जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-१०
३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज निर्मला भाकरे यांच्या कार्याचा परिचय…
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
स्त्री स्वतंत्र आहे का ? तिचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते का ? ती स्वावलंबी आहे का ? याचे ढोबळमानाने दर्शनी उत्तर ‘आहे’ असे दिसते पण वास्तवात ती कौटुंबिक व सामाजिक दबावाखाली आजही आहे हे नाकारतां येत नाही. काही महिला समाजाच्या विरोधात जाऊन आपले निर्णय घेत आहेत त्यांना समाजात बंडखोर म्हणतात. पण तो निर्णय भावनिक पातळीवरील असेल तर तो धाडसी म्हणावा लागेल. अशाच जीवनात धाडसी निर्णय घेणाऱ्या निर्मलाची ही कथा..!
सामान्यपणे मुलीच्या जन्मानंतर तिचे शिक्षण, लग्न, संसार, नोकरी व मुले हे तिचे विश्व मानले जाते. पण निर्मलाताईंचे आयुष्य इतके साधे सोपे कधीच नव्हते. एम.ई.एस. कॅालनीत बालपण गेलेली, वडील इलेक्ट्रिशियन व आई ससून हॅास्पिटलमधे नर्स. तीन बहिणी व एक भाऊ अशा कुटुंबात वाढलेली. परप्रांतीय लोक शेजारी असल्याने निर्मलाच्या मनात विविधतेने नटलेला भारत रूजत गेला. ताई व त्यांच्या भावंडांचे शालेय शिक्षण पुणे मनपाच्या शाळेत झाले. आई ससूनमधे नर्स असल्याने गावाकडील आजारी नातेवाईक सतत घरी असायचे. कमी पगारात ताईंच्या आईने आपला संसार कष्टाने व धैर्याने केला. आईबरोबर नर्सेस रूममधे बसून ताईंनी अभ्यास केला आहे.
ससूनला ‘श्रीवत्स’ या संस्थेतून मुलं दत्तक दिली जायची. तेथे मुलांसोबत खेळणाऱ्या ताईला पाहून ताईंनी एकदा आईला विचारले की ही ताई कोण आहे ? त्यावर आईने ती सोशल वर्कर आहे. तिचे तेच काम आहे असे सांगितले. तेव्हाच ताईंच्या मनात सोशल वर्कर किती सोप्पं काम आहे तेव्हा शालेय जीवनातच ते बीज त्यांच्या मनात रूजले. ताईंची आई सुधारकी विचारांची पण वडील तसे कर्मठ. तीन मुलींना जन्म दिल्याने ते सतत तिचा राग राग करायचे. धर्माने जरी ख्रिश्चन असले तरीही ते मुलगा मुलगी भेद करत. आईमुळे सारेजण शिकत होते.
सेंट मिराज् कॅालेजातून ताई समाजशास्त्र विषयात पदवीधर झाल्या. तेथेच ताईंना प्रा. डॅा. शर्मिला रेगे भेटल्या. ताईंची धडपड पाहून त्यांना MSW व्हायचा सल्ला त्यांनी दिला. लहानपणी मनात ठरवलेले सोशल वर्करचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताईंनी MSW केले. त्यानंतर ताईंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्त्री समस्याविषयक अभ्यासक्रम कोर्स पूर्ण करून CSR चा डिप्लोमाही केला.
वडिलांच्या विचित्र वागण्यामुळे मनावर परिणाम होऊन ताई जास्त बंडखोर बनल्या. पुरुषी वर्चस्व, पुरूषप्रधानतेची चीड त्यांना येऊ लागली. पण ताईंनी वेगळेच ध्येय मनात ठेवले होते. वडिलांमुळेच त्या अधिक कणखर बनत गेल्या. नर्स किंवा शिक्षिका होऊन तिला नोकरी लागून तिचे लवकर लग्न होईल असा वडिलांचा चौकटीतील विचार होता पण ताईंनी त्यांचे काहीच न ऐकल्याने त्यांनी त्यांच्या लहान बहिणींचे व भावाचे लग्न करून दिले. MSW झाल्याने समाजसेविका व्हायची त्यांची वाट अधिक स्पष्ट झाली. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात स्त्रीपुरुष समानतेचे बीज रोवले गेले. वयाच्या १२ व्या वर्षापासून ताई गर्ल गाईडला जात असत. वडिलांचा ओरडा खात तो उपक्रम मात्र ताईंनी कधीच सोडला नाही, त्यामुळे वयाच्या २४ व्या वर्षी एका इंटरनॅशनल कॅम्पसाठी इंग्लंडला जाऊन भारताचे नेतृत्व करायची संधी ताईंना मिळाली.
लहानपणापासून पाहिलेले श्रीवत्स काही केल्या ताईंच्या मनातून जात नव्हते. नको असलेली मुलं अनेक आया जन्माला घालून सोडून देत होत्या. तेथील मुली ताईंच्या मनाला सतत भुरळ घालत होत्या. त्यात त्या मुलींचा काय दोष ? असा प्रश्न ताईंना सतत भेडसावत होता. मुलींना समाजात असलेला दुय्यम दर्जा ताईंच्या मनाला सतत बेचैन करत होता. कळत्या वयापासून ताईंच्या मनात आपण तेथून एक मुलगी दत्तक घ्यावी हा विचार दृढ होत होता. आई वडीलांचा संसार पाहून लग्न करायचे नाही हा ताईंचा विचार ठाम होत गेला. लग्न केले तर मुलगी दत्तक घेता येणार नाही असा विचार करुन लग्न न करता मुलगी दत्तक घ्यायची हा ताई करत असलेला विचार धाडसी व समाजविरोधी होता.
ताई म्हणतात , ‘मी कोणी श्रीमंत नव्हते. मी कोणी सेलिब्रिटी नव्हते. भावंडांची लग्ने होऊन त्यांना दोन दोन मुलं झाली होती. मलाही मुलं खूप आवडत होती त्यामुळे मुलगी दत्तक घ्यायची इच्छा मनात जोर धरत होती. एक दिवस मी आईला माझी इच्छा बोलून दाखवली व मी काय काय तयारी केली तेही सांगितले व तू मला मदत करशील का तेही विचारले. यावर कधी नव्हे ते आईच्या मनात कुठून इतके बळ आले, ती म्हणाली मी माझ्या सहा नातवंडांचे जे केले तेच सारे तुझ्यासाठी करेल. काळजी नको करूस.’ पण हे ताईंच्या वडिलांना पटणार नव्हते म्हणून ताईंनी मुलगी दत्तक घेतल्यावर वेगळे रहायचीही तयारी ठेवली होती. एकल महिलेने लग्न न करता मूल दत्तक घेणे ही अवघड गोष्ट ताईंनी जिद्दीने पूर्ण केली. खाजगी नोकरी सांभाळून त्याचे संगोपन करणे, अर्थसहाय्य व मदत ही सारी आव्हाने असताना ताईंची आई ठामपणे उभी राहिली.
ताईंनी अडीच वर्षांची सावळी बारीक कुडीची मुलगी दत्तक घेतली. तीन महिने सर्व पूर्तता करून ताईंनी ‘मायराला’ घरी आणले. वडिलांना ते न पटल्याने ते घरातून निघून गेले. थोड्या दिवसांनी भावाने त्यांना परत आणले पण ती मुलगी मला दिसली नाही पाहिजे असा ताईंना दम दिला. पण ताईंच्या आईने घर सोडू नको, सुरक्षितता जास्त महत्वाची असे सांगितल्यामुळे ताई तेथेच राहिल्या. स्काऊट गाईडच्या माध्यमातून गेली २५ वर्ष मुली व महिलांच्या सक्षमीकरणाचे काम करताना ताई स्वतःचे प्रश्न सोडवत इतर एकल महिलांचे प्रश्न सोडवत आहेत. १० ते १८ वर्ष वयाच्या मुलींचा सर्वांगीण विकास व नेतृत्व, कलागुण इ. विषयी ताई काम करतात. वयात येतानाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुलींशी संवाद साधणे हे ताईंचे पॅशन आहे.
इंडियन ख्रिश्चन वुमेन्स असोसिएशन, यंग वुमेन्स ख्रिश्चन असोसिएशन पुणे या संस्थेतून स्त्री पुरुष समानता कशी आणता येईल यासाठी ताई गेल्या ६ वर्षापासून काम करत आहेत.
YWCA या जागतिक संस्थेच्या बोर्डवर त्या आहेत. ही संस्था स्त्री सक्षमीकरणासाठी काम करते. टीन एजर्स मुलींमध्ये काम करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांचे सेशन्स घेणे, त्या संदर्भात आपले ज्ञान अपडेट करणे त्यांना विशेष आवडते. स्काऊट गाईडच्या माध्यमातून वस्ती पातळीवरच्या मुली सक्षमपणे आपल्या जीवनातील लढाया जिंकण्यासाठी उभ्या राहातात. पुणे मनपा शाळेतील मुलींसाठी यार्दी वस्ती प्रकल्प, जानकीदेवी बजाज संस्था, माहेर, सकाळ सोशल फाउंडेशन अशा विविध संस्थांशी ताई जोडल्या आहेत. त्यांची मुलगी मायरा सुध्दा या कामात सहभागी झाली आहे याचा ताईंना आनंद आहे.
एकल महिलांचे प्रश्न हाताळताना आजही महिलांचे शोषण होते. जवळचे नातेवाईक, बहीण भावंडांसाठी अनेक स्त्रीया आपला त्याग करतात. आपल्या जगण्याचा विचार बाजूला ठेवतात असे निरीक्षण ताई नोंदवतात. त्या म्हणतात, ‘थोडे धाडस करून आपले वेगळे मार्ग निवडा, स्वतःला कष्ट पडले, यातना झाल्या तरीही स्वतःच्या आनंदासाठी जगणे हे फार महत्वाचे आहे. मी बिचारी झाले नाही. लग्न न करता मुलगी दत्तक घेऊन तिला वाढविण्याचा निर्णय मी कळत्यापणी घेतला व तो मी पूर्ण करू शकले याचा आनंद आहे.’
आज ताईंची मुलगी मायरा पदवीधर होऊन सध्या ९ महिन्यांसाठी स्काऊट गाईडची व्हॅालेंटियर म्हणून स्वित्झर्लंड व इंग्लंड येथे गेली आहे. ताईंचा मायराला प्रचंड गर्व आहे. एकल महिलांना आदर्शवत् अशा ताईंच्या निर्णय, धाडस, जिद्द, चिकाटी व धैर्याला सलाम..! अशा या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान धाडसी लेकीला मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
