दुसऱ्या वनराई बालकुमार साहित्य संमेलनामध्ये डॉ. प्रतिमा इंगोले यांनी केलेल अध्यक्षीय भाषण…
आज ह्या पावनपर्वावर इथे जमलेल्या सर्वांना मी प्रथम वंदन करते. कारण पर्यावरण रक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर हे संमेलन आयोजित केले आहे. योगयोगाने पर्यावरण रक्षणाचे काम जीव धोक्यात घालून करणाऱ्या अभयची कहाणी अर्थात ‘पुराच्या वेढ्यात अभय’ ही माझी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. आणि जाणकारांनी ह्या कांदबरीतील नायक अभय हा दुसरा ‘फास्टर फेणे’च आहे, असे म्हटले आहे. अर्थात ग्रामीण भागातला. मराठीत शहरी धाडसी कुमार नायकांच्या व्यक्तीरेखा आहेत पण ग्रामीण पार्श्वभूमीवर आतापर्यंत हीच वानवा होती, ती उणीव आता भरून निघाली असेही या कादंबरीबाबत समीक्षक म्हणतात. ह्या संमेलनाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीव व जागृती हाच आहे. त्यादृष्टीने ही कादंबरी पूरक ठरते आहे. पर्यावरण म्हणजेच ‘निसर्गाचे संतुलन’ अर्थातच पृथ्वी, तिच्या सभोवतीचे वातावरण, ह्या वातावरणातील घटक, त्या घटकांचे एकमेकांवर होणारे परिणाम. ह्या परिणामांमुळे वातावरणात होणारे बदल, या बदलांमुळे घडणाऱ्या सेंद्रिय प्रक्रिया आणि या प्रक्रियांचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम. या सर्वांचा आपणास समावेश करावा लागतो. अर्थात प्राणिसृष्टी आणि निसर्ग, जीवसृष्टी आणि पर्यावरण हे एकमेकांवर अवलंबून असतात.
आपण तसे आजपर्यंत ऐकत आलेले असतो की ही सृष्टी पंचमहाभूतांनी बनली आहे. आणि मानवी शरीरही पंचमहाभूतांनी बनले आहे. म्हणजेच पंचमहाभूतांचे असंतुलन म्हणजे मानवी शरीराचे असंतुलन ! ह्याचाच अर्थ सृष्टीतील असंतुलन मानवावर परिणाम करणारच ! पण माणसाला हे कळत असून वळत नाही. माणूस अती स्वार्थी झाला आहे. त्यामुळे तो कसलाच विचार करत नाही. त्यामुळे सृष्टीचा तोल बिघडतो. पूर्वी माणसांचे जगणे पर्यावरणपूर्वक होते. मी याचा अनुभव घेतला आहे. कारण मी निसर्गाच्या कुशीत वाढले आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या, वाणनदीच्या कुशीत वसलेल्या ‘दानापूर’ या गावी माझे बालपण गेले आहे. आणि मी त्यावेळची ग्रामीण संस्कृती कशी पर्यावरणपूर्वक आहे याचा अनुभव घेतला आहे. माझे आजोबा तर निसर्गालाच ‘देव’ मानीत होते. ते कधी देवळात गेले नाहीत वा त्यांनी कधी देव-देव केला नाही. ते हनुमान मंदिराचे अध्यक्ष होते पण फक्त बलाची उपासना करण्यापुरते ! उलट त्यांनी या मंदिरात मागासवर्गीयांसाठी मोफत वसतिगृह आणि मोफत वाचनालय उघडले होते. भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांचे ते निवासस्थान होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा आणि शक्तीची उपासना करण्याचा मंत्र दिला.
