January 20, 2026
BJP celebrating victory in Mumbai Municipal Corporation elections with Maharashtra leaders
Home » मुंबई, महाराष्ट्रावर भाजपाचा डंका
सत्ता संघर्ष

मुंबई, महाराष्ट्रावर भाजपाचा डंका

मुंबई कॉलिंग –

ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईत भावनिक वातावरण तयार झाले. पण भावनेच्या लाटेवर महापालिकेत ठाकरे बंधुंना बहुमत मिळाले नाही. ठाकरे बंधुंना पंचहत्तरी गाठताना दमछाक झाली तर महायुतीने सव्वाशेकडे घोडदौड केली.

डॉ. सुकृत खांडेकर

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष हाच नंबर १ ठरला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरसह प्रमुख महापालिकांवर महायुतीने सत्ता काबीज केली. महापालिकांच्या २८६९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पन्नास टक्केपेक्षा जास्त जागांवर भाजपाचे नगरसेवक विजयी झाले. तेवीस महापालिकांमधे सर्वाधिक नगरसेवक म्हणून भाजपाने स्थान मिळवले. मुंबई महापालिकेवर भाजपा- शिवसेना ( शिंदे ) महायुतीने विजय मिळवला आणि सलग पंचवीस वर्षे सत्तेवर असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला हटविण्याचा संकल्प पूर्ण केला. वीस वर्षांनंर एकत्र आलेल्या ठाकरे बंधुंना मुंबईकरांनी नाकारले.

उध्दव ठाकरे यांच्या सेनेने भाजपा व शिंदे शिवसेनेशी अटीतटीची झुंज दिली पण राज ठाकरेंच्या मनसेचा कुठेच प्रभाव पडला नाही. ठाण्यावर फक्त आपलेच वर्चस्व हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिध्द करून दाखवले. नवी मुंबईत फक्त आपलेच चालणार हे वनमंत्री गणेश नाईक यांनी दाखवून दिले. पुणे व पिंपरी चिंचवडमधे भाजपाकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने वसई- विरारचा गड कायम राखला. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी लातूरमधे काँग्रेसची सत्ता आणून भाजपाला धडा शिकवला.

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने सर्वात मोठे यश संपादन केले होते, आता महापालिका निवडणुकीतही भाजपाने सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. सन २०१४ पासून महाराष्ट्रात भाजपाची घोडदौड सुरू झाली असून पाठोपाठ निवडणुका जिंकण्याचा विक्रम या पक्षाच्या नावावर नोंदवला जात आहे. लोकसभा, विधानसभा, नगर परिषदा आणि आता महापालिका निवडणुकीत भाजपाने आश्चर्यकारक विस्तार केला व विजयाची मालिका चालू ठेवली आहे, त्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहे. महाराष्ट्रात भाजपा म्हणजे देवेंद्र फडणवीस. गेल्या दोन वर्षात देवाभाऊ अशी त्यांची प्रतिमा झाली आहे. भाजपाच्या अभूतपूर्व विजयाचे शिल्पकार हे देवाभाऊच आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर भाजपाने कब्जा केल्यानंतर देवाभाऊंवर धुरंधर म्हणून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

गेल्या साडेतीन वर्षात भाजपाच्या रणनितीने ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधे मोठी तोड फोड झाली. शिवसेना हे नाव व धनुष्य बाण हे चिन्ह घेऊन एकनाथ शिंदे यांनी उठाव केला तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव व घड्याळ हे चिन्ह घेऊन काकांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला. एकनाथ शिंदे व अजितदादा हे बंडानंतर भाजपाच्या वळचणीला गेले. महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईची सत्ता गमवावी लागली आणि अजितदादांना बरीच आदळआपट केल्यावरही पुणे किवा पिंपरी चिंचवडची सत्ता हाती लागली नाही. महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंना मुंबईतून गाशा गुंडाळावा लागेल व सर्वात नुकसान राज ठाकरेंचे होईल असे भाकीत भाजपाने केले होते. मावळत्या मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे ४४ नगरसेवक शिंदेच्या पक्षात गेले, ठाकरेंच्या पक्षाचे असंख्य पदाधिकारी गेले.

ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईत भावनिक वातावरण तयार झाले. पण भावनेच्या लाटेवर महापालिकेत ठाकरे बंधुंना बहुमत मिळाले नाही. ठाकरे बंधुंना पंचहत्तरी गाठताना दमछाक झाली तर महायुतीने सव्वाशेकडे घोडदौड केली. मुंबईत महायुतीचे दिडशे विजयी होतील असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम व सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार वारंवार सांगत होते. मुंबई महापालिकेत बहुमतासाठी जादुई आकडा ११४ आहे. महायुतीने तो साध्य करण्यात यश मिळवले आहे.

पक्ष फुटल्यानंतर बलाढ्य भाजपा व शिवसेनेशी लढताना सत्तर- पंचाहत्तर नगरसेवक निवडून आणणे ही सुध्दा ठाकरेंची बऱ्यापैकी कामगिरी आहे. मुंबईतील मराठी आणि मुस्लिम मतदारांची साथ ठाकरे बंधुना मिळाली. सन २०१७ च्या निवडणुकीत अविभाजीत शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते व भाजपाचे ८२ होते. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. आता नऊ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना दुभंगलेली आहे, सत्तेपासून दूर आहे. ठाकरे बंधू एकत्र आले हीच त्यांची जमेची बाजू आहे. ठाकरे बंधुनी मुंबई आणि मराठीच्या मुद्यावर ही निवडणूक लढवली. ही शेवटची निवडणूक आहे, चुकाल तर कायमचे मुकाल असे मराठी जनांना आवाहन केले. केवळ मराठी- मराठी करून निवडणूक जिंकता येत नाही , हाच धडा या निकालाने दिला आहे.

ठाकरे बंधू हिंदीच्या सक्तीच्या विरोधात गेल्या वर्षी पाच जुलै रोजी एकत्र आले पण निवडणुकीसाठी युती जाहीर करायला त्यांना पाच महिने लागले. या काळात ते मुंबईत व महाराष्ट्रात का फिरले नाहीत ? संघटना बांधणीसाठी का प्रयत्नन केले नाहीत ? मुंबई बाहेर एखादा अपवाद वगळता उबाठाची कामगिरी निराशाजक आहे. मुंबईच्या सीमेवर असलेल्या ठाण्यातही ठाकरे बंधुंना भोपळा फोडताना नाकी नऊ आले. ठाकरे बंधुंनी नाशिक, ठाणे व मुंबई अशी तीनच सभा घेतल्या. केवळ तीन सभांनी मुंबई व महाराष्ट्राच्या निवडणुका जिंकता येतात का ? मुंबईबाहेर हे बंधु कुठेही फिरले नाहीत. मुंबई बाहेरील कार्यकर्त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले होते. मतदारांना काय वाटते याची त्यांनी पर्वाही केली नाही. यंदा ७६६०० कोटीचे बजेट असलेल्या महापालिकेवर भाजपाने कब्जा मिळवला आहे. मराठी हिंदू महापौर असे असे आश्वासन दिले आहे. ठाकरे बंधुंच्या पराभवानंतर , तुम्हाला मुंबईत भेटायला येतो असे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी टवीट करून त्यांना डिवचले आहे. तर मंत्री नितेश राणे यांनी ट्वीट करून अच्छा, टाटा, बाय बाय, जय श्रीराम …असे ठाकरे बंधुंना म्हटले आहे.

मुंबईत काँग्रेसने वंचित बहुजनबरोबर केलेली युती अपयशी ठरली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड व वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कुठेही एकत्रितपणे प्रचार केला नाही. काँग्रेस व वंचितकडे उमेदवारही नव्हते. ज्या काँग्रेसने मुरली देवरा किंवा आर आर सिंह असे अनेक महापौर मुंबईला दिले, त्या पक्षाला दोन आकडी नगरसेवक निवडून आणताना घाम फुटला.

भाजपाने निवडणुका जिंकण्यासाठी सामदामदंडभेद अशा सर्व मार्गाचा वापर केला . पैशाचे पाट वाहिले. मतदारांना पाच ते दहा हजार रूपयांची पाकिेटे घरपोच दिली गेली. माघार घेण्यासाठी कोटीकोटीची बोली लावली गेली. महिलाना साड्या, मिक्सर, अगदी ल’पटॉपचे वाटप झाले. मतदानानंतर बोटाची शाई पुसली जाण्याच्या तक्रारींचा पाऊस पडला. काहीही झाले तरी निकालानंतर जो जिता वो सिकंदर …. निवडणुकीत विरोधी पक्ष दिसलाच नाही. चर्चा झाली ती महायुतीच्या नेत्यांचीच.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मुंबईवर नवा कारभारी

महायुती की ठाकरे बंधू ?

देवाभाऊ विरूध्द ठाकरे बंधू…

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading