पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनात संमेलनाध्यक्ष दीपक पवार यांचे आवाहन
पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून संमेलनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद
कणकवली – विचार मांडायलाच स्वातंत्र्य नसेल तर विचार करायचाच कशाला अशी मानसिकता आता लोकांची झाली आहे. आपली धारणाच आता अनैतिक झालेली आहे. अशा काळात मराठी भाषेसाठी, मराठी समाजासाठी थोडेफार काही बरं करायचं असेल तर ते एकट्या दुकट्या माणसाला आता शक्य नाही. यासाठी आपण सगळ्यांनी संघटित होऊनच काम करायला पाहिजे, असे मत पाचव्या समाज साहित्य भाषा विचार संमेलनात संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ भाषा अभ्यास डॉ. दीपक पवार यांनी केले.
सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान आणि सहयोग संस्था वसई यांच्यावतीने वसई भुईगाव येथे डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवशीय समाज साहित्य भाषा विचार संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. पवार यांनी मराठी भाषे विरोधात राजकारण करणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेच्या विरोधात आसूड ओढले. शासनाने तिसऱ्या भाषेचा पर्याय निवडण्यासाठी समिती नेमली तरी या समितीचा अहवालही शासन धार्जिनाच असणार असून हिंदीची सक्ती केली जाणार आहे. त्यामुळे संघटितपणे सगळ्यांनी रस्त्यावर येऊन या हिंदी सक्तीच्या विरोधात लढा उभारूया, असेही डॉ. पवार म्हणाले.
संमेलनाचे उद्घाटक विकास वर्तक, समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक कवी अजय कांडर, अध्यक्ष मधुकर मातोंडकर, सहयोग संस्थेचे संचालक कवी सायमन मार्टिन, ज्येष्ठ लेखिका संध्या नरे पवार तसेच समाज साहित्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी सुरेश बिले, प्रा. संजीवनी पाटील, सफरअली इसफ, डॉ. योगिता राजकर, मनीषा शिरटावले, प्रज्ञा मातोंडकर, विजय सावंत, भालचंद्र सुपेकर, हरिचंद्र भिसे, रमेश सावंत, सत्यवान साटम आदी उपस्थित होते.
या प्रसंगी विख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन पुरस्कार तर नाटककार उदय जाधव यांना जयंत पवार पुरस्कार आणि कवी अक्षय शिंपी यांना प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार डॉ. दीपक पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
डॉ. पवार म्हणाले, आजच्या काळात शून्य भूमिका घेणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत. अपवाद वगळता प्राध्यापक, लेखक, कवी यांच्याकडून काहीच अपेक्षा बाळगू नये असा हा काळ आहे. अशा काळात साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक संघटनेचे काम करणे फार कठीण आहे. त्याचा त्रास काय असतो हे मी अनुभवत आहे. अशावेळी अजय कांडर आणि सायमन मार्टिन यांच्यासारखे कवी लोकांसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करतात हा भाषेचाच गौरव आहे. कार्यक्रमांना लोक उपकार केल्यासारख्या येतात. असा श्रोताहीन हा काळ आपण पाहतो आहोत.
हा आपल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातला मोठा आजार आहे. आपली धारणाच आता अनैतिक झालेली आहे. अशा काळात साहित्याच आणि भाषेचही काम आपल्याला करावं लागतं. ज्या मुलांना शब्दांचा नीट अर्थ कळत नाही त्याच मुलांना विचारले जाते तुम्हाला कोणती भाषा हवी आहे? तिसरी पर्यायी हिंदी भाषा लादण्यासाठी जी समिती नेमली गेली आहे. त्या समितीने कितीही लोकांचा कौल घेतला तरी शासनाला जे पाहिजे तेच ही समिती देणार असल्यामुळे यापुढे लोकांनी संघटित होऊन हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात रस्त्यावर उतरावे, असे आवाहनही शेवटी डॉ. पवार यांनी केले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली समाज आणि साहित्य हा परिसंवाद झाला. यावेळी श्री कांदळकर यांनी समाजापासून साहित्यिकांचं नातं तुटल्यामुळे त्याचा साहित्यावरही परिणाम झालेला दिसतो असे निरीक्षण नोंदविले.
साहित्य आणि समाज यांच्यामध्ये लेखक उभा असतो, त्यामुळे स्वाभाविकच लेखकावर अधिक जबाबदारी येऊन पडते. लेखक आपल्या आजूबाजूच्या वास्तवाला कशाप्रकारे सामोरा जातो, वास्तवातील सत्याचं तो कशाप्रकारे चित्रण करतो, सत्याचे अन्वयार्थ तो कशाप्रकारे उलगडून दाखवतो, हेच अंतिमतः महत्त्वाचे असते. या दृष्टीने लेखकाने सतत स्वतःला पारखून घेतलं पाहिजे.
सुशील धसकटे, कादंबरीकार
कवी सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात कवी वर्जेश सोलंकी, सफरअली इसफ, भालचंद्र सुपेकर, आत्माराम गोडबोले, संचिता चव्हाण, संगीता अरबुने, पल्लवी परळकर बनसोड, सुषमा राऊत, शिवाजी गावडे, रेखा शिर्के, शुभांगी तरडे, रूपाली दळवी, रचना रेडकर, सुरेश बिले, डॉ.योगिता राजकर, मनीषा शिरटावले, प्रज्ञा मातोंडकर, विजय सावंत, हरिचंद्र भिसे, सत्यवान साटम आदी सुमारे साठ कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
उद्घघाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. संजीवनी पाटील यांनी केले तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन शिल्पा परुळेकर यांनी केले.
पुढील संमेलन पुण्यात
पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागातील मोठ्या प्रमाणात साहित्य रसिक सहभागी झालेल्या या संमेलनात राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर यांनी पुढच्या वर्षीचे समाज साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित करण्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण समाज साहित्य प्रतिष्ठानने स्वीकारून समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अजय कांडर यांनी पुढील संमेलन पुणे येथे आयोजित केले जाईल असे यावेळी घोषित केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