तशीही ग्रामीण संस्कृती पर्यावरणपूर्वक आहेच. कारण प्रत्येक बाई आपल्या अंगणात एक तरी फळझाड व फुलझाड लावतेच. त्यामुळे तिचे अंगण शोभिवंत होते. सध्या पौष महिना चालू आहे आणि या महिन्यात ग्रामीण गृहिणी ‘आदित्य नारायणाचे’ व्रत करते. यावेळी सूर्य मकरवृत्तावर असतो. त्यामुळे तो विदर्भाला जवळ असतो. तो जणू आपल्या अंगणातच आला आहे असे समजून त्याचे आतिथ्य केले जाते. यावेळी वाड्यातील सर्व स्त्रिया एकत्र जमून कहाणी ऐकत आणि मग उपवास सोडत. आईच्या आग्रहाखातर लहानपणी मीही हा उपवास करायची. पण कहाणी ऐकल्याशिवाय जेवायचं नाही ही अट होती. आणि सगळ्यांची सगळी कामधाम आटोपेपर्यंत तीन वाजायचे. मग मला भूक लागायची. तशी तिची चुलत आजी, जी खूप कनवाळू होती. ती म्हणायची, ‘आईक व ईमल, तिले भूक लागली ना तं तिले म्हना हे पाच शब्दाची कायनी देवाजोळ सांग आन् मंग उपास सोळ’. मग काय घरच्याच देवाचं निघालं. आजीनी कहाणी सांगितली. तिने ती देवाला सांगितली. झालं. सर्वच एकदम सोप्पं झालं. ती कहाणी अशी –
“जाईजुईचा केला मांडो
गंगीचं आनलं पानी
असी रानूबाई शायनी
पाचा शब्दाची कायनी”
कहाणी खरी वरील दोन ओळींचीच. कदाचित त्यात ‘केला’ हा शब्दही नसावा. मग उरतात पाच शब्द. खाली राणूबाईची स्तुती आहे. ती कशी शहाणी आहे हे निक्षून सांगितले आहे. आणि खरेच ती शाहणी आहे. ‘राणूबाई’ म्हणजे पृथ्वी. पौष महिन्यात तिला ‘सूर्यपत्नी’ म्हणून संबोधिले आहे. ‘आदित्य – राणूबाईचे’ हे व्रत पण इथे सूर्य नामधारी. जे काय करते ती राणूबाई. ती काय करते तर गंगीचं अर्थात इथे समुद्र अध्यारूत आहे. कारण ‘गंगा’ समुद्राला मिळते, नव्हे सर्वच नद्या समुद्राला मिळतात तर ती पाणी आणते म्हणजे पाण्याची वाफ करते. अर्थात वाफ करतो सूर्य ! मग पाऊस पडतो. तो पडतो आकाशातून! पण त्याला वाऱ्याची साथ लागते. आणि मग पृथ्वीवर हिरवा मांडव तयार होतो. म्हणजे झाडं फुलतात. आकाश कवेत घेतात, वेली बहरतात, फळं, फुलं देतात. भाजीपाला पिकतो. धान्य डोलू लागते. कणसातून दाणे निसवतात. सृष्टीवर सर्वत्र आबादी आबाद होते. माणसं तृप्त होतात. हे करते एकमेव पृथ्वी! पण तिला साथ लागते सर्वांचीच. त्यावेळच्या अशिक्षित निर्मात्याने हे सृष्टिचक्राचे सारच पाच शब्दात सांगितले आहे. त्यात पर्यावरणाचे मर्म आहे. पंचमहाभूतांची आळवणी आहे आणि ह्या पंचमहाभूतांच्या प्रसन्नतेमुळे मानवी जीवन सफलसंपूर्ण होते. इथे कहाणीही सफल संपूर्ण होते. ऐकणाऱ्याला पुण्य मिळते पण नुसते पुण्य मिळून काय उपयोग. तर त्याच्या रक्षणाची जबाबदारी त्याचेवर येऊन पडते. नद्या स्वच्छ राहिल्या तर पाणी खळखळेल, पाणी खळखळले तर समुद्राला मिळेल. मग वाफ होईल, पाऊस पडेल, सृष्टी बहरेल.
