “चित्रपट हे बहुजनांचे माध्यम आहे. आणि पृथ्वी तर आपल्याकडे एकच आहे. आपले अर्धे ऊर्जास्रोत अगोदरच संपुष्टात आले आहेत” अशी आठवण करून देत त्यांनी, शक्य तेथे शाश्वत पद्धती वापरण्याचे आवाहन चित्रपट-उद्योगाला केले.
जपानी चित्रनिर्मात्या मिना मोतेकी यांनी पांडा यांच्या मताच्या काहीसे विरुद्ध मत मांडले. कमी खर्चाच्या चित्रपटांत पर्यावरणस्नेही पद्धती अंमलात आणण्यातील अडचणी त्यांनी स्पष्ट केल्या. मोठ्या प्रकल्पांमध्ये अभिनवतेसाठी वाव असतो, तर छोटया प्रकल्पांना ऊर्जा-वापर,नेपथ्य व्यवस्थापन आणि वाहतूक यांबद्दल आह्वाने भेडसावतात. “जेथे शक्य तेथे आम्ही ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो” असे सांगत त्यांनी जपानी चित्रसृष्टीत हळूहळू घडत असलेल्या परिवर्तनाबद्दल माहिती दिली.
स्पॅनिश चित्रनिर्मात्या आना सौरा यांनी याच मताला पुष्टी दिली आणि शाश्वतता हे सामूहिक दायित्व असल्याचे सांगितले. वितरणापासून ते सेटवरील व्यवस्थापनापर्यंत सर्व बाबतींत जाणीवपूर्वक पर्याय निवडले तर कथाकथनाच्या गुणवत्तेशी तडजोड न करताही पर्यावरणावरील ताण कमी करता येईल- अशी जाणीव त्यांनी करून दिली. “आपले प्रत्येक पाऊल महत्त्वाचे ठरते, आणि अगदी छोट्या विचारपूर्वक कृतींनी आपण हरित भविष्याकडे वाटचाल करू शकतो” असे मत त्यांनी मांडले.
ऑस्ट्रेलियाचे निर्माते गार्थ डेव्हिस यांनी या चर्चेला नॅरेटिव्ह म्हणजे कथनाच्या पैलूची जोड दिली. कथा स्वतःच पर्यावरण जागरूकतेवर कसा प्रभाव पाडू शकतात, याबद्दल त्यांनी विचार मांडले. “चित्रपट लोकांना निसर्गाशी पुन्हा जोडतात. तरुण पिढीला बदल हवा आहे आणि वर्तनाला आणि मूल्यांना आकार देण्याचे सामर्थ्य कथाकथनात आहे”, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या चर्चेतून जागतिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या कार्यपद्धती आणि स्थानिक संदर्भात त्यांचा अंगीकार यांचा शोध घेतला गेला. जनता, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सन्मान करण्यावर ऑस्ट्रेलियाच्या चित्रपटांचा भर असतो, असे गार्थ यांनी सांगितले. या प्रक्रियेत ऑस्ट्रेलियाचे निर्माते चित्रीकरणानंतर चित्रीकरण स्थळांना होते तसे ठेवतात/ आधीपेक्षा सुधारून निघतात- असे त्यांनी सांगितले. मिना यांनी- सार्वजनिक वाहतुकीपासून ते संसाधनांच्या काळजीपूर्वक व्यवस्थापनापर्यंत पारंपरिक आणि आधुनिक कार्यपद्धतीचा कसा मिलाफ साधला जातो याची माहिती दिली. आना यांनी स्पेनच्या चित्रपट प्रमाणन व्यवस्थेतील हरित पैलूबद्दल माहिती दिली. यात चित्रनिर्मितीची शाश्वतता तपासून त्याचे प्रमाणन केले जाते. जेणेकरून खाद्यव्यवस्थापन, सामग्री हाताळणी आणि वाहतूक यांबाबत पर्यावरणस्नेही कार्यपद्धती वापरण्याविषयो मार्गदर्शन मिळते.
संपूर्ण गटचर्चेदरम्यान, तज्ज्ञांनी तरुणाईच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. पर्यावरणाचे भान राखून नेपथ्य निर्माण करण्यापासून ते कथानकांमध्ये शाश्वततेचा पुरस्कार करेपर्यंत तरुणाईच परिवर्तनाची प्रचालक होय- यावर चर्चेचा भर राहिला. देशोदेशी आणि पिढ्यान्पिढ्या पसरलेल्या शाश्वततेच्या संस्कृतीचे पालनपोषण करण्यासाठी पॅनेलिस्टनी मार्गदर्शन, शिक्षण आणि सेटवर सवयींचे महत्त्व अधोरेखित केले.
कचरा कमी करणे, पोशाखांचा पुनर्वापर करणे आणि बांधलेल्या सेटपेक्षा वास्तविक ठिकाणांना प्राधान्य देणे यासारख्या व्यावहारिक धोरणांवर चर्चा करण्यात आली. पॅनेलच्या सदस्यांनी सरकारी आणि संस्थात्मक पाठिंब्याच्या गरजेवरही भर दिला. निला माधब पांडा यांनी शाश्वत प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी प्रमाणन प्रणाली सुचवल्या, तर गार्थ डेव्हिस यांनी उत्पादन प्रोत्साहनांना पर्यावरणीय जबाबदारीशी जोडणारी धोरणे मांडली.
जागतिक समुदायासाठी एक प्रोत्साहनदायक नोंद म्हणून, पॅनेलच्या सदस्यांनी इतर देशांसोबत अधिक सहयोगी सत्रे, सर्वोत्तम पद्धती एकमेकांना सांगणे आणि पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी धोरणे अवलंबण्याचा पुरस्कार केला. त्यांनी असे मत व्यक्त केले की आंतरराष्ट्रीय संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण जगभरातील चित्रपट निर्मात्यांना सर्जनशीलता किंवा कथाकथनाशी तडजोड न करता शाश्वतता स्वीकारण्यास मदत करेल.
पॅनेल चर्चेच्या शेवटी, हे स्पष्ट झाले की शाश्वतता ही केवळ तांत्रिक मार्गदर्शक तत्त्व नाही तर ती एक मानसिकता आहे. भारत, जपान, स्पेन आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रतिनिधींच्या या संभाषणातून असे दिसून आले की, पर्यावरणीय जाणीव कथाकथन, कला आणि सांस्कृतिक जबाबदारीशी जोडलेली आहे. पॅनेलने असे प्रतिपादन केले की सिनेमा प्रभावी आणि जबाबदार दोन्ही असू शकतो, प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना प्रेरित करू शकतो आणि चित्रपट निर्मात्यांच्या पुढच्या पिढीला हरित आणि अधिक कर्तव्यदक्ष जगाची कल्पना करण्यास प्रोत्साहित करू शकतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
