कवितेचे सौंदर्य तिच्या रचनेत, प्रतीकांत आणि भाषिक सममितीत आहे. आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून भटक्या विमुक्तांच्या कवितांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारी कविता म्हणून “बिन बुडाचा इतिहास”संतोष राठोड यांच्या कवितेचा उल्लेख करावा लागेल. यातील प्रत्येक कविता आपला स्वतःचा वेगळा चेहरा घेऊन येते. भिन्नभिन्न शैलीमुळे एक वेगळे सुंदर कोलाज या कवितासंग्रहाचे तयार झाले आहे.
डॉ. बाळासाहेब लबडे, शृंगारतळी
मौ.९१४५४७३३७८
“बिनबुडाचा इतिहास”हा संतोष राठोड यांचा पेनक्राफ्ट पब्लिकेशन मुंबई यांनी प्रकाशित केलेला 2023 मधील कवितासंग्रह आहे. भारतीय समाजव्यवस्था ही भाषा, प्रांत, आहार, विचार, भौगोलिकता, जात, धर्म, पंथ, यांच्यानुसार विविधतेत एकता असणारी संस्कृती आहे. या संस्कृतीचा एक इतिहास आहे पण तो इतिहास एकांगीपणे लिहिलेला आहे. अनादी काळापासून भटकत असलेला बंजारा समाज आज कुठे स्थिरावतोय तर अजूनही भटकतोय. भारतीय समाज जीवनाच्या मुख्य प्रवाहामध्ये नसलेले लोक म्हणजे बंजारा लोक होत. जगभर त्यांची भटकंती झाली. रोमा जिप्सीच्या कविता आजही जगभर आहेत. दुर्लक्षित समाज, त्यांची प्रवाहाच्या बाहेर असलेली जीवन पद्धती, कायदेशीर रित्या त्यांच्या वाट्याला आलेले उपेक्षितपण, त्यांच्या व्यथा -वेदनांचा डोंगर, त्यांच्या संस्कृतीचा गंध, या साऱ्यांना आपल्यामध्ये सामावून घेत साकार होणारा बुड नसलेला इतिहास. त्याला बिन बुडाचा इतिहास म्हणतात. बिनबुडाच्या इतिहासाला नवी वाट देणारा कवितासंग्रह म्हणजे बिन बुडाचा इतिहास. या संग्रहाला मुंबई विद्यापीठ इंग्रजी विभाग प्रमुख डॉ सचिन लबडे यांची प्रस्तावना आहे. त्यांनी या कवितेचे नाविन्यपूर्ण पैलू उलगडून दाखवलेले आहेत.
“बिन बुडाचा इतिहास” या संग्रहामध्ये एकूण 34 कविता आहेत. त्या कवितांची शीर्षके आगळीवेगळी अगदी हटके आहेत. कवितेला साजेशी अशी आहेत. कवितेचे वेगळेपण अधोरेखित करणारी आहेत. कवितेच्या आशयातील असणारे वैविध्य नेमकेपणाने उजागर करणारी आहेत. यातील प्रतिनिधी कविता “बिन बुडाचा इतिहास” पाहता येते.