पण केवळ पावसावर सृष्टीचे भागत नाही. झाडांना पाणी मुरायला हवे. त्यासाठी पाणी मुरण्याची प्रक्रिया घडायला हवी. त्यासाठी जमीन लागते. आणि जमीन तर आपण अतोनात वापरतो. पूर्वीचे पाणी मुरण्याचे क्षेत्र कमी कमी होतेय. कारण आम्ही वारेमाप जमीन वापरतो. पिकाऊ जमीन, जिथे पाणी मुरते तिथे प्लॉट पाडतो आणि घर बांधतो. पूर्वी एका घरात पाच भाऊ राहायचे. आता पाच भावांना पाच घरं लागतात. एवढंच नाही तर एका भावालाच पाच घरं लागतात. गावात घरं, शहरात घरं, नोकरीचे ठिकाण जवळ पडते तिथे फ्लॅट. शिवाय फार्म हाऊस, फिरायला जायचे तर तिथे म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी घरं आणि ही घरं तर हवेत बांधली जातच नाहीत.
आता रस्त्याचेही तसेच. जुने रस्ते, मग नवीन हायवे, मग एक्सप्रेस वे, मग समृद्धी मार्ग, मग कॅपसूल मार्ग, आणीखी कितीतरी! त्यांनाही जमीन लागते. मग शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेतली जाते. ते बिचारे ओरडतात. देशोधडीला लागतात. शहरात येऊन आपली ओळख गमावतात. कुत्र्यांसारखे बेवारस जगायला लागतात. खेडी ओस पडतात. शहरं फुगतात. तीही पुन्हा बकाल होतात. हे सर्व कशासाठी ? तर विकासासाठी! पण यातून विकास कोणाचा होतो ? त्यांना खरंच विकासाची गरज असते का ? इतकेही करून ते देशात टिकतात का ? का पळतात दुसऱ्या देशात ! असे प्रश्न संवेदनक्षम मनास पडतात. पण त्याची उत्तरे मिळत नाहीत. मग या विकासासाठी मानशी खर्च होतो त्याचे काय? इतकेच नाही तर मंदिराचेही तसेच! एक मंदिर असते पण त्याने भागत नाही. लोक जागोजागी मंदिरे उभारतात. जी आहेत ती मोठी मोठी करतात. एकाच देवाची अनेक गावी मंदिरे उभारतात. बरं जिथे मुख्य मंदिर असते तिथेही जाऊन येतात. मंदिराला वारेमाप देणग्या देतात. अशी मंदिरांची संख्या मोजली तर एकाच गावात एकाच देवाची असंख्य मंदिरे ! कशासाठी? शेवटी देव चराचरात सामावला आहे. म्हणजेच सृष्टीत सामावला आह. अशिक्षित बहिणाबाई! पण ती म्हणते
“माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता – भागवत
पावसात समावतं
माटीमधी उगवतं “
माझा देव पावसात सामावतो आणि मातीमधून उगवतो. पण त्यासाठी माती राखायला हवी. पाऊस पडायला हवा तरच सृष्टी टिकेल. खरं तर आम्ही देवांना स्वर्गात जागा दिली आहे मग आणखी पृथ्वीवर कशासाठी? बरं ते वेळ आली तर स्वर्गातून पृथ्वीवर येतातच. मग हा अट्टाहास कशासाठी ? त्याला जागा लागते म्हणून हा प्रश्न! अशीच जागा आम्ही कुरतडत राहिलो तर काही दिवसांनी पाणीच मिळणार नाही. सर्वत्र वाळवंट होईल. मग शेती बहरणार नाही. अन्नही पिकणार नाही, मग खाणार काय ?
