‘आम्ही जांभळीकर फाऊंडेशन’तर्फे पक्षी निरीक्षण
जांभळी (ता. शिरोळ) – येथे ‘आम्ही जांभळीकर फाऊंडेशन’ यांच्या वतीने ऑक्सिजन पार्क येथे पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निसर्गप्रेमी, विद्यार्थी, पर्यावरण अभ्यासक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात सुमारे २५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
थंडीच्या दिवसात परदेशातून आणि आसपासच्या प्रदेशातून अनेक पक्ष्यांचे येथे स्थलांतर होत असते. या पक्ष्यांची विशेष नोंद पक्षी निरीक्षणावेळी करण्यात आली. ब्लिथचा वेळू वटवट्या हा परदेशी स्थलांतरित पक्षी प्रथमच दिसून आला. तर पिवळा धोबी (परीट) हा स्थानिक स्थलांतरित पक्षी यांचीही नोंद झाली. या निरीक्षण उपक्रमाद्वारे निसर्गप्रेमींना पक्षी जगताशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
पक्षी अभ्यासक सर्वदमन कुलकर्णी (जयसिंगपूर) आणि प्रमोद कुंभार (अब्दुललाट) यांनी मार्गदर्शन केले. विविध पक्ष्यांचा अधिवास, घरटी बांधण्याच्या पद्धती, त्यांच्या राहणीमानातील वैशिष्ट्ये, तसेच पक्ष्यांच्या आवाजावरून त्यांची ओळख कशी करावी याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच माळरानावरील परिसंस्थेचा आणि त्या ठिकाणच्या पक्ष्यांचा सखोल अभ्यास घडवून आणला. पर्यावरण अभ्यासक डॉ. संतोष उमराणे हे ही या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते.
निरीक्षणामध्ये भिंगरी, तारवाली भिंगरी, बगळा, गाय बगळा, सूर्यपक्षी, राखी वटवट्या, तितर, कावळा, कोतवाल, भारद्वाज, ग्रीन बी इटर, पिवळा धोबी (परीट), गप्पीदास, सायबेरियन गप्पीदास, लार्क चंडोल, ब्लिथचा वेळू वटवट्या, हुदहुद्या, व्होला, ठिपक्यादार मुनिया, दयाळ, बुलबुल, चिरक, खाटिक, टीवी, नदी सुरई, सात भाई आदी पक्ष्यांचा समावेश आहे.
विविध १४२ प्रजातीच्या सहा हजारांहून अधिक झाडांचा जांभळी परिसरातील ऑक्सिजन पार्क हा स्थानिक जैवविविधतेचा समृद्ध अधिवास असून, या ठिकाणी पक्षी निरीक्षणाने पर्यावरणीय जाणिवा अधिक मजबूत होतील, असा विश्वास उपस्थित निसर्गप्रेमींनी व्यक्त केला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
