January 20, 2026
Union Minister Jitendra Singh’s Bombay remark sparks Mumbai vs Bombay political controversy.
Home » बॉम्बे विरूध्द मुंबई…
सत्ता संघर्ष

बॉम्बे विरूध्द मुंबई…

स्टेटलाइन-

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला पासष्ट वर्षे पूर्ण झाली पण दिल्लीतील राज्यकर्त्यांना मुंबई ही मराठी भाषिक महाराष्ट्राची राजधानी आहे हे अजूनही सलत आहे. केंद्रीय विज्ञान- तंत्रज्ञान राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार ) डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईत येऊन म्हणाले- आयआयटी बॉम्बेच्या नावातील बॉम्बे तसेच ठेवले, मुंबई केले नाही, हे चांगलेच झाले, त्यामुळे मी खूश आहे…

डॉ. सुकृत खांडेकर

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एका अमराठी केंद्रीय मंत्र्याने केलेल्या वक्तव्याने मुंबईकर मराठी माणूस अस्वस्थ झाला. भाजपचा मराठी मतदार बेचैन झाला. उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे प्रमुख राज ठाकरे या ठाकरे बंधुंना जितेंद्र सिंग यांना आयते कोलीत मिळवून दिले. भाजपचे प्रवक्ते बॉम्बेचे मुंबई राम नाईक यांनी केले, अशी टेप उगाळत बसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र बचावात्मक पवित्रा घेऊन आयआयटी बॉम्बेचे मुंबई करावे असे पत्र आपण पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहोत असे सांगावे लागले. जितेंद्र सिंह आले आणि निघून गेले. आयआयटीच्या कार्यक्रमात विज्ञान तंत्रज्ञान मंत्रीमहोदयांना बॉम्बे नाव खूप चांगले आहे, हे बोलण्याची काय गरज होती ? ते भाजपचे खासदार म्हणून जम्मू येथून निवडून येतात. ते ना महाराष्ट्राचे ना गुजरातचे. मग त्यांनी आयआयटीच्या नावात मुंबई केले नाही हे चांगले झाले, मी खूश आहे, म्हणायची गरज काय होती ? दिल्लीहून त्यांना असे बोलायला मुद्दाम कोणी सांगितले होते का ? मराठी लोक अस्मितेच्या प्रश्नांत अडकले की अमराठी लोकांना आकर्षित करता येईल असे भाजपचे समिकरण आहे का ?

जितेंद्र सिंह यांना मुंबईचा इतिहास ठाऊक नाही आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी लोकांनी दिलेला लढाही ठाऊक नाही. एकशे सात हुतात्म्यांनी रक्त सांडल्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे हे त्यांना माहिती नसावे. मुंबईत येऊन त्यांनी मराठी माणसाला दुखविण्याचे काम केले आहे. पंडित नेहरू, मोरारजी देसाई, स. का. पाटील अशा साऱ्या काँग्रेस दिग्गजांचा विरोध असताना त्यांना धडा शिकवून संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईसह महाराष्ट्र मिळवला आहे. मुंबईत आंदोलकांवर लाठीमार, गोळीबार झाला, रक्ताचे सडे पडले, त्यानंतर नेहरूंना मुंबई ही मराठी भाषिक जनतेची राजधानी म्हणून देणे भाग पडले. तेव्हा काँग्रेसने मराठी माणसाला शत्रू मानले आता जितेंद्र सिंह पुन्हा तोच अजेंडा राबवणार आहेत का ?

भाषावार प्रांत रचना करताना मुंबई कोणाची ? हा वाद टीपेला पोचला होता. मुंबई हा संपूर्ण देशाला आकर्षित करणारी नगरी आहे. मंबई नगरी बडी बांका असे म्हटले जाते. कुलाबा, धाकटा कुलाबा, मुंबादेवी, माझगाव, परेल, माहीम, वरळी अशा सात बेटांची मुंबई बनली आहे. मुंबादेवीवरून मुंबई हे नाव पडले आहे. पोर्तुगिजांना व नंतर ब्रिटीशांना मुंबई असे नाव उच्चारता येत नव्हते म्हणून बॉम्बे म्हणू लागले. उत्तर भारतीयांना मुंबई म्हणताना त्रास होतो म्हणून ते बम्बई म्हणू लागले. मुंबईचा इतिहास फार मोठा आहे. पण बॉम्बे नावाला काहीही अर्थ नाही, तेच नाव केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना गोड वाटते याचेच आश्चर्य वाटते. निदान असे वादग्रस्त वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम किंवा सांस्कृतिकमंत्री आशिश शेलार यांना फोन करून विचारायला तरी पाहिजे होते. आपल्या बेताल विधानाने आपण राज्याच्या मुख्यमंत्र्याना अडचणीत आण आहोत, याचेही भान जितेंद्र सिंह यांना नसावे याचे आश्चर्य वाटते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी भाषा व मुंबई विषयी कमालीचे अभिमानी होते. कैसे हो आप, तबियत कैसी है ? असे कोणी विचारले की, ते संतापून म्हणत काय रे…. , आईला विसरास काय ? मराठीत बोल ना… एकदा ते म्हणाले- माझ्याकडे कोणी आला आणि मुंबई ऐवजी बॉम्बे बोलला की त्या मी ताबडतोब थांबवतो. बॉम्बे नाही, मुंबई बोल , नाहीतर पुन्हा इथे यायचे नाही, पाऊल ठेऊन देणार नाही, तिथल्या तिथे फटकावतो…. छगन भुजबळ आता राष्ट्रवादी काँग्रेसमधे जाऊन बसलेत, त्याला विचारा गेट वे इंडियाला जो मुंबईचा फलक लागला आहे ना, त्याचं उदघाटन मी केलं आहे… भुजबळ महापौर असताना…