माझी पहिली कादंबरी आहे बुढाई. ती १९९९ साली प्रकाशित झाली. तत्पूर्वी सहा वर्षे आधी ती लिहिली होती. म्हणजे १९९२ वगैरे! म्हणजे झाली पस्तीस वर्षे! त्यावेळी मी पिकाऊ जमिनीचे क्षेत्र कमी होतेय हा विषय मांडला होता. लोक आज त्यावर बोलतात. मला ही कादंबरी सुचली त्यालाही पृथ्वीच कारणीभूत झाली. एका पिकाऊ शेताचे प्लॉट पडले. आम्ही प्लॉट घेतला. आऊट हाऊस बांधले. राहायला गेलो. नवीन वस्ती. एका घरासाठी लोटगाडीवाले येईनात. अंगणात एका कोपऱ्यात धणे पेरले. कारण सांबार (कोथिंबीर ) रोज लागतो. त्यावर्षी पाऊस आला नाही. धणे उगवले नाही. मी विसरून गेले धणे पेरल्याचे. दुसऱ्या वर्षी खूप पाऊस आला. एक दिवस अंगणात फिरताना रांगेत काहीतरी उगवलेले दिसले. जवळ जाऊन पाहिले तो सांबार होता. खात्री पटण्यासाठी पान तोडून वास घेऊन पाहिला. हो! तो सांबारच होता. पान खाऊन पाहिलं. तीच ताज्या सांबाराची चव ! मला वाटले, म्हणजेच जमिनीने एक वर्ष या बियांचे राखण केले. कारण तो तिचा नैसर्गिक गुणधर्म आहे. आता आम्ही प्लॉट बांधून तो गोठवून टाकणार आहोत. पण मग जमिनीची खदखद व्यक्त होईल. त्याचे काय ? तर त्याचे काहीच नाही. कारण ती आम्हाला ऐकू येणारच नाही. जे ऐकू येते, डोळ्यांनी दिसते. त्याचीच आम्ही दखल घेत नाही मग न ऐकू येणाऱ्या गोष्टीची कशाला फिकीर करा. पण त्यातून कालांतराने आमचेच नुकसान होते.
आम्ही अभिमानाने सांगतो ‘गाडगेबाबा’ आमच्या महाराष्ट्राचे ! त्यांचा कीर्तनातला तो संवाद प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, ‘तुमच्या गावात मारोतीचं मंदिर आहे?’
लोक म्हणतात ‘हो’ !
मंग देव किती ?’
लोक म्हणतात, ‘एक’.
‘गावात मादेव हाये ?’ ‘हो’
‘मंग देव किती ?’
लोक म्हणतात, ‘दोन’
‘मंग म्हसोबा हाये ? मरीमाय हाये ?’
असं करीत करीत गाडगेबाबा म्हणतात, ‘मंग देव एक सांगताखेपी काय डोक्सं गहान ठुल व्हतं ?’
‘बरं तुमचा देव कुत्र्याले हाकलत नायी, निवद खात नायी, तरी त्याची पूंजा करता? आन् मायबापाले भाकर देत नाही’
आज हीच परिस्थिती आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. मायबापांना आपल्या सुशिक्षित लेकरांकडे जाण्याची भीती वाटते आहे.
गाडगेबाबांच्या जीवनातला दुसरा एक प्रसंग असाच पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा आहे. ‘ऋणमोचन’ या दर्यापूर तालुक्यातील गावी पौष महिन्यात यात्रा भरते. ही यात्रा रथसप्तमीपर्यंत असते. साधारण ग्रामीण गृहिणी जे ‘आदित्य राणूबाईचे’ व्रत करतात तसेच हे ! दर रविवारी यात्रा व रथसप्तमीला सांगता. तर गाडगेबाबा यात्रेकरूंची सोय व्हावी म्हणून नदीत उतरण्यासाठी पायऱ्यांचा घाट तयार करीत होते. त्यांना भेटायला म्हणून तुकडोजी महराज आले. त्यांचे सोबत माधानचे लेखक बाबा मोहोडपण होते. लोकांनी सांगितले, ‘तिंगे गाडगे बाबा नदीत पायऱ्या खंदून रायले, मग तुकडोजी महाराज नदी काठी आले. गाडगेबाबांना रामराम केला. पण गाडगेबाबांनी काम थांबवलं नाही. त्यांचे खणणे आपले सुरूच! तुकडोजी महाराज म्हणाले, ‘हे बाबा मोहोड ! आमच्या जवळच्या गावाचे. हे लेखक आहेत. बुकं लिहितात, बुकं वाचतात.” गाडगेबाबांनी काम थांबवून बाबा मोहोड यांचेकडे आपादमस्तक पाहिलं आणि विचारलं, ‘तुम्ही बुकं वाचता ? कोनती कोनती बुक वाचली?’ आता बाबा मोहोडांना वाटलं, गाडगेबाबा वयस्कर आहेत म्हणून त्यांनी धार्मिक वा आध्यात्मिक पुस्तकांबद्दल विचारले असेल?’
बाबा मोहोड म्हणाले, ‘हो बाबा, मी ज्ञानेश्वरी वाचली, भागवत वाचले, तुकारामांची गाथा वाचली.’ तसे गाडगेबाबा थेट उभे झाले. त्यांनी आपल्या हातातील फावडे सरळ समोर धरले. स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि म्हणाले, ‘तुमी हे बुक वाचलं नसंल. हे अभाय, हे धरती, ह्या चांन्न्या, ह्या नद्या, हे डोंगर, हे झाडंझुडपं, ह्या येली, हे पाखरं ? नायी ना वाचलं?’ तसे बाबा मोहोड मुके झाले. आपण गाडगेबाबांना अशिक्षित म्हणतो पण त्यांना समजले की पुस्तकी ज्ञानापेक्षा पर्यावरणाचे ज्ञान उपयोगाचे असते. जे शेतकऱ्याला असते. जे खेड्यातील अडाणी बाईला असते आणि हेच खरे ज्ञान! या ज्ञानानेच पृथ्वी सफल संपूर्ण करता येते. प्रत्येक लिहिणाऱ्याने आपले कर्तव्य म्हणून पर्यावरणाचे ज्ञान हस्तगत केले पाहिजे आणि पर्यावरणपूरक जगले पाहिजे. पर्यावरण रक्षणाचे निरनिराळे उपाय शोधून काढले पाहिजेत. पण जे गाडगेबाबांना समजले, बहिणाबाईला समजले ते आम्हाला समजत नाही. आम्ही कसले शिक्षित तर आम्ही खरे अडाणी! उलट आम्ही कृषी संस्कृतीतून आलेल्या आमच्या पर्यावरणपूरक सणांचा बोजवारा उडवून टाकला. पर्यावरणपूरक लग्नविधींचा बट्ट्याबोळ करून टाकला. आणि ‘फॉग’ की काय ते आणले, जे प्रदूषण करते. फटाके असतातच सोबतीला. पूर्वी बँड वाजला की समजायचे लग्न झाले. पण आता फटाके फुटतात.
आपण एका प्रसिद्ध व्रताचे उदाहरण घेऊ. कारण त्याचा संबंध झाडाशी आहे. तर हे व्रत आहे वटसावित्रीचे. ते कोणी करावे? का करावे याच्याशी आपले घेणेदेणे नाही. पण कसे करावे याच्याशी आहे. माझ्या येणाऱ्या ‘झुलते झुले’ नावाच्या पुस्तकात ‘व्रतभलाई’ नावाचा लेख आहे. त्यात म्हटले आहे की, पर्यावरणपूरक असणारा हा सण आता पर्यावरण घातक होतोय. पूर्वी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा हा सण! पण आता बदलते वातावरण, बदलत्या श्रद्धा यांनी प्रत्येक सणांच्या उद्देशालाच नख लावले जाते. पूर्वी ‘वडाचा पार’ म्हणजे ग्रामीण आकाशवाणी केंद्रच तिथे स्त्रियांना रोज जाता येत नव्हते. म्हणून ह्या एका दिवशी तो त्यांना मुक्त होता. गावोगावच्या सूनवायया नटूनथटून किलबिलत वडाच्या पारावर यायच्या. त्यांना मोकळा वारा अंगावर घेता यायचा. शरीराला ऑक्सीजन मिळायचा. एरव्ही कडीकुलुपात असणाऱ्या त्यांच्या दागिन्यांनाही वारा लागायचा. ज्या कोणी पारावर जाऊ शकत नाहीत त्या आपल्या घराची भिंत शेणाने सारवून, घरच्याच चुन्याने त्यावर वडाचे चित्र काढायच्या. त्यांच्या अंगभूत कलेला वाव मिळायचा. शिवाय या व्रतात मुख्य विधी पेव भरण्याचा असायचा. काढलेल्या वडाच्या चित्राखाली मातीच्या जमिनीत पेव केले जात. म्हणजे छोटे खड्डे. ते धान्याने भरले जात. ही होती कृतज्ञता ! कारण नवे धान्य घरात आलेले असे, जिने दिले त्या भूमीला त्यातून दान दिले जाई.