भारतीय समाजरचनेचा अभ्यास केला तर हे स्पष्ट होते की इथले सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्र हजारो वर्षांपासून विषमतेच्या उंबरठ्यावर उभे आहे. उपेक्षित, वंचित आणि दलित समुदायांवर जुन्या काळापासून अन्यायाचे ओझे लादले गेले आहे. अशा समुदायांचा संघर्ष, बंड, अस्मिता आणि स्वाभिमान यांची ज्योत लोककाव्यात सर्वाधिक प्रखरतेने राठोडांच्या शब्दकळेत धगधगताना दिसते. ही कविता केवळ युद्ध किंवा शौर्याचे चित्रण करत नाही; तर ती उपेक्षित समुदायाच्या ऐतिहासिक प्रतिकाराची, त्यांच्या अस्तित्वलढाईची आणि न्यायासाठी उभारलेल्या बंडाची मूळ कथा सांगते. ही कविता भारतीय राज्यघटनेतल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांशी अंतर्भूतरीत्या जोडलेली आहे. कवितेत दिसणारे चित्रण आणि त्याची समुदाय-चेतना यांच्या पार्श्र्वभूमीत उपेक्षितांच्या दीर्घकालीन वंचनेचे प्रतिबिंब आहे.समाजाच्या तळागाळातील लोकांना शतकानुशतके सत्ता, संसाधने आणि प्रतिष्ठेपासून दूर ठेवण्यात आले. त्यांच्या श्रमाचा उपभोग घेतला गेला, पण त्यांना दर्जा किंवा हक्क मिळाला नाही.अन्यायाविरुद्ध उभारलेले बंड हे त्यांच्यासाठी सर्व्हायवल म्हणजेच जगण्यासाठी उभे केलेले युद्ध होते. कवितेतील “चला, घ्या धावा”, “आवाहनाच्या छायेत”, “उखडून टाकू” अशा हाका या उपेक्षित जीवनातील सामूहिक धगधग दाखवतात. ही धडपड केवळ जिवंत राहण्याची नाही, तर मानवी अस्तित्वाची पुनर्स्थापना करण्याची आहे.
भारतीय समाजात शोषक व शोषित यांच्यातील संघर्ष शतकानुशतके कायम राहिला. कवितेतील संघर्ष हा सामाजिक आणि आर्थिक दडपशाहीविरुद्धच्या प्रतिकाराचा आवाज आहे. उपेक्षितांना दडपणारी सत्ता, जातीव्यवस्था, आर्थिक शोषण, सांस्कृतिक उपेक्षा या तीन स्तंभांवर उभी राहिली. कवितेतील नायक या बहुआयामी सत्ताचक्राला आव्हान देतो.
कवितेत “आपण” हे सर्वनाम वारंवार येते.
हे सूचित करते की व्यक्तिगत संघर्ष नाही.हा सामुदायिक क्रांतीचा आवाज आहे.
ज्यांच्याकडे भौतिक शस्त्र नसते, ते एकत्र येऊन प्रतिकाराचे नवे राजकारण तयार करतात. भारतीय संविधान हे जगातील सर्वात प्रगत आणि मानवी मूल्यांवर आधारलेले दस्तऐवज मानले जाते. कारण त्यामध्ये उपेक्षितांना प्रथमच समानतेचे कायदेशीर स्थान, न्यायाची हमी आणि मानवी प्रतिष्ठेची हमी मिळते. कवितेतील संघर्ष जणू राज्यघटनेचे मूल्य जन्म घेण्याआधीचा संघर्ष वाटतो.
राज्यघटना या संघर्षाला नवे भाष्य देते आणि त्याला कायदेशीर संरक्षण देते. भारतीय राज्यघटनेत कलम १४ : कायद्यापुढे समानता,कलम १५ : भेदभाव निषिद्ध,कलम १७ : अस्पृश्यता निर्मूलनचे आहे.कवितेत दिसणारे प्रतिकाराचे स्वर संविधानाने नंतर स्वीकारून न्यायाच्या तत्त्वात बदलले. सामाजिक न्यायाचे कलम 38 आणि 46 आहे.
संविधानाची प्रस्तावना ‘सामाजिक न्याय’ हे पहिल्या शब्दांपैकी एक का ठेवते? कारण भारतीय समाजाला उपेक्षितांच्या संघर्षाचे शतकानुशतकाचे ओझे होते.
कलम ३८ : न्याय्य सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याचा आदेश
कलम ४६ : मागासवर्ग, आदिवासी, उपेक्षितांचे संरक्षण ही कलमे कवितेतील उपेक्षित नायकाच्या स्वाभिमानी लढ्याला प्रतिष्ठा देतात,कवितेतील नायक लढतो आहे.जगण्यासाठी, सन्मानासाठी, दडपशाही मोडण्यासाठी, राज्यघटनेची प्रस्तावना मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करते. ही प्रतिष्ठाच उपेक्षितांच्या संघर्षाचे मूळ मूल्य आहे.
