जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-९
३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज अंजली कुलकर्णी यांच्या कार्याचा परिचय…
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
आंतरभारती संस्थेची पुणे शाखा विद्यमान अध्यक्ष, साहित्य प्रेमी भगिनी मंडळ या संस्थेची विद्यमान अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेत कार्यवाह ( वार्षिक ग्रंथ पुरस्कार विभाग), सत्याग्रही विचारधारा मासिकात कार्यकारी संपादक म्हणून काम केले, सध्या सल्लागार मंडळ सदस्य, लोकशाही उत्सव संस्थेत कार्यकारिणी सदस्य, शब्दमित्र साहित्य संस्थेची अध्यक्ष या पदांवर अंजलीताई सध्या कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए. ( मराठी साहित्य) एल. एल. बी. झाले असून त्या आज एक प्रसिध्द मराठी स्त्रीवादी कवयित्री /लेखिका म्हणून आपण ओळखतो. आज त्यांची कविता, ललित लेख, अनुवादित कादंबरी, वैचारिक लेख संग्रह व काही संपादित पुस्तके असा साहित्य क्षेत्रात लीलया वावर आहे. आज त्यांची एकूण २२ पुस्तके प्रकाशित आहेत.
ताईंचे शालेय शिक्षण रेणुका स्वरूप शाळेत झाले. साहित्य, भाषा, कविता वाचन, गायनाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. सहावीत असतानाच त्यांनी श्रीमान योगी व मृत्यूंजय या कादंबरीचे वाचन केले होते. सहावीतच ‘माझे आजोबा’ या कवितेला एस. एम. जोशींच्या हस्ते बक्षीस मिळाले होते. जुनी अकरावी नंतर एस. पी. कॅालेजात तत्त्वज्ञान विषय घेऊन ताई बी.ए.झाल्या. महाविद्यालयात असताना प्रा. अनुराधा पोतदार व समीक्षक डॅा. चंद्रशेखर बर्वे यांचेमुळे कवितेकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन ताईंना मिळाला. तेव्हा ताईंनी वयाला सुचतील अशा प्रेमकविता लिहिल्या. बी. ए.नंतर एल.एल.बी. करत असतानाच बॅंक ॲाफ इंडिया मधे ताईंना नोकरी मिळाली. सुमारे ३६ वर्ष ताईंनी नोकरी करत साहित्य सेवा केली व आजही अथकपणे त्या करत आहेत.
आज त्या स्त्री साहित्याचा मागोवा – पाचव्या व सहाव्या खंडाचे काम डॉ मंदा खांडगे, डॉ ज्योत्स्ना आफळे व डॉ. रूपाली शिंदे यांच्यासोबत करत आहेत. डॅा. नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कार्याचा वेध घेणारे ‘अपराजिता’ व ‘अजिंक्य राजा’ हे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्य कर्तृत्वाचा वेध घेणारे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. तसेच लक्ष्मण लोंढे यांच्या ‘देवांसी जिवे मारिले’ या कादंबरीचे संक्षिप्तलेखनही ताईंनी केलेय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राज्यघटना, जपून ठेवू सृष्टी हा बालकविता संग्रह त्यांनी मुलांसाठी केला आहे.
काही व्यक्ती आपले आयुष्य साहित्यसेवेला अर्पण करतात त्यांपैकी अंजलीताई एक. ताईंचा साहित्यिक आलेख पाहाता त्यांचा या क्षेत्रातील लीलया वावर आपल्याला अचंबित करतो. या साहित्य सेवेसाठी ताईंना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ताईंच्या दोन कवितासंग्रहांना राज्य सरकारचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा केशवसुत पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लोककवी यशवंत पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद कुसुमताई देशमुख पुरस्कार, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान शारदा पुरस्कार, तुळसाबाई सोमाणी प्रतिष्ठान हिंगोली यांचा पुरस्कार, कामगार साहित्य परिषद सह्याद्री पुरस्कार, ना.सी. फडके प्रतिष्ठान पुरस्कार, ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठान पुरस्कार, उर्दू साहित्य परिषद शायरा परवीन शाकीर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद , पुणे यांचा राजकवी भा. रा. तांबे पुरस्कार, नारायण सुर्वे साहित्य अकादमीच्या वतीने काव्यसाधना पुरस्कार आणि अन्य ३४ पुरस्कार आजवर अंजलीताईंना मिळाले आहेत.
२०१६ मध्ये दैनिक लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत सामाजिक चळवळीत स्त्रियांचे योगदान या विषयावर लेखमाला प्रसिद्ध झाली होती. इतकेच नव्हे तर ताईंनी हिंदी, इंग्लिश, नेपाळी, गुजराती, उर्दू भाषांमधून अनेक कवितांचे अनुवाद प्रकाशित केले आहेत. तसेच “बदलत गेलेली सही” हा त्यांचा कविता संग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए.मराठी (स्वायत्त) व स.प.महाविद्यालय पुणे येथे अभ्यासक्रमात समाविष्ट होता. ताईंची गेली १० वर्षे एस. एस. सी बोर्डाच्या इ. १० वी च्या इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात ‘ रंग मजेचे रंग उद्याचे ‘ ही कविता समाविष्ट आहे. ताईंचे साहित्यिक योगदान एवढे प्रचंड आहे की त्यांच्या कवितेवर दोन विद्यार्थी पीएच.डी करीत आहेत. एका प्राध्यापिकेची पीएच.डी.पूर्ण झाली आहे.
गेली ३५ वर्षे महाराष्ट्रभर आणि बाहेर कविता व व्याख्याने यासाठी ताईंची भटकंती अथकपणे सुरु आहे. ओळख संविधानाची, कवितेतील बापूजी, स्त्रियांची कविता, कवितेची निर्मिती प्रक्रिया, सामाजिक चळवळीत स्त्रियांचे योगदान, नव्वदोत्तरी मराठी कविता हे ताईंच्या व्याख्यानांचे विषय आहेत. या त्यांच्या व्याख्यानांच्या विषयांवरून ताईंच्या कामाची व विचारांची व्याप्ती आपल्या लक्षात येते. अनेक कवीसंमेलनात अंजली कुलकर्णी हे नाव कायम असते. ताईंच्या कविता सुध्दा निसर्ग, सामाजिक प्रश्न, वेदना मांडणाऱ्या व प्रत्येकाला विचार करायला व बदलायला भाग पाडणाऱ्या अशा आहेत.
अतिशय कष्ट व सातत्याने समाजाभिमुख राहून प्रसिध्दी पराड्.मुख राहून साहित्य सेवा करणाऱ्या या जिजाऊ- सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा ..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