दुसऱ्या दिवशी ते धान्य नदीत शिरवले जाई. जळातील जिवांना त्याचा फायदा होई. पण आता हे संपूर्ण बदलले तर फांदीतोड सुरू झाली. तुम्ही शहरात बघा फांद्याच्या फांद्या विकायला येतात. आयाबाया विकत घेतात व त्यांची पूजा करतात. नोकरी करणाऱ्या चक्क लोकलमध्ये फांदी विकत घेतात. पण चुकूनही रोप विकत घेत नाहीत. कबूल आहे आता ‘वडाचे पार’ शिल्लक नाहीत. पण म्हणून ते निर्माण करता येत नाहीत असे तर नाही ? बरं पेपरवाले आणि दूरदर्शनवालेही वडाभोवती फिरणाऱ्या नटलेल्या स्त्रियांचे फोटो टाकतात. पण चुकूनही एखादा मुलगा वा मुलगी वडाचे रोप लावतेय असा फोटो टाकत नाहीत. मीडियावाले बरेचदा अंधश्रद्धेला खतपाणी देतात हे खरे का खोटे, तुम्ही तपासून बघा आणि म म्हणा, तर फांद्याऐवजी वडाची रोपे विकली तर, आणि लावली तर नक्कीच पर्यावरणाला पूरक ठरेल. पण विकणाऱ्यांनी मनावर घ्यायला हवे. तसेच दसऱ्याच्या सोन्याबाबतीत किंवा श्रावणातल्या बेलाच्या फांद्यांबाबतीतही होऊ शकते. जाऊ द्या. ह्यात व्रताचे भले आहे. ह्या लेखाला म्हणूनच ‘ व्रतभलाई’ नाव देऊन मी एक नवा शब्द मराठीच्या प्रांगणात रूजू केला आहे. ह्या ‘झुलते झुले’ने असे बरेच नवे शब्द मराठीला दिले आहेत. प्लॅस्टीकबाबतही तेच. उठसूठ काहीही प्लॅस्टीकमध्ये मिळते. मग त्याचा कचरा होतो. गुराढोरांच्या पोटात जातो. जाळला तर प्रदूषणयुक्त धूर होतो. किमान हा प्लॅस्टीकचा वापर टाळला तरी खूप झाले.
वनराईनेही आपल्या दिवाळी अंकातून पर्यावरणाला हातभार लावणारे अनेक विषय हाताळून समाजजागृती केली आहे. माझी व वनराईची ओळख अशा लिखाणातूनच झाली आहे. त्यांनी मला आजही विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. शिवाय हे संमेलन अकोल्यात होते आहे. अकोला कसेही असले तरी माझे माहेर आहे. ह्या शहराशी माझ्या अनेक कडूगोड आठवणी निगडित आहेत. माझे आजोबा बापूसाहेब ढाकरे यांना थोडेफार समाधान याच गावाने दिले आहे. आपण ज्या परिसरात आहोत त्याच परिसरात कुठेतरी महानगरपालिकेची शाळा होती आणि त्या शाळेत कविवर्य स्व. केशव मेश्राम शिकत होते. त्यांचे गुरुजी बापूसाहेब ढाकरेंचे विद्यार्थी होते, व त्यांच्या कवितेचे चाहते होते. मग ते बापूसाहेब अकोल्याला आले की आवर्जून त्यांना शाळेत नेत आणि कविता गायला लावत. त्यांचा (बापूंचा) आवाज खडा व भारदस्त होता. केशव मेश्राम यांनी पुण्यात एका भर सभेत जाहीररित्या सांगितले की, त्यावेळी बापूसाहेबांच्या कविता ऐकून मला कवी व्हावेसे वाटले व कविता लेखनाची प्रेरणा दिली.’ यापेक्षा कोणते मोठे प्रमाणपत्र हवे की जे या शहराने माझ्या पूर्वजांना दिले, त्यामुळे मी या शहराची कायम ऋणाईत आहे. तशीही त्या काळात बापूंची कविता संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शाळेतून प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीतासारखी म्हटली जात होती. दुर्दैवाने मला हे सांगणारे खूप भेटले पण ती कविता भेटू शकली नाही. ती तळेगावच्या शाळेतील हस्तलिखितात आहे असे फक्त समजले पण ते हस्तलिखित मिळू शकले नाही. अर्थात माझा शोध चालूच आहे. त्यांनीही पर्यावरणपूरक कविता लिहिल्या आहेत.
माझे पण आठव्या वर्षीपर्यंतचे बालपण अकोल्यालाच गेले. पण माझ्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे मला अकोला सोडावे लागले. मी अभिमानाने आज त्यांच्या स्मृतीस वंदन करून सांगते की, ते खूप हुशार होते. बुद्धीबळपटू होते. पोहण्यात पटाईत होते आणि हॉकीचे खेळाडू होते. पण आमचे अकोल्याचे तेव्हाचे घर माझ्या स्मृतिपटलावर कायम कोरले गेले आहे. या सर्वांबद्दलची कृतज्ञता म्हणून मी इथले ज्येष्ठ व मातब्बर पत्रकार श्री. गजानन सोमाणी यांच्या अकोल्याचा इतिहास असलेल्या ग्रंथाला मी प्रस्तावना लिहिली. तेव्हा तर अकोल्याचा इतिहास जाणून मला ह्या शहराबद्दल अधिक अभिमान वाटला. आणखी एक खंत व्यक्त करावी वाटते. ती अशी की, पूर्वी ही मोर्णा नदी स्वच्छ होती. माझे वडील त्या नदीत पोहायला जायचे. पण नंतर ती प्रदूषित झाली. कारखान्याचे पाणी नदीत जाऊ लागले. मग ‘अनिकट’ वरती पोहायला जाऊ लागले.
अकोल्याच्या तीन शाळांचा मी अनुभव घेतला आहे. आधी महानगरपालिकेच्या नऊ नंबर शाळेत होते. आमच्या गुरुजींना मी हुशार वाटायचे. पण माझी पाटी सतत फुटायची. आजोबा वडिलांचे वडील किसनीबाई भरतिया हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर होते. ते पाटीला दवाखान्यातील चिकटपट्ट्या लावून द्यायचे. पण मला त्यामुळे पूर्ण पाटीवर लिहिता येत नव्हते. चिकटपट्टीवर लेखणी चालत नव्हती. एक दिवस असेच गुरुजींनी फळ्यावर लिहून दिलेले मला लिहिताच येईना, माझे वय असेल सात वर्षांचे. मला रडू आले. मग गुरुजी जवळ आले. तर त्यांना माझी पाटी दिसली. त्यांच्या माझ्या रडण्याचे कारण लक्षात आले. पाच वाजता आई घ्यायला आली. गुरुजी म्हणाले, ‘तुमची मुलगी एवढी हुशार ! तिला पाटी का घेऊन देत नाही ?’ आईच्या डोळ्यातून गंगा-यमुना व्हायला लागल्या. तिला हुंदका आवरेना. तिचे पांढरे कपाळ पाहून गुरुजींच्या सर्व लक्षात आले.
ते म्हणाले, ‘चला, मी हिला पाटी घेऊन देतो.’ जवळच दुकाने होती. गुरुजींनी मला नवी कोरी दगडाची पाटी घेऊन दिली. मला आभाळभर आनंद झाला पण तो टिकला नाही. घरी आल्यावर आपल्या विधवा सुनेला कोणीतरी पाटी घेऊन दिली म्हणून पाटी तर फोडलीच पण माझी शाळाही बदलली. मग मी मुलींच्या शाळेत जाऊ लागले. पण नंतर तीही शाळा राहिली नाही. कारण चवथीत मग दानापूरलाच जावे लागले. परत नववीत आताच्या सावित्रीबाई कन्या शाळेत आले. तुम्ही माहेरचे म्हणून आज हा प्रसंग तुम्हाला सांगितला. शेवटी माहेरच्या माणसांजवळच मन मोकळे करावेसे वाटते. नववी ते अकरावी मी इथेच शिकले. त्या काळात माझ्या इथल्या मैत्रिणींनी व शेजाऱ्यांनी मला खाऊपिऊ घालून माझी काळजी घेतली. म्हणून मी त्यांचीही ऋणी आहे. या शहराचीच ऋणी आहे.