कवितेचा आशय संविधानातल्या मूल्यांना आधी घडवणाऱ्या संघर्षांचा दस्तऐवज वाटतो. राज्यघटनेतील तत्त्वे ही ‘वरून दिलेली’ नसून उपेक्षितांच्या संघर्षातून ‘खालीवर आलेली’ मूल्ये आहेत. ही कविता दाखवते की उपेक्षितांनी तलवार उचलली तेव्हा राज्यघटकांनी कलमे निर्माण केली, उपेक्षितांनी बंड केले तेव्हा न्यायाच्या संकल्पना रूजल्या, उपेक्षितांनी समानतेसाठी रक्त दिले तेव्हा संविधानाने समानता कायदेशीर केली. या दृष्टीने ही कविता ही संविधानाची ‘पूर्वपीठिका’ आहे. जनतेकडून आलेल्या क्रांतीची स्मृती आहे.
ही कविता केवळ युद्धाची नाही—
ती उपेक्षितांच्या मानवी अस्तितवाच्या पुनर्स्थापनेची कथा आहे.
ती सामाजिक विषमतेवर उभारलेले शोषण संपवण्याचा प्रयत्न आहे.
ती भारतीय संविधानाने नंतर विधीत केलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांची आधीची ऐतिहासिक पायाभरणी आहे.
कवितेतील नायक हा केवळ योद्धा नाही.
तो उपेक्षितांचा प्रतिनिधी आहे,
तो संविधानातील मूल्यांचा जनक आहे,
तो भारतीय समाजाच्या न्यायस्वप्नाचा आधारस्तंभ आहे.
उपेक्षितांच्या सामूहिक संघर्षाशिवाय भारतीय राज्यघटनेचे अस्तित्व शक्य नव्हते
आणि ही कविता त्या संघर्षाची जाज्वल्य साक्ष आहे. समकालीन स्थितीमध्ये जो इतिहास सांगितला जातो त्या इतिहासातील सत्यता कवी तपासतो आहे .आणि त्या कसोटीवर समकालीन इतिहास टिकत नाही असे सांगून सदर इतिहास “बिन बुडाचा आहे” याचा जाहीरनामा तो करतो आहे. मुख्य प्रवाहाच्या बाहेर असलेल्या दलितांचे जीवन सक्षमपणे मांडण्याचं काम ही कविता विद्रोही भाषाशैलीत करते आहे. या कवितेत बंजारा लोकजीवन, देव, परंपरा, विधी आणि कुलदैवतांभोवती गुंफलेले असले तरी प्रत्यक्ष सामाजिक व्यवस्थेत स्त्रीचे स्थान दुय्यम राहिले आहे. “जय जय माँ जगंदंबे” ही कविता देवीभक्तीचे गीत वाटत असली, तरी तिच्या ओळींमधून पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्रीचे वास्तव, तिच्या भीती,आकांक्षा आणि सामाजिक शोषण अत्यंत प्रभावीपणे उघड होते.
कवितेची सुरुवात स्त्रीच्या मातृपूजेशी होते; पण ही पूजा तिच्या शक्तीची नव्हे, तर तिच्या असुरक्षिततेची आहे. बंजारा समाजात स्त्रीचे मूल्य तिच्या रूपावर आणि ‘गुणी’ असण्याच्या निकषांवर ठरते—“गोरा, सुबक, चंचल, गुणी” अशी मुलगीच आवडणारी ही सामाजिक मानसिकता स्त्रीला शरीर आणि सौंदर्याच्या चौकटीत बंदिस्त करते. स्त्रीवादानुसार, स्त्रीची ओळख तिच्या सामाजिक श्रमांपेक्षा शरीरावर केंद्रित करणे ही सांस्कृतिक हिंसेचीच एक पद्धत आहे.
