November 21, 2025
बिहार निवडणुकीत भाजपाला विक्रमी यश मिळवून देणारे रणनीतीकार विनोद तावडे. त्यांच्या चाणक्यनीतीने एनडीएला बहुमत मिळाले आणि बिहारची राजकीय दिशा बदलली.
Home » कोकणचा सुपुत्र , भाजपच्या विजयाचा शिल्पकार
सत्ता संघर्ष

कोकणचा सुपुत्र , भाजपच्या विजयाचा शिल्पकार

मुंबई कॉलिंग – डॉ. सुकृत खांडेकर

देशातील सर्वात मागास आणि गरीब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व जातीपातीच्या समिकरणाने खोलवर पोखरून निघालेल्या राज्यात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याची किमया कोकणच्या सुपुत्राने म्हणजेच विनोद तावडे यांच्या चाणक्यनितीने करून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विक्रमवीर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या डबल इंजिन सरकारला बिहारच्या जनतेने प्रचंड जनादेश दिला असला तरी विजयाचे शिल्पकार पक्षाचे बिहारचे प्रभारी सरचिटणीस विनोद तावडे हे मानले जात आहेत.

डॉ. सुकृत खांडेकर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आश्चर्यकारक निकालाने देशातील सर्वच विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप – जनता दल यु प्रणित एनडीएने २०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला तर राजद- काँग्रेसच्या महाआघाडीला केवळ ३५ जागांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. बिहारमधे भाजपचे सर्वाधिक म्हणजे ८९ आमदार निवडून आले. देशातील सर्वात मागास आणि गरीब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व जातीपातीच्या समिकरणाने खोलवर पोखरून निघालेल्या राज्यात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याची किमया कोकणच्या सुपुत्राने म्हणजेच विनोद तावडे यांच्या चाणक्यनितीने करून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विक्रमवीर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या डबल इंजिन सरकारला बिहारच्या जनतेने प्रचंड जनादेश दिला असला तरी विजयाचे शिल्पकार पक्षाचे बिहारचे प्रभारी सरचिटणीस विनोद तावडे हे मानले जात आहेत. कोकणच्या सुपुत्रानेच आपल्या रणनितीतून बिहारमधे भाजपाला घवघवीत यश मिळवून दिले आहे.

बासष्ट वर्षाचे विनोद तावडे हे संघ परिवाराच्या मुशीतून तयार झाले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनाचा प्रवास सुरू केला. विधान परिषदेवर ते आमदार होते. सन २०१४ मधे मुंबईतील बोरीवली मतदारसंघातून विधानसभेवर आमदार झाले व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधे कॅबिनेट मंत्री झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री , सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांनी काम केले. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी योगदान दिले. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या काळात संघर्ष करून विविध पातळीवर लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची पक्षात प्रतिमा झाली. सन २०१९ विधानसभा निवडणुकीत पक्षातील अनेक दिग्गजांना तिकीटे नाकारली गेली, त्यात विनोद तावडे यांचाही समावेश होता.

कॅबिनेटमंत्री म्हणून काम केलेले तावडे हे निश्चित निवडून आले असते. शिवाय बोरीवली हा तर भाजपाचा भक्कम गड होता व आजही आहे. शेवटच्या क्षणाला आपले तिकीट कापले हा तावडे यांना मोठा धक्का होता. पण ते शांत राहिले. देवेंद्र फडणवीसांनी विनोद तावडे, पंकजा मुंडे आदींची तिकीटे कापली अशी तेव्हा चर्चा होती. पण तावडे यांनी कोणाला दोष दिला नाही, कोणावर टीका केली नाही, उलट तेव्हा बोरीवली मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार सुनील राणे यांचा त्यांनी प्रचार केला. राज्याच्या राजकारणात आपल्याला फारसा वाव नाही हे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी मुंबईहून थेट दिल्ली गाठली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची विद्यार्थी परिषदेत काम करताना असलेली मैत्री त्यांना उपयोगी पडली आणि सन २०२१ मधे नड्डा यांनी त्यांच्यावर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयातील संघटनात्मक जबाबदारी सोपवली.

विनोद तावडे यांच्याकडे पक्षाने हरयाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली होती, हरयाणामधे भाजपची सत्ता आली व त्यांनी आपले मिशन पूर्ण करून दाखवले. जेव्हा त्यांच्याकडे बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी पक्षाने सोपवली तेव्हा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना, बिहार हे भाजपच्या दृष्टीने महत्वाचे राज्य आहे. काहीही करून आपल्याला बिहार जिंकायचे आहे असे सांगितले. महाराष्टात तीन दशके पक्षाचे काम केलेल्या तावडे यांच्यावर बिहारची जबाबदारी हे मोठे आव्हान होते.

