जागतिक वारसा सप्ताहानिमित्त घेतला उपक्रम
सिंधुदुर्गनगरी – जागतिक वारसा सप्ताहानिमित्त ‘घुंगुरकाठी’ संस्थेच्या पुढाकाराने कुडोपी येथील कातळशिल्पांची स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. मालवण येथील ‘युथ बिटस् फॉर क्लायमेट’चे कार्यकर्ते आणि आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे एनएसएस स्वयंसेवक अशा तीस जणांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला.
दरवर्षी १९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा जागतिक वारसा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहात पुरातन वारसा ठिकाणांना भेटी देणे, त्यांची माहिती घेणे, प्रचार करणे, स्वच्छता मोहिमा राबवणे, असे उपक्रम जगभर राबवले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अश्मयुगीन कातळशिल्पे हा केवळ जिल्ह्याचाच नव्हे, तर मानवजातीचा वारसा आहे.
‘युनेस्को’ने कुडोपी कातळशिल्प ठिकाण ‘जागतिक वारसा स्थळां’च्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केले आहे. ते कायम यादीत घेण्याची प्रक्रीया सुरु आहे. कुडोपीबरोबरच जिल्ह्यात २०हून अधिक ठिकाणी कातळशिल्पे सापडली आहेत. पुरातत्व अभ्यासक सतीश लळीत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवाळे येथील कातळशिल्पांचा शोध सर्वप्रथम ६ मे २००१ रोजी लावला. त्यानंतर धामापूर, खोटलेसह अनेक ठिकाणची कातळशिल्पे उजेडात आणून त्यावर संशोधनपर ग्रंथही लिहिला.
ही सर्व कातळशिल्पे जांभ्या दगडाच्या सड्यांवर व निर्जन ठिकाणी आहेत. चिरेखाणींमुळे अनेक ठिकाणची कातळशिल्पे धोक्यात आली आहेत. याबाबत जागृती व्हावी, यासाठी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पावसाळ्यात या कातळशिल्पांवर गवत वाढते, तसेच मातीने ती भरुन जातात. ग्रासकटर, ब्रश, झाडू यांच्या सहाय्याने या कातळशिल्पांची काळजीपुर्वक स्वच्छता करण्यात आली. ही मोहीम सतीश लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मोहिमेचे नियोजन ‘घुंगुरकाठी’च्या उपाध्यक्ष डॉ. सई लळीत, ‘युथ बिटस् फॉर क्लायमेट’चे अक्षय रेवंडकर, संजय परुळेकर, साहिल कुबल, तन्मय मुणगेकर, पूजा भोगावकर, सुदेश भोगावकर, दर्शन वेंगुर्लेकर, स्वप्नील गोसावी यांनी केले. या मोहिमेत आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सोळा विद्यार्थी-विद्यार्थीनींनी व शिक्षक विरेश चव्हाण, शिक्षिका प्रियांका हिंदळेकर यांनी सहभाग घेतला. श्री. लळीत यांनी सर्व सहभागींना कातळशिल्पांची माहिती दिली. मोहीम संपल्यानंतर आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे श्री. लळीत यांचे कातळशिल्प विषयक व्याख्यान झाले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