कवितेतील सर्वात मार्मिक भाग म्हणजे स्त्रीची पितृत्वाविषयीची भीती. ती देवीकडे विनवते की तिचे बाळ “पित्युखी” असावे, त्याचा चेहरा, नाक, कान वडिलांसारखे दिसावे. कारण पतीचा संशय तिच्या आयुष्याला संकटात ढकलू शकतो. ही प्रार्थना भक्ती नसून जगण्यासाठीची धडपड आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीची प्रतिष्ठा तिच्या ‘सतीत्वाच्या पुराव्यावर’ अवलंबून आहे, आणि त्या पुराव्यासाठी बाळाचे रूप प्रमाण म्हणून स्वीकारले जाते. ही स्थिती स्त्रीच्या स्वायत्ततेवर सर्वांत मोठा घाला घालते.
कवितेतील शेवटची ओळ तर आणखी हताश वास्तव दाखवते. स्त्री म्हणते, “मला कुणी पुसणार नाही : बाळाचा बाप माझा नवरा आहे की माझ्या सारखा?” येथे तिची वेदना, अपमान, आणि संशयाच्या सावलीत जगावे लागणारे आयुष्य स्पष्ट होते. स्त्रीने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी आयुष्यभर उचलावी अशी रचना पुरुषसत्ता सतत निर्माण करते. ही कविता बंजारा संस्कृतीच्या पृष्ठभागावरील धार्मिकतेपेक्षा खोलवर असलेल्या स्त्री-अनुभवाला उजाळा देते. पुरुषप्रधान समाजात स्त्रीची ओळख सौंदर्य, सतित्व आणि आज्ञाधारकतेशी जोडली जाते; तर तिच्या स्वायत्ततेवर सतत नियंत्रण ठेवले जाते. स्त्रीवादी दृष्टीकोनातून पाहता, ही कविता बंजारा स्त्रीच्या सांस्कृतिक, मानसिक आणि सामाजिक शोषणाचा दस्तावेज ठरते.
“आम्ही चोरच राहिलो आणि तुम्ही झाला पोलीस”या कवितेत बंजारा समाजाची ओळख ही त्यांच्या श्रमप्रधान जीवनशैली, परंपरा, निसर्गसापेक्ष जीवनदृष्टी आणि स्वातंत्र्यप्रिय सांस्कृतिक मूल्यांमधून आकारलेली होती. पण १८७१ च्या Criminal Tribes Act अंतर्गत ब्रिटिशांनी या समाजाला “जन्मजात गुन्हेगार” ठरवले आणि त्यांच्या अस्तित्वावरच कलंक लावला. या ऐतिहासिक अन्यायाने बंजारा समाजाला केवळ कायदेशीर दडपशाहीतच नाही तर मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जखमा दिल्या. प्रस्तुत कवितेत कवीने हाच अन्याय अत्यंत मार्मिक आणि संतप्त भाषेत उघड केला आहे.
कवी सांगतो की, पूर्वी बंजारा समाजातील लोकांना “चोर” ठरवले गेले, आणि पुढे स्वातंत्र्यानंतरही हा कलंक पुसला गेला नाही. त्यांची चोर मानली गेलेली पिढी आणि पोलिसांच्या नजरेखाली जगायला बाध्य झालेली पुढची पिढी—दोन्हींना अपमान, भीती, संशय आणि अपहेलनाच लाभली. “आम्ही चोरच राहिलो; अन तुम्ही झाला पोलिस” या ओळींतून सत्ता-सामर्थ्यातील विषमता अधोरेखित होते. दुसरीकडे, पोलिसांच्याही हातात इतिहासाची चुकीची छाया दिली गेली.त्यांनी पाहिलेले “पांढरे पान” म्हणजे न्यायाचा अभाव, आणि “हात काळे” म्हणजे राज्ययंत्रणेची दडपशाही.
कवी सुचवतो की बदनाम ठरवण्याची ही प्रक्रिया कोणाच्याही हातून नव्हे, तर औपनिवेशिक सत्तेने रचलेल्या इतिहासातून जन्माला आली. या इतिहासाने बंजारा समाजाची ओळखच गुन्हेगारीशी जोडून ठेवली आणि पुढील पिढ्यांच्याही स्वप्नांवर संशयाची सावली टाकली.
“बघा तुमच्या डोळ्यांनी आम्ही काय नेलं अन त्यांनी काय नेलं” या शेवटच्या ओळीत कवी समाजातील द्वंद्व उभे करतो: आपण जे पाहतो ते सत्य नाही; सत्तेने जे लिहून ठेवले तोच इतिहास मानला जातो. त्यामुळे बंजारा समाजावर लादलेली गुन्हेगारीची ओळख ही त्यांच्या वास्तविक जीवनाशी नव्हे तर राजकीय हेतूशी संबंधित आहे.
कवीचे निरीक्षण असे की—बंजारा समाजाने कष्ट, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाने जगतो आहे; पण इतिहासाने त्यांना गुन्हेगार ठरवले. या कलंकामुळे त्यांचे सामाजिक स्थान ढासळले, त्यांना अपमान आणि अविश्वास सहन करावा लागला. राजसत्तेच्या दडपशाहीने त्यांचे हक्क हिरावले, आणि स्वातंत्र्यानंतरही हा अन्याय मिटला नाही. कविता ही बंजारा समाजाच्या शतकानुशतकांच्या दुःखाची वेदनादायी दस्तऐवज आहे.
उपरोक्त काव्यात कवीने “चोर–पोलीस” या रूपकाचा प्रभावी वापर करून समाजातील सत्ता-संबंध, अन्याय आणि वर्गभेद उलगडून दाखवले आहेत. ‘आम्ही चोर’ आणि ‘तुम्ही पोलीस’ ही मांडणी केवळ गुन्हेगारीकडे निर्देश करत नाही, तर इतिहासभर उपेक्षित समाजाला लावण्यात आलेल्या शिक्का-मोर्तब ओळखीचे प्रतीक आहे. ज्यांच्या हातात सत्ता व संस्थांचे संरक्षण असते ते स्वतःला ‘पोलीस’ समजतात, आणि ज्यांच्याकडे साधनसंपत्ती नसते, जे वंचित असतात, त्यांना समाज यंत्रणा सहजपणे ‘चोर’ बनवते हा कवीचा रोख स्पष्ट जाणवतो.
कवितेत नंतर आलेला बदल अत्यंत अर्थपूर्ण आहे—“आता आमच्या सारखा तू पण भुरा आहेस, तुझे केस आणि डोळे काळे आहेत”. यातून वर्णभेद, बाह्यरूपाचे राजकारण आणि त्यातून निर्माण होणारे “परकेपण” हे बिंबवले आहे. जो दुसऱ्या समुदायाला चोर ठरवत होता, त्याच्यातही तेच मानवी गुण आढळतात, हे दाखवून कवी सत्ता-गटाच्या श्रेष्ठत्वाच्या भ्रमावर प्रहार करतो.शेवटचे वाक्य “तरीही आम्ही चोरच राहिलो आणि तुम्ही झालात पोलिस” हे सर्वव्यापी सामाजिक वास्तव सांगते. सत्ता, प्रशासन आणि कायदा व्यवस्था ज्यांच्या ताब्यात असते तेच ‘पोलिस’ ठरतात, तर ऐतिहासिकदृष्ट्या पीडित वर्ग ‘चोर’च राहतात. म्हणजेच ओळखी बदलत नाहीत; बदलतो फक्त काळ. ही कविता सत्ता-संरचनांवरील, जात-वर्गभेदांवरील आणि उपेक्षितांच्या मानसिक वेदनेवरील तीक्ष्ण सामाजिक भाष्य आहे. रूपकांच्या साधेपणातून कवीने खोल सामाजिक वास्तव उलगडले आहे.हा या कवितेचा सर्वात मोठा प्रभाव आहे.