सन २०२० मधे बिहारमधे भाजप- एनडीएच्या विरोधात वातावरण होते. तेव्हा भाजपला बरोबर घेऊन नितीशकुमारच मुख्यमंत्री होते. तरीही सन २०२२ मधे नितीशकुमार यांनी भाजपशी असलेली युती अचानक तोडली व राजद व काँग्रेसशी आघाडी करून सरकार स्थापन केले व ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्या सरकारमधे तेजस्वी यादव उपमख्यमंत्री होते. राजदशी पुन्हा एकदा केलेला घरोबा नितीशकुमार यांना मानवला नाही. आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पुन्हा त्यांना राजद- काँग्रेसला जय बिहार केला व एनडीएच्या छावणीत परतले व भाजपला बरोबर घेऊन पुन्हा मुख्यमंत्री झाले.

नितीशकुमार यांच्या धरसोड वृत्तीमुळे पलटुराम किंवा पलटुकुमार अशी त्यांची प्रतिमा झाली होती. अशा अस्थिर वातावरणात विनोद तावडे यांच्याकडे पक्षाने बिहारची प्रभारी म्हणन जबाबदारी दिली गेली. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नितीशकुमार हे इंडिया आघाडीचे प्रमुख नेते होते. ते जरी अधिकृत निमंत्रक नव्हते तरी पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, अशी तेव्हा चर्चा होती, राहुल गांधींना पर्याय नितीशकुमार अशा बातम्या त्या काळात माध्यमातून झळकत होत्या. निवडणुकीला काही महिने उरले असताना ते एनडीएमधे परत आले व भाजपबरोबर राज्यात सरकार स्थापन केले.

एनडीए मधे पाच पक्ष आहेत. भाजप, जनता दल यू, लोकजनशक्ति ( पासवान ) उपेंद्र कुशावह आणि जतीनराम मांझी अशा सर्वांना एकत्र संभाळणे, त्यांच्यात समन्वय राखणे, रूसवे फुगवे दूर करणे, हे काम तावडे यांनी मोठ्या कौशल्याने केले. तिकीट वाटप करतानाही उमेदवारांची निवड विचारपूर्वक करण्यात आली. गायिका मैथिली ठाकूर यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय तावडे यांचाच. त्या भरघोस मतांनी निवडून आल्याच पण नव्या विधानसभेत सर्वात तरूण आमदार आहेत. विनोद तावडे यांनी केलेल्या कामगिरीने भाजप हायकमांड खूश आहे. मोदी, शहा, नड्डा यांचा त्यांनी विश्वास संपादन केला आहे.

जातीपातीच्या व्होट बँक राजकारणातून बिहारच्या मतदारांना बाहेर कसे काढता येईल याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. बिहारमधे सुरूवातीला जातीची समिकरणे एवढी नव्हती मा्त्र लालूप्रसाद यादव याच्या काळात ती खोलवर रूजली. याच राज्यातून जॉर्ज फर्नांडिस हे तर मुज्जफरपूरमधून तर मधु लिमये हे बांका व मुंगेरमधूल लोकसभेवर निवडून आले होते. या नेत्यांना मतदान करताना जातीपातीचा विचार कुणाच्या मनाला शिवलाही नव्हता. त्यांच्या काळात लालू यादव व नितीशकुमार हे विद्यार्थी होते.

यादव- मुस्लिम ही राजदची भक्कम व्होट बँक होती, या बँकेला या निवडणुकीत तडा गेला. तावडे यांनी अगोदरपासून विविध जाती व समाजाच्या नेत्यांबरोबर व प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेतल्या व त्यांच्याशी सुसंवाद राखला. यादव व मुस्लिमांच्या मतांचे विभाजन झाले. त्याचा लाभ भाजप व जनता दल यु ला झाला. भाजपने अनेक यादव नेत्यांना उमेदवारी दिली, त्यातून हा मतदार भाजपकडे वळला.

प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाचा निवडणुकीत मोठा गाजावाजा झाला. बिहारमधील केजरीवाल असा मिडियात त्याचा उल्लेख होऊ लागला. त्यांच्या प्रचारसभाना व रोड शोला मोठी गर्दी लोटत असे. त्यांनी मोदी-शहांवर कडवट टीका केली. पण त्यांच्या टीकेला उत्तर देऊन त्यांना मोठे करायचे नाही अशी रणनिती भाजपाने राबवली. त्यामुळे प्रशांत किशोर यांची प्रतिमा माध्यमांपुरतीच मर्यादीत राहीली.

रफ्तार पकड चुका है बिहार, ही भाजपची घोषणा होती. हाच प्रचाराचा केंद्रबिंदू पक्षाने बनवला होता. प्रचाराची आखणी व नियोजन अचूक होते. त्यात तावडे यांचा मोठा वाटा होता. गेमचेंजर विनोद तावडे या कोकणच्या सुपुत्राला पक्षाच्या हायकमांडकडून बक्षिस काय मिळणार ? राष्ट्रीय सरचिटणीसपदावरून बढती मिळणार की राज्यसभेवर खासदारकी की आणखी काही…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading