झाडं आज पोरकी झाली...
आज...
होती...झाडं स्तब्ध.. निशब्द...
कारण...
त्यांची आई...त्यांची माय...
आज त्यांना सोडून गेली
झाडं आज पोरकी झाली
ती जन्मली.. अशीच
114 वर्षांपूर्वी
एका मजुराघरी...
वाढली... मोठी झाली
लग्न झालं अन..
सून होऊन गेली मजुराघरी
पण...
तिच्या संसार वेलीवर...
कळी लागली नाही...
फुल उमलले नाही...
माता होण्याच भाग्य
तिला काही लाभले नाही...
कोण म्हणालं... वैद्य पहा..
कोण म्हणे... देवाचं बघ...
तर कोणी 'मूल' दत्तक घे म्हणाले
पण
हिने कोणाचेच नाही ऐकले...
'वांझ'पण घेऊन ती जगत होती
जगण्यात गाणं शोधत होती...
पण
वांझ या शब्दानं
जग तिला मारत होतं...
तिने निर्णय घेतला...
स्वतःची बाळं तयार करण्याचा
अनं वाढवण्याचा...
वडाच्या फांदया...
तिने पृथ्वीच्या गर्भाशयात रोवल्या...
आणि लेकरं जन्मू लागली...
ती त्यांना जपू लागली
सांभाळू लागली
हवं नको ते पाहात होती
बाळ मोठी होत होती...
दरवर्षी ती दहा लेकरांची...
स्वतःच वांझंपण घालवत
माय होत होती
तिने झाडं लावली
वाढवली... लेकरांची उणीव
अशी भरून काढली
अखेर... वांझ शब्द गेला
आणि
वृक्ष माता ही तिची
ओळख झाली...
शेकडो लेकरांची माय...
गुणी लेकरांची माय...
पाखरांना घर देणारी लेकरं..
येणा जाणाऱ्याला सावली देणारी लेकरं
शेकडो वडाची झाडं...
आणि
त्यांची माय सालूमर्दा थीमक्का
या झाडांचीं माय...
पद्मश्री झाली...
तरीही तिने
झाडांच मायपण नाही सोडलं
ती झाडांची मायचं राहिली...
ती माय आज सोडून गेली
सकाळी झाडावरून थेंब अंगावर पडले
धुकं नितळते,
असं वाटत होतं...
पण ते धुक्याचं नितळणं नव्हतं आज...
ते झाडांचे रुदन होतं...
हे बातमी पाहून कळलं
थीमक्काचं निधन झालं...
झाडं आज पोरकी झाली
त्यांची माय त्यांना सोडून गेली
- डॉ. व्ही. एन. शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