“गालावरच्या जखमा” ही कविता सुचक आहे ती बंजारा समाजातील असलेल्या लोकांवर होणारा अन्यायअत्याचार वेशीवर टाकते. “त्यांचे पूर्वज आमच्या देवा पेक्षाही शक्तिशाली होते” या कवितेत गावकुसाच्या बाहेर राहणारा बंजारा समाजाचा तांडा हा सतत नवीन गावकुसाच्या शोधात असतो. कारण त्यांच्यावर मारला गेलेला जातीचा शिक्का आणि त्यांची जनावरांमध्ये केले गेलेली गणना त्यांच्या उपेक्षितपणाचे चित्र ही कविता रेखाटते. अनादी काळापासून जे लोक भटकत होते ते त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित होते. त्यामुळे कवीला हा प्रश्न पडलेला आहे की हे अधिकार त्यांच्या देवांनी का मिळवून दिले नाही? ते लोक किती सामर्थ्यशाली होते. तरीसुद्धा त्यांना हे का जमू शकले नाही ?याची चिकित्सा या कवितेत केलेली आहे.”थू! तुमच्या मायला”या कवितेत कवीने शिवी दिलेले आहे.ती लिंग पिसाट असणाऱ्या लमान तांड्यामधील बायकांचे शोषण करणाऱ्या त्यांचा उपभोग घेणाऱ्या माणसांना. स्त्रियांच्या शोषणाच्या विरुद्ध कवी आवाज उठवतो आहे.त्याच्या मनातली चीड तो व्यक्त करतो आहे.
राठोड यांची कविता टोकदार आहे “बरं झालं भडवा मेला”या कवितेत तांड्यावरील एका बाईचा नवरा वारलेला आहे.ती विलाप करत आहे.आणि तिचे जे मुल आहे ते लोकांनी आणलेल्या भाकरी, पिठलं, ठेचा, खाण्यामध्ये गुंग झाले आहे.जणू काही त्याच्या दृष्टीने तो सणच आहे. ते भुकेने व्याकुळ झालेले आहे. त्याला असे वाटते की रोज तीनदा आपला बाप मेला असता तर कमीत कमी पोटाला तरी मिळाले असते. अशीही भुकेची वेदना कवीने अतिशय वास्तववादी रीतीने मांडलेली आहे.
“बस्स तो एवढेच करतो!”कवितेतला विद्रोह हा कवीच्या मनातील अन्यायाविरुद्धचा संताप आणि विरोध व्यक्त करणारा स्वर आहे. शोषण, भेदभाव, विषमता आणि सत्तेची दडपशाही यांना नाकारून कवी स्वतःचे आणि समाजाचे अस्तित्व व स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करतो.
हा विद्रोह केवळ राग नसून जागृतीची ज्वाला आहे. समाजातील शोषित, उपेक्षित, पीडित लोकांच्या वेदनांना शब्द देत कवी परिवर्तनाची मागणी करतो. जुन्या रूढी, अन्यायी व्यवस्था आणि माणसावर होणारे अत्याचार यांच्याविरुद्ध तो उभा राहतो. म्हणून कवितेतील विद्रोह हा विनाशासाठी नाही, तर न्याय, समानता आणि स्वाभिमानासाठीचा लढा आहे. हा आवाज दडपशाहीला छेद देणारा आणि नवीन मानवी मूल्यांना जन्म देणारा आहे.
‘मी माणूस!’ या कवितेत कवीची भूमिका स्पष्टपणे मानवकेंद्री आणि शोषणविरोधी आहे. कवी माणसाला जात, वर्ग, कामगार किंवा बाजारमूल्याच्या चौकटीत न पाहता स्वतंत्र, स्वाभिमानी आणि समान हक्क असलेला जीव म्हणून मांडतो.
कवीची भूमिका अशी आहे की माणूस कोणाचीही मालमत्ता नाही, त्याचे श्रम विकले जाऊ शकतात पण त्याचे अस्तित्व विकत घेता येत नाही. समाज, बाजार, उद्योग किंवा सत्ताकेंद्र यांनी मनुष्याला वस्तूप्रमाणे वागवू नये.कवीची भूमिका माणसाच्या सन्मानाचे रक्षण करणारी आणि अन्यायाविरुद्ध उभी राहणारी आहे. नव्या व्यवस्थेच्या शोधात कवी आहे.आणि ती व्यवस्था तो मांडू पाहत आहे.त्यामुळे या कवितांना एक मानवतावादी वेगळेमूल्य आहे. त्यातून कवीची भूमिका स्पष्ट दिसते आहे. आणि या कविता अतिशय वास्तववादी पद्धतीने अंगावरती येतात.ज्या मधला आशय अतिशय टोकदार आहे. भावना अतिशय टोकाची आहे. आणि शब्दकळा जहरी आहे.
या संग्रहातील कविता मुक्तछंदात लिहिलेली असल्याने तिच्या रचनेत पारंपरिक वृत्तछंदांची बंधने दिसत नाहीत. कवीने विषयाशी सुसंगत अशी मोकळी, संवादात्मक शैली स्वीकारली आहे, त्यामुळे विचार मांडताना छंद‑मात्रा न पाळता प्रतिमांचे व विचारांचे नैसर्गिक प्रवाह जपलेले जाणवतात . या संग्रहातील मुक्तछंदात्मक रचनेचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे ओळींची असमान लांबी व अनियमितता. काही ओळी अतिशय लहान, तर काही दीर्घ असून अंत्यानुप्रास किंवा यमक यांवर आग्रह नसल्यामुळे वाचकाला गद्याजवळ जाणारी, लय अनुभवायला मिळते.दुसरे वैशिष्ट्य म्हणजे वाक्यरचनेत गद्यासारखा साधेपणा; विरामचिन्हांचा वापर, तर्कशुद्ध क्रम आणि विचारांची स्पष्टीकरणात्मक मांडणी यांमुळे कविता मुद्देसूद वाटते .तिसरे वैशिष्ट्य म्हणजे कल्पनांचा विस्तार, विवेचनप्रधान स्वभाव. कवी एखाद्या प्रतिमा किंवा अनुभूतीवर थांबत न राहता सामाजिक, मानसिक संदर्भ, चिकित्सक टिप्पणी आणि उपमा‑उत्प्रेक्षा यांचा वापर करून विचारांचे परीक्षण करतो; त्यामुळे कविता भावविवरापेक्षा चिंतनपर अधिक जाणवतात.
चौथे वैशिष्ट्य म्हणजे कथनातून उभा राहणारा तर्कशृंखलाभाव प्रस्तावना, उदाहरणे आणि निष्कर्ष यांचा क्रम, जो लालीत्याच्या रचनेशी साधर्म्य ठेवतो, पण तरीही भाषेतील प्रतीकात्मकता व भाववाचकता जपून कवितेची सौंदर्यवाचकता कायम ठेवतो. राठोड यांचा मुक्तछंद टोकदार आहे. त्यात आवेश, जोश, उत्साह,आहे. खटकेबाजपणा आहे. संवाद आहे. तिरकसपणा, उपहास, उपरोध, याने भरलेली ही कविता आहे. ती कमालीचा व्यंग अर्थ व्यक्त करणारी आहे. मराठीच्या पूर्वपरंपरेमध्ये आपल्या दमदार आशयाने भर घालणारी आहे. आपल्या कवितेचे वेगळेपण राठोड यांनी जपलेले आहे. ते त्यांच्या शैली मधूनही व्यक्त होते. अनेक प्रकारचे मुक्तछंदातील प्रयोग त्यांनी केलेले आहेत. या प्रयोगाच्या वैविध्यतेमुळे या कवितासंग्रहाला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. “एका विहिरीचे शोक गीत” या कवितेचा मुक्त छंद तुकड्या तुकड्यांमधून अतिशय सुंदरपणे एक कोलाज तयार करतो. “चढली तर नाही ना ?”ही कविता संवादात्मक आहे मित्र आणि निवेदक यांच्यातील संवादातून ही कविता अतिशय बोचऱ्या पद्धतीने वाचकांच्या अंगावर येते. “माणसासारखे प्राणी” या कवितेत कमालीचा उपहास आहे .तो तिरकसपणे अंगावर येतो. “मामाच्या लग्नाला यायचं” ही उपहासिका आहे. एकूण 17 तुकड्यांची ही कविता आहे.
या संग्रहातील “तूच माझी” या कवितेचे रुपवादी आकलन करता येते. रूपवादी समीक्षेच्या दृष्टीने ही कविता “तूच माझी…” ही भाषिक संरचना, प्रतिमानिर्मिती, प्रतीकशैली आणि अंतर्गत रचना यांच्या आधारे स्त्री–पुरुष नात्याची भावनिक गुंफण कलात्मकरीत्या मांडणारी कविता आहे.कवितेची रचना “तूच माझी…” या आवर्तनावर उभी आहे.या सततच्या पुनरुक्तीमुळे—सहचारी, सहकारी, गृहिणी, रागिणी, संजीवनी, अर्धांगिनी स्त्रीची विविध भूमिकांतील उपस्थिती रूपात्मक पातळीवर दृढ होते.
आवर्तनाचा हा लयबंध कवितेला संगीतत्व आणि एकत्रितपणा देतो.
कवितेत ‘प्रश्न’ आणि ‘उत्तर’ ही दोन संकल्पना प्रतिरूप म्हणून वापरली आहेत.
या प्रतीकांच्या साहाय्याने नात्यातील परस्परावलंबित्व, जन्म–जन्मांतरीची संगती,आणि जगाच्या निर्मितीचक्राचा अर्थपूर्ण संकेत दिला आहे.रूपवादी दृष्टीने पाहता, हे प्रतीक संपूर्ण काव्यरचनेचे रचनात्मक सौंदर्य बनते.पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्हे.ही सर्व विरामचिन्हे नात्यातील थांबे, वळणे, उत्स्फूर्तता, संदिग्धता यांचे कलात्मक रूपक बनतात.शब्दांच्या पलीकडे जाऊन भाषा हीच नात्याचे सूक्ष्म गणित सांगते—हा रूपवादी पैलू ठळक आहे.बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, मुद्दल, नफा–तोटा या संज्ञा नात्यातील भावनिक देण्या–घेण्यांची रूपक प्रणाली उभी करतात.
या कवितेला आधुनिक प्रतिमानिर्मितीची वेगळी बाजू आहे .रूपवादानुसार कवीच्या जीवनाचा किंवा सामाजिक पार्श्वभूमीचा संदर्भ न घेता कवितेतील भाषिक रचना स्वतःच अर्थनिर्मिती करते.येथील संवादात्मक शैली, प्रतीक, आवर्तन, लयबद्धता हे सर्व नात्यातील भावविश्वाला आत्मनिर्भर सौंदर्य देतात. रूपवादी दृष्टिकोनातून ही कविता म्हणजेप्रतिमा, प्रतीक, गणिती रूपके, विरामचिन्हांची प्रतीकात्मक रचनाआणि लयबद्ध पुनरुक्ती यांच्या साहाय्याने नात्याचे स्वरूप मांडणारी,
स्वतंत्र कलात्मक संरचनेवर उभी असलेली एक सुंदर निर्मिती. कवितेचे सौंदर्य तिच्या रचनेत, प्रतीकांत आणि भाषिक सममितीत आहे. आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून भटक्या विमुक्तांच्या कवितांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारी कविता म्हणून “बिन बुडाचा इतिहास”संतोष राठोड यांच्या कवितेचा उल्लेख करावा लागेल. यातील प्रत्येक कविता आपला स्वतःचा वेगळा चेहरा घेऊन येते. भिन्नभिन्न शैलीमुळे एक वेगळे सुंदर कोलाज या कवितासंग्रहाचे तयार झाले आहे.
पुस्तकाचे नाव: बिनबुडाचा इतिहास
कवी: संतोष धर्मा राठोड
प्रकाशक: पेनक्राफ्ट पब्लिकेशन, मुंबई.
प्रथम आवृत्ती ;२०२३
पृष्ठे ;९६
किंमत: १५०/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