केवळ आईची इच्छा होती, म्हणून मी त्या काळात शिकत गेले. अकरावीनंतर अमरावतीला विदर्भ महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण कॉलेजचे मोरपंखी दिवस माझ्या वाट्याला आले नाहीत. कारण सतत आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला शिकायचेच आहे हे मनाला बजावत राहिले. आणि आजोबा बापूसाहेब ढाकरे यांची इच्छा होती म्हणून कामधाम आटोपून पहाटे उठून लिहीत राहिले. लेखिका झाले. म्हणूनच मला त्यांच्या परिसरात मला तुम्ही लायक समजले याचा आनंद होतो आहे. अनेक अडथळे आले पण मी लढत राहिले. लिहीत राहिले. त्याचे आज सार्थक झाले. मी वंदनीय मोहन धारिया यांना खूप मानत होते. त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करते. त्यांच्या या स्मृतियज्ञात मला सहभागी होता आले म्हणून धन्यता मानते. सर्व अकोलेकरांना, विशेषतः बबनराव कानकिरड आणि गजानन चौधरी यांनाही धन्यवाद देते.
थोडक्यात आताच पर्यावरण रक्षणाची अधिक गरज आहे. आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात कोणालाच वेळ नाही. माणसांची यंत्रे झाली आहेत. जागतिकीकरण काळाच्या बोकांडी बसले आहे. पैशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच मोबाईलने जगच विस्कटून टाकले आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. मांज्यामुळे पाखरं मरत आहेत. मोबाइलच्या रेंजमुळे तेच होते आहे. झाडं तोडल्यामुळे, बने जंगले विरळ झाली आहेत. जंगली श्वापदं त्यामुळेच भटकी होऊन गावात येत आहेत. या सर्वांवर कशी मात करता येईल, कसा अटकाव करता येईल याचा विचार करण्याची आजच गरज आहे. नाहीतर घरे आहेत पण पाणी नाही. पैसा आहे पण धान्य नाही असे होईल. त्यामुळेच हे संमेलन महत्त्वाचे आहे. गावं आहेत पण माणसं नाहीत असे होऊ नये म्हणून सर्वांनीच दक्ष राहण्याची गरज आहे. सर्वत्र वृक्षलागवड आणि मोबाईलचा मर्यादित वापर एवढे तर आज करू या! पाण्याचा मर्यादित वापर तर सहज शक्य आहे.
शेवटी वनराईला व वनराईच्या निवड समितीला धन्यवाद देऊन थांबते व महादेवी वर्मांच्या ह्या चार ओळी तुमच्यासाठी सादर करते
भुलती थी मैं सिखे राग
निछलते थे कर बारंबार तुम्हे तब आता था करुणेश
उन्ही मेरी भुलो पर प्यार’
अर्थ तुम्हाला माहिती आहे. पण इथे विद्यार्थी मित्र आहेत म्हणून सांगते आहे. तशीही मी काही वर्षे प्राध्यापक होते. तेव्हा आम्हाला एक वाईट खोड लागली होती. ज्याचा अर्थ समजला तेच विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा सांगायचे आणि ज्याचा समजला नाही ते चुकूनही सांगायचे नाही. कारण ते आम्हालाच समजलेले नसायचे. म्हणून मी अर्थ सांगत आहे. की, ‘रसिकांनो! तुम्ही एवढे करुणेचे सागर आहात की तुम्ही माझ्यावर तर काय पण माझ्या चुकांवर देखील प्रेम करायला लागला आहात ! धन्यवाद !
जय मराठी ! जय महाराष्ट्र !! जय वनराई !!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