जितेंद्र सिंह यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी बॉम्बेचे मुंबई करण्यासाठी विधिमंडळापासून ते संसदेपर्यंत जो लढा दिला, त्याची जरी माहिती घेतली असती तर त्यांना मुंबईचा व्देष व बॉम्बेचा पुळका आलाच नसता. बॉम्बे किंवा बम्बई नव्हे मुंबई यासाठी राम नाईक यांनी जीवाचे रान उठवले होते. राम नाईक हे हाडाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आमदार असताना ते गोरेगाववरून लोकल ट्रेनने चर्चगेटला उतरून विधान भवनात येत असत. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. मुंबईकरांचा विधिमंडळातील व संसदेतील आदर्श लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा आहे. सात दशकांच्या सार्वजनिक जीवनात सर्वसामान्य लोकांच्या भावनेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. राम नाईक यांचे वय ९१ पूर्ण आहे, आजही ते सामजिक राजकीय घडामोडींविषयी जागरुक आहेत. राम नाईक हे १९८९ मधे पहिल्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले, तेव्हा सदस्य म्हणन शपथ घेतल्यावर त्याचा मसुदा त्यांच्याकडे वाचनासाठी आला. त्यात राम नायक ( उत्तर बम्बई )असे हिंदीत तर राम नाईक ( नॉर्थ बॉम्बे ) असे इंग्रजीत लिहिलेले होते. त्यांनी लगेचच लोकसभा अध्यक्ष रवि राय यांना भेटून राम नाईक ( उत्तरमुंबई ) , अशी दुरूस्ती करावी असे सांगितले. विशेष नाव सर्व भाषात सारखेच असावे त्याचे भाषांतर होऊ शकत नाही अशी त्यांनी भूमिका मांडली.

गावाचे किंवा शहराचे नाव बदलाचे असेल तर राज्य सरकारचा प्रस्ताव असावा लागतो. महाराष्ट्रात शिवसेना- भाजप युतीचे सरकार आल्यावर राम नाई यांच्या सुचनेनुसार तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी बॉम्बे नव्हे मुंबई असा सरकारचा एकमताने प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. पण केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला. राम नाईक यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर दि. १५ डिसेंबर १९९५ रोजी बॉम्बे, बम्बई ऐवजी मुंबई हेच नाव वापरावे असा अध्यादेश जारी केला. त्यात एक छोटीशी चूक झाली. मुंबई ऐवजी हिंदीत मुम्बई लिहिले गेले. एनडीएच्या काळात राम नाईक १९९९ मधे स्वत: केंद्रीय राज्यमंत्री असताना व गृहखात्याचा अतिरिक्त भार त्यांच्याकडे असताना त्यांनीच २८ मे १९९९ रोजी मुंबई असा सुधारीत अध्यादेश काढला. महाराष्ट्राची अस्मिता राखण्याचे भाग्य आपल्याला लाभले, अशी त्यांनी भावना बोलून दाखवली होती. बॉम्बेचे मुंबई झाल्यानंतरच मद्रासचे चेन्नई, त्रिवेंद्रमचे तिरूअनंतपुरम, कलकत्त्याचे कोलकता अशी नावे सरकारमान्य झाली. राम नाईक हे उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना त्यांच्या आदेशानेच अलाहाबादचे प्रयागराज व फैजाबादचे अयोध्या झाले होते. हा सर्व तपशील स्वत: राम नाईक यांनी जितेंद्र सिंह यांना पत्र लिहून कळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडिया असे न म्हणता, भारत असा उल्लेख करतात याची आठवण राम नाईक यांनी करून दिली आहे.

१९८५ साली मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळवून देण्यात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे वक्तव्य कारणभूत ठरले होते. तेव्हा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाला होता. प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेस यांचे सख्य नव्हते. मुंबई काँग्रेस म्हणजे स्वतंत्र सुभा असल्यासारखा कारभार असायचा. तेव्हा वसंतदादा पाटील म्हणाले – देशातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून मुंबई केंद्रशासित करण्याच्या केंद्रात हालचाली आहेत… वसंतदादांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या हाती कोलीत दिले.

एवढेच नव्हे तर वसंतदादा पाटील म्हणाले – मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत मला महाराष्ट्र कुठेही दिसत नाही…. शिवसेनेने मराठी मुंबईचा नारा घराघरात नेला. शिवसेनेने १३९ जागा लढवल्या व ७४ नगरसेवक विजयी झाले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू असताना, जोपर्यंत आकाशात सूर्य चंद्र आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अनभिषिक्त सम्राट स का पाटील यांनी चौपाटीवरील सभेत केली होती. त्यानंतर मराठी लोकांनी सर्वस्व पणाला लावून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई जिंकली हा इतिहास पुसता कसा येईल ? मुंबई नगरी बडी बांका, इथे कुणीही तंबू ठोका, हे चालणार नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ३० ऑक्टोबर १९६६ च्या शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात बजावले होते. आज तसे बजावणारा कोणी ताकदवान मराठी नेता मुंबई- महाराष्ट्रात नाही….


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

अॅनाकोंडा, गद्दार, अवलाद, अजगर, पप्पू…

रात्र वैऱ्याची आहे, जागा हो…

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading